Friday, December 11, 2015

लोकनेता


मुलुखमैदानी तोफ असलेल्या ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांची 12 डिसेंबर ही जयंती. या महानेत्याच्या आठवणी जागवल्या आहेत साखर क्षेत्रातील तज्ज्ञ आणि ‘इंडियाना सुक्रोटेक पुणे प्रा. लि.’चे संचालक प्रमोदकुमार बेलसरे यांनी. साप्ताहिक ‘चपराक’मधील हा लेख अवश्य वाचा.


आम्हा साखर उद्योगात सक्रिय असलेल्यांना सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी सातत्याने संपर्क होत असतो. महाराष्ट्रात तर ‘सहकार’ गावागावात, खेडोपाडी रूजलेला. सहकाराच्या माध्यमातूनच साखर कारखाने, सुत गिरण्या, दूध संघ, सहकारी संस्था असे भव्यदिव्य प्रकल्प उभे राहिलेले. याच सहकाराच्या माध्यमातून एक साखर तज्ज्ञ म्हणून, साखर कारखान्यांचे मशिनरी उत्पादक म्हणून अनेक दिग्गजांशी गेली अनेक वर्षे मी सतत संपर्कात असतो. महाराष्ट्रातील साखर कारखानदारी आपल्या राजकीय नेत्यांच्या अधिकारात असल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंगे्रस, भारतीय जनता पक्षातील अनेक नेते, मंत्री, ज्येष्ठ समाजसेवक यांच्याशी माझा परिचय आहे आणि म्हणूनच त्यांना जवळून पाहण्याची संधी देखील मला अनेकवेळा मिळाली आहे. त्याचमुळे या राजकीय नेत्यांच्या ठिकाणी असेलेले मोठेपण, कसब, त्यांची विलक्षण बुद्धिमत्ता आणि लोकसंचयाचं रहस्य माझ्या लक्षात आलंय.
असाच कामाच्या निमित्ताने सन 2007 मध्ये माझा दिवंगत  ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथजी मुंडे यांच्याशी संपर्क आला होता. निमित्त होते परळी वैजनाथ येथील त्यांच्या साखर कारखान्याला यंत्रसामग्री पुरवण्याबाबत. त्यावर्षी या कारखान्याला हव्या असणार्‍या यंत्रसामग्रीबाबत रीतसरपणे वृत्तपत्रात टेंडर प्रकाशित झाले. त्यात आम्ही करत असलेल्या यंत्रसामग्रीचा उल्लेख असल्याने आम्ही ते टेंडर घेऊन भरून पाठवले. टेंडर मुंबईला साखर संघात पास होऊन ज्या कोणा उत्पादकाची किंमत सर्वात कमी असेल त्या निकषावर ते काम देण्यात येणार होते. एकदम पारदर्शक व्यवहार होता. प्रत्येक उत्पादकाने आपापल्या उत्पादनाची आपल्याला परवडेल अशी किंमत घालून टेंडर जमा करायचे ही सर्वसाधारण पद्धत असते. ज्या दिवशी मिटींग असते त्यादिवशी सर्वांसमक्ष टेंडर खोलून वर सांगितलेल्या निकषाप्रमाणे कार्यपद्धती होते. तरीपण हे टेंडर ओपन होण्यापूर्वी मुंडेजींची एकदा तरी भेट घ्यावी असे मला वाटले. कारण यापूर्वी मी त्यांच्या कारखान्यात कधीच काम केले नव्हते. शिवाय मला माझ्या उत्पादनाचे वैशिष्ट्य त्यांना विषद करायचे होते. मी केलेल्या अथक, संशोधनात्मक कार्यातून माझे यंत्र कसे वेगळे व कारखान्यास उपयुक्त आहे मला मुंडेजींना सांगायचे होते. म्हणून मी मुंबईला वरळीस्थित त्यांच्या ‘पूर्णा’ या निवासस्थानी गेलो व काही वेळेच्या प्रतिक्षेनंतर मुंडेजींनी मला त्यांच्या कक्षात बोलावले. मी त्यांना माझ्या येण्याचे प्रयोजन सांगितले. त्यावेळी ते ‘पर्चेसर’ खरेदी करणारा व मी ‘सप्लायर’ म्हणजे माल पुरवणारा या भूमिकेत होतो.
जेव्हा मुंडेजींना मी सप्लायर आहे असे कळले तेव्हा ते म्हणाले, ‘‘ मी सप्लायरला भेटत नसतो. माझ्या अंडर सतरा कारखाने आहेत. त्यांच्या प्रत्येक सप्लायरला भेटायला लागलो तर राजकारण केव्हा करायचे?’’ त्यांचे हे वाक्य ऐकताच मी ताडकन उठून उभा राहिलो. ‘‘सॉरी साहेब, मला माहीत नव्हतं. निघतो मी. उगाच तुमचा वेळ व्यर्थ जायला नको’’ असे म्हणून मी जायला वळलो. तोच मुंडेजी म्हणाले, ‘‘आता आला आहात तर बसा बेलसरे’’ आणि मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. साखर कारखाना, त्यातील तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने कारखान्याला होणारे फायदे अशा अनेक बाबींवर आमचा वार्तालाप झाला. मुंडेजी मंत्रमुग्ध होऊन व लक्षपूर्वक माझे बोलणे ऐकत होते. मधूनच ते आपल्या कारखान्यात आणखी काय केल्याने उत्पादन वाढेल, कारखाना सक्षम होईल, त्रुटी दूर होतील या बद्दलही आस्थेने विचारपूस करत होते. या चर्चेत दोन तास कसे निघून गेले ते कळलेच नाही. मुंडेजींशी ती भेट अपूर्व होती. कोणत्याही राजकीय नेत्याने इतका रस घेऊन नवीन तंत्रज्ञानाबद्दल इतकी सखोल माहिती यापूर्वी घेतलेली माझ्या तरी अनुभवात अथवा ऐकीवात नव्हती. राजकारणात सक्रीय असताना देखील, संघर्ष करीत असताना देखील आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गोष्टीचा तपशील ठेवणे, त्याचा बारकाईने अभ्यास करणे व विकासाच्या दृष्टिने पावले उचलने ही मुंडेजींची विचारसरणी, खासीयत मला भावली. या व्यक्तिच्या कारखान्यात काम करायची संधी मिळावी असे मला मनोमनी वाटले व मी तशी इच्छा देखील मुंडेजींना बोलून दाखवली पण आता निकाल साखर संघाकडे होता. त्यात जो सर्वात कमी किंमत घेणारा त्याचीच वर्णी लागणार होती. कारखाना पातळीवर हा व्यवहार होणारा नव्हता नाहीतर ‘लोएस्ट’च्या ऐवजी ‘क्वालीटी’चा देखील निकष लावता आला असता. म्हणून आता सर्व टेंडर ओपनींगच्या वेळीच कळणार होतं पण म्हणतात ना ‘जहॉं चाह वहॉं राह होती है’. मनापासून इच्छा होती म्हणूनच की काय  आमचेच टेंडर लोएस्ट निघाले व परळी वैजनाथ या कारखान्यात काम करण्याची मला संधी मिळाली. टेंडर ओपनींगच्या वेळी मुंडेजींशी झालेली माझी दुसरी भेट. कामाच्या संदर्भातील. एरवी त्यांचा पुण्यातील सहकारी संदीप खर्डेकर याच्याकडील अनेक समारंभात मुंडेजींशी भेट व्हायची पण ती औपचारिक.
यथावकाश त्यांच्या कारखान्यातील आम्ही आमचे काम ठरलेल्या वेळात उत्कृष्टपणे पार पाडले. मशिनच्या उद्घाटनाला स्वत: मुंडेजी जातीने हजर होते. त्यांच्याच हस्ते पूजा करून यंत्र सुरू केले. आज या गोष्टीला सात वर्षे झालीत तरीही तेथील कर्मचारी वर्ग, वरीष्ठ यांच्याशी आमचे स्नेहाचे व सौहार्दाचे संबंध आहेत. त्यानंतरही अनेकवेळा मुंडेजींशी भेट व्हायची. त्यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी माझी जेव्हा प्रथम भेट झाली तेव्हा त्यांना मी माझे भेटपत्र देऊ केले होते. त्यावेळी ते म्हणाले होत, ‘‘बेलसरे आता कार्डची काही गरज नाही. ठेवा ते तुमच्याजवळच. येथून पुढे कितीही वर्षांनी भेटलात तरी मी तुम्हाला नावासकट ओळखेन’’ आणि खरोखरीच जेव्हा जेव्हा ते मला भेटायचे तेव्हा अगदी न चुकता नावाने संबोधायचे. इतका अफाट जनसंपर्क असणार्‍या या नेत्याला ही किमया, इतकी स्मरणशक्ती नक्कीच दैवी देणगीच असावी.
दि. 3 जून 2014 रोजी सकाळी ‘चपराक’चे संपादक श्री. घनश्याम पाटील यांचा फोन आला व त्यांनी मुंडेंजींचे अपघाती निधन झाल्याची बातमी दिली आणि धक्काच बसला. अनेक वर्षाच्या अथक संघर्षानंतर आता कुठे चांगले दिवस आले होते. महाराष्ट्राला मोदीजींच्या राज्यात चांगलेच वजन प्राप्त झाले होते. मुंडेजी ग्रामीण विकास मंत्री झाल्यामुळे बहुजनांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. ग्रामीण विकासाचे, विशेषत: शेतकरी, कष्टकरी यांना न्याय मिळणार होता. खेड्यांचा पर्यायाने देशाचा विकास साध्य होणार होता पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. तसे पाहता अपघात किरकोळ होता, त्यात जीव जाण्याची शक्यतापण कमीच होती पण म्हणतात ना ‘परमेश्‍वर स्वत:कडे दोष घेत नसतो’ म्हणूनच हे अपघाताचं कारण घडलं असावं. मृत्युलाही शेवटी काही कारण असावं लागतं. अनेक मोठ्या अपघातातूनही अनेकजण वाचतात पण येथे उपचाराची देखील संधी मिळाली नाही आणि हा जननायक पाहता-पाहता आपल्यातून निघून गेला. आपली विजयी सभा घेण्यासाठी, आपल्या लोकांना भेटण्यासाठी, त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, मनाशी अनेक स्वप्ने घेऊन देशाच्या भवितव्यासाठी काही ठोस निर्णय घेऊन हा नेता आपल्या ‘कुटुंबात’ परतत होता पण आज ती स्वप्ने फक्त स्वप्नेच राहिलीत. त्या ठोस निर्णयांना आता शब्दात व्यक्त होता येत नाही. खरोखरीच नियतीच्या या करणीने अंतमुर्ख व्हायला होतंय. एक उमदं, बहारदार नेतृत्व अनंतात विलीन झालंय. मराठवाड्यातील तिसरं रत्न हरपलंय. प्रमोद महाजन, विलासराव देशमुख यांच्यानंतर सैरभैर झालेल्या मराठवाड्याला सावरणारा, जनसामान्यांचा आत्मविश्‍वास जागवणारा आणि शेतकरी, कष्टकर्‍यांना आधार वाटणारा दुवा निखळलाय. त्यांच्या अकाली जाण्यानं पालातला शेतमजूर धाय मोकलून रडलाय, पिडलेला शेतकरी हाय खाऊन बसलाय, सहकारी मित्रांना धक्का बसलाय तर बुजुर्ग नेत्यांनाही अश्रू आवरेनासे झाले. असं सर्वसामान्य कुटुंबातून स्वकर्तृत्वावर फुलेलेलं सर्वस्पशी नेर्तृत्व क्वचितच पाहायला मिळतं. येत्या 12 डिसेंबर रोजी मुंडे साहेबांची जयंती. माझ्याकडून व साप्ताहिक ‘चपराक’ परिवाराकडून त्यांना अभिवादन!

- प्रमोदकुमार बेलसरे, पुणे
9822053371

No comments:

Post a Comment