Monday, June 20, 2016

पु. ल. भक्त आणि वास्तवाची जाणीव


साप्ताहिक 'चपराक' २० जून २०१६ 
- राजू परूळेकर
अनेकवेळा आपण अनेक दगडांना शेंदूर फासतो आणि त्याची देव म्हणून पूजा करतो. एखाद्यावेळी तो शेंदूर नखाने किंचित जरी उखडला तरी लक्षात येते की, अरे हासुद्धा दगडच आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पत्रकार आणि लेखक राजू परूळेकर हे सातत्याने असा शेंदूर उखडून अनेकांना उघडे पाडतात. मागच्या आठवड्यात त्यांनी पु. ल. देशपांडे नावाच्या एका लेखकावर अशीच एक ‘फेसबुक पोस्ट’ टाकली आणि त्यावरून वादळ उठले. व्यक्तिपूजा मानणार्‍या देशात विरोधी विचार स्वीकारायचाच नाही असे एक गढूळ राजकारण केले जाते. त्यामुळे परूळेकरांवर अंध पु. ल. भक्तांनी चौफेर हल्ला चढवला. परूळेकरांसारख्या खमक्या पत्रकारावर वैचारिक हल्लाबोल झाल्यानंतर त्यांनीही पु. ल. भक्तांना शिंगावर घेतले. अंधानुकरण करणार्‍या अनुयायांना राजू परूळेकर यांनी दिलेली ही सणसणीत चपराक...

पु. ल. देशपांडे यांच्या भक्तांना मागच्या आठवड्यात पुलंच्या स्मरणार्थ मी लिहिलेलं एवढं बोचले की, त्यांनी फक्त माझा शारीरिक खून करण्याचे बाकी ठेवले. यात डॉक्टर होते, वकील होते, इंजिनिअर होते, संजय मोने यांच्यासारखे कलाकार होते. वास्तवामध्ये मला स्वतःला परत माझी पोस्ट वाचताना मी काय चुकीचे लिहिले होते हे कळले नाही. व्यक्तिश: पुलंविषयी व्यक्तिगत चुकीचे असे मी काही लिहिले नव्हते. त्यांच्या लेखनाविषयी ते कालबाह्य झाले आहे, हे मी लिहिले. त्यांची प्रवासवर्णने भूक्कड आणि कोटीबाज होती, हे मी लिहिले. या मताशी आजही मी प्रामाणिक आहे. याव्यतिरिक्त पुलंनी आणीबाणी वगळता एकदाही टोकदार राजकीय, सामाजिक भूमिका घेतली नाही असं मी म्हटलं होतं. यात अक्षरशः काहीही असत्य नाही. ज्या काळात पुलंचा उदय झाला त्या काळात सरकार नियंत्रित आणि सरकार केंद्रीत माध्यमे उपलब्ध होती. त्या काळात पुलंना भारत सरकारने जवळजवळ वर्षभर बीबीसीमध्ये डेप्युटेशनवर पाठवले होते. भारत सरकारने दूरदर्शन सुरू केल्यावर पु. ल. देशपांडे हे पहिले होते ज्यांनी दूरदर्शनवर जवाहरलाल नेहरू यांची मुलाखत घेतली. या गोष्टी सरकारच्या मर्जीत असल्याशिवाय होतात का? याच काळात पु. ल. पश्चिम जर्मनी, पूर्व जर्मनी, फ्रान्स वगैरे देशात फिरले. यावरून त्यांनी नंतर ‘अपूर्वाई’, ‘पूर्वरंग’ वगैरे प्रवासवर्णने लिहिली आहेत. वास्तवामध्ये त्या काळात शीतयुद्ध सुरू होते. पूर्व युरोपात लेखक, कवी, विचारवंत, शास्त्रज्ञ यांचा अमानुष छळ सुरू होता. त्याचे पडसाद पश्चिम जर्मनी, फ्रान्स इथेही पडत होते. आता पूर्व युरोपात त्या छळ छावण्यांची म्युझियम्स झाली आहेत, मी स्वतः ती पाहिली आहेत. जिज्ञासू तिथे जाऊन पाहू शकतात. हंगेरीतील बुडापेस्ट येथील असेच एक म्युझियम मी जेव्हा पाहिले आणि त्याचे फोटो घेतले तेव्हा माझ्या अंगावर काटा आला. तेव्हाच्या झेकोस्लावियामध्ये (आता झेक आणि स्लोवाकिया असे दोन स्वतंत्र देश झाले आहेत.) वाक्लाव हावेल आणि त्यांच्यासारखे इतर अनेक लेखक, कवी, विचारवंत लढत होते आणि शिक्षा भोगत होते. त्याच काळात ‘चॅप्टर 77’ नावाचा एक जाहीरनामा या सर्वांनी मिळून जाहीर केला. तो काळ होता 1977 चा. जगाच्या पूर्वेकडे अशांतता, दडपशाहीविरुद्ध आंदोलन आणि अमानुषतेची परिसीमा कमी नव्हती. 1963 पासून कंबोडियासारख्या देशात पॉल पॉट या कम्युनिस्ट हुकुमशहाने हाहाकार माजवला होता. त्याने लाखो माणसे मारून कवट्यांचा डोंगर उभा केला होता. हा खरा ‘पूर्वरंग’ होता, ज्याची ‘अपूर्वाई’ पुलंना कधी वाटली नाही. कारण, या सर्व देशांशी भारत सरकारचे चांगले संबंध होते. त्यामुळे भारतातून जाणारे ‘लेखक’, ’कवी’, ’विचारवंत’ हे असेच निवडले जात जे गोड, सुखावह आणि भारतातील लोकांना आनंददायक असे जगाचे वर्णन करतील. अशा वेळेला पुलंसारख्या चतुरस्त्र लेखकाकडून खरे जाणण्याची अपेक्षा करायची नाही तर कुणाकडून करायची, असा माझा सवाल होता. मी रक्तबंबाळ हा शब्द त्या संदर्भात वापरला होता. अनेकांनी मला पुलंची तुलना ’समकालीन जिनिअस’ लेखक, कवी आणि विचारवंतांशी केली म्हणून दुषणे दिली आहेत. आता लेखकाची तुलना समकालीन लेखकांशी करायची नाही, तर काय समकालीन गवंड्यांशी करायची?
खर्‍या लेखकाने प्रवासवर्णने लिहिताना तिथल्या मानवी दुःखाची बाजू प्रथम घ्यावी अशी अपेक्षा असते. आपल्या इथले सरकारच्या मेहरबानीने परदेशात जाणारे लेखक तिथला सरकारी पाहुणचार, ऑम्लेट, निसर्गसौंदर्य आणि सरकारी औदार्य यांचे रसभरीत वर्णन करत असत. पु. ल. देशपांडे यांनी या वर्णनाला त्यांच्या उपजत हजरजबाबीपणाचा वापर करत विनोदाची जोड दिली. परंतु तो ह्युमर हा ब्लॅक ह्युमर नव्हता, ‘पर्सनल इज पॉलिटिकल’ या तत्त्वाला नाकारणारा सर्वांना आवडेल असा टवाळखोर विनोद होता. पु. ल. यांनी लेखक म्हणून जगभरच्या आपल्या जातकुळीच्या सर्व लेखक, विचारवंतांशी केलेला हा बोटचेपेपणा होता.
पण त्यामुळे 90 च्या दशकात ऐतिहासिक सत्य जसजसे समोर आले तसतसे पुलंच्या प्रवास वर्णनातील भूक्कडपणा, बुद्धिमान कोटीबाजपणा आणि सरकारी कल मला जाणवला. मी तसे लिहिले. वर उल्लेख केलेले वाक्लाव हावेल यांना पुढे साहित्याचे नोबेल मिळाले. एवढेच नव्हे, तर झेक आणि स्लोवाकिया वेगवेगळे झाल्यावर ते झेक रिपब्लिकचे अध्यक्ष झाले. वाक्लाव हावेल यांच्यासारखे अनेक होते, पण त्यांचे एकच उदाहरण अशासाठी दिले की, त्यांच्या उदाहरणावरून या चळवळी बरोबर होत्या आणि नैतिकसुद्धा होत्या हे सगळ्यांना समजावे.
त्या काळात भारत सरकारच्या परवानगीशिवाय आणि मर्जीशिवाय लेखकांना असे फिरायला मिळत नसे. त्यामुळे इथल्या जनतेला बाहेरचे जग प्रतिकात्मक रुपात तरी पुलंसारख्या लेखकाकडून समजायला हवे होते अशी अपेक्षा मी केली तर त्यात काय चूक?
1996 मध्ये सेना-भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर पहिला ’महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार (ठाकरेंनी नव्हे!) आणि पाच लाख रुपये परितोषिक म्हणून पु. ल. यांना प्रदान केले. पु. ल. नंतर एकदा भाषणात सहज म्हणून गेले की, ’गुंडही निवडणुकीद्वारे सत्तेत येतात.’ हे एक ऐतिहासिक सत्य होते; मात्र ठाकरे यांनी याला व्यक्तिगत केले आणि ‘झक मारली आणि यांना ’महाराष्ट्र भूषण’ केले’ असे उद्गार जाहीर सभेत काढले. बाळासाहेब ठाकरे यांच्या या विधानानंतर पु. ल. यांनी तो पुरस्कार त्याच्या रकमेसह परत करावा, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली. कवी नारायण सुर्वे यांच्यापासून कवी वसंत बापट यांच्यासह (तेव्हा ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते) अनेकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर तीव्र टीका केली. याउलट पुलंनी ना पुरस्कार परत केला ना बाळासाहेब ठाकरेंवर कोणतीही टीकेची प्रतिक्रिया दिली वा नापसंती व्यक्त केली. वास्तविक पु. ल. यांच्या दातृत्वाने मी स्वतः प्रभावित आहे, ज्याबद्दल मी माझ्या मूळ पोस्टमध्ये कृतज्ञताही व्यक्त केली आहे. पु. ल. देशपांडे यांचं स्थान महाराष्ट्राच्या मनात युती सरकार आणि ‘महाराष्ट्र भूषण’ पेक्षा कितीतरी जास्त वरचं होतं. त्यांच्या एका कृतीने किंवा प्रतिक्रियेने समाजात वैचारिक चैतन्य पसरू शकले असते जे त्यांनी केले नाही. उलट, त्यांनंतर काही काळाने सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पुण्याच्या घरी जाऊन भेटले असता दोघांची अगदी सोहार्दपूर्ण, प्रेमळ गुरुशिष्य (बाळासाहेब ठाकरे यांच्या शैक्षणिक जीवनात पु.ल. देशपांडे त्यांचे गुरू होते) भेट झाली. धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य! याला बोटचेपेपणा म्हणत नाहीत तर दुसरा शब्द सुचवा.
राहिला मुद्दा पुलंचा विनोद कालबाह्य झाल्याचा. जागतिक कीर्तीचे प्रख्यात लेखक, कवी आणि विचारवंत दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी हेच मुद्दे वस्तुनिष्ठपणे आपल्या एका प्रदीर्घ लेखातून मांडले आहेत. त्यांची पुनरोक्ती मी टाळतो. माझी पोस्ट वाचून मेघनाद कुलकर्णी यांनी या गोष्टीची मला आठवण करून दिली. आठवण अशासाठी की, दिलीप चित्रे यांचे वडील पुरुषोत्तम चित्रे ’अभिरुची’ हा अंक काढत असत. पु.लंनी आपल्या लेखनाची सुरुवात जिथून केली त्यात ’अभिरुची’चे नाव अग्रक्रमाने येते. पु.लंच्या विनोदावरील दिलीप चित्रे यांचा हा वस्तुनिष्ठ चिरफाड करणारा लेख प्रसिद्ध झाल्यावर पु.ल. मनातून खवळले आणि अनुल्लेखाने ’अभिरुची’ अंकाचा डिझर्वड् उल्लेख त्यांनी आयुष्यभर टाळला.
व्यक्तिश: माझी पुरुषोत्तम चित्रे यांच्याशी त्यांच्या अखेरच्या काळात भेट झाली. ते मला पत्रेही (पोस्टकार्ड) लिहित. माझा सहावा लेख मी त्यांच्या ’अभिरुची’ या अंकासाठी लिहिला होता, हे मला नीट आठवते. तो अंक आणि त्यांची पत्रे आजही माझ्याकडे आहेत. त्याच्यातील विजीगिषु वृत्ती मला आजही थक्क करते. कारण तेव्हा मी विशीत होतो आणि ते त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात आणि तरीही ते माझ्याकडून आग्रहाने पाठी लागून लेखन करून घेत असत.
हा सारा लेखाजोखा मी एखाद्या पुस्तकाएवढा वाढवू शकतो. पण समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील नेतृत्व करणार्‍यांनी माझा ज्या पद्धतीने उद्धार केला की, पु.लं आणि त्यांच्या भक्तांविरुद्ध असा काय गुन्हा मी केला होता, हा प्रश्न मला पडतो. उलट पु.ल. देशपांडे हे अतिशय विद्वान्, चतुरस्र, हजरजबाबी लेखक होते.
त्यांना भारतीय संगीताची अद्भुत समज होती. ज्यामुळे अनेक थोर गायक त्यानी प्रसिद्धिला आणले. त्यांचे एक लोकप्रियतेचे व दातृत्वाचे युग होते. ज्याचे महाराष्ट्रावर अपार ऋण आहेत त्याला नमन, त्यांचे स्मरण आहेच. त्यांना प्रेमाचा प्रणाम असे मी माझ्या पु.ल. देशपांडे यांच्यावरील पोस्टमध्ये लिहिलं आहे. यात अनादराचा प्रश्न येतोच कुठे?
याउलट शेकडो पु.ल. भक्तांनी माझ्या कामाविषयी, माझ्यावर, माझ्या पुस्तकांची, माझ्या लेखनाची, मी जे काही करतो याची कोणतीही माहिती नसताना अत्यंत शुद्र शेरेबाजी केली (काही अपवाद वगळता). या शेरेबाजीचे सार व बहुसंख्य महाराष्ट्राचे मन, संजय मोने नावाचे कलावंत का कोणीतरी आहेत त्यांनी दोनच ओळीत समर्पक रीतीने व्यक्त केलेले आहे. त्या दोन ओळी संजय उवाच अशा लिहून मी आपला या विषयापुरता निरोप घेत आहे. याउप्पर आपण काय प्रतिक्रिया देता याने माझ्या विचारांच्या ठामपणाला काहीही फरक पडत नाही.
संजय (मोने) उवाच : परुळेकरांनी लिहिलेले कालबाह्य व्हायला हवे असेल तर लगेच ही चर्चा खुडून टाका..

Saturday, June 11, 2016

मी खवय्या पुणेकर !

सुप्रसिद्ध निवेदक आणि पत्रकार सुधीर गाडगीळ यांचं ‘मानाचं पान’ हे पुस्तक शुक्रवार दि. 17 जून रोजी पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेत ‘चपराक प्रकाशन’ कडून प्रकाशित होत आहे. वलयांकित लोक खातात काय? त्यांच्या खाण्याच्या आवडीनिवडी नेमक्या कशा आहेत याबाबत गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखती लेख स्वरूपात या पुस्तकात आहेत. या पुस्तकाचे लेखक सुधीर  गाडगीळ यांचा त्यांच्या खाण्याच्या आवडीनिवडीविषयीचा एक  लेख खास ‘महानगर’च्या वाचकांसाठी देत आहोत. या पुस्तकाचे मूल्य केवळ शंभर रूपये असून त्याच किमतीत वाचकांना घरपोच मिळेल. या पुस्तकाच्या नोंदणीसाठी संपर्क : ‘चपराक प्रकाशन’, पुणे दूरध्वनी : 020 24460909/7057292092
 
खाणं, गाणं, बोलणं हे माझे वीक पॉईंट्स आहेत. खाताना कुणी बोलणारा समोर असेल तर खाण्याला चव येते आणि पदार्थांच्या चवींवर चविष्टपणे टिप्पणी करत खाल्लं तर गप्पांची मैफलही जमते नि खाण्याची रंगत वाढते.
बेसनाचा लाडू फोडता क्षणी मध्ये पांढरट कोरडेपणा असेल तर बेसन नीट भाजलेलं नाही हे क्षणात कळतं. कसदार तुपात आणि जीभेला, टाळूला चिकटलं तर तो बेसन लाडू जमल्याची पावती देता येते. दाण्याचा लाडू आणि पुरणाची पोळी गुळाच्या साथीनंच हवी. उगाच साखरेची पुरणपोळी करण्याचा प्रयत्न करू नये. हॉटेलात मी फार उशिरा म्हणजे कॉलेजच्या पहिल्या वर्षी प्रथम गेलो. तोवर नाश्त्यापासून सणावाराच्या पक्वान्नापर्यंत सारं घरीच बनवलं जायचं आणि आई, आजी, आत्या, पत्नी, कन्या, सून असा गृहिणींचा ताफाच घरी असल्याने, एकत्र कुटुंबात चवींच्या वैविध्याचा आनंद घेता आला.
पूर्वी घरी सकाळचा नाश्ता म्हणजे फोडणीचा भात की, फोडणीची पोळीच असायची. हल्ली हे शिळे पदार्थ मेन कोर्समधले ‘ऍटम’ झाले आहेत. जेवताना चटण्या, कोशिंबीरी, लोणची यांचे नाना प्रकार ताटाची डावी बाजू लढवत तर उजवीकडे एक घट्ट भाजी आणि एक मिक्स किंवा पातळ भाजी असे. तव्यावरचा गरमागरम ‘फुलका’ पानात थेट पडणं, हा आनंददायीच भाग होता.
साधं वरणभात, लिंबू, तव्यावरचा फुलका आणि बटाट्याची ‘काचर्‍या’ भाजी, डावीकडे कैरीचं बारीक फोडीचं रस राखून गोड लोणचं हा मेनू मला कित्येक वर्षे कायमस्वरूपी आवडलेला आहे. भाज्यांमध्ये बटाट्याशिवाय आवडणार्‍या भाज्या म्हणजे कच्च्या हिरव्या टोमॅटोची दाण्याचं कुट घातलेली भाजी, फरसबी, कोबी. बटाट्याचा सालासकटचा काळा मसाला घातलेला रस्सा प्रिय. कधीतरी अळूची पातळ भाजी, चाकवत पातळ भाजी, कैरीची डाळ, कोरडं वरण, मेथी किंवा अंबाडीची गोळा भाजी असल्यास भाकरी अधिक चवीनं खाल्ली जाते. मटकी, चवळी, मसूर, मूग या उसळीही अधूनमधून हव्यात. मुगाची खिचडी आणि पापड असेल तर जोडीला कढी हवीच. गोड पदार्थात गुळाची पोळी; मात्र गूळ कडेपर्यंत भरलेला हवा. पुरणाच्या पोळीपेक्षा पुरण भरलेले तळलेले बेळगावी कडबु लाजबाब. लाडवात मोतीचूर, बेसन, अळीव आणि डिंक केव्हाही खायला आवडतात. गुलाबजाम टाळतो मात्र आम्रखंड आवर्जून खातो.
घर सोडून बाहेरच्या स्टार पार्ट्या, लग्नाच्या जेवणावळी यात मी अजिबात रमत नाही. पनीर आणि कोफ्ता तर पहायला देखील आवडत नाही. भटकतो खूप. त्यामुळे प्रवासातले खाण्याचे थांबे ठरलेले आहेत. मुंबईच्या रस्त्यावर ‘दत्त स्नॅक्स’मध्ये कोथिंबीर वडीसाठी आणि कोल्हापूर रस्त्यावर ‘विरंगुळा’त थालीपीठसाठी रेंगाळणारच. नाशिक रस्त्यावर पुण्याकडून निघाल्यावर ‘कामत’च्या अलीकडे डाव्या टेकडीवरच्या धाब्यावर बडा-मसूर-चवळीसाठी थांबणार. नगर रस्त्यावर सरहदवाडीची भेळ, नारायणगावची मिसळ खाणारंच.
मुंबईत पूर्वी दादरला सेनाभवनजवळ ‘क्रिस्टल पंजाब’मध्ये रात्री हजेरी असे; तर ‘जिप्सी’शेजारी ठरल्यावेळी मिळणार्‍या ठरलेल्या भाज्या उत्साह वाढवणार्‍या. ‘प्रकाश’चा साबुदाणा वडा, ‘आस्वाद’चा कुठलाही पदार्थ, गिरगाव ठाकूरद्वारजवळ ‘विनय हेल्थहोम’ची मिसळ. पुण्यात बेडेकर, दत्त, जोशी, श्री यांची मिसळ तर थाळीसाठी ‘आशा डायनिंग’, देवधरचं ‘जनसेवा भोजनालय’, ‘कृष्णा’त जाणं पसंत करणार. पूर्वी ‘श्रेयस’ जास्त आवडे. सणसांच्या ‘गिरीजा’चा ग्रामीण मेनू (भाकरी-पिठलं-मटकी) तर अधून मधून खायलाच हवा.
घरात कधीतरी दुपारी ‘डकड’ करायची फर्माईश तर जेवणात गोळ्याचं सांबार आठवणार.
माझ्या कॉलेजच्या काळात (बीएमसीसी) ‘रूपाली’चं नाव ‘मद्रास कॅफे’ आणि ‘वैशाली’चं नाव ‘मद्रास हेल्थ होम’ होतं. इथल्या सांबाराच्या चवीत चाळीस वर्षात फरक पडलेला नाही. पुणे शहराबाहेर त्यावेळी वाटणार्‍या लॉ कॉलेजसमोर करंदीकरांची गोडी मिसळ होती तर ‘पुना गेस्ट हाऊस’च्या सरपोतदारांची ‘आमटी’ भुर्रकताना घरची आठवण येई. त्यावेळी लग्नसराईत पुण्यात बुफे पद्धत नव्हती. आचार्‍यानं लग्नसराईत बनवलेल्या जिलब्या नि लाडूच्या पैजेनं जेवणार्‍या पंक्ती उठत. गोड पदार्थाची ‘स्वीट’ नावाखाली हजेरी नव्हती. साखरेचा शिरा फक्त सत्यनारायण पुजेला असे. एरवी लालसर खमंग गुळाचा शिरा दुपारच्या खाण्यासाठी होता. रविवारची सकाळ सगळ्यांनी मिळून ‘पाटा’वर ओले वाल पसरत, बिरड्या सोलण्यात व्यतीत होत असे. ससून होस्पिटलसमोरच्या बिल्डिंगच्या गच्चीवर ‘बादशाही’इतकी चविष्ट थाळी मी अद्याप खाल्लेली नाही. टिळक रोडवरच्या ‘बादशाही’ची घरेलू शाकाहारी ‘थाळी’ खाणेही चुकलं नाही.
नारायण पेठेत सुधीर भटाची कन्याशाळेशेजारची फिशकरी, लालन सारंगची ‘मासेमारी’ किंवा ‘निसर्ग’ची सुरमयी ही मस्त्यप्रेमी मित्रांची आवडती खाद्यस्थळं. जंगली महाराज रस्त्यावरचं ‘कलकत्ता’, सोन्या मारूती चौकाजवळ ‘नेवरेकर’ ही माशांसाठी मस्ट असे. पुण्यात बाजीराव रस्त्यावरचं ‘वाडेश्‍वर’, अपॉलो टॉकीजजवळ खास साऊथ टच चटणी-सांबार देणारं हॉटेल ‘इडली’साठी जायलाच हवं असं. तर मुंबईत रूईयाजवळ  .... चव न विसरता येण्याजोगी! सोन्यामारूती चौकाजवळ किंवा आपटे रोडवर ‘शहाजी पराठा’ इतकी पराठा व्हरायटी अन्यत्र नाही.
मार्झोरीनची सँडवीच, कयानची बिस्किट, काका हलवाईचा कट समोसा, संतोष, पुना, हिंदुस्थानचे पॅटीस हे ट्रीपला निघाल्यावर घ्यायलाच हवेत. शास्त्री रोडवरच्या अभ्यंकरांच्या इडली सांबारची चव आजही स्वीट होमची आठवण देणारी. बिर्याणीसाठी ‘एसपीज्’ किंवा ‘दुर्गा’ बेस्ट. ‘शेतकरी’चं मटण आशाताईंनाही अरवडणारं! अशी खूप खाद्य केंद्रं सांगता येतील. घरचं ताट आता रस्त्यावरंच आलंय. फर्ग्युसन रोड तर खाद्यरोडच झालाय. पुण्यात बायका घरात स्वयंपाक करतात की नाही अशी शंका यावी, इतके खाद्य स्टॉल्स वाढलेत आणि सर्व ठिकाणी पुणेरी खव्वयांची रांगा लावून गर्दी कायम आहे.
खाण्याचे हॉटेल्स आणि पाट्यांचं नातं मात्र पुण्यातच टिकून आहे. ‘आपणास गरम पदार्थ हवा ना, मग उशीर होतो म्हणून काय विचारता?’ किंवा ‘आमच्याकडे सलग चार पराठे खाणार्‍यांना बिल माफ’ अशा पाट्या पुण्यातच दिसू शकतात.
पैजेनं जेवणार्‍या पंक्तींपासून ते नव्या बुफेच्या राज्यात पन्नास-साठ प्रकारच्या जातीच्या खाद्य स्टॉल्सपर्यंत खाण्याचे चोचले पुरवणं पुण्यात कायम आहे आणि एक अस्सल पुणेकर म्हणून नवनव्या चवी शोधणं, मनापासून खाणं नि खाण्यावर बोलणं हे माझ्या व्यग्र दैनंदिनीत कायम आहे.

Thursday, June 9, 2016

‘ग्लोबल इमोशनल वॉर्मिंग’

'साहित्य चपराक' जून २०१६ 


‘ग्लोबल वॉर्मिंग’ म्हणजेच जागतिक तापमानवाढ याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. मानवी प्रगती आणि विकासाच्या अतिरेकामुळे सर्वात भयंकर अशी जी समस्या निर्माण झाली आहे, तिचे नाव आहे ‘ग्लोबल वॉर्मिंग’. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये वातावरणाचे म्हणजेच हवेचे आवरण आहे. या वातावरणामध्ये अनेक प्रकारचे वायू आहेत. यात सर्वात जास्त नायट्रोजन हा वायू आहे. एकूण वातावरणाच्या 78% नायट्रोजन आहे. त्यानंतर ऑक्सीजन, कार्बन डाय ऑक्साईड, हायड्रोजन, इथेन, मिथेन इ. अनेक प्रकारचे वायू वातावरणामध्ये आहेत. याचबरोबर ओझोन हा वायू म्हणजे ऑक्सीजनचा एकच अणू. हाही मोठ्या प्रमाणावर आहे. सूर्याकडून पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण अतिशय उष्ण असतात. ते जर तसेच पृथ्वीवर आले तर पृथ्वीवर जीवसृष्टीचे कोणतेही अस्तित्व राहणे शक्य नाही. इतकी ती किरणे उष्ण आहेत. पृथ्वी भोवतालच्या वातावरणाच्या थराने म्हणजे या विविध वायूंच्या मिश्रणांच्या थराने पृथ्वीभोवती एक संरक्षित आवरण तयार झाले आहे. सूर्याचे किरण प्रथम या आवरणामध्ये शोषले जातात. त्यांची तीव्रता या आवरणामध्ये शोषली जाते आणि तिचे प्रमाण कमी केले जाते. त्यानंतर हे सूर्यकिरण पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टीचे अस्तित्व आणि विकास शक्य झाला आहे. पृथ्वीवरील सजीव जीवसृष्टीचे अस्तित्व केवळ या वातावरणीय आवरणामुळे टिकून आहे.
मानवी प्रगतीचा आणि विकासाचा आधुनिक प्रवास साधारणपणे इ. स. 1600 पासून सुरू झाला असे म्हणता येईल. विज्ञानाचा आद्य जनक गॅलिलिओ हा होता. त्याआधीही काही शास्त्रज्ञांनी वैज्ञानिक पद्धतीचे चिंतन आणि प्रयोग सुरू केले होते; पण गॅलिलिओ, देकार्ते, न्युटन, डार्विन आणि अगदी अलिकडे आईनस्टाईनपर्यंत हा प्रवास वरच्या दिशेने आविरत सुरू राहिला आहे. अजूनही तो विकासाची नवी नवी क्षितिजे गाठतो आहे. साधारण एकोणीसाव्या शतकाच्या सुरूवातीला इंडस्ट्रिलायजेशन म्हणजे यांत्रिक युगाची सुरूवात झाली. विज्ञानाचा मूळ उद्देश मानवाचे दैनंदिन जीवन अधिकाधिक सुखी करणे हा आहे. अगदी अचूक सांगायचे तर शारीरिक परिश्रम कमी करून यंत्रांच्या साहाय्याने अधिकाधिक उत्पादन आणि सेवा कशा निर्माण करता येतील यावर विज्ञानाचा अधिकाधिक भर आहे. मानवाचे शारीरिक कष्ट कमी व्हावेत, तो निसर्गावर, पशूंवर, पक्ष्यांवर व इतर नैसर्गिक घटकांवर कमीत कमी अवलंबून रहावा. त्याऐवजी निसर्गातीलच संसाधने वापरून त्या उर्जेवर चालणार्‍या यंत्रावर आधारित जीवनपद्धती विकसित केली गेली. स्वयंपूर्ण आणि मानवाच्या इच्छेनुसार काम करणारी यंत्रे ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनू लागली. सुरूवातीला मानवाला आवश्यक वस्तू शारीरिक श्रमांद्वारेच किंवा गाय, बैल, घोडा इ. पशूंच्या सहाय्याने चालणार्‍या यंत्रांच्या सहाय्याने बनविल्या जात होत्या. परंपरागत कौशल्ये आणि आवश्यकते इतकेच उत्पादन असे त्याचे सूत्र होते. यामुळे एकूणच मानवी जीवन संथ, निसर्गस्नेही आणि निसर्गावर अवलंबून अशा प्रकारचे होते. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे मानव हा निसर्गाचाच एक भाग बनून जीवन जगत होता. विज्ञानाची प्रगती सुरूवातीच्या काळात धीम्या गतीने होत होती. सुरूवातीला विज्ञानातील शोध आणि उपयोग हे स्थानिक गरजांनुसार आणि स्थानिक परिघामध्ये होते. होता होता उर्जेचा शोध लागला. यामध्ये वीज, वाफ, द्रवरूप इंधन, डिझेल, पेट्रोल, वायू इ. प्रकारचे इंधने आणि त्यांचे भूगर्भातील प्रचंड साठे मानवाला मिळाले. त्यामुळे या इंधनावर चालणारी यंत्रे बनवण्याकडे मानवाचा कल वाढू लागला. यातूनच यंत्रयुगाचा आरंभ झाला.
सुरूवातीला स्थानिक परिघामध्ये आणि अल्प प्रमाणामध्ये सुरू झालेले यांत्रिकीकरण हळूहळू वेग धारण करू लागले. छोट्या छोट्या यंत्रांच्या जागा मोठी मोठी यंत्रे घेवू लागली. उत्पादन क्षमता वाढवताना यंत्राचा आकार वाढू लागला. यंत्राला लागणारी जागा, लागणारी उर्जा, कामगार यांची संख्या वाढू लागली. याचबरोबर उत्पादनांच्या प्रकारामध्ये उभी आणि आडवी वाढ होवू लागली. नवीन नवीन उत्पादने आणि त्यातून नवीन नवीन गरजा वाढू लागल्या. स्थानिक गरजा पूर्ण करून तयार झालेली अधिक उत्पादने इतर ठिकाणी पाठवण्यासाठी वाहतुकीच्या साधनांची गरज वाढू लागली. त्यातून रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक विकसित झाली. पूर्वी मोठ्या नद्या, समुद्रामधून बोटी आणि गलबतांमधून मालाची वाहतूक आणि मानवाचा प्रवास होत होता; मात्र त्यावर एक नैसर्गिक मर्यादा होती. यांत्रिक युगाची पहाट होत असताना उर्जा आणि यंत्राची नवलाई मानवी जीवनाला व्यापून राहिली होती. नवनवीन यंत्रांचे शोध म्हणजे जणू चमत्कारच होते. यांत्रिक युगाआधी स्वयंपूर्ण खेडी अस्तित्त्वात होती. गरजे एवढे उत्पादन स्थानिक पातळीवरच केले जात होते. गावातल्या गरजा गावातच भागत होत्या. बैल, घोडे, गाढव, गाई, म्हशी, शेळी, मेंढ्या इ. पशू मानवी उर्जेची, वस्त्रांची गरज भागवत होते. निसर्गाला देव मानून, निसर्गाशी संतुलन राखून मानव मिळालेल्या जीवनाचा सर्वांगीण उपभोग घेत होता. साहित्य, कला, क्रीडा, ज्ञान, भक्ती, कर्म इ. अनेक मार्गांनी मानवी जीवन अविरतपणे सुरू होते. त्यात जीवघेणी स्पर्धा नव्हती, प्रचंड गती नव्हती; मात्र शारीरिक कष्ट होते. श्रमांशिवाय जगणे शक्य नव्हते. व्यक्ती कुटूंब, समाज, गाव, राज्य, देश अशा विविध पातळ्यांवर समन्वय साधून जीवन जगत होते. रोज सूर्योदयापूर्वी दीड तास ब्राह्मं मुहूर्तावर जागे होणे. पुरूषांनी शेतामध्ये किंवा कौशल्यपूर्ण कामाला सुरूवात करणे. महिलांनी जात्यावर धान्य दळल्यापासून सर्व प्रकारची श्रमाची कामे करणे, अशी दिनचर्या होती. ऋतुचक्र आणि दिनमानाला अनुकूल अशी जीवनपद्धती होती. दीड-दोनशे वर्षापूर्वी ना वीज होती ना दिवे. अशावेळी सूर्यप्रकाशावर आधारित आणि सूर्योदय, सूर्यास्ताशी जमवून घेणारी जीवनपद्धती होती. माणसाबरोबरच निसर्गामध्ये वाघ, सिंह, हत्ती, अनंत प्रकारचे पशू, पक्षी यांचा मुक्त वावर होता. मानवाला या सर्वांपासून भीती होती. मात्र त्यावरही आपली बुद्धी आणि कौशल्ये वापरून तो आनंदाने जगत होता. मानवी जीवन वैयक्तिक अर्थाने परावलंबी मात्र सामूहिक अर्थाने स्वावलंबी अशा प्रकारचे होते. मानवी शहाणपण, बुद्धी, अनुभव यांचा वारसा पिढ्यानपिढ्या पुढील पिढीला समृद्ध करीत होता. माणसाला जरी शारीरिक कष्ट करावे लागत होते. तरी तो भावनिक, मानसिक, बौद्धिक स्तरावर आणि कला, साहित्य, संगीत इ. द्वारे समृद्ध जीवन जगत होता. त्यातच अध्यात्मिक आणि धार्मिक वाटांवरसुद्धा त्याची वाटचाल अखंडपणे सुरू होती. नदी, नाले अखंड वाहत होते. विहिरी, तळी, झरे भरभरून राहिले होते. आवश्यक तेवढे उत्पन्न आणि गरजा मानव आनंदाने भागवत होता. सामुहिक कुटूंबजीवन होते. गाव म्हणजेच एक कुटूंब होते. कुटूंब हे फक्त जवळच्या नातेवाईकांपुरते मर्यादित न राहता गाव, राज्य, देश म्हणजे एक कुटूंब आहे आणि त्यात सर्वांना गुण्यागोविंदाने राहायचे आहे अशी एक उदात्त भावना विकसित झाली होती. सर्वांचा सामुहिक विकास आणि त्यामध्ये प्रत्येकाला स्वत:च्या क्षमतेप्रमाणे प्रगती करायची संधी अशी उर्ध्वमुखी सामाजिक परिस्थिती होती. यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा अजिबात लोप झालेला नव्हता; मात्र व्यक्ती स्वातंत्र्यावर सामाजिक आणि नैतिक बंधने होती. त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याचा बेबंद उच्छाद मांडता येत नव्हता.
यांत्रिक युग आणि आधुनिक विज्ञानाचा विकास होत असताना विविध उर्जांच्या मदतीने यंत्राचा आणि साधनांचा विकास होत गेला. माणसाच्या शारीरिक श्रमाची कामे यंत्रे करु लागली. माणूस निवांत होऊ लागला. नवनवे शोध लागू लागले आणि जीवनाचे सर्व आयाम त्याने व्यापून टाकले. यांत्रिक युगापूर्वी जगाची संख्या (लोकसंख्या) पशू, पक्षी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, रोगांच्या साथी, युद्धे यामुळे आपोआप नियंत्रित राहत होती. निसर्गाची स्वत:ची अशी एक स्वयंभू व्यवस्था एकूणच मानवाचे आणि सजीवसृष्टीचे नियंत्रण करीत होती. मानव त्या व्यवस्थेला अनुकूल अशा तर्‍हेने आपले जीवन जगत होता. त्याने धर्म ही संकल्पना मांडली होती. नैतिक जीवनामध्ये नियम तयार केले होते. सामाजिक आणि सामुहिक जीवनावर बंधने घातली होती. नीती नियमाच्या अदृष्य बंधनामधून सामाजिक जीवनाचे नियमन केले जात होते. विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाने व्यक्तिगत स्वातंत्र्याचा पाया घातला. व्यक्तिने लावलेला शोध, व्यक्तिने सुरु केलेला उद्योग, व्यक्तिचे असामान्यत्त्व, तिचे हक़्क, तिचे अधिकार, व्यक्तिची संपत्ती इ. व्यक्तिकेंद्रीत विचार तीव्र होवू लागले. व्यक्ती हा समाजाचा एक घटक आहे आणि तिचे स्वातंत्र्य आणि अधिकार हे समाजाच्या सर्वकष हिताचा विचार करुनच निश्चित केले पाहिजेत, हा विचार मागे पडू लागला. याउलट व्यक्ती ही स्वयंभू आहे. तिला सर्वप्रकारचे स्वातंत्र्य आणि अधिकार मिळालेच पाहिजेत हा विचार जोर धरु लागला. तिच्या स्वातंत्र्याच्या अधिकारापोटी इतर व्यक्ती आणि निसर्गातील इतर घटक यांचा नाश झाला तरी चालेल; पण तिचे स्वातंत्र्य जपले पाहिजे ही भावना वाढीस लागली. खरेतर समाजाच्या खंडनाला इथूनच सुरुवात झाली. कोणत्याही मार्गाने, एखाद्या व्यक्तिने प्रगती करणे हे भूषण मानले जावू लागले. त्यासाठी त्याने कितीही भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला तरी त्याकडे डोळेझाक करण्यात येवू लागली. विज्ञानाने धर्म आणि नीतिमत्ता यांच्या कल्पना खिळखिळ्या केल्या. नैतिकता आणि सार्वजनिक हीत धाब्यावर बसवले. वैयक्तिक विकास आणि स्वातंत्र्याच्या हितापोटी व्यक्तिला वारेमाप सवलती दिल्या. व्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करताना नैतिकतेची आणि समाजाची व्यवस्था झुगारुन दिली. नैतिकतेची कास पूर्णपणे तोडून व्यक्तिच्या हव्यासाला आणि स्वार्थाला खतपाणी घातले. या सर्वांचा परिणाम असा झाला की माणसांनी वैयक्तिक प्रगती करताना समाज, कुटूंब, निसर्ग यातील सर्व व्यवस्था नासवून टाकली. तिचा परिणाम असा झाला आहे की, गेल्या साडेतीनशे ते चारशे वर्षांत आधुनिक विज्ञानाच्या मार्गाने चाललेली विश्वाची वाटचाल आता सर्वनाशाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. लाखो करोडो वर्षे मानवी जमात निसर्गाशी संतुलन राखत निसर्गस्नेही जीवन जगत आपले अस्तित्त्व टिकवून उभी होती. विज्ञानामुळे आणि अतिरेकी विकासामुळे माणसाने पृथ्वीचेच अस्तित्व धोक्यात आणले आहे. त्याचाच एक परिणाम म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग हा आहे. मानवाने आणि विज्ञानाने आक्रमण केल्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत असून त्यामुळे सर्व नैसर्गिक चक्र बदलून गेले आहे. सर्व प्रकारच्या नैसर्गिक संसाधनांची वारेमाप लूट माणसाने चालवली आहे. निसर्ग माझा शत्रू आहे आणि त्याच्यावर मला विजय मिळवायचा आहे आणि त्यातूनच जीवन सुखी करायचे अशी ही कल्पना आहे. या पृथ्वीवर आणि संसाधनांवर फक्त मानव या प्राण्याचा अधिकार असून सर्व संसाधने फक्त मानवासाठीच आहेत. त्यासाठी इतर सर्व पशू, पक्षी, प्राणी, वृक्ष या सर्वांचा मानवाने नाश चालवला आहे. निसर्गचक्रातील सहा ऋतू वसंत, ग्रीष्म, शिशिर, हेमंत, शरद, वर्षा आपल्याला माहीत होते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हेही ऋतू आपण पाहत होतो; पण सध्या फक्त उन्हाळा आणि पावसाळा हे दोनच ऋतू दिसतात. त्यांचेही वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. मानवाने निसर्गावर केलेले आक्रमण हेच याचे एकमेव कारण आहे. निसर्गाचे आणि नैसर्गिक साधनांचे अमानुष लचके तोडताना आपण स्वत:साठीच खड्डा खणत आहोत आणि आपल्या सर्वनाशाची तयारी करत आहोत हे बेभान झालेल्या माणसाला कळत नाही, अशी परिस्थिती आहे.
‘ग्लोबल वॉर्मिंग’ बरोबरच वाढता दहशतवाद, भ्रष्टाचार, दिवाळे काढणार्‍या विविध देशांच्या अर्थव्यवस्था, बेरोजगारी, विविध देशांतील युद्धे, दंगली, अपघात, घातपात इ. अनंत समस्यांनी संपूर्ण जगाला ग्रासून टाकले आहे. आजमितीला जगातील 193 देशांपैकी 46 हून अधिक देशांमध्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या युद्धे सुरु आहेत. अशा परिस्थितीमध्ये ‘ग्लोबल वॉर्मिंग’बरोबरच ‘ग्लोबल इमोशनल वॉर्मिंग’ हीसुद्धा एक मोठी समस्या बनली आहे. काय आहे ‘ग्लोबल इमोशनल वॉर्मिंग’?
‘ग्लोबल इमोशनल वॉर्मिंग’ म्हणजे जागतिक भावनिक तप्तता. याचा अर्थ संपूर्ण जगातील माणसे भावनिक आणि मानसिक दृष्ट्या तप्त झालेली आहेत. त्यांच्या संवेदना, भावना, मानसिक स्वास्थ्य हे पूर्णत: तापले असून ते नष्ट झाले आहे. संवेदना कोरड्या झाल्या आहेत. ज्याप्रमाणे खतांच्या अतिवापराने जमिनी क्षारपड, नापिक आणि निरुपयोगी होतात त्याप्रमाणे माणसे पूर्णत: कोरडी, निरुपयोगी बनत चालली आहेत. केवळ मरत नाही म्हणून जगणारी करोडो माणसे दिसताना जिवंत दिसतात. मात्र त्यांच्यामध्ये कोणतेही चैतन्य आणि उत्साह नाही. अदृष्य भीतीच्या भयावह सावटाखाली खंगलेले माणसांचे समूहच्या समूह सर्वत्र आहेत. कोणाशी बोलायचे म्हणजे त्याला भीती वाटते. कुणालाही दुसर्‍यासाठी वेळ नाही. एकाकीपणाच्या भयावह जाणिवेने माणसे उद्ध्वस्त झाली आहेत. दिसायला ती बाहेरून अतिशय आकर्षक आहेत; मात्र आतून ती पूर्णपणे पोखरली गेली आहेत. बाहेरुन कितीही प्रगतीचे आणि विकासाचे अवसान आणले तरी आतून ती पूर्णत: ढासळली आहेत. ‘ग्लोबल वॉर्मिंग’मध्ये वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ फक्त मॅटरचा म्हणजे जमीन, पाणी, वातावरण, हिमनद्या, समुद्र यांचाच विचार करतात. पृथ्वीच्या म्हणजे जमिनीच्या तापमानवाढीमुळे निसर्गामध्ये काय परिणाम घडत आहेत यावर संशोधन आणि चर्चा सुरु आहेत. ओझोन या वायूचे आवरण किती पातळ झाले आहे आणि त्यामुळे अतितप्त सूर्यकिरण कसे पृथ्वीचे तापमान वाढवत आहेत यावर मंथन घडत आहे. ओझोनचा थर किती फाटला आहे, त्याचा शोध सुरू आहे. उद्योग, विकास, प्रगती, शहरे, अर्थव्यवस्था यावर ‘ग्लोबल वॉर्मिंग’चे कसे परिणाम घडतील यावर अभ्यास सुरु आहे. ‘ग्लोबल वॉर्मिंग’च्या कारणांची चर्चा करताना त्यावरील उपायांचा शोध सुरु आहे. हे सर्व करताना त्याचा मानवी मनावर आणि आरोग्यावर काय परिणाम घडतो आहे त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. मनुष्य प्राणी म्हणजे यंत्र नाही. यंत्राचा एखादा भाग नादुरुस्त झाला तर तो बाजूला काढून दुरुस्त करता येतो किंवा तो बदलून त्याजागी नवीन भाग बसवून ते यंत्र पुन्हा सुरु करता येते; मात्र मनुष्याच्या बाबतीत तसे करता येत नाही. मानवाचे शरीर ही एक परिसंस्था आहे. शारीरिक अवयवांबरोबरच मन, बुद्धी, चित्त, विविध भाव भावना यांचा घनीभूत अविष्कार म्हणजे मानव आहे. त्याला विविध प्रकारचे विकार आहेत. त्याच्या शरीरावर पंचमहाभूतांबरोबरच पंचकोषांचेही नियंत्रण आहे. तो जे अन्न खातो त्या अन्नाबरोबर येणारे विचार आणि भावना त्याच्या जीवनावर परिणाम करतात. प्राणशक्ती ही माणसाची आधारभूत जीवनशक्ती आहे. नुसती नाकातून हवा ओढून घेवून फुफ्फुसांना ऑक्सिजनचा पूरवठा करणे एवढेच मर्यादित असे प्राणशक्तीचे कार्य नाही. प्राणाचे व्यान, अपान, उदान, समान आणि प्राण असे पाच भाग आहेत. हे प्राणाचे प्रकार अन्न पचनापासून ते आरोग्य सांभाळण्यापर्यंत विविध प्रकारचे कार्य करतात. मन ही तर मानवाला मिळालेली अद्भुत अशी देणगी आहे. विविध प्रकारच्या भावभावना, विचार, ज्ञान प्रकट करण्याचे साधन म्हणजे मन आहे. योग्य अयोग्य मार्गाचे मार्गदर्शन करणारी आणि शुभ अशुभाची जाणीव करुन देणारी बुद्धी मानवी जीवनाच्या संतुलनाचे कार्य करते. त्याही पलिकडे आनंद, सुख, आणि समाधान देणारी एक विशेष उपजत भावना मानवामध्ये कार्य करीत असते. विविध प्रकारचे शारीरिक श्रम सहन करण्याची आणि त्यातून पुन्हा ताजेतवाने होण्याची एक नैसर्गिक व्यवस्था मानवी शरीरामध्ये आहे. त्याचप्रकारे विविध प्रकारच्या भावभावनांचा कल्लोळ निर्माण करण्याची आणि थोपवून धरण्याचीही एक नैसर्गिक व्यवस्था मानवामध्ये आहे. ही सगळी व्यवस्था अतिशय विलक्षण आणि अद्भुत अशी असून ती व्यवस्था जितकी संतुलित तितका मनुष्य अधिक चांगले जीवन जगू शकतो. मनुष्य नैसर्गिकदृष्ट्या एक पशू आहे. शारीरिक आणि मानसिक श्रमांमुळे येणारे ताण सहन करण्याची त्याची एक मूलभूत क्षमता आहे; मात्र त्यालाही एक नैसर्गिक मर्यादा आहे. रबर जसे दोन्ही बाजूनी ताणता येते. ते ताणल्यानंतर काही काळाने पूर्वपदाला येते; मात्र तेच रबर जर सतत ताणत राहिले तर त्याची ताण सहन करण्याची क्षमता नष्ट होते आणि ते तुटून जाते. माणसाचेही तसेच आहे. एका विशिष्ट क्षमतेपर्यंत तो सर्वप्रकारचे ताण सहन करु शकतो; मात्र त्या मर्यादेपलिकडे ताण गेला की मनुष्यही तुटून पडतो. हीच गोष्ट समाज म्हणून, देश म्हणून सर्वांना लागू आहे. विकासाच्या वारेमाप घोडदौडीमुळे एकूणच मनुष्य समाज आणि संपूर्ण विश्वच कोलमडून पडायच्या स्थितीमध्ये आले आहे. याचेच नाव आहे ग्लोबल इमोशनल वॉर्मिंग. संपूर्ण मानव जमात एका भयावह कोलाहलामध्ये गुरफटून गेली आहे. प्रचंड द्विधा मनस्थितीमध्ये सापडली आहे. दिशाहीन झाली आहे. एकीकडे विकासाचे दडपण, जीवनाचा भयावह वेग आणि पूर्णत: अनैसर्गिक जीवनपद्धती यामुळे मानवी जीवन उद्ध्वस्त झाले आहे. मानवाचे रुपांतर आर्थिक पशूमध्ये झाले आहे. मानवी जन्म फक्त पैसे मिळवण्यासाठी, संसाधने गोळा करण्यासाठी आणि मिळेल ती गोष्ट ओरबाडण्यासाठीच झालेला आहे अशी एक सार्वजनिक समजूत झाली आहे. खा, प्या, मजा करा. उद्याचा विचार करु नका. अशी ही चंगळवादी जीवनशैली बोकाळली आहे. फक्त आणि फक्त स्वत:चाच विचार अशी ही स्वार्थी जीवनशैली आहे. तिचा अध:पात इतका झाला की जन्म देणारे आईवडील, नातेवाईक, मित्र, समाज या कुणाचाही मुलाहिजा न ठेवता व्यक्ती अतिशय आत्मकेंद्रीत झाल्या आहेत. कष्ट न करता, नैतिकतेची कोणतीही चाड न ठेवता, इतर कुणाचाही विचार न करता वखवखलेल्याप्रमाणे उपभोगामध्ये लोळणारी माणसे सर्वत्र दिसू लागली आहेत. निसर्ग आणि इतर सजीव यांचा नाश करणारा माणूस स्वत:च्या स्वार्थासाठी दुर्बल आणि वंचित माणसाचा घास घ्यायला कमी करीत नाही अशी परिस्थिती झाली आहे. एका बाजूला हजारो कोटींची माया गोळा करणारे अब्जाधीश वेगाने वाढत असताना उपाशी पोटी मरणार्‍यांची संख्या वाढत आहे. ही विषम स्थिती फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये आहे. जगावर अधिराज्य गाजवणार्‍या अमेरिका आणि युरोपीय देशांनाही या अंदाधुंद विषमतेने ग्रासले आहे. भिकारी, बेरोजगार आणि असहाय्य लोकांची संख्या तेथेही प्रचंड प्रमाणामध्ये वाढत आहे. संपूर्ण जगाचे स्वामी म्हणून मिरवणारी अमेरिकाही इतकी भयग्रस्त झाली आहे की एखादा अपघात किंवा बॉंबस्फोट झाल्याची बातमी आली तर काही तासातच सारे जनजीवन ठप्प होते. माणसे स्वत:ला सुरक्षित ठिकाणी कोंडून घेतात. इतर जगातील हजारो निरपराध माणसे अतिरेकी हल्ल्यात किंवा उपासमारीने मेली तरी त्याचे प्रगत राष्ट्रातील नागरिकांना काही सोयरसुतक नसते. मात्र त्यांच्या नागरिकांना जरा काही झाले तर ही राष्ट्रे आकाशपाताळ एक करतात. संपूर्ण जगातील एकूण नैसर्गिक संसाधनाच्या 50% हून अधिक संसाधने प्रगत राष्ट्रातील 10% नागरिक फस्त करतात आणि जगाला शांतीच्या, सहानुभूतीच्या आणि मानवी अधिकाराच्या गप्पा सांगतात. केवढा हा दांभिकपणा!
या सगळ्या बाबी समजून घेताना एक गोष्ट प्रामाणिकपणे लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे निसर्गाकडे देखील स्वत:ची अशी एक परिपूर्ण संतुलन व्यवस्था आहे. मानव निसर्गातील सर्व घटकांचे लचके तोडत असताना, मानव सोडून सर्वांचा नाश करीत असताना निसर्गही शांत बसलेला नाही. भूकंप, त्सुनामी, दुष्काळ ही त्याची नैसर्गिक प्रकोप रुपे आहेत. त्याचबरोबर दहशतवाद, भ्रष्टाचार, युद्धे हा सुद्धा निसर्गाच्या संतुलन योजनेचा भाग आहे. माणूस जसा निसर्गाला पोखरुन काढत आहे तसा निसर्गसुद्धा माणसाला आतून पोखरुन काढत आहे. मानव निसर्गावर बाहेरुन हल्ला चढवत आहे. निसर्ग माणसाला आतून उद्ध्वस्त करीत आहे. व्यक्तिस्वातंत्र्याच्या अतिरेकातून जन्माला आलेल्या दुष्ट प्रवृत्ती माणसाला आतून नष्ट करीत आहेत. याचे खरे कारण आपण निसर्गत: एक पशू असून आपल्याला मर्यादा आहेत हे आधुनिक विज्ञानवादी मनुष्य विसरला आहे. मला कोणीही काहीही करु शकणार नाही आणि मी सगळ्यावर विजय मिळवू शकतो ही उद्दाम आणि आसुरी विचारसरणी मानवी सर्वनाशाच्या मुळाशी आहे. प्रत्येक प्राण्याची किमान गरज सहज भागू शकेल अशी निसर्गामध्ये व्यवस्था आहे; मात्र हव्यास आणि अधाशीपणा यांचे समाधान करु शकेल अशी कोणतीही व्यवस्था ब्रह्मांडामध्ये कोठेही नाही. मानव स्वत:च्या हव्यासापोटी पृथ्वीचा सर्वनाश करीत आहे; पण पृथ्वी सहजा सहजी ते होऊ देणार नाही. एक तुंबळ युद्ध मानव आणि पृथ्वी यांच्यामध्ये सध्या सुरु आहे.
यावर काही उपाय आहे का? आणि असल्यास तो कोणता? यावर विचार करण्याआधी एक प्रश्न असा विचारला जाईल तो म्हणजे गेली चारशे वर्षे जो विज्ञानवादी विकास केला तो चुकीचा होता का? आता पुन्हा आपण अश्मयुगात परत जायचे का? पुन्हा पशू होऊन जंगलामध्ये राहायचे का? याचे जर खरे आणि प्रामाणिक उत्तर हवे असेल तर ते बहुधा होय असेच आहे. गेल्या चारशे वर्षांचा विकास तपासून पाहावाच लागेल. विकासाचे परिणाम समजून उमजून घ्यावे लागतील. जर एखादी गोष्ट चुकत असेल तर ती चूक स्वीकारुन सुधारणा करावी लागेल. काय व्हायचे ते होऊ द्या, जे जगाचे होईल तेच माझे होईल असा विचार कामाचा नाही. ‘ग्लोबल इमोशनल वॉर्मिंग’चा विचार करताना माणसाला पुन्हा एकदा स्वत:ला कुटुंबाशी, समाजाशी आणि निसर्गाबरोबर जुळवून घ्यावे लागेल. व्यक्तिस्वातंत्र्याच्या अतिरेकावर नियंत्रण घालून उपभोग आणि विकासाला संयमाचे बांध घालावे लागतील. स्वत:मधील माणूस जगवावा लागेल. हे करताना त्याला निसर्गातील सर्व घटकांबरोबरचे संबंध पुन:र्स्थापित करावे लागतील.
एका बाजूला विज्ञान आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांचा उदो उदो करीत असताना जग धार्मिक आणि आध्यात्मिक विश्वाचा आधार घेत आहे ही वस्तुस्थिती आहे. अत्यंत भांबावलेल्या आणि गोंधळलेल्या अवस्थेतील माणसाचा विज्ञानावरील विश्वास डळमळीत होत आहे आणि तो धार्मिक विचारांकडे ओढला जात आहे. माणसाला कुठल्यातरी मानसिक आणि भावनिक आधाराची सतत गरज असते. तो यंत्रासारखा फक्त उत्पादन करणारा परंतु पूर्णत: भावनाशून्य असा राहू शकत नाही. तो आधार त्याला कुटुंब देते, नातेवाईक, समाज देतो. आज माणसाकडे सर्वकाही आहे; मात्र समाधान नाही असे दिसून येते. याचे कारण समाधानाची जी साधने विज्ञानाने उपलब्ध करुन दिली आहेत ती एकतर पूर्णत: कुचकामी आहेत किंवा त्यांची उपयुक्तता मर्यादित आहे. ती साधने सार्वकालिक सुख आणि आनंद देवू शकत नाहीत. तसेच सर्वांना एकत्रितरित्या सुख देवू शकत नाहीत. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. तो सर्वांबरोबर राहणारा कुटुंबवत्सल प्राणी आहे. त्याला त्याची सुख-दु:खे वाटण्यासाठी इतर माणसांची आणि निसर्गातील घटकांची गरज आहे, आजचा माणूस इतका असंवेदनशील झाला आहे की, इराक युद्ध चालू असताना प्रगत राष्ट्रातील लोक बिफ खात टीव्हीवर माणसे मरताना एन्जॉय करत होती असे सांगितले जाते. आपले आई बाप भारतात मरण पावले तर त्यांची उत्तरक्रिया करायला येण्यासाठी परदेशातील मुलांकडे वेळ नाही, अशी परिस्थिती झाली आहे. कारण त्यामुळे नोकरी जाण्याची भीती आहे. प्रत्येक गोष्ट स्वार्थामध्ये आणि पैशामध्ये अशी गुंडाळून टाकली गेली आहे आणि त्याचे निर्लज्ज समर्थन करताना कुणाला काहीही वाटत नाही. उत्तरदायित्त्व, कृतज्ञता या गुणांना तिलांजली दिलेल्या माणसाला आता जागे होण्याशिवाय गत्यंतर नाही. माणसाने आपल्या भावभावना, नैतिक मूल्ये चिरडून टाकली आहेत. त्याचाच परिणाम सर्व प्रकारच्या विनाशाकडे माणसाला घेवून जात आहे. ‘ग्लोबल इमोशनल वॉर्मिंग’चा सामना करताना माणसाला निसर्गाबरोबरचे भावनिक आणि मानसिक बंध पुन्हा निर्माण करावे लागतील. फक्त विकास आणि आर्थिक गोष्टी यांना प्राधान्य न देता भावना, नाती आणि जीवनमूल्ये यांना प्रथम प्राधान्य द्यावे लागेल. जीवनाची गती कमी करून जीवनशैलीची लय संथ करणे हे सर्वात आवश्यक आहे. मनाचे स्थिरीकरण आणि संतुलन हे यावरचे उपाय आहेत. स्वत:च्या आतल्या आवाजाबरोबर संवाद साधून मला नक्की किती गरज आहे, माझ्या शरीराच्या क्षमतांच्या मर्यादा किती आहेत आणि माझ्या आनंदाचे नक्की विषय कोणते आहेत याचा शोध घेतला पाहिजे. मी बाह्य वस्तूंवर, यंत्रांवर आणि यंत्रणांवर किती अवलंबून आहे आणि हे बाह्य अवलंबित्व कसे कमी करता येईल याचा आढावा घेतला पाहिजे. सर्वांगिण विकास म्हणजे नक्की काय आणि तो किती करायचा आहे याची व्यक्तिगत योजना आखली पाहिजे. यासाठी व्यक्तिने, समाजाने, देशाने अंतर्मुख होवून स्वत:चीच परीक्षा केली पाहिजे. आपली जीवनदृष्टी बाह्य जगताकडून वळवून ती आतल्या दिशेला वळवली पाहिजे. आपल्या बुद्धीबरोबरच इतरांच्याही  हृदय आणि मन यांचा सन्मान केला पाहिजे. स्वत:चे आणि समाजाचे भावनिक आणि मानसिक पोषण केले पाहिजे. अनिर्बंध स्वातंत्र्याला लगाम घालून जीवनमूल्ये आणि आदर्शांच्या प्रतिष्ठापनेला स्वत:हून सहकार्य केले पाहिजे. हे वाटते तितके सोपे नाही. ही एक तुंबळ लढाई आहे परंतु मानवाच्या अस्तित्वासाठी ती अतिशय आवश्यक आहे.  कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र, शेजारी, समाजातील इतर घटक यांच्याशी सतत संवाद करीत राहिले पाहिजे. मनातील गोष्टी, विचार आणि भावना इतरांबरोबर सतत बोलत राहणे आणि इतरांच्या संवादातही मनापासून सहभागी होत राहणे गरजेचे आहे. खरंतर ‘ग्लोबल इमोशनल वॉर्मिंग’बरोबर सामना करायचे तेच एक उत्तम शस्त्र आहे. इतरांबरोबर कोणत्याही प्रकारची तुलना न करता, हव्यास, पळापळ थांबवून भोगवादी जीवनशैलीचा त्याग करून हे साध्य करता येईल. जीवनाचे, जीवनशैलीचे आणि मनाचे सुयोग्य कंडिशनिंग करणे हा ‘ग्लोबल इमोशनल वॉर्मिंग’वरचा उपाय आहे. निसर्गामध्ये सतत अनंत घडामोडी घडत असतात. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती तरी प्रकारचे आनंद दडलेले असतात. त्यांचा शोध घेणे, त्यांचा आस्वाद घेणे आणि जीवनाचा शांतपणे संथ लयीमध्ये उपभोग घेणे ही कला साध्य करावी लागेल. बाहेरचे अवलंबित्व कमी करणे यानेच हे साध्य होईल. हे अवघड आहे; पण अशक्य नाही. थंड करून खावे अशी एक म्हण आहे. त्याप्रमाणे जीवन थंड करून, शांत करून, संथ करून त्याचा आनंद घ्यायला हवा. ज्यांना हे कळते त्यांनी ते आचरणामध्ये आणले पाहिजे. ‘ग्लोबल इमोशनल वॉर्मिंग’बरोबर लढण्याची ती पहिली पायरी आहे. अन्यथा ‘ग्लोबल वॉर्मिंग’बरोबर ‘ग्लोबल इमोशनल वॉर्मिंग’मध्ये सारी मानव जात होरपळून जाण्याचा धोका आता अगदी समोर उभा ठाकला आहे, हे नक्की.        

-प्रा. क्षितिज पाटुकले 
९८२२८४६९१८ 
'साहित्य चपराक' जून २०१६

Tuesday, June 7, 2016

डाव मांडियेला

राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय सांस्कृतिक विभाग प्रमुख, भारतीय स्त्री विद्या निकेतनच्या अखिल भारतीय अध्यक्षा आणि भारतातील 23 प्रतिष्ठानांच्या सल्लागार सुशीला माधव महाजन यांचे ‘डाव मांडियेला’ हे पुस्तक पुण्यातील ‘शिल्पा प्रकाशन’कडून प्रकाशित झाले आहे. या पुस्तकातील एक प्रकरण खास ‘साहित्य चपराक’च्या वाचकांसाठी...


1955 व 1956 मध्ये श्री. मधुकरराव घरी नव्हतेच. गोवा आंदोलनामुळे ते कधी सावंतवाडी, बेळगाव, बांद्रा, पुणे असे सारखे फिरत होते. मलाही नुसते मॅट्रिक असून चालणार नव्हते. राजकारणी लोकांचे जीवन अस्थिरच. तेव्हा शिक्षिकेच्या नोकरीसाठी किमान एस. टी. सी. (सेकंडरी टीचर्स कोर्स) करणे जरूर होते. माझी नणंद मनु व आम्ही दोघींनी पुण्याला रमणबाग शाळेतून या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. मी वर्षभर पुण्याला राहिले, पण आमच्या सासूबाईंच्या आजारपणामुळे त्या व नाना मुंबईला माझ्या मोठ्या दिरांकडे राहायला गेले होते. विद्या वर्षाची होती. आम्ही दोघी व नवीन लग्न झालेले धाकटे दीर व जाऊबाई असे आम्ही राहत होतो. जाऊबाईंचे नुकतेच लग्न झाल्यामुळे त्यांचे सासरी-माहेरी जाणे-येणे चालू होते. त्यामुळे लहान मुलगी, घरकाम व अभ्यास ही माझी कसरत होती; मात्र मनु वन्संची मला खूप मदत होई. माझा पाठ असेल तेव्हा त्या विद्याला सांभाळत. जाऊबाई जेव्हा असत तेव्हा त्यांचीही मदत होई. काही वेळा मला असे वाटे की हे सर्व सोडून द्यावे, पण ते क्षणभरच. कारण आमच्या देशसेवेवर संसार भागणार नव्हता. त्यामुळे हे सर्व करणे अटळ होते. आमची वार्षिक परीक्षा ज्या दिवशी संपली त्याच्या तिसर्‍या दिवशी मनु वन्संचे लग्न होते. घरात खूप पाहुणे मंडळी जमली होती. स्वयंपाकाला बाई वगैरे कोणी नव्हते. सर्व घरातच करावे लागे. पुन्हा त्या काळी लाडू, चिवडा वगैरे सर्व फराळाचे घरीच करण्याची पद्धत असे. ते सर्व दुपारी, माझ्या सख्ख्या व चुलत जावा मिळून करीत. त्यामुळे परीक्षेहून आल्यावर मी एवढ्या माणसांच्या पोळ्या करीत असे. आमच्या सासूबाईंनाही आमच्या शिक्षणाचे महत्त्व असल्यामुळे त्या मला म्हणत, ‘हे पाहा, आता तुम्ही दोघी जेऊन अभ्यासाला जा.’ अशा प्रकारे आमची परीक्षा झाली व मला दुसरा वर्ग मिळाला.
आता आम्ही बनामा हॉल लेनमधल्या पोटमाळ्यावरून भुलेश्‍वरला जरा बर्‍यापैकी जागेत राहण्यास आलो होतो. जयहिंद इस्टेट म्हणून पाच मजली इमारतीत संघाची एक पाच खोल्याची सदनिका होती. त्यातले स्वयंपाकघर खूप मोठे होते. त्या स्वयंपाकघरात संघाचे एक कार्यकर्ते श्री. पेंढारकर राहात असत. ते संसारी होते. त्यांना दुसरीकडे जागा मिळाली, त्यामुळे आम्ही तेथे राहावयास गेलो. त्याचवेळी जनसंघाच्या कामाला काळबादेवीचे कार्यालय लहान पडू लागल्याने नवे कार्यालय शोधण्याचे काम सुरू होते. मुंबईभर सभा-बैठका घेणे, परगावचे दौरे व त्यातच कार्यालय शोधणे असा सारखा पायाला भिंगरी लावल्यासारखा यांचा कार्यक्रम होता. आज गावोगावी असलेली भाजपची सुसज्ज कार्यालये पाहून माझे मन अगदी भरून येते. त्यावेळी खूप शोधाशोध केल्यानंतर कथ्थकभवनमध्ये जागा मिळाली. आजही भाजपचे ते कार्यालय आहे. श्री. मारूतीराव आवटे तेथे राहत होते. त्यांचा तेथेच पुठ्ठ्याची खोकी बनवण्याचा व्यवसाय होता. तेथील जागा त्यांनी जनसंघाच्या ऑफिससाठी दिली; मात्र त्याबद्दल कधी कुरकूर किंवा प्रौढीही त्यांनी मिरवली नाही. ज्यावेळी जनसंघातून ह्यांना बाहेर पडावे लागले त्यावेळेला मात्र एकदाच हे असे म्हणाले की, ‘ती जागा मिळवताना मी काय सहन केले आहे ते मलाच माहिती; म्हणून निदान झाडू मारण्याचे काम जरी मला तिथे दिले, तरी ते मी आनंदाने करेन.’ तो एक वेगळाच अध्याय आहे. ओघाने मला तो पुढे सांगावाच लागणार आहे.
काश्मीर सत्याग्रहातून हे परत आल्यानंतर तर कामाच व्याप खूप वाढला. तेवढ्या त्या धावपळीत त्यांनी हिंदीच्या परीक्षा देणे सुरू केले. त्याला कारणही तसेच होते. काश्मीर सत्याग्रहाला जाण्यापूर्वी त्यासंबंधी गिरगाव चौपाटीवर मोठी सभा झाली. जाणार्‍या तुकडीला निरोप समारंभ होता. सर्वांची भाषणे हिंदीत झाली. पुण्याच्या लोकांना अजिबातच हिंदी येत नव्हते. ह्यांना निदान बंबई हिंदी तरी येत होते. ह्यांचे सभेत हिंदीतून भाषण झाले आणि त्यांना हे जाणवले की, अखिल भारतीय पदावरच्या कार्यकर्त्याला हिंदी यायलाच पाहिजे; पण तेव्हा परीक्षा देण्यास वेळ नव्हता. तशी तीन महिने तिकडे आग्रा जेलमध्ये त्यांना हिंदी बोलण्याची सवय झाली होती; पण तेवढ्यावर समाधान मानण्याचा ह्यांचा स्वभाव नव्हता. कोणतीही गोष्ट पूर्ण आत्मसात केल्याशिवाय खरे काम होत नाही. जे काम हाती घेतले असेल ते पूर्णत्वास न्यावयासाठी करावे लागणारे सर्व श्रम ते घेत असत. माझ्यासारखा जुजबी किंवा कामचलाऊपणा त्यांना मुळीच खपत नसे. त्यावरून आमचे अनेकदा खटके उडत.
ओघाने आले म्हणून सांगते, समितीची माझ्यावर मुंबई प्रदेशातील चार जिल्ह्यांची जबाबदारी आली तेव्हा ह्यांचे म्हणणे असे की, ह्या सर्व भागातील सर्व शाखांवर तुला एकेकदा तरी जायला हवे. तर खरे कार्यवाहिका पद; नाहीतर नुसतेच नावाला. गुजरातची मी पालक अधिकारी झाले, तेव्हाही ह्यांचे म्हणणे, आधी गुजरातची भौगोलिक, ऐतिहासिक माहिती तू गोळा कर. त्याचा अभ्यास कर. त्यासाठी सर्व गुजरात एकदा फिरून ये. गुजराथी भाषा शिक. मगच हे काम स्वीकार. माझ्यासारख्या नोकरी करणार्‍या, दोन लहान मुली असलेल्या संसारी बाईला हे कसं शक्य आहे? पण त्यांना ते मुळीच पटत नसे. मग शेवटी मी त्यांना म्हणे, ‘तुमचे संघाचे काम पुरूष करतात, त्यामुळे त्यांची पद्धत वेगळी आहे; आमची वेगळी आहे.’ असा संवाद आमचा अनेकदा होत असे. पुढे-पुढे असे काही मला सांगण्याचे त्यांनी सोडून दिले. त्यांच्या मुली मात्र अगदी तंतोतंत त्यांच्याप्रमाणे दीर्घोद्योगी झाल्या. त्याचे उदाहरण म्हणजे, चि. विद्याचे पीएचडी आणि चि. सुषमाचा उद्योगधंदा. मलाही मनातून त्यांचे ते म्हणणे पटे, पण माझा स्वभाव!
असो. आता आमचा गृहस्थाश्रम भुलेश्‍वर जयहिंदमध्ये सुरू झाला. तिथली चार-पाच वर्षे काही वेगळाच अनुभव देऊन गेले. ते दिवस झपाटलेले होते. तिथे स्वयंपाकघर सोडून उरलेल्या खोल्यांमध्ये श्री. बापूराव लेले व ‘नवभारत टाईम्स’चे श्री. मिश्रा हे कायम राहणारे होते. पण संघाचे प्रचारक, जनसंघाची नेते मंडळी येऊन जाऊन सतत असत. त्यात काही विद्यार्थी म्हणजे विश्‍वनाथ दाबके, जयंत भागवत सारखे माझ्याहून थोडेफार वयाने लहान असणारेही असत. तेथे माझा वेळ कसा जाई ते कळत नसे. जनसंघाची ती सुरूवातीची वर्षे होती. पक्ष सर्वार्थाने लहान होता. कार्यकर्ते, नेतेही यांच्याच बरोबरीचे असे तरूण होते. दीनदयाळजी, अटलजी, जगन्नाथरावजी, प्रभाकर पटवर्धन, बच्छराजजी व्यास, प्रेमजीभाई असर, सुंदरसिंग भंडारी, कुशाभाऊ ठाकरे आणि असे कितीतरी कार्यकर्ते जयहिंदवरच उतरत आणि त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था मला करावी लागे. मी जो काही आमटी-भात करीत असे तो सर्वजण प्रेमाने खात असत. बाहेर खाणे कोणालाच परवडणारे नव्हते. माझ्याकडे जेऊन ही मंडळी बैठकीसाठी चालत जात होती. टॅक्सीसुद्धा परवडत नव्हती.
जेवणाबद्दल अटलजींची एक आठवण मला नेहमी आठवते. ते आंब्याचे दिवस होते. हे सर्व सात-आठ जण जेवायला होते. मी आमरस केला होता. वाटीत रस व पानात पुर्‍या वाढल्या. अटलजींना समजेना हा खायचा कसा, कशाबरोबर? मराठी मंडळींनी त्यांना सांगितले, पुर्‍या रसाबरोबर खा. पण त्यांना काही ते जमेना. शेवटी सर्व रस त्यांनी भातात कालवून खाल्ला.
तसेच दीनदयाळजींचीही एक आठवण माझ्या चांगली स्मरणात आहे. त्यांचा मुक्काम जयहिंदवर होता. रोज सभा-बैठका चालूच होत्या. अशाच एके दिवशी हे दोघेजण सकाळी अकरा वाजता घरी आले. आधी जेवायला येणार आहेत याची मला कल्पना नसल्याने माझा कार्यक्रम सावकाश चालू होता. हे मला म्हणाले, ‘हे बघ, अर्ध्या पाऊण तासात आम्हाला जेऊन बाहेर जायचे आहे. लवकर स्वयंपाक कर.’ घरात काहीच भाजी नव्हती, टॉमेटो होते दोन-तीन. खाली पाच जिने उतरून भाजी आणणेही शक्य नव्हते. कांदा घालून टोमॅटोची कोशिंबीर, वरणभात, पोळ्या केल्या आणि त्यांची पाने वाढली. पहिलाच घास दीनदयाळजींनी घेतला आणि ते म्हणाले, ‘क्या आप बम्मन है ना? तो प्याज खाते है?’ मला इतके शरमल्यासारखे झाले. त्यानंतर ते मुकाट्याने जेवले. मात्र कोशिंबीर खाल्ली नाही. हे नंतर मला बोलले, ‘आपण दुपारच्या जेवणात कांदा कधी खातो का? मग हे काय केलेस?’ मी म्हणाले, ‘अहो तुमच्या पानावर काय वाढू? फक्त आमटी भात? मलासुद्धा लागले आहे; पण अर्ध्या तासात भाजी उत्पन्न कुठुन करू मी?’ या जेवणाखाण्यावरून आणखी एक आठवलं. श्री. बाळशास्त्री हरदास हे मुंबईला प्रवचनांना येत असत. मुंबईला आल्यावर त्यांचे एक-दोन वेळा तरी आमच्याकडे जेवण असे. त्यांचे प्रवचन आटोपल्यावर रात्री साडे अकरा-बाराला ते जेवत. त्यांना मसाले भात, भजी वगैरे चमचमीत जेवण लागे. त्यांच्याबरोबर पुष्कळ वेळा दामुअण्णा टोकेकर असत. दोघेही विदर्भातले. त्यामुळे जेवणाच्या बाबतीत त्यांचे चांगले जमत असे. रात्री चार-पाच जण तरी जेवायला असत.
अनेकजण अनेकदा जेवायला असत. मला तशी फारशी स्वयंपाकाची सवय नव्हती व आवडही नव्हती; पण सवयीने जमू लागले. विशेषत: मसालेभात छान जमत असे. त्यामुळे कोणी जेवायला येणार म्हटल्यावर त्यांचे म्हणणे असे की, मसालेभात कर. एकदा असेच हे सर्वजण दुपारी बैठकीला व नंतर जाहीर सभेला जायचे होते. अटलजींना खूप ताप भरला होता. त्यामुळे ते घरीच झोपून होते. अटलजी दुखण्याला फारच हळवे होते. तेव्हा ते मला म्हणाले, ‘सुशिलाजी निंबू जरा भूनकर (भाजून) उसमें शक्कर और नमक डालकर मुझे देना!’ मी तसे करून त्यांना दिले. नंतर ते म्हणाले, ‘असे नको, सरबत करून द्या.’ त्यानंतर ते म्हणाले, ‘नुसतेच पाणी द्या.’ एकूण काय ही मंडळी रात्री सभेहून येईपर्यंत ना अटलजींना स्वस्थता, ना मला! सारखे नाचवत होते. आता हा प्रसंग ते विसरूनही गेले असतील. याउलट ‘दीनदयाळजींचे!’ त्यांना डिसेंट्री झाली होती. पंधरा दिवस तशाच स्थितीत ते व मधुकरराव मुंबई व ठाणे जिल्ह्यात प्रवास करून आले. घरी आल्यावर मग ते म्हणाले, ‘ताईजी आज मुझे केवल खिचडी खानी है।’ मी का? म्हणून विचारले तेव्हा समजले की, त्यांना पंधरा दिवस डिसेंट्रीचा त्रास होतो आहे. हे बरोबर असून यांनासुद्धा कल्पना आली नाही. कमालीचा सहनशील व शांत माणूस. बच्छराजजी व्यास जेवायचे असले म्हणजे त्यांना वैश्‍वदेवाची सर्व तयारी करून द्यावी लागे. अगदी पहिल्यांदा जेव्हा ते आमच्याकडे जेवायला आले, तेव्हा ते मला वैश्‍वदेव करायचा आहे असे म्हणाले. हे माझ्या तोंडाकडे बघू लागले. मी मात्र चटकन त्यांना हो म्हणाले आणि एका लहानशा कढल्यात निखारे घालून दिले. एका ताटलीत भात, त्यावर तूप घालून त्यांना दिले. ते एकदम खूश झाले आणि मला म्हणाले, ‘तुला कशी ही माहिती?’ त्यावर मी त्यांना, माझ्या माहेरी रोज वैश्‍वदेव असतो हे सांगितले. माझे वडील शेवटच्या दुखण्यात आजारी पडेपर्यंत रोज वैश्‍वदेव करीत असत. तसे माझ्या माहेरी फारसे कर्मकांड नसे पण सर्व सणवार, ूुजाअर्चा व्यवस्थित होत असे. त्याचे अवडंबर किंवा सोवळेओवळेही फारसे पाळले जात नसे. मात्र आम्हाला त्या सर्वांची माहिती आहे.
या सगळ्या धबडग्यात माझी समिती शाखा कधी चुकली नाही. हे बाहेर गेले, की मी माझ्या कामाला मोकळीच असे. त्याबाबतीत या सर्वच मंडळींचे मला सहकार्य मिळत असे आणि यांनीही मला कधी असे म्हटले नाही की, ‘आधी घरातले सर्व कर आणि मग समितीकार्य कर.’ एकदा जगन्नाथराव जोशी वगैरे मंडळी मीटिंग आटोपून रात्रीपर्यंत जेवायला येणार होती. यांनी दोन-तीन जण येतील असे सांगितले की मी चार-पाच जणांचा स्वयंपाक करीत असे. मी सर्व स्वयंपाक करून यांची वाट पाहत बसले. साडे आठ झाले तरी कोणी आले नाही. माझी रात्री साडेनऊला गिरगावात एक बैठक होती. शेवटी नऊ वाजेपर्यंत या लोकांची मी वाट पाहिली. नंतर ताट, वाट्या, भांडी सर्व मांडून ठेऊन व स्वयंपाक झाकून ठेऊन विद्याला घेऊन मी बैठकीला गेले. त्यानंतर मंडळी दहा वाजता घरी येऊन जेवली, असे मला दुसर्‍या दिवशी बैठकीहून घरी आल्यावर समजले आणि विशेष म्हणजे जगन्नाथराव मला म्हणाले, ‘सुशिला, मला हे तुझे फार आवडले. आमची जेवणाची सर्व तयारी करून ठेऊन तू आपल्या कामाला गेलीस. हे फार चांगले झाले.’ इतकेच नाही तर त्यांनी हे माझे उदाहरण कामाच्या बाबतीत अडचणी सांगणार्‍यांना बैठकीत सांगितल्याचे समजले.
मला खरोखरच या सर्व लोकांची खूप मदत झाली. माझी सकाळी कामाची गडबड असली की, विद्याला बापूराव लेले अनेकदा सांभाळत. या सर्वांचा सकाळचा चहा व नाश्ता चाले, त्यावेळी मी विद्याला तेथे नेऊन सोडत असे. सर्वांना तो एक विरूंगळाच वाटे. तिला खेळविण्यात अटलजी, दीनदयाळजी वगैरे सर्वजण सहभागी असत. तीही तेथे छान रमत असे. विद्याला अटलजी अजूनही विसरले नाहीत. मुंबईत स्काऊट ग्राऊंडवर जनसंघाचे अधिवेशन होते. विद्या त्यावेळी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होती. तेव्हा अटलजींनी ह्यांना, विद्याला घेऊन येण्याबद्दल मुद्दाम सांगितले. ते म्हणाले, ‘अभी तो विद्या बहोत बडी हो गई होगी। लेकर आओ उसे एक दिन।’ आणि त्याप्रमाणे हे तिला अधिवेशनात घेऊनही गेले होते. पुढे विद्याच्या पुस्तकाचे प्रकाशनही अटलजींच्या हस्ते झाले तेव्हा अटलजींना फार कौतुक वाटले.
तसाच आणखी एक प्रसंग. पं. सातवळेकरांना नव्वद वर्षे पूर्ण झाली म्हणून मुंबई विद्यापीठाच्या सभागृहात त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम होता. बहुधा संघ प्रेरणेतूनच हा कार्यक्रम आयोजित केला असावा. संघाचे वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. आम्ही पण गेलो होतो. विद्या लहान म्हणजे अडीच-तीन वर्षांची होती. पहिल्या रांगेत आम्ही बसलो होतो. पहिली दहा पंधरा मिनिटे ती स्वस्थ बसली आणि कार्यक्रम सुरू झाल्यावर तिची चुळबूळ, गडबड सुरू झाली. मला अगदी चोरट्यासारखे झाले, पण आबाजी थत्त्यांच्या लक्षात आले की मी नाईलाजाने, नाराजीने तिला घेऊन बाहेर जाण्यासाठी ऊठते आहे. ते चटकन पुढे आले आणि मला म्हणाले, तू बस. आम्ही सांभाळतो तिला आणि विद्यापीठाच्या लॉनवर मोरोपंत पिंगळे आणि बाबा या दोघांनी तिला उत्तम सांभाळले. मध्येच मी बाहेर डोकावले तो ते दोघेजण तिच्याबरोबर चक्क चणे खात होते.
दुसरा प्रसंग : 1954, 55 साल असेल काश्मीर सत्याग्रहानंतर पं. प्रेमनाथ डोग्रा मुंबईत आले होते. त्यांची मुंबईत मोठी मिरवणूक निघाली होती. ही मिरवणूक गिरगावातून निघणार होती. माझी खूप इच्छा होती त्या मिरवणुकीत भाग घेण्याची. त्यांना ओवाळण्यासाठी मला जायचे होते. काश्मीरसाठी झगडणार्‍या या वयोवृद्ध नेत्याला डोळे भरून पहावे, असे फार फार वाटत होते; पण जाणार कशी? विद्या अगदीच लहान, सहा-सात महिन्यांची होती. माझी मैत्रीण आणि समिती सेविका सौ. सुशीला कशेळकर हिला मी माझी अडचण सांगितली. तेव्हा ती फणसवाडीत राहत होती. ती चटकन म्हणाली, ‘हे सांभाळतील तिला.’ आणि राजाभाऊ काशेळकरांनी त्या सहा महिन्यांच्या मुलीला तीन-चार तास आनंदाने सांभाळले. खरोखरच हे लोक, अशी प्रेमाने मदत करीत म्हणूनच मी समितीचेही काम करू शकले व आल्या-गेल्याचेही दहा वर्षे माझ्याकडून झाले तेवढे काम केले. भारतीय जनसंघाची व संघाची मंडळी माझ्याकडे येत. त्यामुळे भोवतालच्या समाजातल्या व राजकीय घडामोडींचीही मला माहिती होत असे. अगदी शांतपणे विषय समजावणार्‍या दीनदयाळजींचा आवाज सहसा चढत नसे. अटलजींचा आग्रही आवाज मात्र कधी कधी खोलीबाहेर ऐकू येई. गंभीर विषय चालू असतानाही कधीकधी मध्येच जगन्नाथराव खसखस पिकवत असत. जेवणे मात्र नेहमी हसत खेळत पार पडत असत.
'साहित्य चपराक' जून २०१६ 


Sunday, June 5, 2016

असुर सूर्य : असुर संस्कृती

- संजय सोनवणी
'साहित्य चपराक' जून २०१६ 

जगातील सर्वात प्राचीन संस्कृती कोणती? देवांची का असुरांची? असुर संस्कृती जवळपास अर्धे जग व्यापलेली संस्कृती होती याचे निर्णायक पुरावे आपल्या हाती आहेत. तुलनेने देव-संस्कृती अर्वाचिन. ब्राह्मण ग्रंथातही असुर व देव हे प्रजापतीचीच अपत्ये असून असुर थोरले असे स्पष्ट निर्देशीले आहे. ऋग्वैदिक देवता वरुण, अग्नी, इंद्रादि यांना आरंभीच्या ऋग्वेद काळात आदरार्थी देव नव्हे तर असुर हे संबोधन वापरलेले आहे; पण असुर संस्कृतीची पुरातनता पाहायला आपल्याला फक्त ऋग्वेद अथवा पुराणांवर अवलंबून राहण्याचे कारण नाही. पारशी धर्मग्रंथ अवेस्ता ते असिरिया भागातील अवशेष व त्यांचे इष्टिकालेख आपल्याला आता पुरावा म्हणून उपलब्ध आहेत. त्यावरून आपण असुर संस्कृतीच्या पुरानत्वाची आणि व्यापकतेची माहिती घेऊ शकतो. आज भारतात तरी असुर ही संज्ञा अत्यंत बदनाम झालेली असून पुराणातील असुरांच्या मूळ कथांचे विकृतीकरण केले गेल्याने आज असुर म्हटले की दुष्ट, मायावी, मनुष्यघातकी, नरभक्षक इ. वाईट बाबीच मनात येतात; पण आपण पुरातन वास्तव पाहिले तर मात्र आश्चर्याचा धक्का बसल्याखेरीज राहणार नाही. वस्तुत: असुर संस्कृतीची व्याप्ती भारत, पर्शिया (इराण-अफगाणिस्तान) ते सुदूर मेसोपोटेमिया व इजिप्त येथवर असल्याचे स्पष्ट पुराव्यांनिशी दिसून येते.
असिरियन संस्कृती (असुरांची संस्कृती) ही मुळातच अस्सूर (अशुर/अशिर) या शब्दापासून बनली आहे. अस्सुर शहर हे टायग्रिस नदीच्या पश्चिम किनार्‍यावर वसलेले होते. त्याचे अवशेष आजही इराकमध्ये पाहायला मिळतात. हे शहर इ. स. पू. 2600 मध्ये वसवले गेले. अस्सुर ही या नगराचीच नव्हे तर असिरियन लोकांची प्रमुख देवता होती. असिरियन राजांच्या नावातही असुर हा शब्द सामाविष्ट असे. जसे असुर बनीपाल, पुझुर असुर, असुर उबालित, अशुर निरारी वगैरे. असुर ही असिरियनांची मुख्य देवता होती व राजा हा असुराचा प्रतिनिधी म्हणून राज्य करत असे. म्हणजे खरा राजा असुरच (म्हणजे सूर्य) आहे व त्याच्यातर्फे मानवी व्यक्ती राज्य करते अशी संकल्पना असिरियनांची होती.
असुर म्हणजे सूर्यदेवता. किंबहुना सूर्यालाच असिरियन असुर असे म्हणत असेही स्पष्ट दिसते. असुर देवतेच्या प्रतिमांतही पंख पसरलेली सूर्य देवताच दर्शवली जाते. तो असिरियन पुराणकथांत देवांचा देव आहे, पर्वताचाही देव आहे आणि असुर शहराचाही देव आहे. याच्या सन्मानार्थ असिरियात अनेक मंदिरे बांधली गेली. अगदी ख्रिश्‍चन काळातही असिरियनांनी असुरपूजा सोडली नाही.
असुराबरोबरच असिरियन लोक अन्य देवताही पुजायचे. किंबहुना प्रत्येक शहराची स्वतंत्र नगरदेवता असायची, जसे आपल्याकडे आजही प्रत्येक गावाला व नगराला गावदेव अथवा गावदेवी असते तसेच. या देवतांत अनू, बल, एन्लिल, इश्तार, नाना (सिन) वगैरे देवता होत्या. एका अर्थाने एक मुख्य देवता मानत बहुदेवतावादही असिरियन देवतात होता असे स्पष्ट दिसते. असिरियन साम्राज्य सत्ताधारी वंश बदलत गेले असले तरी इसवी सनाच्या सातव्या शतकापर्यंत टिकले.
इजिप्तमधील ओसिरिस (ओसायरिस, औसिर, असिरी) ही परिवर्तन, पुनरुत्थान, जन्म आणि मृत्युची देवता मानली जाते. अगदी आपल्या शिवासारखीच. असुर या शब्दाचेच हे इजिप्शियन भाषेतील रुप आहे. ओसिरिसला आकाश, भूमी किंवा सूर्यदेवताराचे अपत्य मानले जाते हेही येथे उल्लेखनीय आहे.
असुर आणि सूर्य यातील संबंध येथे आपल्या लक्षात आला असेलच. असिरियनांसाठी असुर हा सूर्यच आहे तर काही इजिप्शियन पुराणकथांनुसार तो सूर्यपुत्र आहे. हे साम्य येथेच संपत नाही. ऋग्वेदानुसारही असुर हे सूर्याचेच एक नाव आहे. खालील ऋचा पहा:
पश्यन्नन्यस्या अतिथिं वयाया रतस्य धाम वि मिमेपुरूणि।
शंसामि पित्रे असुराय शेवमयज्ञियाद्यज्ञियं भागमेमि॥
(ऋ. 10.124.3)
दविधा सूनवो असुरं सवर्विदमास्थापयन्त तर्तीयेनकर्मणा।
सवां परजां पितरः पित्र्यं सह आवरेष्वदधुस्तन्तुमाततम॥ 
(ऋ. 10.56.6)
उक्षा समुद्रो अरुषः सुपर्णः पूर्वस्य योनिम पितुर आ विवेश।
मध्ये दिवो निहितः पर्श्निर अश्मा वि चक्रमे रजसस पात्य अन्तौ॥
(ऋ. 5.47.3)
पतंगमक्तमसुरस्य मायया हर्दा पश्यन्ति मनसाविपश्चितः।
समुद्रे अन्तः कवयो वि चक्षते मरीचीनाम्पदमिछन्ति वेधसः।
(ऋ. 10.177.1)
या ऋचा व ऋग्वेदात विखुरलेले अन्य संदर्भ यावरुन लक्षात येते की वैदिकांच्या दृष्टीनेही असुर ही मुळची सूर्यदेवताच होती किंवा सूर्यालाच ते असुरही म्हणत असत. असुर देवता निर्मितीचे कारण तर होतीच; पण स्वर्गस्थान व अंतरिक्षही असुरांशीच निगडित होते. वैदिक साहित्यात असुर वीरांना ‘स्वर्गाची मुले’ म्हटले गेले आहे.  असुर आणि सवितृ यांचे सोन्याच्या हातांचे असे वर्णन 1.35.9-10 या ऋचांमध्ये करण्यात आले असून सवितृ हे सूर्याचेच एक नाव आहे हे आपल्याला माहीत आहे व अनेक ठिकाणी सवितृलाही असुर हे संबोधन वापरले गेलेले आहे. असुर हे सूर्यपूजक होते असे 10.177 या ऋचेवरुन एस. कल्याणरमणही म्हणतात. असुर हे समाज म्हणून सूर्यपूजक व असुर हे संबोधन म्हणून सूर्यनिर्देशक असाच याचा अर्थ दिसतो. पतंग हा शब्द येथे सूर्याचे नाव म्हणून वापरला आहे. ऋग्वेदात सूर्याला अनेक नावे असली तरी सुपर्ण असेही एक नाव आहे व ही नावे असुरांकडेच निर्देश करतात असे डॉ. मालती शेंडगे यांनी सप्रमाण दर्शविले आहे.
वैदिक साहित्यात सूर्यालाच असुर म्हटले जात होते हे वाचून धक्का बसणे स्वाभाविक आहे; पण हे एवढ्यापुरते मर्यादित नाही. वैदिकांनी नंतर असुरांना बदनाम करण्याची मोहीम काढली असली तरी त्याची कारणे सर्वस्वी सांस्कृतिक/धार्मिक संघर्षात आहेत; पण आरंभीचा वैदिक धर्म हाही असुरकेंद्रितच होता हे वरुण-इंद्रादि देवतांना आरंभी ‘असुर’ हे संबोधन आदरार्थाने वापरले आहे यावरून सिद्ध होते.
अहुर माझ्दा (सं. असुर-मेधा) हा झरथुस्ट्री धर्माचाही एकमात्र ईश्वर. देव हे या धर्मात दुष्ट, पापी मानले जातात. अहुर हे असुर शब्दाचे पर्शियन रुप होय. अहुर माझ्दा हा विश्वनिर्माता व वैश्विक न्यायाचा रक्षणकर्ता असून त्याचा सर्वसाधारण शब्दश: अर्थ उच्चबुद्धिमत्तेचा, शक्तीशाली असा घेतला जातो. अहुर माझ्दाच्या धर्माची पुनर्स्थापना झरथुस्ट्राने उत्तर अफगाणिस्तानात ऋग्वेदाच्या समकालीन (इसपू 1500) केली. म्हणजे झरथुस्ट्राच्या पूर्वीही हा धर्म होताच परंतु त्यात अनेक अपप्रथा घुसल्या होत्या. त्या दूर करत झरथुस्ट्राने संदेष्ट्याच्या भूमिकेत जात अहुर माझ्द्याचा खरा धर्म लोकांना सांगायला सुरुवात केली. यात अहूर माझ्दा हा श्रेष्ठ ईश्वर असून ते सूर्याचेच एक नाव आहे. जरथुस्ट्री धर्मात प्रार्थना या अग्नी (सूर्याचेच एक रुप) किंवा सूर्यासमक्षच म्हटल्या जातात. झुर्वेनाइट ही झरथुस्ट्री धर्माचीच एक शाखा आहे. ही शाखा सूर्यालाच अहुर-माझ्द म्हणते. एवढेच काय पण खोतानी शक हेही अपभ्रंशित रुपात सूर्याला अऊरमाझ्दे म्हणतात. आजही अनेक इराणी बोलीभाषांत सूर्याला ओर्मोझ्द असेच म्हटले जाते हे झरथुस्ट्री धर्माच्या प्रकांड अभ्यासिका मेरी जोइस यांनी दाखवून दिलेले आहे. (इेूलश, चरीू (1983), Aर्हीीर चरूव, एपलूलश्रेरिशवळर खीरपळलर 1, छशु धेीज्ञ: र्ठेीींश्रशवसश  घशसरप झर्रीश्र, िि. 684-687)
असुरांसंबधी अन्य विवेचन करण्याआधी हे विवेचन अत्यंत महत्त्वाचे वाटल्याने आधीच केले आहे. असुर आणि सूर्य यातील अन्योन्य संबंध वाचकांच्या लक्षात एव्हाना आलाच असेल. असुर म्हणवनारे लोक हे भारत ते मेसोपोटेमियापर्यंत पसरलेले होते. असुर हीच त्यांची मुख्य देवता होती. असुर हे सूर्याचेच संबोधन होते. सूर्य हा मानवी जगाचा आदिम काळापासून केंद्रबिंदू असणे स्वाभाविक आहे. काही समाजांनी आपल्या दैवत रचनेत त्यालाच केंद्रवर्ती स्थान दिल्याने त्याच्या भवती जी संस्कृती केंद्रित झाली तीच असुर संस्कृती होय.
सूर्य हा तत्कालिन जगाने अत्यंत गूढमय, रहस्यमय दृष्टीने पाहिला असल्यास नवल नाही. दिवस आणि रात्र ही विभागणी चांगले आणि वाईट याप्रमाणे करत आरंभिक कल्पना तेवढ्याच गूढ पद्धतीने विकसित केल्या जाणे स्वाभाविक होते. असुर या शब्दाची वैदिक व्युत्पत्ती असू: म्हणजे प्राणवान-वीर्यवान या शब्दाला ‘र’ हा प्रत्यय लागून असुर शब्द बनतो असे संस्कृततज्ज्ञ म्हणतात. असुर शब्दाचा खरा अर्थ प्राणवान, वीर्यवान, पराक्रमी असा आहे हे भारतीय संस्कृती कोश (खंड 1, पृ. 337) मध्ये सांगितले आहे परंतु ही व्युत्पत्ती कृत्रिम आहे हे उघड आहे. कारण असिरियन संस्कृतीची भाषा ही सेमेटिक गटातील आहे. या भाषेचा कथित इंडो-युरोपियन भाषांशी काहीही संबंध नाही. असुर, अस्सुर, अशुर, अशेर हे शब्द मानवाच्या आदिम भाषेतील आद्य शब्दसमुहांपैकी एक असले पाहिजेत ज्यांचा भाषागटांशी काहीएक संबंध नाही. डॉ. आ. ह. साळूंखेही असुर शब्दाची व्युत्पत्ती अन्य भाषांतच शोधली पाहिजे असे बळीवंशमध्ये म्हणतात. त्यामुळे असिरियन (अक्काडियन) लोक भारतात आले व त्यांनी सिंधू संस्कृती वसवली किंवा सिंधू लोकांनी असिरियन संस्कृती वसवली असे काही विद्वान (उदा. मालती शेंडगे, रा. ना. दांडेकर) प्रतिपादित करतात त्यात अर्थ नाही. सूर्याला कोणीतरी आधी असुर म्हणाले आणि तो शब्द विविध टोळ्यांत संक्रमित झाला व काही टोळ्यांनी सूर्यकेंद्रित असुर संस्कृत्या जोपासल्या एवढेच फारतर येथे म्हणता येईल. कोणतीही संस्कृती उदयाला आली की, ती विरोधात अथवा स्वतंत्रपणे इतरही संस्कृत्या निर्माण होतात. असुर धर्म आणि वैदिकांचा देव धर्म यात कशी फूट पडली त्यावरून आपल्या लक्षात येईलच. पुढे ऋग्वेदातच असुर हे मुख्य देवतांचे संबोधन गळून पडते आणि असुर हा शब्द कटाक्षाने केवळ शत्रुंसाठी वापरला जावू लागतो. हा सांस्कृतिक संघर्ष आपण पुढे समजावून घेऊ. अहुरमाझ्दा धर्मात असुर हे सृष्ट तर देव हे दुष्ट आहेत हे आपल्याला माहीत आहेच.
किंबहुना सूर्य हा वैदिक शब्द मूळच्या असुर या शब्दावरुनच साधला गेला असावा हे असुर आणि सूर्यामधील अभेदावरून दिसून येते. मग असूर्यचे सूर्य कसे झाले? त्याचे कारण पुरातन सांस्कृतिक संघर्षात आहे. असुरांच्या विरोधात सुर हा शब्द देवासुरांतील झगड्यामुळे निर्माण केला गेला. सुर हा शब्द संस्कृतात कृत्रिम व नंतरचा असून असुर हाच मूळचा शब्द आहे, असुर शब्दातील ‘अ’ हा नकारार्थी नसून असू: या शब्दाला ‘र’ हा प्रत्यय लागून तो शब्द बनला आहे असे डॉ. रा. ना. दांडेकर (वैदिक देवतांचे अभिनवदर्शन, पृ. 43-46) म्हणतात. सूर्य जर सूर या शब्दापासून बनवला गेला असेल तर असूर्य हाच शब्द मुळचा असायला हवा. असुर हा शब्दच मुळात सूर्यवाचक आहे हे आपण पाहिलेच आहे. असूर्य शब्द ऋग्वेदात वेगळ्या संदर्भात, म्हणजे असुरांचे स्थान दाखवण्यासाठी (ऋ. 7.21.7) वापरला गेला आहे हेही महत्त्वाचे आहे. ती ऋचा अशी-
देवाश्चित ते असुर्याय पूर्वे.अनु कषत्राय ममिरे सहांसि ।
इन्द्रो मघानि दयते विषह्येन्द्रं वाजस्य जोहुवन्त सातौ ॥
येथे देव हे पूर्वीचे असुर या अर्थाने घेतले आहेत. देवांनाच पूर्वी असुर म्हटले जायचे याचे भान या ऋचेत दिसते. देव हा शब्दही दिव किंवा द्यौस या शब्दातून आला आहे. त्याचाही अर्थ प्रकाश अथवा सूर्य असाच होतो हेही येथे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे असुरांशी संघर्ष करणार्‍या गणांनी असुर हे नाव टाकत देव हे नाव स्वीकारले खरे पण मुळबोध कायम ठेवला हेच तेथे सुचित होते.
येथे लक्षात घायची बाब म्हणजे आपण मानतो त्याप्रमाणे असुर हा शब्द अवमानदर्शक नाही. तो सूर्यनिदर्शक आहे. मानवाला तेजोमान सूर्य पवित्र, यातुमय, गुढ, जीवनदाता, धीर देणारा, अंधाराला (म्हणजेच अनिष्टलाही) दूर करणारा वाटला नसला तर नवल नाही. हा शब्द (असुर अथवा सूर्य) मूळचा वैदिक नाही. हा शब्द आदिम शब्दसमुहांपैकी एक असून स्थानिक उच्चारपद्धतींप्रमाणे वेगवेगळा जसा उच्चारला जात असे तशाच त्याभोवतीच्या पुराणकथाही वेगवेगळ्या बनल्या असे दिसते. हा शब्द मूळचा अक्काडियन भाषेतील असावा असा डॉ. मालती शेंडगे यांचा कयास आहे तर डॉ. आ. ह. साळूंखे सुचवतात की, असुरांच्या संस्कृतेतर भाषेतच या शब्दाचे मूळ शोधले पाहिजे.
सिंधू संस्कृतीचे लोक आणि मेसोपोटेमियात पुरातन कालापासून व्यापारानिमित्त संबंध होता तसाच तो प्राचीन इराणशीही होता. व्यापारी वस्तुविनिमय जसा दोन संस्कृत्यांत होतो तसाच तो काही शब्द व सांस्कृतिक/धार्मिक संकल्पनांतही होत असतो. त्यामुळे शब्द एका ठिकाणावरुन दुसरीकडे गेला असा अंदाज बांधता येईल; पण कोठून कोठे हा प्रवास झाला हे मात्र सांगता येणार नाही. शिवाय सूर्याचा परिचय मानवी समाजाला लाखो वर्षांपूर्वीच झाला असल्याने त्याला विविध प्रदेशांतील मानवाने काहीना काही नाव दिले असणार व ते प्रचारित झाले असणार हेही तेवढेच खरे. त्यामुळे त्याचे मूळ शोधण्यापेक्षा असुर म्हणजे मूलत: सूर्य एवढे समजावून घेतले तरी असूरांकडे पाहायचा दृष्टिकोन आमुलाग्र बदलायला मदत होईल एवढे नक्की! सिंधू संस्कृतीतील मुद्रांवर सूर्याचे चित्रण केले गेले आहे हेही येथे उल्लेखनीय आहे. सिंधू संस्कृती ही मूळ असुरांची संस्कृती. ते वास्तुकलेत निष्णात होते. या स्मृती मयासुराच्या रुपात पुढेही जपल्या गेल्या.

असुर हे मानवही!
असुरांबाबत अनेक लोकभ्रम आज निर्माण झाले आहेत. असुर ही कोणी काल्पनिक, पुराणकथांनी रचलेली मित्थकथा नाही. असिरियन लोक मानवच होते हे तर स्पष्ट आहे. असुर हा शब्द जसा संबोधन म्हणून वापरला जातो तसाच समुहवाचकही वापरला जातो. असुर हे सूर्याचे जसे नाव होते तसे अनेक मानवी समुदायांचेही होते. प्रत्येक समुदायाची संस्कृती ही असूरकेंद्री असली तरी त्यात स्थानिक देवदेवतांनाही स्थान होते. काही असुर मूर्तीपूजक होते तर काही असुराची अर्चना अग्नीमार्फत  (यज्ञ - यस्न) करायचे. ऋग्वेदात अग्नीलाही अनेकदा असुर म्हटलेले आहे. त्वमग्ने रुद्रो असुर... असे तैत्तिरिय ब्राह्मणातही (3.11.2.2) म्हटलेले आहे. किंबहुना अग्नीला सूर्याच्याच समकक्ष मानण्याची धार्मिक प्रथा होती. भारतातील असुर मात्र लिंगपूजक अथवा शिव-शक्ती पूजक होते. परंतु सूर्याशी संबंधित काही प्रतीके मात्र शिवाशी जोडलेलीच राहिली. उदा. वृषभ, पर्वत, चंद्रकोर. (चंद्र सूर्यपुत्र आहे असा प्राचीन काळी समज होता.)
या असुरांचा धर्म नेमका काय होता हे ऋग्वेद सांगत नाही. झरथुस्ट्री धर्माचे लोक मात्र वेगळ्या पद्धतीचा यज्ञधर्मच पाळत. जे असुर झरथुस्ट्राच्या धर्मात गेले नव्हते ते नेमका कोणता धर्म पाळत याचे विवेचन नसले तरी ऋग्वेदातील अकर्मन (कोणतेही कर्मकांड नसलेले), अब्रह्म (मंत्र नसलेले), अयज्वन, अयज्जु (यज्ञ नसलेले), अव्रत:, अन्यव्रत: (व्रत नसलेले, अन्य व्रत असलेले) असे उल्लेख दास-दस्युंबाबत मिळतात. सर्वात महत्त्वाचा उल्लेख आहे तो शिस्नदेव, म्हणजे लिंगाची उपासना करणारे. यांच्याबाबत तर प्रचंड द्वेष व्यक्त केला गेला आहे.  हे दास-दस्यू असुर संस्कृतीचाच भाग असल्याने ही वर्णने असुरांसाठीचीच आहेत असे म्हणता येईल. परंतु त्यातून सर्व असुरांच्या धर्माचा, धर्मतत्वांचा विशेष बोध होत नाही हेही तेवढेच खरे. तरीही आपल्याला झरथुस्ट्री धर्माची तत्त्वे व उपासनापद्धतीही माहीत आहेत. ती वैदिकांपेक्षा फारशी वेगळी नव्हती. याचे कारण असुर व देवांच्या विशिष्ट सांस्कृतिक इतिहासात दडलेले आहे. असुर व देव हे दोघेही प्रजापतीची संताने होत असे शतपथ ब्राह्मण सांगते. दोघांनाही यज्ञ हवा होता; पण देवांनी यज्ञ पळवला व जो अवशिष्ट वाईट भाग होता तो असुरांसाठी ठेवला अशी कथा येथे येते. झरथुस्ट्री धर्मातही यज्ञ होताच पण त्याला हिणवण्यासाठी हे कथा बनली हे उघड आहे; पण याचा दुसरा अर्थ असाही होतो की एके काळी दोन्ही (देव व असुरही) एकच धर्म पाळत असत. पुढे त्यांच्यात फुट पडली ते बहुदा झरथुस्ट्राने असुर धर्माला नवे स्वरुप द्यायला सुरुवात केल्यानंतर. त्यामुळे सुरुवातीला असूरकेंद्री असलेला वैदिक धर्म असुरविरोधी बनला.
शतपथ ब्राह्मणात अजून एक कथा येते (10.9.3.7-9) ती अशी. सौत्रामनी यज्ञ हा आधी असुरांचाच होता. तो नंतर देवांनी घेतला. म्हणजेच काही असुर घटकांचा कर्मकांडात्मक धर्म यज्ञाभोवती फिरत होता तर काहींचा अमुर्त देवतांभोवती तर काहींचा लिंगपुजा, वृक्षपुजा ते अन्य अनाम देवतांची पुजा या भोवती असे दिसते. त्यामुळे एक संस्कृती असली तरी सर्वांतच मैत्रही नव्हते आणि धर्मही एकच नव्हता.
आणि हे तत्कालीन स्थिती, भुगोलाचे ज्ञान, जनसंख्या आणि आपापसातील अनेक कारणांनी उद्भवणारे संघर्ष पाहता स्वाभाविकही होते. येथे एक लक्षात घेणे आवश्यक आहे ते म्हणजे असुर जसे आदरार्थी इंश्वरी नाम/संबोधन आहे तसेच ते मानव समुहांचे व मानवाचेही नाव आहे. देव याला अपवाद नाही. देव हे एक समाजनामही होते हे लक्षात ठेवले पाहिजे.
येथे हे स्पष्टपणे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की ऋग्वेदातील असुर (देवता म्हणून उल्लेख असतील किंवा शत्रू म्हणून) हे भारतीय पुराणकथांतील असुर नव्हेत. वल, नमुची, शंबर, वृत्र इत्यादी जे असुर ऋग्वेदात शत्रू म्हणून उल्लेखले आहेत ते सर्वस्वी प्राचीन इराणमधील आहेत. त्यातील काही असुर (उदा. वृत्र) तर निसर्गाची रुपके आहेत. त्या देवासूर युद्धांचा आणि भारतातील असुरांचा त्यांच्याशी संबंध नाही; परंतु आपण आपला सांस्कृतिक इतिहास पाहताना कोणता मानवी समुदाय कोठला हे तपासले नसल्याने व कोणत्या पुराणकथा कोणत्या भौगोलिक क्षेत्रात रचल्या गेल्या याचा अदमास न घेतल्याने आपले आपल्याच इतिहासाबाबत पुष्कळ गैरसमज आहेत. असुर संस्कृतीच्या विस्ताराचाही आपल्याला अंदाज आला नाही. भारतातील असुरांबाबत आपल्याला जी माहिती मिळते ते पुराणांतून, महाभारतातून व काही प्रमाणात ब्राह्मण ग्रंथांवरून. त्यातही वैदिक पुराणकथांतून झिरपलेल्या कथा कोणत्या हेही समजावून घ्यावे लागते. या कथांवर अनेक पुटे शत्रुभावनेने चढवली गेली असली तरी त्यातून आपण भारतीय असुरांचा इतिहास शोधू शकतो. हा फरक का हे जोवर आपण ऋग्वेद व अवेस्त्याचा भूगोल समजावून घेत नाही तोवर समजणार नाही.
असे असले तरी असुर संस्कृती पुरातन असून तिला विरोध करण्यासाठी असंतुष्टांनी स्थापन केलेली संस्कृती म्हणजे देव संस्कृती. ही कधी आणि कोणी निर्माण केली हे आपण आज सांगू शकणार नाही; पण वैदिक संस्कृती या संस्कृतीचीही निर्माती नव्हे. वैदिक संस्कृती ही असुरांकडून विरोधी गटात, म्हणजेच देवांकडे कशी गेली याचा क्रमबद्ध वृत्तांत ऋग्वेदातच येतो.
झरथुस्ट्रानेही असुर धर्माचे पुनरुज्जीवन केले. त्याने नव्याने धर्म स्थापन केला नाही तर विस्कळीत धर्माला एकत्र करण्यासाठी नवे तत्त्वज्ञान रचले. झरथुस्ट्राच्या गाथांत झरथुस्ट्री धर्माआधीच्याही अनेक गाथा आहेत. त्या पारशी पंडितांनी संबोधने बदलून वापरल्या असे मेरी जोइस म्हणतात. म्हणजेच झरथुस्ट्री धर्म स्थापन होण्यापुर्वी खूप आधीपासून असुर संस्कृती व धर्म अस्तित्वात होताच. झरथुस्ट्राने देवांना दुष्ट व शत्रू मानले. देव हे वाईट, सर्व पापांचे मूळ. अंग्रमैन्यु (इंद्र) हा अहुर माझ्दाचा मुख्य शत्रू.
म्हणजेच देव (दिव/द्यौस) हा शब्दही अचानक उगवलेला नाही. देवांना मानणारे काही समाज होतेच व त्यांचेही वेगळे धर्म होते. कदाचित हा धर्म असुरांना विरोध करणार्‍या जनसमुहांनी शत्रुत्वातूनही निर्माण केला असू शकेल; पण या धर्माची निर्मिती वैदिकांनी केली नव्हती हे निश्चित. ऋग्वेदात आधी असुरत्त्व प्रामुख्याने येत असून वरुण, मित्र, अग्नी, सवितृ, रुद्र, आदित्य, पुषाण, आर्यमान व इंद्राला उद्देशून आदरार्थी संबोधन म्हणून असुर हा शब्द वापरला आहे. ऋग्वेदात 105 वेळा असुर शब्द येतो. त्यात 90 ठिकाणी त्याचा वापर पूजनीय/आदरणीय उपाधी म्हणून केला आहे. असुर उपाधी मात्र नंतर नाहीशी होते व असुर हे दुष्ट/मायावी म्हणून अवतरु लागतात. हा बदल झाला आहे त्यामागे इराणमधील विविध टोळ्यांतील संघर्ष व झरथुस्ट्री माझ्दायस्नी धर्माचे वाढलेले प्राबल्य व वैदिकांची झालेली पीछेहाट हे महत्त्वाचे कारण आहे. या संघर्षाचे प्रतिबिंब आपल्याला ब्राह्मण ग्रंथांत ठळकपणे दिसते. किंबहुना काही वैदिकांना भारतात शरणार्थी म्हणून का प्रवेश करावा लागला याचे कारण असुर धर्माच्या प्राबल्यात आहे. ब्राह्मण ग्रंथात देवासुरयुद्धांचे जे अतिरंजित वर्णन येते ते याच शत्रूभावनेतून हेही येथे लक्षात घ्यावे लागते.
पुरातन काळात सुष्ट व दुष्ट शक्तींना गूढत्व जसे दिले जायचे तसेच मानव आणि त्या शक्तींतील एक संबंधही रुपकात्मक गूढरम्यतेने जोपासला जायचा. पुरावाङ्मयात हा गुण (अथवा दोषही) ठळकपणे दिसतो. ऐतिहासिक घटना नोंदवतानाही अनेकदा प्राचीन ग्रंथांनी त्यांचे मिथकरुपानेच वर्णन केले आहे. त्यामुळे मिथके बनवण्याची प्रत्येक धर्माची पद्धत लक्षात घेतली तरच इतिहासाचे बिंदू हाती लागतात व इतिहासाचे मर्म आपल्याला समजावून घेता येते. त्यांना काही लोक भाकडकथा या सदरात टाकतात ते उचित नाही. इंद्राने विजय मिळवला अशा अर्थाची ऋचा येते तेव्हा याचा अर्थ खुद्द इंद्राने नव्हे तर इंद्राला मुख्य देवता मानणार्‍यांनी विजय मिळवला असा घ्यावा लागतो. तसेच देवासुरांची युद्धे पाहताना मिथके कोणती व प्रत्यक्ष घडली असलेली, तरीही मिथकांत आवेष्टित केली गेलेली युद्धे कोणती याचाही नीट धांडोळा घ्यावा लागतो.
मिथकांतून व पुरात्वीय पुराव्यांतून इतिहास उलगडतो असा. असूरांच्या दृष्टिने देव दुष्ट तर देवांच्या दृष्टिने असुर दुष्ट हे एक द्वंद्व होते हे समजावून घेणे गरजेचे आहे. त्याखेरीज आपल्याला आशियायी व म्हणूनच आपल्या सांस्कृतिक इतिहासाचा बोध नीटपणे होणार नाही.
- संजय सोनवणी 

९८६०९९१२०५ 

'साहित्य चपराक' जून २०१६ 

गाव हरवलं आहे!

'साहित्य चपराक' जून २०१६  

नांगरून ठेवलेल्या शेतावर जरा हलकासा पाऊस पडून गेला की, मातीची ढेकळं फुटतात आणि काळ्याभोर मातीचा मऊशार, मोहक गालिचा तयार होतो. या मातीवरून कोणी वावराच्या मध्यभागातून या बांधापासून त्या बांधापर्यंत चालत गेलं की, वावराच्या मध्यभागी एका विशिष्ट लयीत पावलांचे मोहक ठसे उमटतात. बांधावर उभं टाकून लांब जाणार्‍या या पावलांच्या ठशांकडे काही सेकंद लक्षपूर्वक पाहिलं तर मनात उगीच हलकीशी हुरहुर दाटते. हवहवसं काहीतरी लांब जातंय, सुटत चाललंय असं वाटतं.
प्रत्येकाच्या मनात खोलवर रुतून बसलेल्या बालपणीच्या आठवणींचंही काहीसं असंच असतं. मनात खोलवर या आठवणींचे लयबद्ध ठसे उमटलेले असतात. या ठशांकडे लक्ष गेलं की मनात हुरहुर दाटते, काहीतरी मौल्यवान हातातून निसटून गेल्याची सलणारी जाणीव होते. मन जुन्या आठवणीत हरवून जाते.
तारूण्यात पदार्पण करेपर्यंत खेड्यात जीवन व्यतित करून कामानिमित्त शहरात स्थिरावलेल्या चाकरमान्यांचं उर्वरित संपूर्ण आयुष्य हा हळवा, दुखरा कोपरा कुरवाळत व्यतित होतो. माळावर ऊनवारा झेलत वाढणार्‍या उन्मत्त झाडाला उपटून, कुंडीत कोंबून, हरितगृहात ठेवलं तर त्याची वाढ खुंटेल की कायम राहील? मानसिक पातळीवर कुंडीतला बोन्साय झाल्याचा असाच काहीसा घुसमटून टाकणारा अनुभव हे चाकरमाने घेत असतात. शहरात, निमशहरी भागात येऊन स्थिरावलेली ही माणसं मनाच्या कोपर्‍यात नेहमीच त्यांच्या खेड्याबद्दल, तिथे व्यतित केलेल्या बालपणाबद्दल मनात एक हळवा कोपरा बाळगून असतात. त्यांना शहरी जीवनातील सुखसुविधा हव्याहव्याशा वाटतात पण मनानं ही माणसं त्या शहराशी फारशी एकरुप होत नाहीत. मोकळ्या ढाकळ्या ग्रामीण वातावरणातून दारं आणि मनं नेहमीच बंद असणार्‍या शहरी संस्कृतीमध्ये स्वतःला चापूनचोपून बसवणं ही एक प्रकारची मानसिक कसरतच असते. एका मोठ्या समुदायात राहून ही एकटेपणाची बोच मनात कायम घर करून असते.
आज मध्यमवयात असलेल्या, मूलतः ग्रामीण परंतु नंतर शहरात स्थायिक झालेल्या मध्यमवयीन पिढीची मानसिक घुसमट मोठी आहे. गावाची ओढ वाटते म्हणून गावाकडे कधी जावं तर आठवणीतलं ते गाव आता प्रत्यक्षात शिल्लकच कुठे आहे? अलीकडच्या दहा वर्षात वेगाने झालेली संवाद क्रांती आणि दळणवळणाच्या सुविधांनी खेडी ही आता प्रचंड बदलली आहेत. त्यात ग्रामपंचायतींना विकासकामासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आर्थिक निधीने ग्रामीण राजकारणात प्रचंड चुरस निर्माण केली. छोटासा ग्रामीण समुदाय अनेक गटातटात विभागला गेला. सामाजिक एकोपा हे पूर्वीच्या ग्रामीण समुदायाचं सर्वात मोठं बलस्थान. अगदी रजाकारात हिंदू आणि मुस्लीम समुदायानं एकमेकांचं रक्षण केल्याच्या आठवणी जिथं ताज्या आहेत तोच ग्रामीण समुदाय आता विविध जातीपातींच्या नावावर एकमेकांचा विरोधक म्हणून एकमेकांसमोर उभा ठाकतोय हा आजच्या विखारी राजकीय प्रचाराचा परिणाम आहे. संवाद साधणे, दळणवळणाच्या सुविधा यामुळे ग्रामीण जीवनात घडून येत असलेले बदल सकारात्मक की नकारात्मक याबद्दल मतभेद असू शकतात; पण खेड्यांचा आत्मा हरवत चालला आहे याबद्दल कोणाचंही दुमत असण्याचं काहीच कारण नाही. गावाच्या एकूणच भौतिक, सामाजिक आणि मानसिक परिप्रेक्ष्यात इतका कमालीचा बदल या अलीकडच्या काळात झाला आहे की, खेडी आपली ओळखच गमावून बसली आहेत.
गावाच्यालगत पूर्वी किमान दोन मोठी मोकळी मैदाने हमखास असायची. ही मैदाने जणू त्या गावच्या मुलांची अघोषित मालमत्ताच होती. तिथे निर्माण झालेल्या, होत असलेल्या नवीन वस्त्यांनी ही मैदाने मुलांकडून हिरावून घेतली आहेत. आता मैदानेच नष्ट झाली आहेत तर तिथे खेळलेले लगोर, कबड्डी, खोखो, विटीदांडू इत्यादी देशी खेळ कुठे शोधायचे? अगदी खेड्यातलीसुद्धा किशोरवयीन, नवतरुण मुले स्मार्टफोनमध्ये गुरफटून पडली आहेत. मधल्या काळात फोनच्या जागी टीव्ही होता. मुळातच गावातही मुलांनी एकत्र येऊन मैदानी खेळ खेळण्याची संस्कृती नष्ट होत आहे. भले कारणे काहीही असोत. ही मैदाने आज शिल्लक असती तरी ही मुले मैदानी खेळ खेळायला इथे आली असती का?
गावातला पार, मंदिराचा मोठा मंडप ही मुलामुलींची दुसरी अघोषित मालमत्ता असायची. चंपुल, सागरगोटे अशा बैठ्या खेळांबरोबरच इथं लपणापाणी पण खेळलं जायचं; पारावर चकाट्या पिटणार्‍या मोठ्यांनी गोंधळाला वैतागून ऐकवलेली बोलणीही बिनबोभाट ऐकावी लागायची. बोलणाराही लेकरु आपलं की परकं याचा फारसा विचार करत नसे. आता गावाकडची मंदिरं, त्यांचे मंडप अधिक भव्य झाले आहेत, सुंदर झालेत; ओबडधोबड दगडी फरशी जाऊन तिथे सुंदर गुळगुळीत टाईल्स आल्यात पण तिथले बाळगोपाळ, गप्पा मारणारे आबालवृद्ध कुठेतरी हरवलेत! या दोन घटकांशिवाय ही मंदिरे सुनीसुनी भासतात.
गावातल्या बांधकामांच्या पद्धतीत झालेल्या बदलांमुळे गावाचा चेहरामोहरा कमालीचा बदलला आहे. गावातली जुनी बांधकामे वैशिष्ट्यपूर्ण होती. छोट्या छोट्या कौलारू घरांबरोबरच गावातले चिरेबंदी वाडे त्या गावच्या वैभवात भर घालायचे. आता असे बहुतांश वाडे मोडून पडले आहेत. त्यांची जागा आता कॉंक्रिटच्या बांधकामांनी घेतली आहे. कौलांची जागा स्लॅब किंवा परवडत नसेल तर पत्र्यांनी घेतली आहे. गावाच्या एकंदरीत बाह्य स्वरूपावर त्याचा सरळ सरळ परिणाम झाला आहे. बहुतांश गावातील अंतर्गत रस्ते आता गुळगुळीत, सिमेंटचे झाले आहेत. गावी गेलं तरी मातीचा स्पर्श शेतात गेल्याशिवाय आता होत नाही. या रस्त्यांनी एक नवीनच समस्या जन्माला घातली आहे. गावातील जाणकार मोठी माणसे सांगतात की सिमेंटचे रस्ते झाल्यापासून गावच्या आसपासच्या पाणीसाठ्यांची पाणीपातळी कमी झाली आहे. छतांवरून पडणारे पाणी पूर्वी जिथल्या तिथे मुरायचे. आता ते सरळ वाहत जाऊन गावालगतच्या ओढ्याला जाऊन मिळते. त्याचा विपरीत परिणाम गावच्या पाणीपातळीवर झाला आहे. पाणवठे कोरडे पडत चालले आहेत.
गावातली मंदिरे हे त्या गावचं मोठं सांस्कृतिक वैभव होतं. नित्यनेमाने तिथे भजन, कीर्तन, धर्मग्रथांची पारायणे होत. अनेक पिढ्यांची मानसिक जडणघडण या धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून झालेली आहे. मागे एकदा मला गुरूस्थानी असणार्‍या अत्यंत नामवंत मराठी कविवर्यांना त्यांच्या कवितेतील विषय वैविध्याबद्दल विचारलं असता त्यांनी त्यांच्या ग्रामीण वारशाचा उल्लेख करताना सोबतच भजनी मंडळात होतो हेही हसत हसत सांगितलं होतं. गावातली ही महत्त्वपूर्ण सांस्कृतिक केंद्रे आता निव्वळ भौतिक स्वरुपात शोभेच्या वस्तूसारखी उभी आहेत. गावात मंदिरे आहेत पण तिथे होणार्‍या कार्यक्रमातील लोकांची आस्था संपुष्टात आली आहे. सांस्कृतिक केंद्र असण्यासोबतच ही मंदिरे सामाजिक एकोप्याची पण केंद्रं होती. मंदिरात होणार्‍या कार्यक्रमांच्या निमित्ताने संपूर्ण गाव एकत्र यायचा, यथाशक्ती सहभागीही व्हायचा. आज हे चित्र हरवलं आहे आणि सामाजिक एकोपाही.
दळणवळणाच्या साधनांचा कमालीचा अभाव ही गावातली खूप मोठी समस्या होती. वाहन विकत घेण्याची क्षमता शहरी माणसांकडे नसायची तर ग्रामीण माणसाकडे ती कुठून येणार? दळणवळणाची साधने उपलब्ध झाली आणि गावातून जवळच्या छोट्यामोठ्या शहरांकडे कामानिमित्त किंवा विनाकारणच जाणार्‍यांची संख्या वाढली. या संपर्काने ग्रामीण माणसाचा बाहेरच्या मोठ्या जगाशी संपर्क वाढला आणि ग्रामीण माणूस त्याच्या मनाचा साधेपणाच हरवून बसला. गावातील जुनी जाणकार पिढी तर हाही आरोप करते की, तरूण मुलांच्या मनात शहरी जीवनाच्या असणार्‍या आकर्षणामुळे ही मुले विनाकारण या गावांना चकरा मारत राहतात. त्यामुळे त्यांची उद्यमशीलता कमी होत आहे. म्हणजे जे शहरात येऊन राहिले आहेत त्यांचा ओढा गावाकडे आणि जे गावात आहेत त्यांचा ओढा शहराकडे असं काहीसं चित्र आहे.
गावच्या आधुनिक, भौतिक रूपाकडे पाहून आनंदी व्हायचं का संपत चाललेल्या सांस्कृतिक वैभवाकडे पाहून दुःखी व्हायचं हे ठरवणं सर्वांसाठीच अवघड आहे. जे त्याच समुदायाचा एक भाग आजही आहेत त्यांनी या बदलांना कालौघात होणारे बदल म्हणून स्वीकारून टाकलं असणार पण गावाचं सांस्कृतिक वैभव ज्यांच्या मनात आठवणींच्या रूपाने शिल्लक आहे त्यांना हे बदल अस्वस्थ करतात.
या पिढीच्या गावाशी निगडीत विशिष्ट आठवणी त्यांच्या मनात कायम कोरलेल्या आहेत. त्यांना गावात त्या ओळखीच्या खुणा कुठेच सापडत नसल्याने ते गावी गेले की अस्वस्थ होतात. ज्या शहरी, निमशहरी भागात ही पिढी स्थायिक झाली आहे. त्याला या पिढीने मनाने कधीच संपूर्ण स्वीकारले नाही. एक विचित्र त्रांगडं निर्माण झालंय.
गावात दिसणारे हे बदल निव्वळ वरवरचे आहेत. हे बदल पाहून गावांची खूप प्रगती झाली आहे असा भास होऊ शकतो; मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे. अजूनही गावात अर्थार्जनाचा मुख्य स्त्रोत शेती हाच आहे. वर्षानुवर्षे पडणार्‍या दुष्काळाने शेतकर्‍याचे कंबरडे पार मोडले आहे. गावाकडे गेल्यावर ठळकपणे नजरेत भरते ते तिथले दैन्य. ज्या गावाला सिंचनाच्या सोयी उपलब्ध आहेत तिथला शिवार आणि माणसेही टवटवीत दिसतात. इतरत्र चित्र भयावह दिसते. आर्थिक विपन्नता ही गावांची जुनीच समस्या आहे. आता जोडीने मानसिक दैन्यही अवतरले आहे. खचलेपण ग्रामीण माणसाच्या चेहर्‍यावर स्पष्ट जाणवते. पूर्वीसुद्धा गावात फारशी आर्थिक सुबत्ता नसायची पण मनाची समृद्धी मात्र ओसंडून वाहायची. मनाच्या शांत, समाधानी वृत्तीने जीवनातल्या उणिवांना मनावर ताबा मिळवू दिलेला नव्हता. भौतिक सुखसुविधांच्या अभावात जगणारी ही माणसं मनानं मात्र लढाऊ बाण्याची, खंबीर असायची. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. शहरांच्या सततच्या संपर्काने ग्रामीण माणसाचा आत्मविश्वास काढून घेतला आहे. त्याच्या मनात एकप्रकारची न्यूनगंडाची भावना निर्माण झाली आहे. शेतीशिवाय उत्पन्नाची इतर साधने नाहीत, चांगल्या शैक्षणिक सुविधा नाहीत. रोजगार मिळवण्यासाठी, चांगल्या शैक्षणिक सुविधांसाठी जवळपासच्या मोठ्या गावांवर अवलंबून रहावे लागते. अवर्षणाने मोडून पडलेला शेतकरी, बेरोजगारीने त्रस्त तरूणाई, शैक्षणिक सुविधांच्या अभावात पायाच कमकुवत राहून जात असलेले बालपण असे काहीसे निराशाजनक चित्र खेड्यात पाहायला मिळते. जे संवेदनशील मनाला अस्वस्थ करते. ठिगळ कुठे आणि कसे लावायचे तेच समजत नाही. त्याचवेळेस ‘जलयुक्त शिवार’सारखी योजना मनात आशा निर्माण करते. नदीपात्रांच्या खोलीकरणाची स्वयंसेवी संस्थांमार्फत होणारी कामे मनाला गारव्याची जाणीव करून देतात. प्रचंड जिद्दीच्या बळावर विविध परीक्षांत यशस्वी होणारे एकलव्य बघून मन आनंद आणि अभिमानाने भरून येते परंतु आनंदी होण्यासाठी सापडणारी ही कारणे अगदीच तुटपुंजी, नगण्य आणि कधीतरीच हाती लागणारी आहेत.
वस्तुस्थिती कितीही विषण्ण करणारी असली तरी आम्हा चाकरमान्यांना त्याच्या उरल्यासुरल्या खुणांसह भेटणारा गाव अजूनही प्रियच वाटतो. नोकरीच्या ठिकाणावरून कधीतरी आम्ही गावी जातो तेव्हा गाव त्याच उर्वरित खुणांसह उभा असतो. आम्हाला प्रेमाने जवळ करतो. त्याचा अदृश्य, आश्वासक हात अंगाखांद्यावर फिरला की मनातली पोकळी आपसूकच भरून निघते. समाधानी, तृप्त वाटतं. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी त्याला गावचं हे निर्व्याज वात्सल्य कृत्रिमरित्या थोडंच निर्माण करता येणार आहे? कितीही पैसे कमावले तरी ते वात्सल्य, त्या गावच्या सहवासाचा तो सुगंध ही पैशाने विकत मिळणारी गोष्ट नव्हे. जगातली कुठलीही गोष्ट, कोणतंही मोठेपण त्या अनोख्या वात्सल्याची पूर्ती करू शकत नाही. म्हणूनच गावाशी असणारा तो अनोखा, दृढ भावबंध गावाकडे पुन्हापुन्हा घेऊन जातो.
- विद्या बयास 

शिरूर ताजबंद, जि. लातूर 
७०३८६६५६८४ 

'साहित्य चपराक' जून २०१६ 


Saturday, June 4, 2016

खडसेंचा बळी कुणामुळे?



साप्ताहिक ‘चपराक’, पुणे

राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्यावर होणार्‍या आरोपांची चौकशी कुठल्याही दबावाविना व्हावी या हेतूने आपल्या पदाचा राजीनामा दिला. भारतीय जनता पक्षात गेले काही दिवस जे वादळ निर्माण झाले होते त्याला खडसे यांच्या राजीनाम्याने अल्पविराम मिळेल. अर्थात खडसे यांचा राजीनामा ही भाजपमधील गृहकलहाची सुरूवात ठरणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पक्षातील ज्येष्ठांना डावलून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी पसंती दिली. त्याचवेळी भाजपमध्ये कुजबुज मोहिमेला आणि नाराजीला सुरूवात झाली होती.
खडसे यांच्या राजीनाम्याने पक्षांतर्गत युद्धाला आता तोंड फुटले आहे. खडसे यांच्यावर जेवढे आरोप झाले तेवढे आरोप यापूर्वी महाराष्ट्रातील अन्य अनेक नेत्यांवर झाले आहेत; मात्र खडसे यांनी ज्या त्वरेने राजीनामा दिला ते लक्षात घेता खडसे यांच्यावर राज्यातील नेत्यांपेक्षा दिल्लीतील नेत्यांचा दबाव सर्वाधिक होता हे कुणीही सांगेल. खडसे यांच्या राजीनाम्याला जातीय वळण महाराष्ट्रात दिले जाईल हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. कॉंग्रेसचे ‘फायरब्रँड’ नेते आणि शिवसेना-भाजप युतीचे कट्टर विरोधक नारायण राणे यांनी ‘खडसे बहुजन असल्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला गेला’ असा आराप केला आहे. मुळात कॉंग्रेसच्या आणि तेही एकेकाळी मुख्यमंत्री पद भुषविलेल्या नेत्याने असा आरोप करावा यासारखे दुर्दैव नाही. राणे यांचा ‘अभ्यासू’ स्वभाव लक्षात घेता त्यांना नेत्यांवर होणारे आरोप व राजीनाम्याची वेळ यातला कार्यकारणभाव लक्षात आला नसेल असे म्हणणे भाबडेपणाचे ठरेल; पण राणे यांनाही जातीय राजकारणातून स्वत:ला मोकळे करून घेता आले नाही हेच खरे.
खडसे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी ‘पक्ष खडसे यांच्या पाठिशी याआधीही होता आणि पुढेही राहील’, असे सांगितले आहे. खडसे जेव्हा खर्‍या अर्थाने अडचणीत होते त्यावेळी दानवे किंवा पक्षाचे अन्य नेते खडसे यांच्या समर्थनार्थ थेट मैदानात उतरले नव्हते. आता राजीनामा दिल्यानंतर मात्र खडसे यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपतील नेते वेळ काढत आहेत. हा भाजपचा साधनशुचीतेचा जो देखावा आहे, त्याला धरूनच सारे चालले आहे. खडसे निर्दोष आहेत, असे जर पक्षाला आणि पक्षातल्या अन्य नेत्यांना वाटत होते तर त्यांच्या समर्थनार्थ या नेत्यांनी याआधीच समोर येऊन खडसे यांचा बचाव का केला नाही? आम आदमी पक्षाच्या एकेकाळच्या नेत्या आणि सध्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून वावरत असलेल्या अंजली दमानिया यांनी केलेले आरोप ग्राह्य धरून खडसे यांना वार्‍यावर सोडणार्‍या भाजपला राज्यातील अन्य दोषी नेते दिसले नाहीत का? हा खडसे समर्थकांचा सवाल चुकीचा नाही. खडसे मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत आज नाहीत? ते उघडपणे पहिल्या दिवसापासून या स्पर्धेत उतरले आहेत. त्यामुळे खडसे यांना पक्षातूनच घातपात झाला असेल, या आरोपावर विश्‍वास ठेवायला जागा आहे.
खडसे यांच्यावरील आरोपांची न्यायालयीन चौकशी व्हावी, असे सार्‍यांचे म्हणणे आहे. त्यात काहीही चूक नाही. अशी चौकशी होऊन त्याचे निष्कर्ष लवकरात लवकर बाहेर यावेत म्हणजे संशयाला जागा राहत नाही; मात्र खडसे यांच्यावरील आरोपांची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. यातील अशोक चव्हाण यांनी अशी मागणी करावी हा राजकारणातला मोठा विनोद ठरावा. ज्यांना ‘आदर्श’ प्रकरणात राजीनामा द्यावा लागला, त्यांनी खडसे यांच्या स्वच्छतेचे प्रमाणपत्र मागावे यासारखे दुर्दैव नाही.
खडसे यांच्यावरील आरोपांचा धुरळा उडत असताना काही गोष्टी निरक्षीर विवेकबुद्धीने तपासल्या पाहिजेत. भोसरी येथील एमआयडीसीमधील ज्या जमिनीच्या खरेदीवरून खडसे यांना अडचणीत आणले जात आहे आणि आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जात आहे. ती जमीन गेली 48 वर्षे योग्य तो मोबदला देऊन एमआयडीसीने आपल्या ताब्यात का घेतली नाही? याचे उत्तर सरकारने द्यायला हवे. खडसे यांच्यावरचा राग काढण्यासाठी शिवसेनेने नको तितकी तत्परता दाखवून या प्रकरणात जो उत्साह दाखवला तो त्यांच्या अंगाशी आल्याशिवाय राहणार नाही. खडसे यांना अडचणीत आणण्यासाठी उद्योगमंत्री असलेले शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी तत्परतेने ही जमीन एमआयडीसीच्याच मालकीची आहे असा दावा केला. जर ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची होती तर खडसेंनी ती विकत घेईपर्यंत आणि ती विकत घेतल्याचा गौप्यस्फोट पुण्यातील एका बिल्डरने व अंजली दमानिया यांनी करेपर्यंत देसाई का शांत राहिले? आपल्या खात्याची जमीन अशी फसवणुकीने विकली जात असेल तर मंत्री म्हणून देसाई यांना या जबाबदारीतून कसे सुटता येईल? आपल्याच खात्याच्या अंतर्गत येणार्‍या एका महामंडळाची जमीन विकली जाते, त्याची राज्यात चर्चा होते आणि मग अत्यंत कार्यक्षम आणि तत्पर असे सुभाष देसाई ही जमीन एमआयडीसीची आहे असे सांगत मैदानात येतात. याची संगती कशी लावायची? जर खडसे यांचा व्यवहार चुकीचा असेल तर उद्योगखात्याचे मंत्री म्हणून देसाई यांनादेखील आपल्या खात्यात काय चालले आहे, हे कळले नाही असे जनतेने मानायचे का?
खडसे यांच्यावरील दुसरा आरोप आहे तो त्यांच्या जावयाच्या लिमोझीन गाडीचा. मुळात ती गाडी सेकंडहँड असून त्याचे नुतनीकरण केले असा खुलासा खडसे यांनी केला. त्यावर आरोप करणार्‍यांनी कोणताही प्रतिखुलासा केला नाही, याचे गुढ काय? खडसे निर्दोष आहेत, असे आम्हाला येथे मुळीच म्हणायचे नाही. खडसे निर्दोष आहेत की दोषी आहेत, याचा फैसला चौकशीनंतर होईलच; मात्र यानिमित्ताने गेल्या पंधरा दिवसात राज्यातील अनेक दैनिके आणि विविध वाहिन्यांनी जी ‘मीडिया ट्रायल’ चालवली त्याबद्दल कोणीच अवाक्षरही काढत नाही.
खडसे यांच्यावर राजीनाम्याची वेळ आली, त्याला ते स्वत:च जबाबदार आहेत. गेल्या काही वर्षातील खडसे यांचे एककल्ली राजकारण आणि सत्तेची सर्व पदे आपल्याच घरात सग्यासोयर्‍यांमध्ये कशी राहतील याकडे त्यांनी जे लक्ष दिले, त्यामुळे ही वेळ आली आहे. खडसे यांच्यासारखा जनमानसामध्ये मोठे स्थान असलेला नेता अडचणीत येतो, तेव्हा त्याला अनेक पदर असतात. खडसे यांची उद्धट आणि उर्मट वागणूक तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा आपण मुख्यमंत्री पदासाठी कसे अधिक योग्य होतो, हे सांगण्याचा त्यांचा गेल्या काही दिवसातला प्रयत्न त्यांना आजच्या या अडचणीच्या परिस्थितीकडे घेऊन गेला. खडसे यांच्या मदतीला पक्षातील कुठलाही नेता किंवा कुणी पदाधिकारी आले नाहीत. त्यामागे हेच कारण आहे. आम्ही इतर पक्षांपेक्षा वेगळे आहोत, आम्ही नैतिकता मानतो, भ्रष्टाचाराला आम्ही थारा देत नाही असे जोरजोराने सांगणार्‍या भाजपने खडसे यांच्या राजीनामा प्रकरणाचे जरूर श्रेय घ्यावे. ‘आम्ही तत्त्वासाठी आणि पक्षाच्या शुद्धतेसाठी कुठल्याही बड्या नेत्याचा मुलाहिजा ठेवत नाही’ असे खडसे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपने अगदी ओरडून सांगावे. त्याला कुणीच हरकत घेणार नाही; मात्र गेल्या दीड वर्षात हेच धोरण भाजपने का राबवले नाही? याचाही खुलासा अवर्जून करावा. कॉंग्रेसचे बडे नेते कृपाशंकरसिंह यांच्या बेहिशोबी मालमत्तेच्या  चौकशीचे प्रकरण, तसेच अन्य अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांच्या चौकशींबाबत भाजपने अशी तत्परता का दाखवली नाही? पक्ष सत्यतेचा आणि गैरकारभारा विरोधात नेहमीच कारवाईचा आग्रह धरतो असे या भाजपचे नेते उच्चरवाने सांगत असतात. मात्र प्रत्यक्ष कृतीच्या वेळी आपला-परका, डावा-उजवा असा भेद केला जातो. ‘यज्ञामध्ये नेहमी बोकडाचा बळी दिला जातो, वाघाला कधी बळी दिले जात नाही’ अशा आशयाचे एक संस्कृत वचन आहे. खडसे यांच्यावर कारवाई करून भाजपने त्या वचनाची आठवण करून दिली आहे. आम्ही गैरकारभार करणार्‍यांविरूद्ध कडक कारवाई करतो, हे दाखवून देण्यासाठी भाजपने जे कठोर पाऊल उचलले त्यात खडसे यांचा बळी गेला, असे म्हणण्यास जागा आहे. खडसे यांच्यावरील आरोपांचे प्रकरण भाजपला अत्यंत स्मार्टरीतिने हाताळता आले असते; मात्र हे प्रकरण याच पद्धतीने हाताळायचे असे काही ठरले होते का? अशी शंका यावी अशा घडामोडी गेल्या काही दिवसात घडल्या आहेत. अंजली दमानिया यांना अचानक जे महत्त्व प्राप्त झाले आणि आपण अण्णा हजारे असल्याचा त्यांना जो साक्षात्कार झाला आणि त्यांनी उपोषणाला सुरूवात केली त्यामागे कुणी आहे का? याचाही तपास यानिमित्ताने केला पाहिजे. अशा पद्धतीने सरकारला जर कुणी चौकशीचा आग्रह धरत असेल तर लोकशाहीच्या दृष्टिने ते घातक आहे. दमानिया यांची बाजू घेणार्‍यांना उद्या त्या त्यांच्यावरच जेव्हा आरोप करतील तेव्हा या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येईल आणि आपण कुणाला क्षणिक स्वार्थासाठी मोठे करत आहोत, याचे भान येईल. खडसे यांच्या राजीनाम्याने भाजपसमोरचा प्रश्‍न तात्पुरता संपला असला तरी हा राजीनामा अनेक नव्या प्रश्‍नांना जन्म देणारा आणि पक्षातील कलहांच्या आग्या मोहोळाला दगड मारणारा ठरणार आहे.
- देवदत्त बेळगावकर
साप्ताहिक ‘चपराक’, पुणे