Sunday, June 28, 2015

साद... सजलेल्या शब्दात रंगण्याची

  • 'सजवलेले क्षण'चे प्रकाशन करताना डावीकडून प्रल्हाद दुधाळ, 'चपराक'चे संपादक आणि प्रकाशक घनश्याम पाटील, साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य प्र. चिं. शेजवलकर, समीक्षक श्रीपाल सबनीस आणि प्रसिद्ध कवी स्वप्निल पोरे.
'चपराक प्रकाशन' तर्फे कवी प्रल्हाद दुधाळ यांचा 'सजवलेले क्षण' हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. ज्येष्ठ पत्रकार आणि कवी स्वप्निल पोरे यांनी या कवितासंग्रहासाठी लिहिलेली ही प्रस्तावना.


आभाळ भरून येतं आणि काही कळण्याच्या आत पाऊस सुरू होतो. कधी तो आवेगात कोसळतो, कधी अलगद उतरतो. कवितेचंही तसंच! भाव- भावनांचा कल्लोळ दाटतो, मनाचं आभाळ भरून आल्यावर शब्द कविता बनून येतात. या शब्द सरी कधी अडखळणार्‍या, कधी तुफान बरसणार्‍या. कविता म्हणजे मनाचा हुंकार, कविता म्हणजे खोल तळातून आलेली मनाची साद. कवी प्रल्हाद दुधाळ यांची कविता तीच साद आहे. ही साद एवढी जोमदार आहे की तिचे प्रतिध्वनी आपल्याही मनात उमटत राहतात. हे प्रतिध्वनी जेवढे नादावणारे तेवढेच अस्वस्थ करणारे आहेत. याचं कारण दुधाळ यांची कविता मानवी भाव-भावना, व्यवहार, माणसाचे मन याचा विशाल पट कवेत घेऊन पुढे येते.
ही कविता जशी छंदमुक्त आहे तशी बंधमुक्तदेखील आहे. डोंगर असो अथवा दरी; मुक्त वाहणार्‍या झर्‍याला त्याची पर्वा नसते. तो पुढे पुढे वाहतच राहतो. तशी दुधाळ यांची कविता सर्वस्पर्शी असून त्यामुळेच ती प्रवाही ठरली आहे. या कवितेत प्रेमभावना आहे, विरह आहे आणि जगाचे, जगाच्या शुष्क व्यवहाराचे कठोर वास्तव सुद्धा! त्यामुळे या कवितेला अनेक पैलू मिळाले अन् ती अधिक चमकदार झालेली दिसते.
कवितेचं वरदान प्रत्येकाला लाभत नाही. ज्यांना ते मिळते ते केवळ रूढार्थाने या जगाचे. याच जगात राहून वेगळे असलेले.  अनोळखी वाटा तुडवत जाणारे वाटसरू. ही वाट सोपी नव्हे. खाचा-खळगे आणि जखमा हे या वाटांवरचे संचित. ते समंजसपणे स्वीकारावं लागतं. मनावर घाव करणारे अनुभव मांडताना कवितेत आक्रंदनाचा सूर लावून चालत नाही. विलक्षण अनुभवानांही शब्दांच्या माध्यमातून नेटके रूप द्यावे लागते. दुधाळ यांच्या कवितेला ते पुरेपूर भान आहे. म्हणूनच ही कविता सजवलेले शब्द नसून सर्वार्थाने सजलेले क्षण आहेत! आणि ते सजलेले असले तरी केवळ उत्सवात रमलेले नाहीत. रोजच्या जगण्याशी या कवितेचे नाते आहे आणि तेच या कवितेचे बलस्थान ठरावे.
कवितेसाठी मनाचे आभाळ भरून यावे लागते, पण आधी मनाचे आभाळ तर हवे! आभाळाएवढे मन ही पुढची गोष्ट. जिते-जागते शरीर आहे पण मन आहे का? समाजातील ढोंग आणि विरोधाभासाने ज्यांची मने कोमेजून जातात त्यांचा दोष नाही. मात्र मानवी जीवनाची मूल्य बिनदिक्कत पायदळी तुडवून पुढे जाणारे कोणत्या व्याख्येत बसवावेत? कवीकडे संवेदनशील मन असते आणि मनाचे आभाळ. जीवनातील असंख्य अनुभवांचा रंग त्या आभाळावर उतरतो आणि तिथेच न थांबता तो शब्दांवर पसरत जातो. एक-एक अनुभव शब्दांचे रूप लेऊन कागदावर उमटतो. ती कविता असते. हा प्रवास येथेच थांबत नाही. तो अखंड सुरू राहतो. कागदावर उमटलेली कविता रसिकांना शोधू लागते. त्याअर्थाने दुधाळ यांची कविता महत्त्वाचा टप्पा ओलांडत आहे. रसिकांच्या भावविश्‍वात स्थान मिळवण्याची ताकत शब्दांच्या या सजवलेल्या क्षणांमध्ये आहे. हा दुधाळ यांचा दुसरा काव्यसंग्रह. ‘काही असे काही तसे’ या काव्यसंग्रहानंतर सात वर्षांच्या दीर्घ कालावधीने हा काव्य संग्रह रसिक वाचकांसमोर येत आहे. अनुभवांचे वैविध्य हे ‘सजवलेले क्षण’ कविता संग्रहाचे वैशिष्ट्य ठरावे. यात मुक्त छंदातील कविता जशी भेटते तशी भुरळ पाडणारी गझलदेखील भेटते.
काही असे काही तसे,
जगलो असे जमले जसे...

हे दुधाळ यांची कविता थेट सांगून टाकते. जगलो असे जमले जसे.. या शब्दांमध्ये प्रांजळपणा आहे. तिथे लपवाछपवी नाही, मुखवटा नाही, हा सरळपणा हाच दुधाळ यांच्या कवितेचा स्थायीभाव. तत्त्वज्ञान मांडण्याचा या कवितेचा आविर्भाव नाही, मात्र सहजपणे ती कालातीत गोष्टी सांगून जाते.
काळच असतो जालीम औषध,
जीवनातील बहुसंख्य घावांवर...
असे दुधाळ लिहितात. ते सत्य कोणाला तरी नाकारता येईल का? अखंड प्रवाही काळाची स्पंदने त्यांची कविता अलगद टिपून घेते.
येतो आणि जातो
कायम न राहतो
समजून घे
काळ हा...

हे सत्य त्यांची कविता अधोरेखित करते.
लोढणे गळ्यात कुणाच्या, मी कदापि होणार नाही... असे त्यांची कविता समंजसपणे सांगते.
कधी दुष्काळाची झळ
कधी ओला धुमाकूळ
झोडपते कधी गार
बारोमास पडे मार...

हे त्यांच्या कवितेतून समोर येणारे दाहक वास्तव मनाला भिडते.
किती भगवंता
अंत हा पाहता
धाडा पर्जन्याला
भक्तासाठी...

अशी आर्त विनवणी त्यांची कविता करते.
नको धरणीशी अबोला
माणसांच्या सार्‍या चुका

हे पावसाला सांगताना अंकुराचा काय गुन्हा? हा त्यांच्या कवितेने केलेला सवाल अंत:र्मुख करून जातो.
गढूळलेले समाजजीवन विषाद देते. त्याचे अस्सल प्रतिबिंब प्रल्हाद दुधाळ यांच्या अनेक कवितांमधून उमटले आहे. त्यांच्या कवितेने लख्ख आरसा समोर धरला आहे आणि त्यात पाहणार्‍यांना तो आरसा अपार अस्वस्थता देतो, मनाला बोच लावतो.
गेलोे पालिकेत, सरकारी बाबूकडं
राशन दुकान आणि कुठं कुठं
जिथं तिथं उद्धट माणसं जोरात
मुकाट रहा नाही तर मिळे धमकी
... उगाच नाद करायचा नाय!

हे कुरूप वास्तव ही कविता मांडते. गल्ली गल्लीत, नाक्या-नाक्यावर पिसाटांचे अड्डे आकारले आहेत, हे जळजळीत सत्य त्यांची कविता सांगते.
बियाणं पेरले तयांनी अशा भेदांचे
कसे पिकणार तेथे एकतेचे मळे?

हा दुधाळ यांच्या ‘कांगावा’ कवितेतील सवाल निरूत्तर करतो. ‘कोणी’, ‘करार’ या कविताही कटू वस्तुस्थिती मांडतात.
घोटाळ्यांचा देश हीच
झाली देशाची ओळख
सूर्य असून आभाळी
झाला गच्च हा काळोख

हे भयाण वास्तव दुधाळ यांनी रोखठोक मांडले आहे. कविता म्हणजे शब्दांचा डोलारा नव्हे. त्याबद्दल लिहिताना दुधाळ म्हणतात,
उद्गार तो भावनांचा
शब्दांपलीकडच्या..
नकळत व्यक्त झालेला
शब्दांमध्येच!

कविता म्हणजे खरोखरीच शब्दांपलीकडचा उद्गार. तो उद्गार नकळत शब्दांमध्ये व्यक्त होतो हे सुद्धा तेवढेच खरे! याचे भान असल्याने दुधाळ यांच्या कवितेला कृत्रिमतेचा स्पर्श नाही. निसर्गात जशी सहजपणे फुलं उमलतात तशी ही कविता आहे. तिला स्वत:चा गंध आहे.
या कवितेला ढोंगाची चीड आहे. मानवी जीवनाचे मोल आहे आणि नितळ, पारदर्शक जीवन प्रवाहाची ओढ आहे.
न मंदिरात गेलो ना हाताळली जपमाळ
दगडात नाही, माणसात भगवंत होता...

ही माणसातील देवत्व शोधण्याची कवीची आस आहे.
वर्षामागून गेली वर्षे, स्मृतीतून पुसटले नाव...
झाली होती भेट कुठे ती, विसरून गेले गाव...

ही आत्ममग्नता त्यांच्या कवितेत कधी दिसते तर केव्हा व्यवहारातील वास्तव.
विराण हे माळ
सुकलेली झाडे
उधळते माती
वार्‍यासंगे...

हे निसर्गचित्र टिपताना त्यांच्या कवितेचा भाव त्या चित्राचे शेतकर्‍याच्या मनात उमटलेले तरंग दाखविण्याचा आहे. असे रे कसे देवा, तुझे भास पावसाचे? हा त्यांचा रोकडा सवाल आहे. त्यांच्या काही कवितांमध्ये पाऊस प्रीतिच्या भावना व्यक्त करतो. कविता हा दुधाळ यांच्या जीवनाचा अतूट भाग आहे. हे कविते, तू माझा शब्द... असे ते लिहून जातात. या कवितेला प्रतिमांचा सोस नाही. कवितेची मोजकी शब्दकळा नाद घेवून आली आहे. अक्षराची अचूक अभिव्यक्ती करणारे त्यांच्या कवितेचे शब्द आहेत.
माथेफिरूंचे राज्य, खुळ्यांची वस्ती
जगी एकटा या शहाणा कशाला?

अशा ओळींमधून अस्सल अभिव्यक्तीचा प्रत्यय येतो. जीवनात काही अधिक असणार आणि काही उणे. जीवनाकडे पाहण्याची कवीची ही समंजस भूमिका त्यांच्या कवितेतून पदोपदी जाणवते. दुधाळ यांच्या कवितेतील आत्मप्रत्यय इतरांनाही तोच अनुभव देण्याएवढा समर्थ आहे. परिपक्व अनुभवातून फुललेली ही कविता चटकन लक्ष वेधून घेते. वास्तवाला भिडतानाही ती चटका देत नाही किंवा निराशेचे गीत गात नाही. त्यांच्या कवितेचा सूर आशावादाचा आहे. जीवनातील चिरंतन मूल्यांचा ही कविता आदर करते आणि सजवलेल्या क्षणांच्या मदतीने सजलेल्या आयुष्यासाठी सांगावा धाडते. जीवनाच्या प्रवासात अनुभवांचे ओझे होऊ नये, उलट अनुभव हे दीपस्तंभ ठरावेत, ही दुधाळ यांच्या कवितेची प्रामाणिक भावना आहे. चिंता, कटुता याचे सावट क्षणांना काळवंडून टाकते, याचे भान या कवितेला आहे. म्हणूनच या कवितेचा आग्रह फुलण्याचा आणि सजण्याचा दिसतो. हे सजणे मनातून आले आहे.
जीवन म्हणजे क्षणांचा अखंड पट. तोच पट प्रल्हाद दुधाळ यांच्या कवितेने शब्दांमधून मांडला आहे. क्षण महत्त्वाचा, तो जपला पाहिजे. तो जपता आला तर जीवन जपता येईल. उत्कटता असेल तर जीवनात रंग भरेल. उत्कटता असेल तरच प्रत्येक क्षण सजवता येईल. क्षणांना सजवणारा हा कवी इतरांनाही सजवलेल्या क्षणात रंगून जाण्यासाठी साद घालतो आहे. आजचा क्षण काही क्षणात मागे पडतो. काळाच्या प्रचंड उदरात पाहता-पाहता गडप होतो. पण हे सजवलेले क्षण निसटणारे नाहीत. ते मनात घर करतील आणि त्यांचे बोल पुन: पुन्हा ऐकू येत राहतील.
-स्वप्निल पोरे
प्रसिद्ध कवी-पत्रकार
पुणे
9404232227

Sunday, June 7, 2015

ओथंबलेले घन

'साहित्य चपराक' मासिकाच्या जून २०१५ च्या अंकातील कादंबरीकार नरेंद्र नाईक यांचा विशेष लेख!
 
आईच्या शालूचा पल्लू वार्‍यावर फरफरतोय म्हणजे नेमकं काय? कशाची ही लक्षणे? सुसंस्कृत माताविष्कार असतोच मुळी अजातशत्रू. पण... आई गेेलीय तरीही तिचा पल्लू फरफरतोय हा भास का आभास? खरंच तिने अनुपम सौंदर्याची इंद्रनगरी निर्माण केली आहे की काय? घननीळ अंबरात सुंदर झळाळीचा कवडसा म्हणजे तिचे प्रतिबिंब तर नव्हे ना? कदरदान लोकांची क्रांती असतेच मुळी पालखी पदस्थ. धुंदारुन आलेल्या आकाशात चकाकीची रौनक अन् त्यात गजांत लक्ष्मीचा फरारणारा पदर ही कशाची चिन्हे आहेत? शुभ चिन्हे का अशुभ चिन्हे? साक्षात राजराजेश्‍वरांचे पदकमल वलयांकित करणारे हिमनगाचे वादळी वारे तर नव्हेत ना? कारण राजलक्ष्मीने उधळलेली खूबसुरत खुबीदार खैरात म्हणजे सृष्टीला श्रांतावणारा भावविभोर वारा. कारण नरकेसरी वनमालेचा कैफ असतोच मुळी अश्‍विनी सारखा धुंदफुंद घोडदौड करणारा.
वैराग्याचा चकाकता कंठमणी म्हणजे आई. तिचे अष्टभाव असतात रत्नजडीत कवच कुंडले. साक्षात कर्णाला आभूषित करणारे. तिच्या अधरात असतो जाई जुईचा मधाळ गंध. अन् अंत:करण असतं फुलारलेल्या चमेली सारखं गंधाळलेलं. त्यात असतात मन मोहक कुमूद अन् त्यावर लडबडलेले नाजूक साजूक सान सानुले कुसूम! हेच तर असतं तिचं अस्तित्व. चमेलीचा खुशबू आणि घर असतं दरवळणारी शेवंती. म्हणूनच तर तिचा राग असतोय अस्तचलाचा मंगलमय सौंदर्य सेतू. तिचे तादात्म्य असते सुंदर , भावविभोर परंतु ठसकेबाज. म्हणून तर ती कडाडते शेषाद्रीची महिमाशाली बिजली होऊन. तिच्या चर्मचक्षू तारतम्यात असते एक राजभूषण , रत्नजडीत चकाकणारी तर्जनी. त्यावर लुकलुकतात इवले इवले हिरवे पिवळे अन् धवलरंगी माणिक मोती! साक्षात हिरकणीचे हिरे. ती त्रिजगताची असते दार्शनिक आणि सद्वर्तनात असते विश्‍वाची धाडसी दुदुंभी. तिचा विनय असतो पारदर्शक आरसा. दया भाव असतो साक्षात स्वर्गाहूनही सुंदर. उदारता असते पूर्णाहुती. म्हणून तर ती ठरते निर्मिकांची निर्मिती. तिचे निश्‍चल नेत्र पल्लव म्हणजे सृष्टीचं विशाल सुरमा रेखलेले प्राक्तन. तिचा फिरंगी बाणा असतो राष्ट्राचा उपोद्घात. ती मातृत्व करते पादाक्रांत. म्हणून तर ठरते परम दयाळू परमानंद. मुळात आई असते महान. म्हणून तर चराचरात शिंपते प्रचुर माधुर्य. तिचा चेहरा नसतो म्लान. असतो पांथस्थ राजयोगिनी सारखा. तिचे आशीश असतात निर्मोही. निर्मिकांची निर्मिती. आई असते मुलखावरची उधळत उसळत वाहणारी अजिंक्य तटणी. तिचे अभिष्ट असतात उत्कर्षजनक. ती बिरुदवंत नसते पण बिरुदवंताची आई असते महिमाशाली. तिच्या नौबतीची रणभेरी असते कडाडणारी जोत्स्ना पण... मधुर. तिचा स्वर असतो बुलबुल पण... बिगुल. म्हणून तर ती करते रथी महारथीनांही बुनियाद. तिचे रणशिंग असतात रससिंदूर. व्यासंग असतो रसाळ. ती राजयोगाचे राजचिन्ह घेऊन रामराज्य करु इच्छिते लोकपाळ होऊन. पण विघ्न संतोषी विभुती विराजित होतात राजसिंहासनावर राजहंस होऊन. रातवा देतोय हाकाटी शिरोभूषण शुभांगीसाठी पण... साठमारी करणारे आपणच असतोत ना? आता आईनेेेेही मांडलाय सतरंज, सर्वज्ञ होऊन. शरसंधान चालू आहे शिखर संग्रामासाठी. संगराला सुधांशुही हाकाटी घालतोय , हृदयस्थ होऊन. रजनीनाथही होतोय स्वार रजनीवर , निशापती होऊन. तिच्या रुपेरी भावछटात रुपमहाल असतो सुपुत्राच्या तितिक्षेत. पण...
चांदरात फुलारतीय मोहक होऊन. हजारी मोगरा अन् मुश्कहिन्याच्या कस्तुरी घमघमाटात दिशाही दिपलीय आई नावाच्या चरणावर , भक्तसिध्द होऊन. स्वर्णकिरणेही कृतार्थ झालीत तिच्या भालचंद्र मळवटीवर. अनिवार वारा परमसुख घालतोय रंजल्या गांजल्या वांछीतांना. तत्ववेत्ता निसर्ग दुरितांचे तिमिर घालविण्यासाठी अखंड एलगार करतोय कुदरताजवळ. अल्लाही झालाय मेहरबान. कुर्निसात करतोय मातृत्वाला. माता झालीय धर्मशीळा, निर्धनाचा उद्धार करण्यासाठी. पुर्वार्ध विसरुन उत्तरार्धाला आलिंगन देण्यासाठी. कारण महाप्रसादिक महाबुध्द हसतोय शिलालेखावरुन रणफंदीची जात पाहून. गायही हंबरतेय मुलूखगिरीचे मुलूखमैदान पाहून. मूलाधार घेतलाय निशाचरांनी, स्वरुपडे रोशन करण्याचे. पण     आई असतो एक स्वयंभू शिवतारा. अशा मातेसमोर हरण्यातच पुत्राचं खरं सार्थक असतं. बेतालपणाचा ब्रह्मघोळ गिरीधारीचा गुलतुरा नसतो. रोमरंध्री मुक्तीचा दिलदार सप्तरंगी श्‍वास हवा तरच नैतिकता फुलवाती सारखी तेजाळेल , तपोधन होऊन येईल. कारण लोकोत्तर कार्य ज्ञानवंतास शािेभवंत दिसतं. सहज समाधीची मेहेरनजर भाग्योदय निर्मिल. त्यासाठी निरअहंकारी विदेह स्थितीचा ज्ञानेश्‍वर हवा, वर्धमान हवा, येशू, बौध्द हवा. तरच राजभैरवी मृत्यूंजयी ठरेल. ललाटरेषेवर मोहरणारे राजमणी ठरतील. लखलखीत घार्‍या डोळ्यांची लयलूट करता येईल. पण... दगडघाशा लोकांच्या लोचट नजरा कुठली जोशिली समरभूमी निर्माण करुन नवनिर्माणाचा ताज देईल? सत्तांतराचा सुध्दा तंबोरा फुंकावा लागतो. अन्यथा माकड उड्या त्या माकड चेष्टा बनतात. पण... कोणी सांगावं हे मार्मिक अभिधान? दानतच ती काय? उलट वानर उड्या होऊन वानर चेष्टा होईल. तारक असो वा मारक, ललकारीचा चौघडा दणदणायलाच हवा. मग बरदास्त पणाचं वटवाघूळ एखाद्या चमनबागेत पुंजाळत राहील. त्याचे चक्षू कुणाचीच इतराजी न करता दिलभर सुखेनैव पैजरा खात राहिल. तोशिश करणार्‍यांना डाळींबदाणा दाखवून हम भी कुछ कम नहीच रानमांजर ढिसफीस करेल. मग दिंडी दरवाज्यातून गुलहौशी लोकांचा गुलछबु पिपासा जहांबाज होऊन चर्पट पंजरीचा डंका पिटीत दुर्लभ छाव्याचा आव आणतील आणि गहिरीपणाची लहरी जाणीव करुन देतील. मग पिंगट डोळे घुंगट पांघरुन बलीवेदीवर बलिदान करतील. धराधिशांचे बलिदान पाहून आईचा आत्मा चू चू करेल , पृथ्वीपती नरकेसरीसाठी. साखर झोपेतील साखर सुरी म्हणजे साक्षात रक्तपिपासू खंजिरा. हे सारं अवधान म्हणजे मूर्खपणाचा महामूर्ख कळस. आई विसरलीय मग हे असंच होणार. केस संभारातून मायेनं हात फिरविणारी आई, थोपटणारी आई, अश्रूंचा प्रपात करणारी आई, वेदनेला मुक्त वाट करुन देणारी आई, आश्‍वासक आधार देणारी आई, आता सामाजिक जीवनातून बाद झालीय. त्यामुळे ही शोकांतिका.
अरे हिजड्यांनो! आईला सारं दु:ख, व्यथा, वेदना सोसाव्या लागतात, पचवाव्या लागतात. तेव्हा कुठे होते जगत जननी, विश्‍व जननी. खवळलेला दर्या कितीही उसळला तरी तिचे बांध असतात भक्कम. जिजामातेसारखे. त्यासाठी एकच शब्द हवा ‘आई’. त्यात असतात सात्विक भाव आणि सुमधुर स्वर. सिंचन करणारे जल तुषार. अवचित आभाळ भरुन यावं तसं वेदना शमविणारी आई नावाची एकच सर साक्षात जलमोती बनते आणि श्रांत करते अवघ्या सृष्टीला. त्यासाठी बाबांनो! थांबवा आई नावाची फंदफितुरी. ते पहा आकाश मार्गाने येतायेत भाव भावनांचे मोती. पिंगा घालतायेत हल्लकल्लोळ करुन. साक्षात बरसून गेलेल्या मेघमालेचे शुभ्र स्फटिक मणी अन् त्यातील जलधारा म्हणजे आई. मातृत्वाचा सुवर्णकुंभ, कांचनरुप पैलू. आईच्या हास्यात असतात विरक्त तत्वज्ञ भाव! एखाद्या योग्यासारखे. मग ते हसू कसंही असो, त्यात असतं मातृप्रितीचं आगर. माता आवेग हेच तिचं वास्तव सत्यरुप. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी रेंगाळत राहणारं रुप म्हणजे माताविष्कार. एखाद्या मंदिरातील सुगंध. आई असते फुलारलेल्या फुलांची वेली. मायेची उब देणारी अन् जीवन संगीत फुलविणारी फिलॉसॉफर...! मायेचा ओलावा, प्रितीची संततधार अभावितपणे येते तिच्या मनाच्या कोंदणातून , अवचितपणे अन् हळवेपण घेऊन. विरहाच्या वेदनेत मावळत्या रवीची सुंदर किरणे पडल्यानंतर जशी धरा फुलावी, तशी आई. एखाद्या सागरात लाटा उसळाव्यात तशी पण... पिलांच्या पंखात बळ आलं की, पाखरं उडून जात दाही दिशांना. घर मात्र रितं रितं....सुनं सुनं... पण... आई हृदयाची एक विण तालवाद्य होऊन जीवनाचा अर्थगर्भ शोधते, पिलांच्या परतण्यात. हृदयात असतो वेदनेचा उसळता सागर , डोळ्यात असतो आसवांचा महापूर. पण... पिलं सैरभैरलीत , पारध्यांच्या बाणावर. आक्रोश अन् चित्कार दंगतोय, रेखीव घननीळ अंबरबनात. तशी आईच्या सुरांनी साथ सोडलीय अन् शब्दांनी नातं तोडलं.
तिच्या काचेसारख्या सुंदर डोळ्यातून पिलांच्या पाऊल खुणा अधिकाधिक गहिर्‍या होतात. खरचं पिलं गेलीत का दिशाहीनपणे पारध्यांच्या बाणावर? दिव्य नेत्र शमलेत का? आई हृदयाची उकल खरंच काय असते? अनात्म आत्म शुध्दी म्हणजे आई. तिचा अनुग्रह म्हणजे प्रीती. प्रीती म्हणजे केवड्याच्या फुलाने आसमंताला दिलेले मुक्तदान. पश्‍चिमाते चंद्रकोरही आनंदघन होऊन बहरलेय, दिशा दिशांचे सौंदर्य दिप्तीमान झालेय, अबोलीची फुलेही लहरलीत, डेरेदार गुच्छ स्वच्छंदी बागडू लागलीत, रानावनातील पशुपक्षी अभिनिवेशाची तुतारी फुंकत एलगार करु लागलेत, सौंदर्यपूजक हिमालयही सौंदर्यावर भाळलाय, मावळतीचा सूर्यही अमित मनोहर हिरव्यागार पाचूची उधळण करतोय, नारळी पोफळीच्या बागा क्षितिजाशी तन्मय पावल्यात म्हणूनच की काय, पश्‍चिम दिशा सौंदर्य लालीची आरक्त आभा घेऊन नर्तन करु लागलीय. पक्ष्यांचा आक्रंदता स्वर मधाळ बनलाय. भिजपावसाची रिपरिप सुरु झालीय. कारण आई नावाचा आरासपानी क्षण प्रकटलाय. त्यामुळे गायी गुरांच्या गालावर हास्याची खळी उमटलीय. खरंच अंधार विरलाय. अभ्र पटलावर सुवर्णलालीमा लालबंुंद झळाळी फेकू लागलीय. तसा गुलाबी गंधीत वारा सैरभैरलाय. रंजीस जिवावर मेघमंडळ निळसर आवरण आच्छादू लागलयं. तसे बोलके डोळे श्रांतावले. दाटून आलेले विरहाचे मळभ पांगले. उष:कालाची पहाट फुलली. रविराजाची कोवळी किरणे धरेवर अंकुरली आणि आनंदघन साश्‍चर्य बागडू लागलं. का बागडणार नाही? माता आविष्कार असतोच मुळात उधाणलेला. त्यामुळेच तर घन ओथंबून आले. अथांग सागरासारखे. सागराची गाजही असते लक्षदीप. एक एक शब्द असतो तटबंदी किल्ल्याचा दिंडी दरवाजा. याच दरवाजातून हिरवेगार पाचूचे माणिक मोती आपल्या अगम्य इच्छा शक्तीचा जय मल्हार करीत उधळलेले. कोणे एके काळचे सुपुत्र. याच सुपुत्रांना शुभ चिंतन करण्यासाठी आईच्या मालवलेला डोळ्यातील तेजाळलेली बिजली चकाकते आहे. खरंच हा भास की आभास? आभास कसा असेल? आईचे दशांगुळे केस संभारात गरगरलीत. आई म्हणजे निश्‍चयाचा महामेरु. अचेतन पडलेली चकाकणारे काजवेही सचेतन संजीवन बनले. फक्त एका आई नावाच्या उद्गाराने.
आईच्या सुरातील गहिरी आर्त आणि एक पापणी भरुन आलेला थेंब विश्‍वाला श्रांतावू शकतो. ही तिची किमया. सायासा-प्रयासाने निर्मिलेली दुनिया म्हणजे पहाटेचे मंगलमय दवबिंदू अन् त्यात श्रांतावलेली भूपाळी. जणू गेंदेदार फुलातील परागकणांची टपोरे सुंदर मोती. काही फुललेली , काही गुंफलेली , काही माळलेली , फुलेच फुले म्हणजे आई. आई नावाचं कमळ पाकळी स्थित हृदय म्हणजे साक्षात फुलांनी बहरलेली फुल परडी. नव्हे गुलजार फुलांनी रेखलेलं सुंदर मन भावन विश्व.साक्षात आकाशात उधाणलेला इंद्रधनु. रंगीबेरंगी फुलांच्या वरमाला नव्हे वनमाला. धरेवर साकारलेला चांदणचुरा. शीतल चांदण्याची बरसात. खळाळणार्‍या यमुनेच्या बांधा वरील वनराई. हिरवीगार वनशोभा. अन् त्यात रेंगाळलेली आईची देखणी कांचन पावलं. काचेसारख्या ऐलतीरावर पैलतीरावर पसरलेलं विहंगम पाणीच पाणी म्हणजे मातृत्वाचा जागर. आई म्हणजे पतितांना पावन करणारा जलकुंभ. शतकानुशतके पतितांना अलंकृत करणारी गर्भश्रीमंत गुढी. पण... शिल्पकृतीने विभूषित झालेली. स्थितप्रज्ञ महात्मा गौतम बुध्दासारखी. साक्षात योगयोगेश्‍वर. म्हणून तर बासरीचा स्वर लाभलेली जणू पृथ्वीभराची अलभ्य आरती. गाभार्‍यातील घंटानाद. नादब्रह्म मुख , नितळ कांती, जणू हसरी गोकर्ण कलिका. सुराच्या दुनियेतील धवलरंगी स्फटीक. साक्षात पार्वती पती शंकर तर कधी कदंबावर उतरलेलं पुनवेचं चांदणं. काळोखात टिकणारा एक आत्मीय कलानंद. सर्वांग सुंदर बासरी. म्हणून तर संयमी. सौंदर्य उधळण करणारी मुक्तमाला. देवताधिपतींची देवता. यहा थी कहा गयी? आई नाही म्हणजे खरंच काय नाही? सृष्टीभराचा दिवा मालवलाय. नुसता बोचरा गारठा. थडथडणारा. थरारक भावस्पंदन. झावळ मावळतीकडं झुकणारं फिकट चंद्रबिंब पण... तिचे हसरे डोळे , निहायत खुश. कारण तिने दिलेत पुढल्या पिढीला बोलक्या डोळ्यांची मन मोहक लाडलाडली. कदाचित ती कुणाची कन्या पण... भविष्याची जगजननी. इवलीशी कळी पण... उद्याच फूल. एक गंधीत गुलजार फुल. म्हणजे मा!
उमलणारी खुबसुरत खुशबू. गुलाब कळीच्या रुपानं अवतरलेलं एक खुदाचं रुप. स्वरांचा धुंदफुंद खुशबू. खळाळणारे निर्झर. कडाराजीत कोसळणारे धबधबे. पर्वतराजीला आभूषित करणारे कारंजे. पण... देखणा भाव लाभलेले मुखकमल. चंद्रकोरीतला चंद्रमा. निर्व्याज प्रीती, दुनियाभराचे सुगम संगीत. जणू काचेरी दर्पण. पण... तेजस्वी जगन्नाथ. आई म्हणजे रहमदिल. मासूम प्रीत! विश्‍व भराचा मूल्यवान दागिना.भाषेचं आद्याक्षर म्हणजे आई. कधीच क्षर न होणारे अविनाशी. मनोज्ञ सत्यदर्शन. दीपार्चनाचा मंगलमय प्रकाश, पृथ्वीमोलाचं लावण्यरुप. कौतुकभरल्या शब्दांची उधळण. अन् त्यात सामावलेला अदाकारी सोहळा. प्रीतीच्या शोधात उधाणलेला प्रवाह. वात्सल्याने प्रवाहित करणारी जीवनदायिनी. केसात माळलेलं जास्वंदी फूल. अलगत पापणीत सामावलेलं नयन मनोहर रेशमी सुख. तरीही अश्रू फुलांचे अलंकार ल्यालेली रत्नजडीत व्रतस्थ आई. केसात माळलेली, महफिलीत उधळलेली अन् शवावर वाहिलेली फुले कधीच निर्माल्य होवू शकत नाहीत पण... देवत्वावर वाहिलेली निश्‍चितच निर्माल्य असतात. तेच रुप म्हणजे आई. तिच्या चरणावर टपटपलेला प्राजक्ताचा सडा जसा काय मोहरलेला गुलाबी चंद्र. अनेक सुख दु:खाच्या रेशीम धाग्यांनी गुंफलेली मोहन माळ, कातळ फोडणारा झरा, स्नेहाने जडावलेले मोती. असं सुख म्हणजे आई. पण... विझलेल्या राखेत उन्मळून पडलेला सागर. तरीही हसरा गुलाब. राज प्रासादिक देखणं रुप. धुंद गंध उधळणारं एक पराभूतांचं जीणं तरीही तिच्या प्रीतीचा मांगलिक सोहळा मुळातच देखणा असतो. जसा काय तेज:पुंज इंद्राचा ऐरावत. आयाळ लाभलेला धवलरंगी अश्‍व. अन् धीर गंभीर गर्जना पण... पहाटेला कवेत घेणारा, चिखलातल्या विरक्त पंकज कलिके सारखा. तरीही सत्ता पिपासू गोमटेश्‍वरांचें उमदं घोडं. स्वार्थार्थ हाकाटी देत नीरक्षीर ओळखण्याची अक्कल गहाण ठेवून संयम आणि सदाचाराची नीती जगाच्या वेशीवर टांगून फिरतोय , तरीही केवड्याच्या सोेनेरी पानासारखा दरळवणारा सदाबहार खुशबू म्हणजे आई. म्हणून तर देवालयात मंद समयी प्रज्वलीत होते, तेजाळते. तरीही ढेरपोट्या थोतांड्याला काय माहीत, महिमाशाली मंगलमय दीपोत्सव. गुळाचा गणपती, धर्मभ्रष्ट आणि कर्मभ्रष्ट. शून्य किमतीचा. जशी काय चिवट घोरपड. पण... आई म्हणजे आदिम सत्य. जन्मा पेक्षा कर्माने तेजाळणारी दीपिका. माणूसकीप्रधान गहिरे तत्व आणि श्रेष्ठतम भाव. देखणा हिरवागार डोंगर. पाचू माणकाच्या कोंदणात लखलखणारा गहिरा हिरा अन् टपटपणारा चाफा म्हणजे समाधिस्त संजीवन संवेदना. आतून बाहेरुन देवत्व, देशभूषण, कुलभूषण म्हणजे आई. जणू कुंतलगिरीचा वर्धमान. जसा काय सुचितेचा सदाबहार. भावविभोर आनंद सोहळा. आई म्हणजे सत्त, चित, स्वरुप. त्रिपुरसुंदरी. कैवल्यरुपी मातृउत्सवाची पर्वणी. साक्षात क्षमाली पर्व. आई म्हणजे वेदांताचे तत्वसार , भूषणभूत दीप , मेघमल्हार , विशुद्ध नामसंकीर्तन , स्वात्मसुखाचा आनंदघन सोहळा. म्हणून तर अपत्याचा कीर्तीवंत उत्कर्ष. साक्षात मूल्यात्मक आत्म तत्वाची मधुरा भक्ती. आई म्हणजे कर्मयोग , प्रेमयोग सांगणारा भगवतगीतेतील कृष्णाचा सामाजिक वेदांत. हृदयस्थ प्रज्ञा. मातृकीर्तनाचा महिमा. अभूतपूर्व क्षमाशील. साक्षात प्रचोदयात. सामाजिक निष्ठा आणि नैतिक जीवनाची प्रेरणा म्हणजे आई. ज्ञानज्ञ सौंदर्याने लडबडलेले शब्दरुप ममत्व म्हणजे आई. भिक्षांनदेहीचा आलख म्हणजे आई. साक्षात तुळसगंध. पण... शब्दही मुके झालेत, आई नावाचा ब्रम्हांड शोधता शोधता. गोडगंधीत सुधारस काही हाती लागलाच नाही. खरंच माझी भ्रमंती शमलीय का? कांचनाचं सौंदर्य वाढविणारा अलंकार, अलंकापुरी पुण्यभूमी, द्वेत अद्वेत आईचा शोध लागलाय का? आई गेलीय खरंच केवढा अनर्थ. पृथ्वीभराचा विद्ध्वंस. पाखराला परतीची तमा नसावी पण... दारात वाट पाहणारी आई असावी.तसा श्‍वेत पदर फडफडतो घननीळ् अंबरात अन्  व्याकुळ हुंदका फुटतो आईच्या प्रतिक्षेत... आ..ऽऽ ई...ऽ आ..ऽऽ ई...ऽ आ..ऽऽ ई...ऽ...

- नरेंद्र नाईक
कळमनुरी, जि. हिंगोली 
९४२१३८४००७

Tuesday, June 2, 2015

ठाले पाटलांचे वर्चस्व मराठवाडा साहित्य परिषदेवर टिकणार का?

'साहित्य चपराक' मासिकातील डॉ. भास्कर बडे यांचा विशेष लेख.… 
 
अलीकडे मराठवाड्यातच नव्हे, तर महाराष्ट्रात गाजणारी साहित्यिक संस्था म्हणून जिच्याकडे पाहिले जाते ती म्हणजे मराठवाडा साहित्य परिषद, ‘मसाप’ होय. कोणतीही संस्था चर्चेत असते ती त्या पाठीमागे असलेल्या माणसांमुळे. तो एकमेव माणूस म्हणजे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील. मसापची निवडणूक लागणार म्हणून काहीजण दहा वर्षांपासून लंगोट लावून तयार आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत जेमतेमच मते त्यांना मिळाली होती. तर फक्त तीनच जागेच्या निवडणुका झाल्या. उर्वरीत जागा बिनविरोध निवडून आल्या. एवढे हे विरोध करणारे प्रसिद्ध!
मी तीस वर्षापूर्वी औरंगाबादला शिक्षणासाठी गेलो. मित्रमंडळींच्यासोबत त्या जुन्या चिरेबंदी घरासारख्या दिसणार्‍या खोलीतील मसापमध्ये जायचो. प्रेक्षक म्हणून. खेडेगावची ग्रामपंचायतच म्हणा ना! मोडके तोडके फर्निचर, अस्वच्छता, ‘प्रतिष्ठान’चे अंक-गठ्ठे पडलेले, जाळ्या लागलेल्या. बोर्डावर सुधीर रसाळ हे नाव वाचायचो. काही कार्यक्रमास त्या काळातील नाव असलेले लेखक येत. मी पहायचो. मनात वाटायचे, हे आपल्यासाठी नाही. ठराविक जिल्हे सोडले तर मसापची शाखा नावाचा प्रकार नव्हता. प्रा. डॉ. हृषिकेश कांबळेचा मी रूममेट. त्याच्यामुळे साहित्यिकांच्या ओळखी होऊ लागल्या. मी त्यावेळी कविता लिहायचो. अशी ही मसाप मी पाहिलेली.
जालन्याच्या एका विनाअनुदानित महाविद्यालयात नोकरीला गेलो. बिनपगारी, फुल अधिकारी! संस्थाचालक माजी आमदार. मला प्राचार्य करणार होता. गुळचट लुच्चा. तीन वर्ष विज्ञान महाविद्यालय उभे करून घेतले अन् तोंडी सांगितले, ‘तुमची नोकरी संपली.’
त्यादरम्यान मसापची निवडणूक लागली. तीस चाळीस मतपत्रिका माझ्याकडे होत्या. मला डॉ. वासुदेव मुलाटे, प्रा. नाईकवाडे, डॉ. सुधीर गव्हाणे आणि इतरांच्या पॅनलमध्ये घेतले. मी नोकरीवरून तोंडी काढलेला, पुढील नोकरीच्या शोधात आणि वरील मंडळींच्या बोलण्यात आलो. राहिलो उभा. जालना-बीड-लातूर-उस्मानाबाद या ठिकाणी मी मतदाराकडे गेलो. काही साखळ्या कळल्या. अधिक ठिकाणी प्राचार्य ठालेंचेच नाव मला सांगितले. धारूरला असाच गेलो. प्रा. फपाळ यांना भेटलो. त्यांनी स्पष्ट सांगितले, ‘तुम्ही वेळ वाया घालवू नका. इथले एकही मत तुम्हाला मिळणार नाही.’
आणि एकही मत मिळाले नाही. एकटे डॉ. सुधीर गव्हाणे प्रा. ठालेंशी संपर्कात असल्यामुळे विजयी झाले. आम्ही सपशेल  आपटलो. प्राचार्य ठालेंचा दणका आम्ही खाल्ला. नंतरच्या पाच वर्षात मी मसापशी संपर्कात राहिलो. प्राचार्य ठालेंशी संपर्क वाढवला. त्या व्यासपीठापासून दूर होतो. जवळ येता आले. त्यामुळे प्राचार्य ठालेंची कार्यशैली जवळून पाहता आली. ते बेरजेचे राजकारण करतात. साहित्यिक आणि साहित्य चळवळीतील कार्यकर्त्यांशी सरळ संपर्क ठेवतात. साहित्यिकातील नवोदितापासून वयोवृद्धापर्यंत त्यांचा दांडगा संपर्क आहे. ही त्यांची ताकत आहे. या ताकतीला तोड नाही. त्यांना हलवण्याचे वेगवेगळे प्रयोग झाले परंतु विरोधी मंडळींना अपयशच आले.
प्राचार्य ठाले रोखठोक बोलणारा तर दिलेल्या शब्दाला जागणारा माणूस म्हणून ख्याती. अशी ही खुराड्यातील मसाप प्राचार्य ठालेंच्या ताब्यात आली. अध्यक्ष झाल्यामुळे अधिकार मिळाले आणि कामाचा उरक वाढला. निवृत्तीनंतर ठालेंनी अधिकचा वेळ मसाप उभारणीसाठी दिला. खुराड्यातील मसाप टोलेजंग इमारतीत आणली. त्यासाठी त्यांनी विश्‍वासू साथीदारांची साथ घेतली. त्यात मराठवाड्यातील राजकारणातले महत्त्वाचे नाव मधुकरअण्णा मुळे, सुधीर रसाळ, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, कवठेकर, चंद्रकांत पाटील, ना. धों. महानोर, नागनाथ कोतापल्ले या आणि इतर साहित्यिकांचे सहकार्य वेळोवेळी घेतले. म्हणून आजची मसाप दिसत आहे.
मसापची स्थापना दि. 29 सप्टेंबर 1943 रोजी नांदेडला झाली. स्थापनेमागे मराठवाड्याच्या मुक्तीचा लढा लढणे, तसेच त्याच कार्यकर्त्यांनी साहित्य चळवळ चालवावी. 1943 ते 1953 या कालावधीत मसापचे कार्यालय हैद्राबादला गेले. तेरा वर्षानंतर हे कार्यालय औरंगाबादला आले. मसापच्या नावासोबत अनंत भालेराव, भगवंत देशमुख, वा. ल. कुलकर्णी, चंद्रकांत भालेराव, नरहर कुरूंदकर, सुधीर रसाळ अशी नावे आली. या मंडळींचा यशवंतराव चव्हाणांशी संपर्क आला आणि मसापचे काम जोरात सुरू झाले. चव्हाणांनी मसापसाठी रूपये दहा हजाराचे अनुदान सुरू केले. 1963 साली मसाप इमारतीची कोनशिलाही यशवंतरावांच्या हस्ते बसवण्यात आली. दरम्यान ना. धों. महानोर मसापचे अध्यक्ष झाले आणि यशवंतरावजींच्या नावे नाट्यगृह व्हावे असा ठराव झाला! परंतु काम ठप्पच होते. नंतर पुढे प्राचार्य ठाले मसापचे अध्यक्ष झाले आणि कामाचा धडाका सुरू झाला.

मसापची संमेलने
मसापचे वर्षात एक संमेलन व्हावे ही अपेक्षा होती. मात्र एकूण चार-पाच वर्षाचा बॅकलॉग राहिला होता. तो बॅकलॉग भरून काढायचा विडा प्राचार्य ठालेंनी उचलला. वर्षात दोन दोन संमेलने घेवून बॅकलॉग भरून काढला. त्यात कंधार, जालना, माजलगाव, औरंगाबाद, शिरूर, पैठण, वसमत, मुरूड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, कडा आदी ठिकाणी संमेलनाचा धडाका लावला. संमेलन ठरले की अध्यक्षाची निवड करणे आलेच. संमेलन संपले की, त्या अध्यक्षाचा प्रतिष्ठानचा विषेशांक प्रकाशित करणे अशी कामं करावीच लागली. संमेलनाची संख्या वाढली म्हणून अध्यक्षपदेही साहित्यिकांना मिळाली. त्यात भारत सासणे, बाबा भांड, कवठेकर, भास्कर चंदनशिव, गजमल माळी, देशपांडे, सुधीर रसाळ, फ. मुं. शिंदे, लक्ष्मीकांत देशमुख, सुहासिनी इर्लेकर, नागनाथ कोतापल्ले, प्रभाकर मांडे, यु. म. पठाण अशी कितीतरी नावे सांगता येतील.
या सन्माननीय संमेलनाध्यक्षांच्या नावाने प्रतिष्ठानचे विषेशांक! प्रतिष्ठानचाही खूपच बॅकलॉग होता. तो पूर्ण करण्याचे अवघड कार्य प्राचार्य ठाले सरांच्या मार्गदर्शनाखाली संपादक मंडळाने केले.

प्रतिष्ठा असलेले ‘प्रतिष्ठान’
प्रतिष्ठानमध्ये आपले साहित्य प्रकाशित व्हावे यासाठी साहित्यिक वाट पाहतात. या अंकाची प्रतिष्ठा उंचावत गेली आहे. संपादक जरी श्रीधर नांदेडकर असले तरी साहित्य निवड, विषय निवड, विशेषांक निवड चर्चेनंतर स्वत: ठाले सर जातीने पाहतात. म्हणून गुणवत्ता अबाधित आहे. प्रतिष्ठानने यापूर्वी काही विशेषांक प्रकाशित केेलेत. त्यात संत नामदेव, यशवंतराव चव्हाण, रा. रं. बोराडे विषेशांक इत्यादींचा समावेश आहे.
नंतरच्या पिढीतील साहित्यिकांच्या कथा, कविता, समीक्षांचे अंकही प्रकाशित केलेत.  संमेलने आणि प्रतिष्ठान अंकाचे प्रकाशन बरोबरीत आणून नियमितपणा सिद्ध केला. मराठी साहित्यातील दखलपात्र अंक म्हणून प्रतिष्ठानच्या अंकाकडे पाहिले जाते. अगदी परवा माजी मुख्यमंत्री मसापच्या एका कार्यक्रमात ‘मी प्रतिष्ठानचा वर्गणी भरून सभासद आहे आणि तो अंक मी वाचतो’ असे जाहीरपणे व्यासपीठावरून बोलले. इतर पुढार्‍यांचे याबाबतचे ज्ञान शून्यच. एकूण प्रतिष्ठान वाचनीय तर आहेच, त्यासोबत मराठवाड्यातील नामवंत व अभ्यासू लेखकांचे लेख या अंकात प्रकाशित केले जातात. हे वैशिष्ट्य जपण्याचे काम मसापने केले आहे. प्रतिष्ठानचा अंक छापायचा म्हणून कधीच छापला नाही. उद्देश ठरलेला, विषय ठरलेला. म्हणून प्रतिष्ठानचे सांस्कृतिक दस्तऐवजाच्या तोडीचे अंक वाचकांना दिले जातात. अंक मिळाला नाही तर तो अंक वाचक मसाप कार्यालयातून घेवून जाताना मी कित्येकवेळा हे पाहिले आहे.

लेखिका संमेलने
अध्यक्ष प्राचार्य ठालेंच्याच कालावधीत फक्त लेखिकांच्या साहित्य संमेलनाची सुरूवात करण्यात आली. असा प्रयोग नियमितपणे महाराष्ट्रात होत नसावा. मात्र मसापने हे धाडस केले. धाडस करताना लेखिकांना अध्यक्षपदे मिळायला सोपे गेले किंवा त्यांना संधी चालून आली. प्रतिष्ठानचे लेखिका विशेषांकही निघाले. यामुळे मराठवाड्यातील लेखन करणार्‍या लेखिकांची दखल वेगळेपणाने घेणे भाग पडले. औरंगाबाद, अंबेजोगाई, परभणी, बीड, माजलगाव, जालना या शहरात लेखिका संमेलने झाली. त्याच्या अध्यक्षा म्हणून रेखा बैजल, मथू सावंत, छाया महाजन, ललिता गादगे, अनुराधा वैद्य, लता मोहरीर यांची निवड केल्यामुळे त्यांना हा मान मिळाला.
लेखिका संमेलनाची वैशिष्ट्ये ठरवून घेतलेली आहेत. त्यात संमेलनाच्या उद्घाटन आणि समारोपाच्या कार्यक्रमाप्रसंगीच फक्त परिषदेचे आणि स्थानिक पदाधिकारी व्यासपीठावर असतात. उर्वरित सर्वच कार्यक्रमात फक्त लेखिकाच असतात. शंभर टक्के लेखिकाच. हा मसापचा लेखिका पॅटर्न ठरला आहे. उद्घाटकीय पाहुणी ही नामवंत लेखिका किंवा कार्यकर्तीच असते. हे या संमेलनाचे वैशिष्ट्य आहे.

जीवनगौरव पुरस्कार
मसापच्यावतीने गेल्या वर्षापासून मराठवाड्यातील ज्येष्ठ साहित्यिकाला ‘जीवनगौरव’ पुरस्कार दिला जातो. त्यात वर्ष-दोन वर्षातच तीन ज्येष्ठ साहित्यिकांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात सुधीर रसाळ, चंद्रकांत पाटील आणि ना. धों. महानोर यांचा समावेश होता. पंचवीस हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह आणि श्रीफळाचा त्यात समावेश असतो.
असे पुरस्कार देत देतच नवीन पुरस्कारार्थी शोधून विविध साहित्य प्रकाराला पुरस्कारही दिले जातात. असे पुरस्कार आश्रयदाते शोधणे, त्या रकमा मसाप खात्यावर टाकून येणार्‍या व्याजावर साहित्य पुरस्कार देणे अशा कल्पना गेल्या दहा पंधरा वर्षात राबवल्या गेल्या. यावर्षीचे जीवनगौरव पुरस्कार जाहीर व्हायचे आहेत.

विश्‍व मराठी...
विश्‍व मराठी साहित्य संमेलनाची अफलातून कल्पना राबवण्यामागे प्राचार्य ठालेच. अगदी त्यांनी धडाकेबाज तीन साहित्य संमेलने घडवून आणली. थेट परदेशात! खूप टीका झाली. मीडियांनी बातम्यांचा रतीब लावला. त्यातल्या काही जणांना या संमेलनवारीत जायला संधी मिळाली आणि हेच मीडियावाले लागले टाळ वाजवायला.
पहिले विश्‍व साहित्य संमेलन सॅन होजे (अमेरिका) येथे दलित साहित्यिक गंगाधर पानतावणे यांच्या अध्यतेखाली झाले.
दुसरे संमेलन दुबई येथे प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
तिसरे संमेलन सिंगापूर येथे नाटककार महेश एलकुंचवार यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
चौथे संमेलन ठरले तेव्हा अखिल भारतीय मराठी महामंडळ पुणे येथे गेले आणि वांधे सुरू झाले. संमेलन टोरँटो येथे घेण्याचे ठरले. सन्माननीय अध्यक्ष म्हणून निसर्गकवी ना. धों. महानोर यांची निवडही झाली....
....आणि टोरँटोचे संमेलन गाळात रूतले. त्यातून कधी निघेल माहीत नाही. का त्याचा बॅकलॉगही ठालेंनाच पूर्ण करावा लागणार?


एक एकर जागा
मराठवाडा साहित्य परिषदेसाठी कै. अनंत भालेराव यांनी सोसायटीतून एक एकर जागा हट्टाने देण्यास भाग पाडले. म्हणून या जागेत वास्तू उभ्या राहू शकल्या. मसाप कार्यालय, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अनंतराव भालेराव भवन हे उभे करणे शक्य झाले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे उत्पन्न बर्‍यापैकी मसापला मिळते. अनंतराव भालेराव भवनाचेही उत्पन्न सुरू झाले आणि परिषदेतील बांधकामाचा काही भाग स्टेट बँकेला किरायाने दिला. तेही उत्पन्न मिळतेय. एकूण मसाप आता स्वत:च्या पायावर उभी राहिलीय. उत्पन्नाची साधने तयार झालीत. परिषदेबाहेरील चिमूटभर सतत विरोध करणार्‍यांचा उत्पन्नावर डोळा आहे. म्हणून गेल्या पाच-सहा वर्षात टीका केल्याशिवाय त्यांना निवांत झोप लागत नाही. आताही तीच मंडळी पुन्हा आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत. तो त्यांचा अधिकार आहे.
याच इमारतीत मोक्याच्या ठिकाणी स्व. अनंत भालेराव आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे बसवण्यात आले. प्रतिष्ठान वेळेवर निघू लागला. साहित्य संमेलने वर्षावर आणली. निमंत्रण पत्रिकेत विविधता राखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. गुणवत्तेला प्राधान्य या भावनेतून प्रत्येकाच्या वाट्याला संधी येत आहे.
साहित्य संमेलनामुळे आणि कार्यकर्त्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे मसाप खेडोपाडी पोहोचली ती अध्यक्ष ठालेंच्या काळात. त्यातही मसापने गेल्या पंचवार्षिक कालावधीत ऐतिहासिक निर्णय घेतले. त्यामुळे मसाप लोकप्रिय होण्यास मदत झाली.

वर्धापनदिन लातूरात
कधी नव्हे ते नावीन्य घडले. मसापने अनेक कार्यक्रम औरंगाबादबाहेरच्या जिल्हा शाखांना दिले. त्यात उस्मानाबाद येथे व्याख्यानमाला, नांदेड येथेही व्याख्यान तर ज्या लातूरने मसापसाठी खूप दिले, लातूर, शिरूर ताजबंद, उदगीर, मुरूड या गावात मसापची विभागीय साहित्य संमेलने झाली.
अशा लातूर जिल्ह्याने लेखकांची पिढी घडवली आणि लेखक निर्मिती होतेय. अशा लातूर शहरात मसापचा वर्धापनदिन साजरा करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी निसर्गकवी ना. धों. महानोर प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमात भाषणासोबतच निवडक कविंचे कविसंमेलन घेण्यात आले. अशा विविध कार्यक्रमातून मसाप तळागाळापर्यंत पोहोचली आहे.
औरंगाबादबाहेर कार्यक्रम देताना प्रतिसादाचा विचार करण्यात आला. त्यात तिथली जबाबदारी लातूर, डॉ. भास्कर बडे आणि भारत सातपुते, नांदेड, जगदिश कदम आणि सावंत सुरेश, उस्मानाबाद, किरण सगर आणि नितिन तावडे यांच्याकडे देण्यात आली.

शाखांना बळ
मसापच्या शाखांना बळ देण्याचे काम या कालावधीत अधिक प्रभावीपणे झाले. उदगीर, रामचंद्र तिरूके यांची निवड झाली आणि दखलपात्र कार्यक्रमांचा धडाका लावला. त्यात फ. मुं. शिंदे यांचा जाहीर सत्कार, पत्रकार अमर हबीब यांचे भाषण, तर कविसंमेलने आणि ग्रंथप्रकाशनेही केली. तिरूकेंचा कामांचा आवाका पाहून त्यांना विभागीय संमेलन दिले. नियोजनाचा अभाव, साहित्यिक कार्यकर्त्यांवर अविश्‍वास दाखवून मसाप पदाधिकार्‍यांना वार्‍यावर (कार्यवाह-सुधाकर वायचळकर, कोषाध्यक्ष-सुर्यकांत शिरसे) सोडून सर्व अधिकार अनुभवशून्य प्रा. चंद्रशेखर मलकमपट्टे यांना दिल्याने कुजबूज वाढली आणि फक्त बैठकाच झाल्या.... अखेर ‘साहित्य संमेलन घेण्यास आम्ही असमर्थ आहोत’ असे लेखी द्यावे लागले आणि ते साहित्य संमेलन नांदेडला ऐनवेळी देण्यात आले.
अंबाजोगाई- अमर हबीब, दिनकर जोशी, दगडू लोमटे काहीतरी नवे करतात. शाखेच्यावतीने कथालेखनाची शिबिरे घेवून कथालेखन स्पर्धाही घेतल्या गेल्या. इथेही कार्यक्रमांची रेलचेल असते. या गावाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेतले होते.
उमरगा- किरण सगर साहित्य चळवळीतील कार्यकर्ते. दिवाळी दरम्यान ‘वाचन चळवळ’ चालवतात. आठवडाभर ग्रंथविक्री व प्रदर्शन लावतात. त्याचसोबत साहित्यिकांच्या जयंत्या, पुण्यतिथ्यांना ग्रंथप्रदर्शने लावली जातात. ‘जागरमाय’ नावाचा साहित्यिक कार्यक्रम दरवर्षी घेतात.
माजलगाव- प्रभाकर साळेगावकर, कमलाकर कांबळे आणि डी. के. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बर्‍याच वर्षापासून शिवारात, शेतात शिवार साहित्य संमेलने घेतली जातात. विभागीय साहित्य संमेलनाची सत्यप्रत म्हटले तरी चालते. लोक बैलगाड्या करून रानात या संमेलनाला हजेरी लावतात. मराठी भाषादिनही मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. साहित्य चळवळीला पूरक असा हा तालुका आहे.
लातूर- डॉ. भास्कर बडे, भारत सातपुते, राजा होळकुंदे, शंकर झुल्पे, योगीराज माने ही मंडळी साहित्य चळवळीसाठी झटतात. मसापच्यावतीने वर्धापनदिनाचा मोठा कार्यक्रम घेतला, तर वेळोवेळी कविसंमेलने घेतली जातात. मसापच्यावतीने साहित्यसंमेलनही घेण्यात आले. यासाठी शाखाध्यक्ष भारत सातपुते यांचा सहभाग मोठा होता.
बीड- प्राचार्या दीपाताई क्षीरसागर, प्रा. कांचन श्रृंगारपुरे, अनिल होळकर, सतिश साळुंखे, श्रावण गिरी, शाहू बांगर, श्रीराम गिरी, के. टी. तांदळे, डॉ. गणेश मोहिते आदी साहित्यिक मंडळी वाचक चळवळ गतिमान व्हावी म्हणून प्रयत्नात असतात. या शाखेने स्थानिक पातळीवर साहित्य संमेलने घेतलीत. लेखिका साहित्य संमेलनाचे उत्कृष्ट नियोजन लेखिका डॉ. दीपाताई क्षीरसागर यांनी केले होते.
केज- प्राचार्य ईश्‍वर मुंडे, एक सांस्कृतिकतेतील चळवळ्या माणूस. बोलणे जिभेवर साखरच. म्हणून माणसं जमा करण्यात हातखंडा. या ठिकाणी त्यांच्या संस्था आहेत, कर्मचारी आहेत. त्यांनी एकदिवसीय साहित्य संमेलने घेतलीत. आतापर्यंत चार संमेलने झालीत. ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव आणि फ. मुं. शिंदे यांनी या संमेलनाची अध्यक्षपदे स्वीकारलीत. हिंदकेसरी मिळवलेली ही माणसं खेड्यातल्या कुस्त्यातही रेवड्यावारी ‘अध्यक्षपद’ घेतात. हे विषेश.
शिरूर (का)- डॉ. अशोक घोळवे, विठ्ठल जाधव,अनंत कराड, अंकुश कांबळे, मधुलता केदार, सतिश मुरकुटे, संजय डोरले आदी मंडळी मसापच्या बॅनरखाली लहानमोठे कार्यक्रम घेत असतात. तालुक्यातील कविंचा प्रातिनिधीक कवितासंग्रह प्रकाशित होत आहे. शिरूर तालुका नवीनच, त्यात शाखा नवीन. ‘साहित्य’ कशाशी खातात याचे ज्ञान नसल्याने अबकडपासून सुरूवात करावी लागली आहे.
खुलताबाद- ललित आधाने, विष्णू सुरासे या प्राध्यापक द्वयांनी दोन वर्षात तिथली शाखा सुदृढ केली. साहित्य पुरस्कार आणि साहित्य संमेलने घेतली जातात.
औरंगाबाद ही तर मराठवाड्याची राजधानी. इथे सतत साहित्यिक कार्यक्रम होतात. त्यातही मसापचे मुख्य कार्यालय इथेच. प्रशस्त इमारत. बहुतेक पदाधिकारी इथेच राहतात. त्यामुळे साहित्यिक कार्यक्रमाची रेलचेल असते. साहित्यिक कार्यक्रमासाठी हॉल किरायाने दिला जातो. नव्या आणि जुन्या साहित्यिकांचे व्यक्तिगत कार्यक्रम मसापच्यावतीने घेतले जातात.
उणिवा निश्‍चित आहेत. त्याचा उहापोह जाहीर करण्याची आवश्यकता वाटत नाही. त्या उणिवांवर चर्चा करून निर्णय बैठकीत घेता येतात. प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटलांचा निवृत्तीचा विचार होता, परंतु आम्हीच कार्यकारिणीच्या बहुसंख्य संचालकांनी त्यांना गळ घातली. ‘‘एवढे पाच वर्ष तुम्हीच रहा. खूप काम केलात. आता फक्त धावपळ नाही. तुमची आम्हाला, मसापला आवश्यकता आहे.’’ माझ्या मते प्राचार्य ठाले हे निधर्मी चेहर्‍याचे आहेत. मराठवाड्यातील गावागावापर्यंत संपर्क आहे. राजकीय मंडळींशी बैठक/नाव आहे. याचा फायदा संस्थेला निश्‍चित होतो आहे.

जूनमध्ये निवडणूक :
आमदार सतिश चव्हाण पॅनल टाकणार?

आली आली म्हणत मसापची निवडणूक जाहीर झाली. जूनमध्ये उमेदवारी अर्ज भरणे सुरू होतेय. ऑगस्टमध्ये नवीन कार्यकारिणी निवडून येईल. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक झाली त्यात मसापचे विश्‍वस्त श्री. मधुकरअप्पा मुळे यांचा पराभव झाला. शिक्षण साम्राज्यातून (मुळे अप्पा) आ. चव्हाणांनी त्यांचा पराभव केला. मराठवाड्यात या संस्थेची अनेक महाविद्यालये आहेत. प्राचार्य ठाले या संस्थेत प्राचार्य होते. तेव्हा त्यांनी मसापचे सदस्य केले होते. त्या सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे.
आ. सतिश चव्हाण राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर पदवीधर मतदार संघातून स्व. गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती (घाती) निधनाच्या नाराजीचा आ. चव्हाणांना फायदा झाला. ते निवडून आले. आमदारकी शिक्षणसंस्था आणि आता मसापचा किल्ला त्यांना श्री. मधुकरअप्पा मुळे यांच्या खुणावतोय. त्यात बेरीज शिक्षण संस्थातील मसापचे मतदार अधिक नाराज साहित्यिकांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. तशी चर्चा मे महिन्यात सुरू झाली.
ग्रामीण साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे यांना पुढे करून शिक्षणसंस्थेची मते अधिक नाराज मतांची मोट बांधली जावू शकते. त्या त्या जिल्ह्यातील काही नव्या-जुन्या साहित्यिक कार्यकर्त्यांची चाचपणी आ. चव्हाणांनी केली. त्यांचे पॅनल कागदावर तयार झाले आहे पण मते कुठून मिळवणार? शिक्षणमंडळातील चारशे-पाचशे ‘मराठा’ जातीच्या मताने काहीच होणार नाही.
मसापसाठी लोकांसोबतच मतदारात प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांच्याबद्दल आपुलकी आहे. त्यांच्यावर विश्‍वास आहे. आ. चव्हाणांच्या ताब्यात मसाप देवून मसापची राष्ट्रवादी साहित्य परिषद करायची की काय? असा संशय येतोच.
आता गणित असे आहे. एकूण मतदार अडीच हजारावर आहेत. पैकी बाविसशे मतदान मतदान पेटीपर्यंत येईल. अंदाजे जातनिहाय ब्राह्मण 40%, मराठा 40%, वंजारी10%, लिंगायत 05%, येलम 02%, इतर 03% अशी आकडेवारी आहे. याचा अभ्यास प्राचार्य ठालेंना तीस वर्षापासूनचा आहे. मते कशी मिळवायची याचे गणित प्राचार्य ठालेंना चांगले जमते. नव्हे ते प्रथम श्रेणीतच उत्तीर्ण होणार.
वरील आकडेवारी आणि मान-सन्मानाची पदे कोणाला (जातसमूह) जास्त मिळाली याचा वाचकांनी विचार करावा. मराठवाड्यातील या चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून सांगावे वाटते. आ. सतिश चव्हाणांनी या भानगडीत पडू नये. इथे चहापाणी, पार्टी, कोंबडा चालत नाही. उगाच या जाळात हात घालू नये अन् विरोधकांची संख्या वाढवू नये. उभे राहणे त्यांचा हक्क आहे. जरूर उभे रहावे अन् ताकत आजमवावी, पण जपून.
प्राचार्य ठालेंचे पॅनल तयार झाले. त्यांनी त्यांच्या काही खास उमेदवारांना गेल्या दोन महिन्यापूर्वीच कामाला लावलेय. जुन्या कार्यकारिणीतील किरकोळ बदल होतील, अन्यथा तेच संचालक मसापमधील विकासाची माहिती घेवून मतदारापर्यंत जातील. प्राचार्य ठालेंनी मराठवाड्यातील आजीव सभासद, संचालक, कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी पंधरा दिवसापूर्वीच आटोपल्या आहेत.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर खरे काय ते कळेल. पॅनल पडतेय की रणांगण सोडून विरोधक माघार घेतात? यापूर्वी असे झालेय. मसापच्या आजीव मतदारांनी मसापच्या विकासासाठी ‘विश्‍वासू’ माणसालाच मते द्यावीत आणि मसाप ही फक्त ‘साहित्य परिषद’ कशी राहिल , हा राजकीय आखाडा होवू नये अशी भूमिका घ्यावी, अशी साहित्य वर्तुळात चर्चा आहे.

- डॉ. भास्कर बडे, लातूर 
९४२२५५२२७९ 
(पूर्वप्रसिद्धी : मासिक साहित्य चपराक जून २०१५)