Tuesday, June 2, 2015

ठाले पाटलांचे वर्चस्व मराठवाडा साहित्य परिषदेवर टिकणार का?

'साहित्य चपराक' मासिकातील डॉ. भास्कर बडे यांचा विशेष लेख.… 
 
अलीकडे मराठवाड्यातच नव्हे, तर महाराष्ट्रात गाजणारी साहित्यिक संस्था म्हणून जिच्याकडे पाहिले जाते ती म्हणजे मराठवाडा साहित्य परिषद, ‘मसाप’ होय. कोणतीही संस्था चर्चेत असते ती त्या पाठीमागे असलेल्या माणसांमुळे. तो एकमेव माणूस म्हणजे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील. मसापची निवडणूक लागणार म्हणून काहीजण दहा वर्षांपासून लंगोट लावून तयार आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत जेमतेमच मते त्यांना मिळाली होती. तर फक्त तीनच जागेच्या निवडणुका झाल्या. उर्वरीत जागा बिनविरोध निवडून आल्या. एवढे हे विरोध करणारे प्रसिद्ध!
मी तीस वर्षापूर्वी औरंगाबादला शिक्षणासाठी गेलो. मित्रमंडळींच्यासोबत त्या जुन्या चिरेबंदी घरासारख्या दिसणार्‍या खोलीतील मसापमध्ये जायचो. प्रेक्षक म्हणून. खेडेगावची ग्रामपंचायतच म्हणा ना! मोडके तोडके फर्निचर, अस्वच्छता, ‘प्रतिष्ठान’चे अंक-गठ्ठे पडलेले, जाळ्या लागलेल्या. बोर्डावर सुधीर रसाळ हे नाव वाचायचो. काही कार्यक्रमास त्या काळातील नाव असलेले लेखक येत. मी पहायचो. मनात वाटायचे, हे आपल्यासाठी नाही. ठराविक जिल्हे सोडले तर मसापची शाखा नावाचा प्रकार नव्हता. प्रा. डॉ. हृषिकेश कांबळेचा मी रूममेट. त्याच्यामुळे साहित्यिकांच्या ओळखी होऊ लागल्या. मी त्यावेळी कविता लिहायचो. अशी ही मसाप मी पाहिलेली.
जालन्याच्या एका विनाअनुदानित महाविद्यालयात नोकरीला गेलो. बिनपगारी, फुल अधिकारी! संस्थाचालक माजी आमदार. मला प्राचार्य करणार होता. गुळचट लुच्चा. तीन वर्ष विज्ञान महाविद्यालय उभे करून घेतले अन् तोंडी सांगितले, ‘तुमची नोकरी संपली.’
त्यादरम्यान मसापची निवडणूक लागली. तीस चाळीस मतपत्रिका माझ्याकडे होत्या. मला डॉ. वासुदेव मुलाटे, प्रा. नाईकवाडे, डॉ. सुधीर गव्हाणे आणि इतरांच्या पॅनलमध्ये घेतले. मी नोकरीवरून तोंडी काढलेला, पुढील नोकरीच्या शोधात आणि वरील मंडळींच्या बोलण्यात आलो. राहिलो उभा. जालना-बीड-लातूर-उस्मानाबाद या ठिकाणी मी मतदाराकडे गेलो. काही साखळ्या कळल्या. अधिक ठिकाणी प्राचार्य ठालेंचेच नाव मला सांगितले. धारूरला असाच गेलो. प्रा. फपाळ यांना भेटलो. त्यांनी स्पष्ट सांगितले, ‘तुम्ही वेळ वाया घालवू नका. इथले एकही मत तुम्हाला मिळणार नाही.’
आणि एकही मत मिळाले नाही. एकटे डॉ. सुधीर गव्हाणे प्रा. ठालेंशी संपर्कात असल्यामुळे विजयी झाले. आम्ही सपशेल  आपटलो. प्राचार्य ठालेंचा दणका आम्ही खाल्ला. नंतरच्या पाच वर्षात मी मसापशी संपर्कात राहिलो. प्राचार्य ठालेंशी संपर्क वाढवला. त्या व्यासपीठापासून दूर होतो. जवळ येता आले. त्यामुळे प्राचार्य ठालेंची कार्यशैली जवळून पाहता आली. ते बेरजेचे राजकारण करतात. साहित्यिक आणि साहित्य चळवळीतील कार्यकर्त्यांशी सरळ संपर्क ठेवतात. साहित्यिकातील नवोदितापासून वयोवृद्धापर्यंत त्यांचा दांडगा संपर्क आहे. ही त्यांची ताकत आहे. या ताकतीला तोड नाही. त्यांना हलवण्याचे वेगवेगळे प्रयोग झाले परंतु विरोधी मंडळींना अपयशच आले.
प्राचार्य ठाले रोखठोक बोलणारा तर दिलेल्या शब्दाला जागणारा माणूस म्हणून ख्याती. अशी ही खुराड्यातील मसाप प्राचार्य ठालेंच्या ताब्यात आली. अध्यक्ष झाल्यामुळे अधिकार मिळाले आणि कामाचा उरक वाढला. निवृत्तीनंतर ठालेंनी अधिकचा वेळ मसाप उभारणीसाठी दिला. खुराड्यातील मसाप टोलेजंग इमारतीत आणली. त्यासाठी त्यांनी विश्‍वासू साथीदारांची साथ घेतली. त्यात मराठवाड्यातील राजकारणातले महत्त्वाचे नाव मधुकरअण्णा मुळे, सुधीर रसाळ, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, कवठेकर, चंद्रकांत पाटील, ना. धों. महानोर, नागनाथ कोतापल्ले या आणि इतर साहित्यिकांचे सहकार्य वेळोवेळी घेतले. म्हणून आजची मसाप दिसत आहे.
मसापची स्थापना दि. 29 सप्टेंबर 1943 रोजी नांदेडला झाली. स्थापनेमागे मराठवाड्याच्या मुक्तीचा लढा लढणे, तसेच त्याच कार्यकर्त्यांनी साहित्य चळवळ चालवावी. 1943 ते 1953 या कालावधीत मसापचे कार्यालय हैद्राबादला गेले. तेरा वर्षानंतर हे कार्यालय औरंगाबादला आले. मसापच्या नावासोबत अनंत भालेराव, भगवंत देशमुख, वा. ल. कुलकर्णी, चंद्रकांत भालेराव, नरहर कुरूंदकर, सुधीर रसाळ अशी नावे आली. या मंडळींचा यशवंतराव चव्हाणांशी संपर्क आला आणि मसापचे काम जोरात सुरू झाले. चव्हाणांनी मसापसाठी रूपये दहा हजाराचे अनुदान सुरू केले. 1963 साली मसाप इमारतीची कोनशिलाही यशवंतरावांच्या हस्ते बसवण्यात आली. दरम्यान ना. धों. महानोर मसापचे अध्यक्ष झाले आणि यशवंतरावजींच्या नावे नाट्यगृह व्हावे असा ठराव झाला! परंतु काम ठप्पच होते. नंतर पुढे प्राचार्य ठाले मसापचे अध्यक्ष झाले आणि कामाचा धडाका सुरू झाला.

मसापची संमेलने
मसापचे वर्षात एक संमेलन व्हावे ही अपेक्षा होती. मात्र एकूण चार-पाच वर्षाचा बॅकलॉग राहिला होता. तो बॅकलॉग भरून काढायचा विडा प्राचार्य ठालेंनी उचलला. वर्षात दोन दोन संमेलने घेवून बॅकलॉग भरून काढला. त्यात कंधार, जालना, माजलगाव, औरंगाबाद, शिरूर, पैठण, वसमत, मुरूड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, कडा आदी ठिकाणी संमेलनाचा धडाका लावला. संमेलन ठरले की अध्यक्षाची निवड करणे आलेच. संमेलन संपले की, त्या अध्यक्षाचा प्रतिष्ठानचा विषेशांक प्रकाशित करणे अशी कामं करावीच लागली. संमेलनाची संख्या वाढली म्हणून अध्यक्षपदेही साहित्यिकांना मिळाली. त्यात भारत सासणे, बाबा भांड, कवठेकर, भास्कर चंदनशिव, गजमल माळी, देशपांडे, सुधीर रसाळ, फ. मुं. शिंदे, लक्ष्मीकांत देशमुख, सुहासिनी इर्लेकर, नागनाथ कोतापल्ले, प्रभाकर मांडे, यु. म. पठाण अशी कितीतरी नावे सांगता येतील.
या सन्माननीय संमेलनाध्यक्षांच्या नावाने प्रतिष्ठानचे विषेशांक! प्रतिष्ठानचाही खूपच बॅकलॉग होता. तो पूर्ण करण्याचे अवघड कार्य प्राचार्य ठाले सरांच्या मार्गदर्शनाखाली संपादक मंडळाने केले.

प्रतिष्ठा असलेले ‘प्रतिष्ठान’
प्रतिष्ठानमध्ये आपले साहित्य प्रकाशित व्हावे यासाठी साहित्यिक वाट पाहतात. या अंकाची प्रतिष्ठा उंचावत गेली आहे. संपादक जरी श्रीधर नांदेडकर असले तरी साहित्य निवड, विषय निवड, विशेषांक निवड चर्चेनंतर स्वत: ठाले सर जातीने पाहतात. म्हणून गुणवत्ता अबाधित आहे. प्रतिष्ठानने यापूर्वी काही विशेषांक प्रकाशित केेलेत. त्यात संत नामदेव, यशवंतराव चव्हाण, रा. रं. बोराडे विषेशांक इत्यादींचा समावेश आहे.
नंतरच्या पिढीतील साहित्यिकांच्या कथा, कविता, समीक्षांचे अंकही प्रकाशित केलेत.  संमेलने आणि प्रतिष्ठान अंकाचे प्रकाशन बरोबरीत आणून नियमितपणा सिद्ध केला. मराठी साहित्यातील दखलपात्र अंक म्हणून प्रतिष्ठानच्या अंकाकडे पाहिले जाते. अगदी परवा माजी मुख्यमंत्री मसापच्या एका कार्यक्रमात ‘मी प्रतिष्ठानचा वर्गणी भरून सभासद आहे आणि तो अंक मी वाचतो’ असे जाहीरपणे व्यासपीठावरून बोलले. इतर पुढार्‍यांचे याबाबतचे ज्ञान शून्यच. एकूण प्रतिष्ठान वाचनीय तर आहेच, त्यासोबत मराठवाड्यातील नामवंत व अभ्यासू लेखकांचे लेख या अंकात प्रकाशित केले जातात. हे वैशिष्ट्य जपण्याचे काम मसापने केले आहे. प्रतिष्ठानचा अंक छापायचा म्हणून कधीच छापला नाही. उद्देश ठरलेला, विषय ठरलेला. म्हणून प्रतिष्ठानचे सांस्कृतिक दस्तऐवजाच्या तोडीचे अंक वाचकांना दिले जातात. अंक मिळाला नाही तर तो अंक वाचक मसाप कार्यालयातून घेवून जाताना मी कित्येकवेळा हे पाहिले आहे.

लेखिका संमेलने
अध्यक्ष प्राचार्य ठालेंच्याच कालावधीत फक्त लेखिकांच्या साहित्य संमेलनाची सुरूवात करण्यात आली. असा प्रयोग नियमितपणे महाराष्ट्रात होत नसावा. मात्र मसापने हे धाडस केले. धाडस करताना लेखिकांना अध्यक्षपदे मिळायला सोपे गेले किंवा त्यांना संधी चालून आली. प्रतिष्ठानचे लेखिका विशेषांकही निघाले. यामुळे मराठवाड्यातील लेखन करणार्‍या लेखिकांची दखल वेगळेपणाने घेणे भाग पडले. औरंगाबाद, अंबेजोगाई, परभणी, बीड, माजलगाव, जालना या शहरात लेखिका संमेलने झाली. त्याच्या अध्यक्षा म्हणून रेखा बैजल, मथू सावंत, छाया महाजन, ललिता गादगे, अनुराधा वैद्य, लता मोहरीर यांची निवड केल्यामुळे त्यांना हा मान मिळाला.
लेखिका संमेलनाची वैशिष्ट्ये ठरवून घेतलेली आहेत. त्यात संमेलनाच्या उद्घाटन आणि समारोपाच्या कार्यक्रमाप्रसंगीच फक्त परिषदेचे आणि स्थानिक पदाधिकारी व्यासपीठावर असतात. उर्वरित सर्वच कार्यक्रमात फक्त लेखिकाच असतात. शंभर टक्के लेखिकाच. हा मसापचा लेखिका पॅटर्न ठरला आहे. उद्घाटकीय पाहुणी ही नामवंत लेखिका किंवा कार्यकर्तीच असते. हे या संमेलनाचे वैशिष्ट्य आहे.

जीवनगौरव पुरस्कार
मसापच्यावतीने गेल्या वर्षापासून मराठवाड्यातील ज्येष्ठ साहित्यिकाला ‘जीवनगौरव’ पुरस्कार दिला जातो. त्यात वर्ष-दोन वर्षातच तीन ज्येष्ठ साहित्यिकांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात सुधीर रसाळ, चंद्रकांत पाटील आणि ना. धों. महानोर यांचा समावेश होता. पंचवीस हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह आणि श्रीफळाचा त्यात समावेश असतो.
असे पुरस्कार देत देतच नवीन पुरस्कारार्थी शोधून विविध साहित्य प्रकाराला पुरस्कारही दिले जातात. असे पुरस्कार आश्रयदाते शोधणे, त्या रकमा मसाप खात्यावर टाकून येणार्‍या व्याजावर साहित्य पुरस्कार देणे अशा कल्पना गेल्या दहा पंधरा वर्षात राबवल्या गेल्या. यावर्षीचे जीवनगौरव पुरस्कार जाहीर व्हायचे आहेत.

विश्‍व मराठी...
विश्‍व मराठी साहित्य संमेलनाची अफलातून कल्पना राबवण्यामागे प्राचार्य ठालेच. अगदी त्यांनी धडाकेबाज तीन साहित्य संमेलने घडवून आणली. थेट परदेशात! खूप टीका झाली. मीडियांनी बातम्यांचा रतीब लावला. त्यातल्या काही जणांना या संमेलनवारीत जायला संधी मिळाली आणि हेच मीडियावाले लागले टाळ वाजवायला.
पहिले विश्‍व साहित्य संमेलन सॅन होजे (अमेरिका) येथे दलित साहित्यिक गंगाधर पानतावणे यांच्या अध्यतेखाली झाले.
दुसरे संमेलन दुबई येथे प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
तिसरे संमेलन सिंगापूर येथे नाटककार महेश एलकुंचवार यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
चौथे संमेलन ठरले तेव्हा अखिल भारतीय मराठी महामंडळ पुणे येथे गेले आणि वांधे सुरू झाले. संमेलन टोरँटो येथे घेण्याचे ठरले. सन्माननीय अध्यक्ष म्हणून निसर्गकवी ना. धों. महानोर यांची निवडही झाली....
....आणि टोरँटोचे संमेलन गाळात रूतले. त्यातून कधी निघेल माहीत नाही. का त्याचा बॅकलॉगही ठालेंनाच पूर्ण करावा लागणार?


एक एकर जागा
मराठवाडा साहित्य परिषदेसाठी कै. अनंत भालेराव यांनी सोसायटीतून एक एकर जागा हट्टाने देण्यास भाग पाडले. म्हणून या जागेत वास्तू उभ्या राहू शकल्या. मसाप कार्यालय, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अनंतराव भालेराव भवन हे उभे करणे शक्य झाले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे उत्पन्न बर्‍यापैकी मसापला मिळते. अनंतराव भालेराव भवनाचेही उत्पन्न सुरू झाले आणि परिषदेतील बांधकामाचा काही भाग स्टेट बँकेला किरायाने दिला. तेही उत्पन्न मिळतेय. एकूण मसाप आता स्वत:च्या पायावर उभी राहिलीय. उत्पन्नाची साधने तयार झालीत. परिषदेबाहेरील चिमूटभर सतत विरोध करणार्‍यांचा उत्पन्नावर डोळा आहे. म्हणून गेल्या पाच-सहा वर्षात टीका केल्याशिवाय त्यांना निवांत झोप लागत नाही. आताही तीच मंडळी पुन्हा आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत. तो त्यांचा अधिकार आहे.
याच इमारतीत मोक्याच्या ठिकाणी स्व. अनंत भालेराव आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे बसवण्यात आले. प्रतिष्ठान वेळेवर निघू लागला. साहित्य संमेलने वर्षावर आणली. निमंत्रण पत्रिकेत विविधता राखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. गुणवत्तेला प्राधान्य या भावनेतून प्रत्येकाच्या वाट्याला संधी येत आहे.
साहित्य संमेलनामुळे आणि कार्यकर्त्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे मसाप खेडोपाडी पोहोचली ती अध्यक्ष ठालेंच्या काळात. त्यातही मसापने गेल्या पंचवार्षिक कालावधीत ऐतिहासिक निर्णय घेतले. त्यामुळे मसाप लोकप्रिय होण्यास मदत झाली.

वर्धापनदिन लातूरात
कधी नव्हे ते नावीन्य घडले. मसापने अनेक कार्यक्रम औरंगाबादबाहेरच्या जिल्हा शाखांना दिले. त्यात उस्मानाबाद येथे व्याख्यानमाला, नांदेड येथेही व्याख्यान तर ज्या लातूरने मसापसाठी खूप दिले, लातूर, शिरूर ताजबंद, उदगीर, मुरूड या गावात मसापची विभागीय साहित्य संमेलने झाली.
अशा लातूर जिल्ह्याने लेखकांची पिढी घडवली आणि लेखक निर्मिती होतेय. अशा लातूर शहरात मसापचा वर्धापनदिन साजरा करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी निसर्गकवी ना. धों. महानोर प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमात भाषणासोबतच निवडक कविंचे कविसंमेलन घेण्यात आले. अशा विविध कार्यक्रमातून मसाप तळागाळापर्यंत पोहोचली आहे.
औरंगाबादबाहेर कार्यक्रम देताना प्रतिसादाचा विचार करण्यात आला. त्यात तिथली जबाबदारी लातूर, डॉ. भास्कर बडे आणि भारत सातपुते, नांदेड, जगदिश कदम आणि सावंत सुरेश, उस्मानाबाद, किरण सगर आणि नितिन तावडे यांच्याकडे देण्यात आली.

शाखांना बळ
मसापच्या शाखांना बळ देण्याचे काम या कालावधीत अधिक प्रभावीपणे झाले. उदगीर, रामचंद्र तिरूके यांची निवड झाली आणि दखलपात्र कार्यक्रमांचा धडाका लावला. त्यात फ. मुं. शिंदे यांचा जाहीर सत्कार, पत्रकार अमर हबीब यांचे भाषण, तर कविसंमेलने आणि ग्रंथप्रकाशनेही केली. तिरूकेंचा कामांचा आवाका पाहून त्यांना विभागीय संमेलन दिले. नियोजनाचा अभाव, साहित्यिक कार्यकर्त्यांवर अविश्‍वास दाखवून मसाप पदाधिकार्‍यांना वार्‍यावर (कार्यवाह-सुधाकर वायचळकर, कोषाध्यक्ष-सुर्यकांत शिरसे) सोडून सर्व अधिकार अनुभवशून्य प्रा. चंद्रशेखर मलकमपट्टे यांना दिल्याने कुजबूज वाढली आणि फक्त बैठकाच झाल्या.... अखेर ‘साहित्य संमेलन घेण्यास आम्ही असमर्थ आहोत’ असे लेखी द्यावे लागले आणि ते साहित्य संमेलन नांदेडला ऐनवेळी देण्यात आले.
अंबाजोगाई- अमर हबीब, दिनकर जोशी, दगडू लोमटे काहीतरी नवे करतात. शाखेच्यावतीने कथालेखनाची शिबिरे घेवून कथालेखन स्पर्धाही घेतल्या गेल्या. इथेही कार्यक्रमांची रेलचेल असते. या गावाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेतले होते.
उमरगा- किरण सगर साहित्य चळवळीतील कार्यकर्ते. दिवाळी दरम्यान ‘वाचन चळवळ’ चालवतात. आठवडाभर ग्रंथविक्री व प्रदर्शन लावतात. त्याचसोबत साहित्यिकांच्या जयंत्या, पुण्यतिथ्यांना ग्रंथप्रदर्शने लावली जातात. ‘जागरमाय’ नावाचा साहित्यिक कार्यक्रम दरवर्षी घेतात.
माजलगाव- प्रभाकर साळेगावकर, कमलाकर कांबळे आणि डी. के. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बर्‍याच वर्षापासून शिवारात, शेतात शिवार साहित्य संमेलने घेतली जातात. विभागीय साहित्य संमेलनाची सत्यप्रत म्हटले तरी चालते. लोक बैलगाड्या करून रानात या संमेलनाला हजेरी लावतात. मराठी भाषादिनही मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. साहित्य चळवळीला पूरक असा हा तालुका आहे.
लातूर- डॉ. भास्कर बडे, भारत सातपुते, राजा होळकुंदे, शंकर झुल्पे, योगीराज माने ही मंडळी साहित्य चळवळीसाठी झटतात. मसापच्यावतीने वर्धापनदिनाचा मोठा कार्यक्रम घेतला, तर वेळोवेळी कविसंमेलने घेतली जातात. मसापच्यावतीने साहित्यसंमेलनही घेण्यात आले. यासाठी शाखाध्यक्ष भारत सातपुते यांचा सहभाग मोठा होता.
बीड- प्राचार्या दीपाताई क्षीरसागर, प्रा. कांचन श्रृंगारपुरे, अनिल होळकर, सतिश साळुंखे, श्रावण गिरी, शाहू बांगर, श्रीराम गिरी, के. टी. तांदळे, डॉ. गणेश मोहिते आदी साहित्यिक मंडळी वाचक चळवळ गतिमान व्हावी म्हणून प्रयत्नात असतात. या शाखेने स्थानिक पातळीवर साहित्य संमेलने घेतलीत. लेखिका साहित्य संमेलनाचे उत्कृष्ट नियोजन लेखिका डॉ. दीपाताई क्षीरसागर यांनी केले होते.
केज- प्राचार्य ईश्‍वर मुंडे, एक सांस्कृतिकतेतील चळवळ्या माणूस. बोलणे जिभेवर साखरच. म्हणून माणसं जमा करण्यात हातखंडा. या ठिकाणी त्यांच्या संस्था आहेत, कर्मचारी आहेत. त्यांनी एकदिवसीय साहित्य संमेलने घेतलीत. आतापर्यंत चार संमेलने झालीत. ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव आणि फ. मुं. शिंदे यांनी या संमेलनाची अध्यक्षपदे स्वीकारलीत. हिंदकेसरी मिळवलेली ही माणसं खेड्यातल्या कुस्त्यातही रेवड्यावारी ‘अध्यक्षपद’ घेतात. हे विषेश.
शिरूर (का)- डॉ. अशोक घोळवे, विठ्ठल जाधव,अनंत कराड, अंकुश कांबळे, मधुलता केदार, सतिश मुरकुटे, संजय डोरले आदी मंडळी मसापच्या बॅनरखाली लहानमोठे कार्यक्रम घेत असतात. तालुक्यातील कविंचा प्रातिनिधीक कवितासंग्रह प्रकाशित होत आहे. शिरूर तालुका नवीनच, त्यात शाखा नवीन. ‘साहित्य’ कशाशी खातात याचे ज्ञान नसल्याने अबकडपासून सुरूवात करावी लागली आहे.
खुलताबाद- ललित आधाने, विष्णू सुरासे या प्राध्यापक द्वयांनी दोन वर्षात तिथली शाखा सुदृढ केली. साहित्य पुरस्कार आणि साहित्य संमेलने घेतली जातात.
औरंगाबाद ही तर मराठवाड्याची राजधानी. इथे सतत साहित्यिक कार्यक्रम होतात. त्यातही मसापचे मुख्य कार्यालय इथेच. प्रशस्त इमारत. बहुतेक पदाधिकारी इथेच राहतात. त्यामुळे साहित्यिक कार्यक्रमाची रेलचेल असते. साहित्यिक कार्यक्रमासाठी हॉल किरायाने दिला जातो. नव्या आणि जुन्या साहित्यिकांचे व्यक्तिगत कार्यक्रम मसापच्यावतीने घेतले जातात.
उणिवा निश्‍चित आहेत. त्याचा उहापोह जाहीर करण्याची आवश्यकता वाटत नाही. त्या उणिवांवर चर्चा करून निर्णय बैठकीत घेता येतात. प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटलांचा निवृत्तीचा विचार होता, परंतु आम्हीच कार्यकारिणीच्या बहुसंख्य संचालकांनी त्यांना गळ घातली. ‘‘एवढे पाच वर्ष तुम्हीच रहा. खूप काम केलात. आता फक्त धावपळ नाही. तुमची आम्हाला, मसापला आवश्यकता आहे.’’ माझ्या मते प्राचार्य ठाले हे निधर्मी चेहर्‍याचे आहेत. मराठवाड्यातील गावागावापर्यंत संपर्क आहे. राजकीय मंडळींशी बैठक/नाव आहे. याचा फायदा संस्थेला निश्‍चित होतो आहे.

जूनमध्ये निवडणूक :
आमदार सतिश चव्हाण पॅनल टाकणार?

आली आली म्हणत मसापची निवडणूक जाहीर झाली. जूनमध्ये उमेदवारी अर्ज भरणे सुरू होतेय. ऑगस्टमध्ये नवीन कार्यकारिणी निवडून येईल. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक झाली त्यात मसापचे विश्‍वस्त श्री. मधुकरअप्पा मुळे यांचा पराभव झाला. शिक्षण साम्राज्यातून (मुळे अप्पा) आ. चव्हाणांनी त्यांचा पराभव केला. मराठवाड्यात या संस्थेची अनेक महाविद्यालये आहेत. प्राचार्य ठाले या संस्थेत प्राचार्य होते. तेव्हा त्यांनी मसापचे सदस्य केले होते. त्या सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे.
आ. सतिश चव्हाण राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर पदवीधर मतदार संघातून स्व. गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती (घाती) निधनाच्या नाराजीचा आ. चव्हाणांना फायदा झाला. ते निवडून आले. आमदारकी शिक्षणसंस्था आणि आता मसापचा किल्ला त्यांना श्री. मधुकरअप्पा मुळे यांच्या खुणावतोय. त्यात बेरीज शिक्षण संस्थातील मसापचे मतदार अधिक नाराज साहित्यिकांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. तशी चर्चा मे महिन्यात सुरू झाली.
ग्रामीण साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे यांना पुढे करून शिक्षणसंस्थेची मते अधिक नाराज मतांची मोट बांधली जावू शकते. त्या त्या जिल्ह्यातील काही नव्या-जुन्या साहित्यिक कार्यकर्त्यांची चाचपणी आ. चव्हाणांनी केली. त्यांचे पॅनल कागदावर तयार झाले आहे पण मते कुठून मिळवणार? शिक्षणमंडळातील चारशे-पाचशे ‘मराठा’ जातीच्या मताने काहीच होणार नाही.
मसापसाठी लोकांसोबतच मतदारात प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांच्याबद्दल आपुलकी आहे. त्यांच्यावर विश्‍वास आहे. आ. चव्हाणांच्या ताब्यात मसाप देवून मसापची राष्ट्रवादी साहित्य परिषद करायची की काय? असा संशय येतोच.
आता गणित असे आहे. एकूण मतदार अडीच हजारावर आहेत. पैकी बाविसशे मतदान मतदान पेटीपर्यंत येईल. अंदाजे जातनिहाय ब्राह्मण 40%, मराठा 40%, वंजारी10%, लिंगायत 05%, येलम 02%, इतर 03% अशी आकडेवारी आहे. याचा अभ्यास प्राचार्य ठालेंना तीस वर्षापासूनचा आहे. मते कशी मिळवायची याचे गणित प्राचार्य ठालेंना चांगले जमते. नव्हे ते प्रथम श्रेणीतच उत्तीर्ण होणार.
वरील आकडेवारी आणि मान-सन्मानाची पदे कोणाला (जातसमूह) जास्त मिळाली याचा वाचकांनी विचार करावा. मराठवाड्यातील या चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून सांगावे वाटते. आ. सतिश चव्हाणांनी या भानगडीत पडू नये. इथे चहापाणी, पार्टी, कोंबडा चालत नाही. उगाच या जाळात हात घालू नये अन् विरोधकांची संख्या वाढवू नये. उभे राहणे त्यांचा हक्क आहे. जरूर उभे रहावे अन् ताकत आजमवावी, पण जपून.
प्राचार्य ठालेंचे पॅनल तयार झाले. त्यांनी त्यांच्या काही खास उमेदवारांना गेल्या दोन महिन्यापूर्वीच कामाला लावलेय. जुन्या कार्यकारिणीतील किरकोळ बदल होतील, अन्यथा तेच संचालक मसापमधील विकासाची माहिती घेवून मतदारापर्यंत जातील. प्राचार्य ठालेंनी मराठवाड्यातील आजीव सभासद, संचालक, कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी पंधरा दिवसापूर्वीच आटोपल्या आहेत.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर खरे काय ते कळेल. पॅनल पडतेय की रणांगण सोडून विरोधक माघार घेतात? यापूर्वी असे झालेय. मसापच्या आजीव मतदारांनी मसापच्या विकासासाठी ‘विश्‍वासू’ माणसालाच मते द्यावीत आणि मसाप ही फक्त ‘साहित्य परिषद’ कशी राहिल , हा राजकीय आखाडा होवू नये अशी भूमिका घ्यावी, अशी साहित्य वर्तुळात चर्चा आहे.

- डॉ. भास्कर बडे, लातूर 
९४२२५५२२७९ 
(पूर्वप्रसिद्धी : मासिक साहित्य चपराक जून २०१५)

No comments:

Post a Comment