Friday, December 11, 2015

बंदा रूपया

पूर्वी रूपयाचा बंदा आकाराने थोडा थोराड, वजनदार असायचा. त्याला त्याच्या अगदी अरूंद कडेवर प्रयत्नपूर्वक उभं करायचं आणि पडू द्यायचं नाही असा एक खेळ आम्ही लहानपणी खेळत असू. दुसर्‍याचा बंदा पडला की खूप आनंद व्हायचा, मजा वाटायची, हसू यायचं; स्वतःचा पडला की मात्र मन हिरमुसलं, खट्टू व्हायचं. पुढे वय वाढलं तरी हा खेळ काही सुटला नाही; सुटत नाही. मोठेपणी हा खेळ सगळेचजण खेळत असतात. फक्त या बंद्याचं रूप तेवढं बदललेलं असतं. लहानपणीच्या धातुच्या, गोल बंद्याची जागा मोठेपणी त्याच्या स्वप्नांनी, मुल्यांनी आणि नातेसंबंधांनी घेतलेली असते. स्वप्नांचा, मुल्यांचा आणि नातेसंबंधांचा हा बंदा रूपया त्याच्या काही मी. मी. च्या अरूंद कडेवर उभा करून प्रत्येकाच्या तळहातावर अदृश्य रूपात ठेवलेला असतो. त्याला पडू न देता तोल सांभाळत चालणं म्हणजेच आयुष्य! जरा पावलं डळमळली की हा बंदा धप्पकन पडलाच म्हणून समजा. उभा असतो तोवर हलका असतो तो पण पडला की कोण जड होतो; पावलं डळमळीतच होतात चालणार्‍याची! वेळीच त्याला सावरून परत सरळ उभं केलं तर बरं नाही तर मग पुढे कायम भेलकांडतच राहतं जीवनाचं गाडं.
  अगदी अजाणत्या वयापासूनच माणसाला स्वप्न पडायला सुरू होतात आणि आयुष्यभर ती पडतच रहातात. फक्त मोठेपणी स्वप्ने पाहण्यासाठी प्रत्येकच वेळेस झोप लागायची गरज मात्र नसते. ही स्वप्नच तर आपला चालण्याचा वेग आणि दिशा नियंत्रीत करत असतात. स्वप्ने मनात आहेत म्हणून तर जीवनाला अर्थ आहे; मनात जगण्याची ऊर्मी आहे. स्वप्ने संपली की आयुष्यातला रामही संपला. जोवर ही स्वप्ने बंद्या रूपयासारखी त्याच्या अरूंद काठावर तोल सांभाळत उभी आहेत तोवर  जीवन आहे, जीवनाला अर्थ आहे. हा रूपया पडला की जीवन डळमळीत. ही स्वप्नं काहीही असू शकतात; भौतिक सुखसुविधा स्वतःसाठी, कुटुंबासाठी मिळवण्याचं स्वप्न, प्रतिष्ठा, मानमरातब मिळवायचं स्वप्न, ऊत्तुंग, भव्यदिव्य काही घडवायचं स्वप्न इत्यादी.
व्यक्तिमत्वाची ऊंची त्या व्यक्तिच्या स्वप्नांच्या ऊंचीवरून तर ठरत असते. जगण्याची, चांगलं जगण्याची ऊर्मी ही स्वप्नेच तर देत असतात. कधीतरी चालताना हा स्वप्नांचा बंदा रूपया धप्पकन खाली पडतो आणि मग सगळच डळमळीत होतं.
स्वप्नं योग्य चाकोरीतली पडताहेत, योग्य दिशेने पडताहेत तोवर जीवनही योग्य दिशेनं चालत राहतं. चुकीची स्वप्नं मनात जन्मली, त्यांचा तोल ढासळला की मग त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आटापिटा चालू होतो, पावलांचा प्रवास चुकीच्या दिशेने सुरू होतो आणि मग कडेलोट निश्चीत!
कधी हा स्वप्नांचा बंदा रूपया धप्पकन कोसळला  की जगण्याचा दर्जा खालावतो; माणुस समाजासाठी आणि स्वतःसाठीही हानीकारक पद्धतीने जगायला लागतो. तर कधी जगण्यातली ऊर्मीच घालवून बसतो.
माणसाच्या जीवन जगण्याच्या पद्धतीवर स्वप्नाइतकीच महत्त्वपूर्ण भूमिका त्याने जाणता अजाणता मनात जोपासलेल्या मुल्यांची पण असते. अगदी अजाणत्या वयापासून आपल्या आत कुटूंब, आपण वावरत असलेला परिवेश, वाचन अशा अनेक माध्यमातून वेगवेगळ्या मुल्यांची बीजे पेरली जात असतात. पुढे या मुल्यांची बाग आपल्या व्यक्तिमत्वात, जीवनात माणुस जोपासत रहातो. जीवनाचा सुक्ष्मपणे विचार केल्यास माणसाचं जीवन म्हणजे त्याने नकळतपणे मनात जपलेल्या सकारात्मक किंवा नकारात्मक मुल्यांची त्याने जीवनात केलेली अंमलबजावणीच तर असते. बंद्या रुपयासारखी खणखणीत, अरूंद काठावर रूबाबदारपणे, ठाम रोवून उभी असलेली मूल्ये असली की माणूस सकारात्मक, प्रशंसनीय जीवन जगतो. परंतु मनात नकारात्मक मुल्यांची साठवणूक झालेली असेल तर त्याचा प्रभाव जीवन जगण्याच्या पद्धतीवर, वर्तनावर निश्चीतच पडतो. बीजच शुद्ध नसेल तर मिळणार्‍या फळांचा दर्जा कसा चांगला राहील? हा मूल्यांचा बंदा कोसळला की जीवन भेलकांडतच राहतं.
माणसाची स्वप्ने, त्याने जोपासलेली मूल्ये याबरोबरच त्याचे नातेसंबंधही जीवनावर परिणाम करतात. चांगले जोपासलेले सकारात्मक नातेसंबंध ऊर्जा प्रदान करतात तर तोल ढासळलेले नातेसंबंध त्याला नामोहरमही करतात. माणसाच्या भावविश्वाशी त्याच्या नातेसंबंधांचा अगदी थेट संबंध असतो. आनंद आणि दुःख दोन्ही प्रसंगात आपली माणसे सोबत  हवीत; ती नसतील तर जीवन निरस, कंटाळवाणे होऊन जाते. माणसाच्या मानसिक गरजांची पूर्तता करण्यासाठी चांगले नातेसंबंध ही मुलभूत गरज असते.
 आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तर हा नातेसंबंधांचा बंदा रुपया तळहातावर उभा ठेवून, पडू न देता जपणे हे महाकठीण! माणूस एकतर हातातोंडाची मिळवणी करण्यात त्रस्त किंवा ‘आणखी हवे’ची हाव त्याला स्वस्थ बसू देईना. कधी नव्हे इतका माणूस आज नातेसंबंधांच्या बाबतीत बेफिकीर झालाय. त्यातून नातेसंबंधांचा मामला जरा जास्तच नाजूक. जरा कुठे तिळमात्र इकडे तिकडे झाले की हा बंदा धप्पकन कोसळलाच म्हणून समजा. लगेच सावरून उभा केला तर ठीक नाहीतर पुन्हा तो उभा टाकणे दुरापास्तच. कितीही यशोशिखरे सर केली तरी अशा दुरावल्या नातेसंबंधांच्या स्मृति मात्र काटा बनून सलतच राहतात.
तर असा हा स्वप्नांचा, मुल्यांचा आणि नातेसंबंधांचा बंदा रुपया तळहातावर वागवतच संपूर्ण जीवन वाटचाल करायची असते. कधी हा बंदा पडला की थांबायचं जरासं; करायचं त्याला सरळ उभं आणि मग पुढचा प्रवास सुरू!!
पुढच्या काही ओळी लक्षात ठेवल्या ना की हा बंदा रूपया सतत तळहातावर उभा ठेवणे सोपे जाते-
प्रत्येकाला काट्यांसोबत
काही फुले देतोच ईश्वर
उधळून द्यावा गंध थोडासा
येता जाता जीवन वाटेवर

मृत्यू तर अटळच असतो
काहीच नसते मृत्युला उत्तर
नेता नेता मृत्यूनेही
हताशपणे थांबावे क्षणभर!

(साप्ताहिक 'चपराक', पुणे)
- विद्या बयास/ठाकुर
शिरूर ताजबंद, ता. अहमदपुर, जि.लातुर
भ्र. 9637146156

No comments:

Post a Comment