Tuesday, April 26, 2016

'शोध' रद्दीतल्या मोत्यांचा!

‘वाचनसंस्कृती संपुष्टात आली’ अशी तक्रार सर्वच पातळीवरून मोठ्या प्रमाणात केली जाते. पुस्तक मिळविणे आणि सर्वांनी वाचणे हा ‘कौटुंबिक कार्यक्रम’कोणे एकेकाळी अनुभवाला येत होता. तो आता दृष्टिस पडत नाही. ‘मराठी भाषेतून शिक्षण दिले जात नाही, त्यामुळे नवी पिढी वेगाने मराठी साहित्यापासून दूर जाते आहे’ असेही निरीक्षण नोंदविले जाते. दुसर्‍या बाजूने 40 ते 65 या वयोगटातील रसिकवाचनवेडा माणूस पुस्तकाच्या शोधात मुशाफिरी करताना दिसतो. अशांची संख्या अत्यल्प असली तरी अशा ‘मुशाफिरी’मुळे पुस्तकांचा शोध, दुर्मीळ पुस्तकांची दखल घेण्याची प्रवृत्ती आणि वाचनावरील प्रेम हे घटक अजूनही समाजात टिकून आहेत. त्या अनुषंगाने काही उपेक्षित पुस्तकांची भेट कशी कशी होत गेली त्याचा वृत्तांत व त्या पुस्तकांचा संक्षिप्त परिचय सुप्रसिद्ध साहित्यिक भारत सासणे यांच्या या नव्या सदरातून करून देण्यात येत आहे.


साप्ताहिक 'चपराक'चे नवे सदर!

उपेक्षित पुस्तकांचे जग
दिल्लीतली एक सकाळ. एक फूटपाथ आणि त्यावर रचून ठेवलेला पुस्तकांचा ढीग. आपण या फूटपाथवरून हळूहळू पाहत पाहत चालत राहायचं असतं. डाव्या किंवा उजव्या बाजूला अनेक पुस्तकं असतात. दुर्मीळ, उपेक्षित, फाटलेली, अत्यंत जुनी, क्वचित नवीसुध्दा. इथे तुम्हाला हवी असलेली पुस्तकं हमखास मिळू शकतात. फक्त शोधण्यासाठी भरपूर वेळ आपल्याकडे असला पाहिजे आणि चिकाटी देखील असली पाहिजे. येथे फक्त दर्दी मंडळी गर्दी करतात आणि ही गर्दी भाजीमार्केटमध्ये असावी इतकीसुध्दा असू शकते. म्हणजे पुस्तकं शोधायला माणसांची जास्त गर्दी असत नाही, ही आपली कल्पना इथे उधळली जाते. आपण हळूहळू चालत राहायचं असतं आणि शांतपणे पुस्तकं शोधत राहायचं असतं. कोणतं माणिक अचानकपणे हाती येईल याचा काही नियम इथे नसतो. इथे गर्दी असली तरी गोंगाट मात्र नसतो. माणसं शांतपणे भोवतालच्या जुन्या पिवळ्या पडलेल्या पुस्तकांच्या रद्दीमधून हिरे-मोती आणि मौल्यवान रत्नं शोधत असतात. आपणसुध्दा शांतपणे हिंडून हेच करायचं असतं. मी येथे हिंडतो, पाहतो आहे. मला योगी अरविंदांच्या छायाचित्रांचा कुणीतरी फार पूर्वी प्रकाशित केलेला संग्रह सापडतो किंवा महात्मा गांधींची फारशी माहीत नसलेली पत्रे दुर्लक्षित पुस्तकांतून छापलेली सापडतात. मृच्छकटिकची खूप जुनी प्रत सापडते. हडप्पा व मोहोंजोदडो येथे सापडलेली चित्रलिपी वाचली गेली नाही असा आपला समज करून देण्यात आलेला असतो; पण येथे ’द इन्डस स्क्रिप्ट ऍन्ड द ॠग्वेद’ हे पुस्तक अचानक सापडतं. ब्रिटीश साहसिकांनी गंगा नदीतून केलेल्या प्रवासावर आधारित रोमहर्षक असं 1932 मध्ये लिहिलेलं पुस्तक सापडतं. आपण शोधत राहायचं असतं. आपल्या हाती काय सापडेल याचा इथे नियम नसतो.
उपेक्षित पुस्तके दुर्मीळ असतात आणि दुर्मीळ पुस्तके उपेक्षित राहत जातात, असा काहीतरी नियम आहे. जी पुस्तके आपण वाचली पाहिजेत असं काहींना वाटतं त्यांच्याकडून काही पुस्तके आपल्याला वारंवार उपलब्ध करून दिली जातात आणि म्हणून कदाचित वाचकप्रिय ठरतात. त्याव्यतिरिक्त उपलब्ध साधनसामुग्रीच्या आधारे वाईट पध्दतीने छापलेली, मुद्रण दोष असलेली, चुकीच्या प्रकाशकाच्या हातात पडलेली अशी अनेक उत्तम व उपेक्षित पुस्तके पर्यायाने दुर्मीळ होत जातात. अशा पुस्तकांचा शोध घेणं हे चांगल्या वाचकासमोरचं आव्हान असतं.

* * *
उपेक्षित पुस्तकांचं एक विश्‍व आहे. अफाट, विशाल असं. मुळात पुस्तकांचं विश्‍वच इतकं विशाल आहे की एक जीवन संपून जातं तरी पुस्तकं शिल्लक राहतात. या विश्‍वात हरवून जाण्याचं भाग्य सर्वांच्या वाट्याला येत नाही. थोडे भाग्यवान त्या वाटेने जातात आणि ‘काळ अनंत आहे-पृथ्वी विपुल आहे’ असा अनुभव घेतात. उरलेले थोडे या मार्गावर घुटमळतात पण हरवून जात नाहीत. मात्र ज्ञानप्रकाशाने दिपून जातात. बाकी बहुसंख्य अन्न-वस्त्र-निवारा निर्माण करण्यासाठी अर्थार्जन नावाचा संघर्ष करीत राहतात आणि संपून जातात. पुस्तकांच्या जगाचा आणि त्यांचा त्यामुळे संपर्क येत नाही.
किती प्रकारची किती पुस्तकं अस्तित्त्वात आहेत! एक लेखक वाचनालयात जायला घाबरत असे. तो म्हणे की आपण एखादंच पुस्तक लिहिण्यासाठी आत्म्याची ताकद पणाला लावतो आणि इथं किती पुस्तकं आहेत! त्या तुलनेने आपली पुस्तकं किती आणि आपलं स्थान काय? आपण किती छोटे-नगण्य आहोत! स्वत:च्या ’छोटेपणाचा’ अनुभव देणार्‍या पुस्तक संग्रहालयाकडे तो फिरकत नसे म्हणे.
उपेक्षित पुस्तकांचं एक वेगळं विश्‍व आहे. या पुस्तकात काहीतरी विलक्षण असं असतंच. काहीतरी सांगायचंही असतं, पण दुर्लक्षित राहिलेलं असतं. प्रचलित वाटांनी न जाता, अशा दुर्लक्षित पुस्तकांचा मागोवा घेणं जास्त अवघड आणि साहसाचं काम असतं. त्यातून प्रसिद्ध पुस्तके सगळेच वाचतात. मात्र अशा उपेक्षित पुस्तकांना कोण वाचणार? मी मोठ्या कुतुहलाने अशा दुर्लक्षित पुस्तकांचा शोध घेण्याची सवय ठेवली. विलक्षण असं बरंच हाती लागू शकतं असं लक्षात आलं.

* * *
कोण्या व्यं. तु. कुलकर्णी नावाच्या माणसाने एक छोटंसं चोपडं लिहिलं आहे, ’गंडातराच्या फेर्‍यात’ नावाचं. वाईट छपाई, पिवळी पानं, यामुळे त्या पुस्तकाला कोणी हात लावला नसणार. या लेखकाने सन एकोणीसशे वीस पासूनच्या आठवणी सांगितल्या आहेत. प्रदेश जुन्या निजामशाहीचा. दुर्गम आणि मागास असा. लेखकाचा दावा असा की तो सामान्य जीवन जगला असला तरी त्याला सतत ’गंडांतरांना’ तोंड द्यावं लागलं आहे. लेखकाने पुढीलप्रमाणे नोंद केली आहे, ’एखाद्या सामान्य माणसाच्या आयुष्यात किती म्हणून अपघात होऊ शकतात? आणि त्या प्रत्येक अपघातातून प्रत्येक वेळी मरणाच्या दारात जाऊन तो परतही कसा येऊ शकतो? दुसर्‍या कुणाचे माहीत नाही परंतु माझ्या स्वत:च्या आयुष्यात मात्र मी आतापर्यंत कितीतरी गंडांतरात सापडलो आहे, ज्यामध्ये मरणाशिवाय पर्याय नव्हता... माझे जीवन अगदी साधे, सामान्य आणि धोपटमार्गाने गेले आहे... तरीही त्यात कितीतरी अपघाताची आणि संकटाची मालिका आहे...’
कुलकर्णी निजामाच्या राज्यात नोकरीत होते. मराठवाडा-तेलंगणात. पोलेपल्ली या गावात मुक्कामाला असताना मित्राबरोबर ते माडपल्ली गावावरून पायी परतत होते. मित्र म्हणाला की मी मळ्यातून थोडी भाजी घेऊन येतो, तुम्ही थांबा. कुलकर्णी वाट पाहत थांबले आणि शेजारच्या ’पपईच्या झाडाला’ टेकून उभे राहिले. झाड मऊ आणि थंड लागले. तसं हाताने चाचपडून पाहू लागले तर दोन महाभुजंग त्यांच्या दोन्ही बाजूने ’धप्पकन’ पडले आणि त्वरेने निघून गेले. कुलकर्णी ज्याला पपईचे झाड समजले ती प्रत्यक्षात बारा फुटी लांबीच्या प्रचंड महाभुजंगाची ’लागड’ होती. शेपटीवर उभे राहून ते सर्प प्रणय करीत होते. कुलकर्णींची बोबडी वळाली. घाबरलेले हे दोन मित्र पोलेपल्ली गावात आले. पोलेपल्ली ते माडपल्ली या डोंगरामध्ये हे दोन महाभुजंग काही लोकांनी पाहिले होते. कुलकर्णी ही हकीकत रंगवून सांगतात आणि त्यांनी आपल्याला दंश का केला नाही याचा विचार करतात. धप्पकन पडून दोन दिशेने निघून जाणारे प्रचंड सर्प आपल्याही डोळ्यासमोर उभे राहतात.
ग्रामीण जीवनाचा वन्य जीवनाशी संपर्क तुटला नव्हता त्या काळातील, दुर्गम भागातली अस्वलांची आठवण कुलकर्णी सांगतात. काही मित्रं आणि कुलकर्णी स्वत: हैद्राबाद सरकारच्या आदेशानुसार मधुमक्षी पालनाच्या संशोधनाच्या कामावर होते. देवरकुंडा तालुक्यातील चिंतापल्लीच्या (चिंचवनाच्या) जंगलात मधमाशांची पोळी हुडकण्याचे काम त्यांना करायचे होते. एकदा दहा किलो मध काढून, चपराशाजवळ भांडी देऊन, टॉर्च घेऊन ते पहाड उतरत होते. तेव्हा अस्वलांच्या टोळीने त्यांचा पाठलाग सुरू केला. बादलीतला मध एका दगडावर ओतून ठेवला त्यांनी. कारण तो मध चाटून खाईपर्यंत यांना इकडे लपण्याची व्यवस्था करता आली असती; पण चपराशांना मात्र सरळ मार्गाने धावत जायच्या सूचना देण्यात आल्या. अस्वले कुलकर्णींच्या मागावरच होती. कुलकर्णी आणि मित्रांनी हत्तीपेक्षा मोठ्या तीन दगडांच्या पोटातल्या पोकळीत आश्रय घेतला आणि चुलीसारख्या रचनेचं तोंड एका मोठ्या दगडाने बंद करून टॉर्च घेऊन बसून राहिले. एक तास काही घडलं नाही. मग मात्र त्यांच्या दगडी निवार्‍याभोवती अस्वले फिरत आहेत असं त्यांच्या लक्षात आलं. आतून काटक्या पेटवून शेकोटी करण्यात आली. झरोक्यातून अस्वले त्यांच्याकडे रात्रभर पाहत होती पण अस्वले आत आली नाहीत. गेलीही नाहीत. आतला एक सर्पराज मात्र धुरामुळे बाहेर पडला. त्याला आतल्या आत त्यांनी दगडांनी मारलं आणि पहाटे बाहेर पडून मित्रमंडळी धावत सुटली. अस्वले मात्र कंटाळून दूर गेली होती.
कुलकर्णी आपल्या छोटेखानी पुस्तकात असे अनेक प्रसंग सांगतात. अपघाताने प्रेतागारात अडकून पडावे लागणे, निजामशाहीतील रझाकारांशी सामना, सापाने केलेला पाठलाग, पाण्यातून वाहून जाण्याचा प्रसंग, भुताचे दर्शन, वाघाने केलेला पाठलाग, माकडांच्या टोळीत सापडण्याचा प्रसंग, मराठी माणसांसाठी बलुची लोकांशी केलेले भांडण आणि मराठी माणसांची निष्क्रियता इत्यादी प्रसंग कुलकर्णी यांनी रंगवून सांगितले आहेत.
हे पुस्तक रद्दीत पडलं होतं. छापणार्‍याने बहुधा ’कुमार वाङमय’ म्हणून छापलं असावं. (आणि वाईट छापलं होतं!) वाचणार्‍याने (कोणी वाचलं असेल तर) सुरस कथा म्हणून वाचलं असेल. सांगणार्‍याने मात्र सर्वस्व ओतून सांगितलं आहे. कारण निदान तेवीस वेळा तरी त्याचा मरणाशी मुकाबला झाला आहे. आता या पुस्तकाचं साहित्यमूल्य काय आहे? वाङ्मयीन इत्यादी दर्जा काय आहे? या पुस्तकाकडे कोण लक्ष देणार? माझ्यासारखा रद्दीतून मोती शोधणारा एखादा कदाचित ते पुस्तक वाचेल. एरव्ही हे पुस्तक उपेक्षित, दुर्लक्षित असंच राहणार आणि भेळवाल्याकडे जाणार.  

(पूर्वप्रसिद्धी : साप्ताहिक 'चपराक' पुणे)
- भारत सासणे
204, लक्ष्मी एनक्लेव्ह,
गणेश खिंड रस्ता,
मॉडेल कॉलनी जवळ,
शिवाजीनगर, पुणे 411016.
भ्रमणध्वनी : 9422073833


1 comment:

  1. जुने ते सोने हेच खरे!
    अप्रतिम लेख!!

    ReplyDelete