गेला आठवडाभर पाक कब्जात असलेल्या कुलभूषण जाधव आणि त्यांच्या आई, पत्नीच्या पाक भेटीविषयी खूप गाजावाजा झाला. त्यांना ज्याची भेट घेऊ देण्यात आली व त्यात अनेक अडथळे उभे करण्यात आले तो खरोखरच कुलभूषण होता किंवा नाही, यावरही शंका घेतल्या गेल्या आहेत. पण असाच एक पाकिस्तानी ‘कुलभूषण’ गेले नऊ महिने बेपत्ता आहे, त्याचे भवितव्य काय आणि तो कुठे आहे, त्याचा फारसा कुठे उल्लेख आलेला नाही. अर्थात कुलभूषणप्रमाणेच त्याचेही भारतीय हेरखात्याने अपहरण केल्याचा आरोप पाकिस्तानने केलेला आहे. पण भारताने त्याला दुजोरा दिलेला नाही वा भारतातही त्याविषयी कुठली माध्यमात चर्चा झालेली नाही. यातला योगायोग असा आहे, की कुलभूषणला अटक करणारे जे पाकिस्तानी पथक होते, त्यात या पाक कुलभूषणाचा समावेश होता. आणखी एक योगायोग असा आहे की जाधव यांना पाक लष्करी न्यायालयाने फाशी फर्मावली, त्याच दरम्यान हा पाक कुलभूषण बेपत्ता झाला आहे. त्यामुळेच पाकने त्याच्या अपहरणाचा भारतावर संशय घेतला आहे. या पाक कुलभूषणाचे नाव महंमद हबीब झहीर असे आहे. जाधवना अटक करण्याच्या वेळी झहीर पाक हेरखात्यात अधिकारी म्हणून काम करत होता आणि मुळात तो पाक सेनादलात चिलखती दलाचा लेफ्टनंट कर्नल म्हणून कार्यरत होता. निवृत्तीनंतर नवी नोकरी शोधत असताना तो बेपत्ता झालेला आहे. त्यामागे कुठली कारणे आहेत, त्याचा खुलासा पाकने केलेला नसला तरी तो पाकहून ओमान व पुढे नेपाळला गेला असताना बेपत्ता झाला, असा दावा आहे. जिथून झहीर बेपत्ता झाला ती जागा भारताच्या सीमेलगत असल्याने पाकने भारतावर संशय घेतला आहे. त्यात कुठलेही तथ्य नाही असे कोणी छातीठोकपणे सांगू शकत नाही. हेरखात्याची कामे व कारवाया अतिशय गुप्तरित्या चालतात. म्हणूनच पाकचा आरोप फेटाळून लावण्यात अर्थ नाही.
कुलभूषण याच्याविषयी जी माहिती आजपर्यंत उघड झाली आहे, त्यानुसार तो भारतीय नौदलातून निवृत्त झाल्यानंतर इराणच्या चाबाहार बंदरात व्यवसाय करत होता. तिथे त्याला कुठलेतरी व्यापारी आमिष दाखवून पाकिस्तानी टोळीने बोलावून घेतले आणि त्याचे अपहरण करून त्याला पाकिस्तानला पळवून नेले. तालिबान टोळीने हे काम केले आणि पैशाच्या बदल्यात कुलभूषणला पाक हेरखात्याच्या हवाली केले, असे म्हटले जाते. त्याला काहीसा दुजोरा पाकिस्तानातून आलेल्या बातम्यातूनही मिळू शकतो कारण त्याला बलुचीस्थान सीमेवर अटक केल्याचे एका मंत्र्याने म्हटलेले होते, तर पोलीस अधिकार्यांनी त्याला अफगाण सीमेवर पकडल्याचा दावा केला होता. पाकच्या तात्कालीन सुरक्षा सल्लागारांनी कुलभूषण विरोधात कुठलाही सिद्ध होऊ शकणारा पुरावा नसल्याचा खुलासा केलेला होता. साहजिकच पाकने कितीही आरोप केले असले, तरी कुलभूषणला यात अपहरण करून गोवण्यात आलेले सहज लक्षात येते. काही प्रमाणात झहीरची तशीच कथा आहे. निवृत्तीनंतर तो नवी नोकरी शोधत होता आणि इंटरनेटच्या माध्यमातून ब्रिटनच्या एका कंपनीने त्याला आठ लाख रुपये मासिक पगाराची नोकरी देऊ केलेली होती. त्यासाठी त्याला ओमानला बोलावून घेण्यात आले. त्याला विमानाचे तिकिट पाठवले आणि मग तिथून त्याला पुढील मुलाखतीसाठी नेपाळला जाण्यासाठी विमानाचे तिकिट दिले गेले होते. नेपाळला पोहोचल्यावर त्याने आपला फोटोही कुटुंबाला मोबाईलच्या माध्यमातून पाठवला होता. तिथे त्याला भेटलेल्या कुणा व्यक्तीच्या सोबत झहीर भारतीय सीमेलगतच्या लुंबिनी या ठिकाणी जात असल्याचे त्याने कुटुंबाला कळवले होते. मात्र त्यानंतर त्याचा आपल्या नातलगांशी कुठलाही संपर्क झालेला नाही. त्यामुळे झहीरच्या मुलाने पाकिस्तानात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
आता त्या घटनेला नऊ महिने उलटून गेलेले असून, अजून झहीरविषयी कुठलीही माहिती समोर आलेली नाही. पाकिस्ताननेही कुठला थेट आरोप भारतावर केलेला नाही. मात्र पाकिस्तानी भाषेत शत्रू राष्ट्राने असे म्हटले जाते, तेव्हा त्यांचा रोख भारताकडे असतो हे उघड आहे पण भारताने कधीच अशा आरोपांना उत्तर दिलेले नाही किंवा त्याची दखलही घेतलेली नाही. मात्र यातला योगायोग विसरून चालत नाही. कुलभूषणला लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा फर्मावली, त्याच दरम्यान झहीर बेपत्ता झालेला आहे आणि तो कुलभूषणला अटक करणार्या पथकाचा अधिकारी होता. कुठल्याही हेरगिरीच्या प्रकरणातले हिशोब उघडपणे मांडले आत नसतात आणि त्यासाठीची किंमत कोर्टात भरपाई म्हणून मागितली जात नसते. त्याचा हिशोब शत्रू-मित्र राष्ट्रे आपल्या पद्धतीने परस्सर चुकता करीत असतात. कुलभूषणला अपहरण करून जर पाकने फसवले असेल, तर त्याचा हिशोब त्यांच्याच पद्धतीने पाक अधिकार्याचे अपहरण करून चुकता होऊ शकत असतो. पण भारताने झहीर आपल्या ताब्यात आहे, असे अजून कुठे सांगितलेले नसल्याने, ते प्रकरण संशयास्पद आहे. मात्र तसे भारत करू शकतो, हे पाकिस्तानला पक्के ठाऊक असले तरी उघड कुठलाही पुरावा हाती नसल्याने पाक कुठला दावाही करू शकत नाही. जागतिक कोर्टात दादही मागू शकत नाही. उलट पाकिस्तानने कुलभूषण विषयात मोठा तमाशा करून त्याचा ताबा आपल्याकडे असल्याची ग्वाही दिलेली असल्याने भारताला जागतिक कोर्टात धाव घेणे सोपे झाले. झहीरविषयी पाकिस्तान असे कुठलेही पाऊल उचलू शकला नाही. अर्थात आपल्यावरचा जगभरच्या दहशतवादाचा आरोप संपवण्यासाठी आणि बलुची व सिंध प्रांतातील असंतोषाचे खापर भारताच्या माथी फोडण्यासाठीच पाकने कुलभूषणच्या अटकेचा व खटल्याचा तमाशा मांडलेला होता. उलट भारताने काहीही कबुल केलेले नाही.
पाकिस्तानी लष्करातून निवृत्त झाल्यावर लेफ्टनंट कर्नल महंमद हबीब झहीर नवी नोकरी शोधत होता. त्यासाठी त्याने इंटरनेटच्या लिंक्डइन या संकेतस्थळावर आपली माहिती काही महिन्यांपूर्वी टाकलेली होती. तेव्हा झहीर फैसलाबाद येथील एका गिरणीत नोकरी करीत होता. त्या माहितीच्या आधारे ब्रिटनच्या एका कंपनीने त्याला ऑफर दिली होती. ब्रिटनमधल्या फोनवरून झहीरशी कोणी तरी संपर्क साधला व त्याला नोकरीची ऑफर दिलेली होती. पुढे झहीरला इमेलद्वारे रितसर ऑफरपत्र मिळाले. त्यात आठ लाख रुपये मासिक पगाराची माहिती होती. झहीरला विभागीय संचालक म्हणून काम करायचे होते. 4 एप्रिल 2017 रोजी झहीरला ओमानहून विमानाचे तिकिट पाठवण्यात आले आणि दुसर्याच दिवशी झहीर लाहोर येथून ओमानला रवाना झाला. मग तिथून त्याला नेपाळला जाणार्या विमानाचे तिकिट मिळाले. त्याप्रमाणे झहीर नेपाळला पोहोचला. तिथे त्याला जावेद अन्सारी नावाची व्यक्ती भेटणार होती. त्या व्यक्तीने झहीरला स्थानिक मोबाईल कंपनीचे सीमकार्ड दिले होते. तिथे त्याला छोटा प्रवास असलेल्या लुंबिनीचे तिकिट मिळाले आणि त्यानेही तिथे पोहोचताच आपला फोटो काढून कुटुंबियांना पाठवला होता. त्यानंतर मात्र झहीरने पुन्हा कुटुंबाशी संपर्क साधलेला नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेला झहीरचा पुत्र साद झहीर याने पित्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्याला सर्वच संपर्क नंबर स्विच ऑफ असल्याचे लक्षात आले आणि तो घाबरला. त्याने धावपळ करून पोलिसांशी संपर्क साधला. रीतसर तक्रार केली पण आजतागायत पाकिस्तानला झहीरचा शोध लागलेला नाही. झहीर हा पाक हेरखात्याचा माजी अधिकारी असल्याने पाक सरकारने त्याची तात्काळ दखल घेऊन शोधही सुरू केला पण त्यातून काही निष्पन्न झालेले नाही. पाकिस्तानसाठी ही मोठी चिंतेची बाब आहे कारण झहीर हा पाक ‘कुल’भूषण आहे.
झहीर हा कुलभूषण जाधव याच्यासारखाच निवृत्त सेनाधिकारी असून त्याने काही काळ पाक हेरखात्यामध्ये काम केलेले आहे. साहजिकच पाकच्या अनेक कृष्णकृत्याची भरपूर माहिती त्याच्याकडे असू शकते. असा माणूस भारताच्या हाती लागला तर त्याच्याकडून भारतातील पाकसाठी हेरगिरी करणारे गद्दार व हस्तकांची माहितीही उघड होऊ शकते. तेवढेच नाही तर कुलभूषण वा अन्य प्रकरणातील तपशीलही भारताला मिळू शकतो. मात्र भारताने त्यात कुठलाही रस दाखवलेला नाही वा त्यविषयी काहीही मान्य केलेले नाही. थोडक्यात कुलभूषणचा वापर जसा पाकिस्तानने तमाशा उभा करण्यासाठी करून घेतला, तसा कुठला प्रकार भारताकडून झालेला नाही. मग झहीरचे झाले काय? जेव्हा अशी लपाछपी चालते, तेव्हा शत्रूगोटात भीतीचे वातावरण घोंगावू लागते. त्याला आपल्या हस्तकाला वाचवता येत नाही वा त्याच्या सुटकेची मागणीही करता येत नाही. त्याच्याविषयी काही करता आले नाही, म्हणून बिघडत नाही पण त्याच्यापाशी असलेली माहिती शत्रू किती व कशी उपयोगात आणेल, त्याची चिंता सतावणारी असते. म्हणूनच भारतासाठी कुलभूषण हा जितका जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यापेक्षा कित्येक पटीने झहीर हा पाकिस्तानसाठी गळफास आहे. आणखी एक गोष्ट इथे उलगडून सांगितली पाहिजे. भारताने झहीरविषयी उघड काही कबुल केलेले नसले, तरी तशी शक्यता असल्यास त्याचे सुचक संकेत पाकिस्तानला दिलेले असू शकतात. ब्लॅकमेलमध्ये जसे सुचक संकेत दिले जातात, तशीच ही गोष्ट असते. त्यात ऐकणार्या बघणार्या इतरांना त्यातले संकेत कळू शकत नाहीत. मात्र त्यात गुंतलेल्यांना नेमका आशय अशा गूढ शब्दातून कळत असतो. कदाचित तो संकेत पाकिस्तानला भारताने दिलेला असावा आणि त्यांना समजलेला असावा. म्हणूनच कुलभूषण जाधवच्या बाबतीत माणुसकीचे नाटक पाकने रंगवलेले असावे.
माणुसकीच्या नात्याने कुलभूषणच्या आई व पत्नीला त्याची भेट देण्याचे नाटक पाकने रंगवलेले असू शकते पण तेही करताना त्यांना धड वागता आलेले नाही. परंतु यामुळे कुलभूषण सुरक्षित किती आहे, त्याची भारताला माहिती मिळालेली आहे. समजा तसाच झहीर भारताच्या ताब्यात असेल तर त्यालाही यमयातना देऊन त्याची छायाचित्रे पाकला मिळतील, अशी सोय केली जाऊ शकते. तसे काही झाल्यामुळे पाकला सुबुद्धी सुचली असेल काय? दोन देशातल्या हेरांना पकडले असल्यास त्यांची अदलाबदल करण्याचाही प्रघात आहे. पाकला तसाच खोड्यात घालून झहीरच्या बदल्यात कुलभूषणची मुक्तता करणे शक्य आहे. अर्थात झहीर भारताच्या कब्जात असला तर! तशी कुठली माहिती आज तरी उपलब्ध नाही पण झहीरला भारताच्या सीमेलगत अन्य कोणी कशाला गायब करू शकतो? इतर कुठल्या देशाला झहीरला उचलून काय मिळणार आहे? फक्त भारतासाठीच झहीर मोलाचा ऐवज आहे. हा सगळा सावल्यांचा खेळ आहे. हेरखाती ही मुळातच सरकारच्या बेकायदा कारवायात गुंतलेली असतात आणि त्याविषयी कोणी कधी जाहीरपणे बोलत नसतो. इथे भारतीय माध्यमात तावातावाने पाक हेरखाते आय एस आय याविषयी चर्चा चालतात पण आयबी वा रॉ अशा भारतीय हेरखात्याबद्दल कुठली चर्चा होत नाही. नेमकी उलटी स्थिती पाकिस्तानात आहे. तिथे कुठला घातपात, हिंसाचार माजला, मग त्याचे आरोप भारतीय हेरखात्यावर होत असतात. त्यामुळेच झहीरच्या बेपत्ता होण्यावरून पाक माध्यमात खूप चर्चा झाल्या व भारतीय हेरखात्यावर आरोपांची सरबत्ती झालेली आहे. मात्र भारताने कुठलीही दाद दिलेली नसली तरी त्यात तथ्य नाही, असे बोलण्यात अर्थ नाही. हा मोठा डाव असू शकतो. त्याची जाहीर चर्चा होऊ शकत नाही. मात्र तरी माध्यमात जी उथळ चर्चा चालते, ती मोठी मनोरंजक असते.
हेरगिरी व तत्सम कारवाया ही अतिशय निर्दय बाब असते. त्यांना माणुसकी वा समाजाचे नित्यनियम लागू होत नाहीत. भावनांना तिथे स्थान नसते. नात्यागोत्यांना अर्थ नसतो. म्हणूनच सामान्य घटनांची जशी जाहीर चर्चा, वादविवाद होतात तशी अशा गोष्टींची चर्चा होऊ शकत नाही. माध्यमातून बौद्धिक चर्चा रंगवणार्यांना या वस्तुस्थितीचा गंध नसतो. म्हणून कुठल्याही विषयावर वादंग माजवले जाते पण त्यातून काहीही हाती लागत नाही, की कुठल्या विषयाचा निचरा होत नाही. म्हणूनच झहीर व कुलभूषण यांच्यातला संबंध भारतात कुठे चर्चिला गेला नाही. झहीर हा पाक ‘कुल’भूषण आहे, त्याचाही दोनचार दिवसात कुठे उल्लेख झाला नाही. तशी आपण अपेक्षाही करू नये. ज्यांना राजकीय गुपिते, परराष्ट्र संबंध, त्यातल्या खाचाखोचा ठाऊक नाहीत, त्यांना यातली गुंतागुंत कशी उलगडू शकते? येमेनमधून भारत सरकारने हजारभर नागरिकांची मुक्तता केली. त्यात 43 देशांचे नागरिक होते पण त्याचे इथे कौतुक होऊ शकले नाही. कारण भारतीय माध्यमे व शहाणे जनरल व्ही. के. सिंग यांची टवाळी करण्यात गर्क होती. त्यापैकी कोणाला या निवृत्त सेनापतीने येमेनच्या आखातामध्ये युद्धजन्य स्थितीत नागरिकांची सुखरूप मुक्तता करण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला त्याचेही भान नव्हते तर त्यांच्याकडून कुठल्या शहाणपणाची अपेक्षा करायची? त्यातली गुंतागुंत यांना कोण समाजावू शकेल? त्यांना झहीरमधला पाक ‘कुल’भूषण ओळखता येत नाही वा त्याच्या बेपत्ता होण्यातला डावपेचही उमजू शकत नाही. असे लोक सनसनाटी खूप माजवू शकतात पण त्यांच्यापाशी गोष्ट नसते की तथ्य नसते. नुसतेच फुगे फुगवले जातात. भावना आणि कर्तव्याचा गोंधळ घातला जातो. साध्य काहीच होत नाही. म्हणूनच कोणाला पाक कुलभूषणाची आठवण झाली नाही, की त्याच्या भवितव्याचा प्रश्न पडलेला नाही.
- भाऊ तोरसेकर
९७०२१३४६२४
साप्ताहिक 'चपराक', पुणे
मासिक 'साहित्य चपराक'
कोणताही मोठा संशोधक वा गाढा अभ्यासक आपापल्या कामात अतिमग्न राहिल्यामुळे त्याचा स्वभाव एककल्ली बनू शकतो. मात्र पुण्यातील ज्येष्ठ पुरातत्त्ववेत्ते व संशोधक आणि मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर त्याला निश्चितच अपवाद म्हणावे लागतील. पुरातत्त्व संशोधनासारख्या किचकट क्षेत्रात काम करूनही त्यांनी आपले ‘अजातशत्रू व्यक्तिमत्त्व’ कायम टिकविले आहे. मूर्तिशास्त्राचा सखोल अभ्यास करताना त्यांनी अनेक मूर्तींमध्ये असलेली प्रेमळता, शालीनता आणि विद्वत्ता जणू काही स्वतः आत्मसात केली असावी असे त्यांच्या प्रसन्न मूर्तीकडे पाहून सतत वाटते. त्यांच्या ‘अजातशत्रू व्यक्तिमत्त्वा’चे रहस्य कदाचित यामध्येच दडलेले असावे.
संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेकडून अतिशय आदराचे आणि मानाचे स्थान प्राप्त झालेल्या देगलूरच्या प्रसिद्ध वारकरी घराण्यात डॉ. गो. बं. देगलूरकर यांचा जन्म झाला. वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू धुंडामहाराज देगलूरकर हे त्यांचे सख्खे काका. धुंडामहाराज देगलूरकर हे डॉ. देगलूरकर यांचे वडील बंडामहाराज यांचे ज्येष्ठ बंधू होते. बंडामहाराज देगलूरकर हे देखील चांगले कीर्तनकार होते. संगीताचे त्यांना उपजत ज्ञान होते. लहानपणापासून घरातच ‘भजन-कीर्तन’ यांची नित्याचीच सोबत असल्यामुळे साहजिकच डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या बालमनावर आध्यात्मिक संस्कार बिंबले गेले. त्यातूनच भारतीय संस्कृती, प्राचीन इतिहास, पुराणकथा, मूर्तिशास्त्र याबाबतची त्यांना गोडी निर्माण झाली. देगलूरजवळ असलेले होट्टलचे अति प्राचीन मंदीर हे तर त्यांचे अभ्यासाचे आवडते स्थळ बनले. त्याकाळी संपूर्ण मराठवाडा हा निजामाच्या राजवटीत होता. निजामी राजवटीतील अत्याचार, जुलूम आणि मोगलाईचे चटके त्यांनी लहानपणापासूनच अनुभवले. तरीही हैदराबादच्या शालीबंडा भागातील ‘वैदिक धर्म प्रवेशिका’ मध्ये त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी मात्र त्यांना पुण्याला जावे लागले. सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून त्यांनी बी.ए.ची पदवी प्राप्त केली आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी ते पुन्हा हैदराबादला उस्मानिया विद्यापीठात गेले. ‘उस्मानिया’मधून एम. ए. ची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी काही काळ औरंगाबाद आणि नागपूर येथील शासकीय महाविद्यालयातून अध्यापनाचे काम केले.
शिक्षण आणि नंतर अध्यापनाचे कार्य चालू असतानाच त्यांचे पुरातत्त्व आणि मूर्तिशास्त्रामध्ये संशोधनही चालूच होते. देगलूरकर यांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजमधून ‘कल्चरल हिस्ट्री ऑफ मराठवाडा’ विषयावर पीएचडी मिळविली तर त्यानंतर थोड्याच अवधीत ‘टेम्पल आर्किटेक्चर अँड स्क्लप्चर्स ऑफ महाराष्ट्र’ या विषयासाठी नागपूर विद्यापीठाने त्यांना ‘डी.लिट’ ही पदवी दिली. पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने देखील ‘डी.लिट’ ही सर्वोच्च पदवी देऊन त्यांच्या अमूल्य संशोधन कार्याचा गौरव केला. आतापर्यंत ‘डी.लिट’च्या दोन पदव्या मिळविणारे डॉ. देगलूरकर हे कदाचित महाराष्ट्रातील पहिले पुरातत्त्व संशोधक असतील.
अनेक वर्षे अध्यापनाचे काम करताना त्यांनी आपले लेखन आणि संशोधन चालूच ठेवले. देशातील महत्त्वाच्या मंदिरांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर त्यांनी आपल्या विविध लेखांद्वारे त्या वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांची माहिती सामान्य जनतेला उपलब्ध करून दिली. तसेच ‘बिंबब्रह्म आणि वास्तुब्रह्म’, ‘विष्णुमूर्ते नमस्तुभ्यम्’, ‘मार्कंडादेव मंदिरे’, ‘सुरसुंदरी’, ‘वेरूळ दर्शन’, ‘टेम्पल आर्किटेक्चर अँड स्क्लप्चर्स ऑफ महाराष्ट्र’, ‘मॅगँलिथिक रायपूर’, ‘घारापुरी दर्शन’, ‘पोर्टेशल ऑफ दि वूमन इन दि आर्ट ऑफ दि डेक्कन’ आदी 14 ग्रंथ लिहून त्यांनी मूर्तिशास्त्र आणि पुरातत्त्व शास्त्रांमधील महत्त्वाचा दस्तऐवज तयार केला. याशिवाय त्यांनी अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचे संपादन केले आहे.
आपले लेखन आणि संशोधन चालूच ठेवून रायपूर, भागीमोहरी, पौनी, भोकरदन, मांढळ, अर्णी येथे झालेल्या उत्खननात असलेला त्यांनी घेतलेला सहभाग फार मोलाचा आहे. आजही देशात कोठेही महत्त्वाचे उत्खनन चालू असते तेथे देगलूरकर सरांना मानाने बोलाविले जाते. भारतीय संस्कृतीबाबत परदेशी नागरिकांना तसे तेथील अभ्यासकांना नेहमीच कुतूहल वाटत आलेले आहे ते लक्षात घेऊन डॉ. देगलूरकर यांनी इंग्लंड, अमेरिका, इटली, इंडोनेशिया, कंबोडिया, श्रीलंका, म्यानमार आदी विविध देशांमध्ये जाऊन व्याख्यानाद्वारे आपल्या भारतीय संस्कृतीचा, पुरातत्त्व शास्त्राचा आणि मूर्तिशास्त्राचा प्रचार आणि प्रसार केला आहे. शिकागो येथे झालेल्या दुसर्या जागतिक रामायण परिषदेत त्यांनी सादर केलेला निबंध अनेकांच्या औत्स्युक्याचा विषय ठरला होता.
कित्येक वर्षांच्या अध्यापनानंतर डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी डेक्कन पुरातत्त्व कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपतीपदही सुमारे दहा वर्षे भूषविले आणि ‘डेक्कन’ची ख्याती वाढविण्यात मोलाचा वाटा उचलला. आजही वयाच्या 85 व्या वर्षी त्यांचा पुण्यातील महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा, महाराष्ट्र गॅझेटिअर संपादक मंडळ, राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालय आदी ख्यातनाम संस्थांशी निकटचा संबंध असून ते कार्यरत आहेत. ‘संस्कार भारती’ या अ. भा. संस्थेच्या प्राचीन कला विभागाचे ते अनेक वर्षे प्रमुख आहेत. आजपर्यंत ‘विद्या व्यास’ पुरस्कारासह इतर अनेक पुरस्कारांनी त्यांचा बहुमान करण्यात आला आहे.
सुंदर लेखणी आणि अमोघ वाणी यांचे विलक्षण सामर्थ्य लाभलेल्या डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्याकडून कोणत्याही मंदिराचे, त्यामधील मूर्तींचे वैशिष्ट्य जाणून घेणे म्हणजे एक अलौकिक आनंद असतो. हा आनंद नेहमीच देणार्या डॉ. गो. बं. देगलूरकर यांना मुंबईच्या चतुरंग प्रतिष्ठानतर्फे ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरव केला आहे. त्यानिमित्त अजातशत्रू व्यक्तिमत्त्व लाभलेल्या या ‘पुराण-पंडिता’स ‘चपराक’ परिवाराकडून अनेकानेक शुभेच्छा!
- श्रीकांत ना. कुलकर्णी
९४२२३१९१४३
मासिक 'साहित्य चपराक'
डिसेंबर २०१७
साप्ताहिक 'चपराक' २५ डिसेंबर २०१७
2011 ला महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता सिनेमा बरा होता. पण अमिताभसारखा वृद्ध नट हा त्या चित्रपटाचा हिरो होता. या वयातही अमिताभ बच्चन यांची ऊर्जा आणि उत्साह पाहिला की भल्या भल्या तरुणांची बोटेही तोंडात जातात. त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनला मात्र एवढे यश मिळाले नाही. पण हा बुढ्ढा (लेखाची गरज म्हणून हा शब्द वापरलाय. बच्चन साहेबांबद्दल पराकोटीचा आदर आहे.) सर्व तरुणांना लाजवत अजूनही ठुमके घेतोय. आपल्याच वयाचे पात्र रंगवतानाही त्यांचा जोश पाहण्यासारखा असतो. ते आजही कित्येक तास काम करतात. नरेंद्र मोदी आणि अभिताभ बच्चन यांची चांगली मैत्री आहे. अमिताभ यांचे पूर्वी कॉंग्रेस पक्षाशी चांगले संबंध होते. त्यांच्या सौ.जया बच्चन ह्या विरोधी पक्षात आहेत पण तरीही मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरात पर्यटनासाठी त्यांना ‘ब्रँड ऍम्बासेडर’ बनवले. त्या जाहिराती खूप गाजल्या. मला नेहमी अमिताभ बच्चन आणि नरेंद्र मोदींच्या बॉडी लँग्वेजमध्ये साम्य दिसतं. मोदींचं शरीर थोडसं तिरपं करुन बोलणं, टाळ्या वाजवण्याची पद्धत आणि वृद्ध असूनही चेहर्यावरील तारुण्यातील आत्मविश्वास या गोष्टी समान वाटतात. ‘आज तक’च्या So Sorry आणि इंडिया टिव्हीच्या OMG या पॉलिटिकल ऍनिमेटेड सिरीजमध्ये नरेंद्र मोदींना अमिताभ यांच्या अवतारात दाखवतात. त्यांनाही हे साम्य जाणवले असतील. एक कलाक्षेत्रातला आणि एक राजकारणातला बुढ्ढा तरुणांपेक्षाही जास्त काम करत आहेत.
या दोन बुढ्ढ्यांबद्दल लिहिण्याचे कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वी जिग्नेश मेवाणी नावाच्या एका तरुण नेत्याने मोदींविषयी आक्षेपार्ह विधान काढत त्यांना बुढ्ढा म्हटले. जिग्नेश मेवाणीची ओळख दलित नेता म्हणून आहे. गुजरातच्या निवडणुकीत तो कॉंग्रेसचा स्टार चेहराही होता. जिग्नेश मेवाणी एका चॅनलच्या चर्चे दरम्यान म्हणाला की, ‘‘वो मानसिक तौर से बुढे हो गये है. अब तो हम युवा आयेंगे. राजनीती देश का युवा करेगा युवा. इनको अभी रिटायर्ड हो जाना चाहिये. उनको हिमालय भी चले जाना चाहिये, अपनी हड्डीयां गलाने के लिये. घर जाकर बैठे, आराम करे. अब बहुत बोरिंग आदमी हो गया हैं.’’ हे म्हटल्यानंतरही त्याला याबद्दल माफी मागाविशी वाटली नाही. बोलण्याच्या नादात उत्सुकतेने आपण बोलून गेलो असेही त्याला वाटत नाही. पुरे होश-ओ-आवाज़ में त्याने हे म्हटलेले आहे. अशा प्रकारच्या टीका नरेंद्र मोदींसाठी नव्या नाहीत. या आधी अनेक खालच्या पातळीवरच्या टीका मोदींनी सहन केल्या आहेत. त्या त्यांनी गुजरातच्या निवडणुकीत बोलूनही दाखवल्या. त्यांनी टिकाकारांचा समाचार घेतल्यावर टिकाकार आणि विरोधकांनी म्हटलं की मोदी विकास विसरुन स्वतःबद्दल बोलत आहेत. जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. अहो पण ज्यांनी मोदींवर अशा टीका केल्या त्यांच्याबद्दल कुणीच बोलायला तयार नाही. म्हणजे लोकांनी तोंडसुख घ्यायचे आणि त्याविषयी मोदींनी एक अवाक्षरही काढायचा नाही, अशी विरोधकांची मानसिकता आहे. मोदींनी फक्त मुकाट्याने सहन करायचं असंच त्यांना वाटतं. बोलणारे राहतात बाजूला, पण चुका दाखवणार्यांचं तोंड दिसतं. नरेंद्र मोदी हा एक असा नेता आहे, ज्याला विरोधकांनी सर्वात जास्त टार्गेट केले आहे. अगदी ते प्रत्यक्ष राजकारणात नवीन असल्यापासून. पण हा नेता सर्वांना पुरुन उरला. मोदी राजकारणातून नष्ट होणार अशी मनीषा बाळगणारे राजकारणातून हद्दपार झाले. पण मोदी मात्र प्रादेशिक राजकारणातून राष्ट्रीय राजकारणात आले.
गुजरातमध्ये राहुल हरुनही बाजीगर ठरले आणि मोदी सतत जिंकूनही त्यांच्या तोंडाला फेस आला, असे कॉंग्रेसी म्हणतात तेव्हा आपण समजू शकतो. कारण कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण होऊ नये आणि कॉंग्रेसच्या परंपरेप्रमाणे जसे बादशहाचा मुलगा बादशहा होतो तसे राहुल सुद्धा पारंपरिक पद्धतीने बादशहा अर्थात कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. कॉंग्रेसींना काही करुन राहुल गांधींचे अस्तित्व टिकवायचे आहे. जर राहुल यांच्या योग्यतेबद्दल कॉंग्रेसमध्ये अधिक चर्चा होऊ लागली तर कॉंग्रेसी राहुल समर्थकांना हा सर्वात मोठा फटका बसू शकतो. म्हणून राहुल बाजीगर, त्यांनी मोदींना टक्कर दिली, राहुलमुळे मोदी काठावर पास झाले हे कॉंग्रेसींना सांगावं लागतं पण इतर मोदी विरोधक हा खटाटोप करतात तेव्हा हसू आवरत नाही. त्यांना राहुल गांधींच्या पराभवात जय का दिसतो? की त्यांनीही गांधी परिवारची गुलामी करण्याचे व्रत घेतले आहे? मला आश्चर्य तेव्हा वाटले जेव्हा स्वतःला तिसरी व्यक्ती किंवा पत्रकार किंवा लेखक म्हणवून घेणारेही राहुलजींच्या या पराभवामुळे आनंदी होते व त्यांनीही मोदी जिंकूनही हा त्यांचा नैतिक पराभव असल्याचे म्हटले. या अशा लोकांना गुजरातच्या पार्श्वभूमीची साधी माहिती सुद्धा घ्यावी असे वाटत नाही. अगदी साधा मुद्दा आहे, आपल्या भारतीय लोकशाहीप्रमाणे बहुसंख्य लोकांच्या समर्थनाने सरकार स्थापन होते. त्यामुळे लोकशाही पद्धतीने भाजप गुजरातेत जिंकला आहे आणि संविधानाप्रमाणे हा नैतिक विजयच आहे.
गुजरातमधून हार्दिक पटेलनंतर मोदी विरोधी दलित चेहरा म्हणून जिग्नेश मेवाणी समोर आला. जिग्नेश हा तरुण आहे. तो आता जिंकलाही आहे. त्यामुळे विजयाची धुंदी अजूनही त्याच्या डोक्यावरुन उतरलेली नाही. ज्या वयात जिग्नेश मोठा नेता झाल्याने पुरोगामी मंडळी खुश आहेत, त्या वयात मोदी हे साधे कार्यकर्ते होते. त्या वयात मोदी प्रत्यक्ष राजकारणात आलेले नव्हते. ते टप्प्याटप्याने आले. म्हणजे ते प्रसिद्धीच्या बळावर राजकारणात आले नाहीत. ते श्रम करीत आले. स्वयंसेवक किंवा कार्यकर्ता आणि विशेष म्हणजे प्रचारक म्हणून तुम्ही काम करता तेव्हा तुम्ही लोकांमध्ये राहत असता. अगदी सामान्य माणसाप्रमाणे लोकांमध्ये मिसळता, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत असता. हार्दिक म्हणा, कन्हैया किंवा जिग्नेश हे प्रसिद्ध झालेले युवा नेते आहेत. यशस्वी झालेले नव्हे. मराठीत असं म्हणतात की एखाद्याला आपटायचं असेल तर आधी त्याला उचलावं लागतं. या तरुण नेत्यांना मिडिया आणि डाव्यांनी डोक्यावर उचलून घेतलंय. ही डावी मंडळी हिंदू द्वेषाने पछाडलेली आहेत. ही मंडळी भयंकर स्वार्थी आहेत. जिथे जिथे कम्युनिस्टांचे राज्य आहे, तिथे तिथे रक्ताचे पाट वाहिले जातात हे सत्य ते जगापासून लपवतात. या डाव्या मंडळींनी या युवा नेत्यांना त्यांचे विशेष काहीही कर्तृत्व नसताना डोक्यावर उचलून घेतले आहे. ही मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी या तरुणांना आपटू शकतात. अर्था या युवा नेत्यांनी प्रसिद्धीही मिळाली आहे. एखादं गाढव जरी हिंदू किंवा मोदींच्या विरोधात बोंबलायला लागलं तर ही डावी मंडळी त्या गाढवालाही खांद्यावर घेऊन नाचतील. अशी अवस्था स्वतः डाव्यांनी करुन घेतलेली आहे. कारण डावी मंडळी सपशेल नापास झालेली आहेत. त्यांचा अवास्तव बुद्धीवाद भारतीयांना नकोय. त्यांना सुशासन हवेय.
या डाव्या मंडळींनी उचलून घेतलेले हे युवा नेते किती माजोरडे आहेत, हे त्यांच्या मुलाखतींमधून आणि भाषणांमधून स्पष्ट दिसत आहे. भाजप आल्यापासून ही मंडळी जास्तच वैतागलेली आहेत. त्यांना भारतात सुशासन आणायचे आहे, याचा दुसरा अर्थ त्यांना भारतात शांती नकोय. कारण डाव्या मंडळींचे लेख जर तुम्ही वाचत असाल तर ह्यांचा हिंदू विरोध दिसून येतो आणि ह्यांना काहीही करुन भारतात हिंदू विचारांचं शासन नकोय. आता या ज्येष्ठ डाव्या मंडळींचं कुणीही ऐकत नाही. म्हणून जिग्नेश मेवाणी सारख्या युवा नेत्यांच्या खांद्यावरुन ही मंडळी मोदींवर वार करीत आहेत. मग कोणतीही कुवत नसताना प्रसिद्ध झालेले जिग्नेश मेवाणी सारखे नेते स्वतः भारत भाग्य विधाता असल्या सारखे वागू लागतात आणि मोदीं सारख्या जुन्या जाणत्या आणि यशस्वी नेत्यावर टिका करु लागतात, लोकशाहीत टिका झालीच पाहिजे. पण ह्यांची कुवत नसल्यामुळे टिका करताना सुद्धा ह्यांचे भान सुटते, मग ते मोदी बुढ्ढा म्हणत अपमान करतात. पण कुणाही स्वयंघोषित पुरोगाम्याला जिग्नेशचे कान धरावेसे वाटत नाही. त्यांनाही यात आनंद मिळतो. अर्थात मोदी वेळ आल्यावर त्यांना उत्तर देतीलच. पण मोदी वेळोवेळी आपल्या कार्यातून उत्तर देतच आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर बहिष्कारीत झालेले व अमेरीकेने व्हिजा नाकारलेले मोदी आज आंतरराष्ट्रीय स्थरावर लोकप्रिय होत आहेत. मोदींमुळे अनेक आंतरराष्ट्रीय राजकीय पंडितांना भारताविषयी लिहावेसे करावेसे वाटत आहे. मोदी पंतप्रधान झाले तेव्हा सरकारी बाबू वेळेवर कामाला येतात अशी बातमी छापून आली होती. याचा अर्थ पूर्वी मनमोहन सिंह यांच्यासारख्या उच्चशिक्षित माणसाच्या नेतृत्वाखाली ही मंडळी कामं टाळायची. पण मोदी आल्याने त्यांच्यावर वचक बसला. म्हणजे 67 वर्षाचा बुढ्ढा स्वतः प्रामाणिकपणे काम करतो. म्हणूनच इतरांच्या मनात वचक निर्माण होतो. मोदी देशाचा कारभार सांभाळून भाजपसाठी निवडणुकाही जिंकून देतात. तरीही 67 वर्षांचा बुढ्ढा थकत नाही. तो सतत कार्य करीत राहतो. विरोधक टीका करत राहतात आणि हा केवळ कार्य करीत राहतो. कधीतरी आपल्यावर झालेल्या टिकेचा समाचारही घेतो. पण त्याचेही अपचन विरोधकांना होते. जिग्नेश मेवाणी म्हणाला की ‘‘उनको घर बैठना चाहिये आणि हिमालय में जाकर हड्डियां गलाने चाहिये.’’ जिग्नेशला वाटतं की हा बुढ्ढा बोरींग आहे पण या बुढ्ढ्याचे अनेक समर्थक आहेत. या बुढ्ढ्याकडे पाहून लोकांना प्रेरणा मिळत आहे. सर्वसामान्य परिवारातून येऊन इतक्या मोठ्या पदाला पोहोचल्यामुळे हा बुढ्ढा धडपड्या तरुणांचा आदर्श आहे. जिग्नेशला देशाचं नेतृत्व करायचं आहे. पण देशाचं काय तर केवळ दलित समाजाचंही नेतृत्व करण्यास तो सक्षम नाही. पहिले कारण मोदी बुढ्ढ्याप्रमाणे त्याला देश जोडायचा नसून तोडायचा आहे. म्हणून तो जातीयवादी राजकारण करत आहे. पण मोदींनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही. दुसरे कारण बाबासाहेब आंबेडकरांसारख्या दिग्गज नेत्याने एक मोठा आदर्श निर्माण करुन ठेवला आहे. त्या आदर्श परंपरेत जिग्नेश कुठेच बसत नाही आणि मोदी सुद्धा उच्च घराण्यातून आलेले नाहीत. पण तरीही ते लोकनेता झाले. संयम, दूरदृष्टी या बळावर ते इथपर्यंत पोहोचले. अजूनही ते नम्र आहेत. राजकीय भाषणात विरोधकांना धोबीपछाड करावे लागतेच. पण तरीही ते सुसंस्कृत घराण्यातले वाटतात. हे हीराबेन मोदी यांचे संस्कार आहेत. मोदींचे जवळचे अनेक नातेवाईक राजकारणात नसून सर्वसाधारण आयुष्य जगत आहेत. हा आदर्श मोदींनी निर्माण केला आहे. कुटुंब कल्याणापेक्षा त्यांना लोककल्याण महत्वाचे वाटते. या वयातही त्यांचा आत्मविश्वास, त्यांची कृती तरुणांना लाजवणारी आहे. जिग्नेश आणि त्याच्या सारख्या काही मंडळींना मोदी हे बुढ्ढा वाटत असले तरी मोदी आपल्या कृतीद्वारे जणू दाखवून देत आहेत की बुढ्ढा होगा तेरा बाप...
जयेश मेस्त्री
9967796254
साप्ताहिक 'चपराक' २५ डिसेंबर २०१७
साप्ताहिक 'चपराक' - २५ डिसेंबर २०१७
महाड येथे प्राथमिक शिक्षक म्हणून माझी नेमणूक झाली होती ती प्राचार्य गजेेंद्रगडकर यांच्यामुळे. ते चंद्रपूर येथे बदलून गेले होते तरी त्यांचे मन माझ्यात गुंतले होते. मला मुलगा मानून माझ्यातला साहित्यिक त्यांनी जागा केला होता. ‘आचार्य’ची परीक्षाही द्यायला लावली होती. मनाने आम्ही दोघे कमालीचे जवळ आलो होतो. त्यातून त्यांची पितृछायाच मिळाली होती. रायगड खोर्यातील सांदोशी गावी कडेकपारीत बदली झाल्यामुळे माझ्यातला कलावंत मरून जाईल म्हणून ते बेचैन झाले होते. इतक्या दूरवर जाऊनही त्यांना मला विसरता येत नव्हते. त्यांनी संधी मिळताच रायगडच्या शिक्षण अधिकार्याला सांगितले व माझी बदली महाडला झाली.
महाडची शाळा तशी जुनी आणि नावाजलेली. त्या शाळेत चिंतामणरापांनी (सीडी देशमुख) शिक्षण घेतले होते. या शाळेत माझ्या वाट्याला चौथीचा वर्ग आला होता. जी जुनी-जाणती माणसे होती त्यांच्या ‘वजनानुसार’ त्यांना वरचे वर्ग मिळालेले होते. त्यातून त्या काळात सातव्या यत्तेला विलक्षण महत्त्व आले होते. त्यामुळे वाडकर, उमरटकर, रा. मो. शेठ ही वयाने मोठी असलेली माणसे वरचे वर्ग ‘सांभाळीत’ होती. त्यातून मी तसा अगदीच नवा होतो. तरी बरे, चौथी तरी दिली होती. त्याचेही कारण होते. खालच्या तीन यत्तांचा ‘सांभाळ’ महिला शिक्षक करीत होत्या. त्यात केशवराव जावडेकरांची पत्नी होती. प्रकाश हा त्यांचा मुलगा पत्र्याच्या त्या शाळेत त्याकाळी शिकत होता. पुढे माध्यमिक शिक्षक म्हणून परांजपे विद्यामंदिरात मी अध्यापन करीत असताना तो नववीच्या वर्गात विद्यार्थी म्हणून शिकत होता. प्रकाशच्या वडिलांशी माझा स्नेहसंबंध फारच जुना असा होता. ‘केसरी’मध्ये ते वृत्तसंपादक होते. मी ‘आचार्य’ परीक्षेत महाराष्ट्रात सर्वप्रथम येताच त्यांनी ती बातमी ‘केसरी’च्या पहिल्या पानावर अगदी ठळकपणे छापली होती. ते मधूनमधून महाडला येत असत. त्यांचा माझ्याशी पत्रव्यवहार हा शेवटपर्यंत होता.
चौथीच्या वर्गात जी मुले होती ती आडदांड अशी होती. या वर्गाचा धाक सर्व शाळेला होता. अशी मुले मला शिकवायची होती. विशेष म्हणजे या मुलांचे माझ्यावर फारच प्रेम बसले होते. गंमत ही की, मी माध्यमिक शिक्षक म्हणून परांजपे विद्यामंदिरात काम करीत असताना हा वर्ग ‘हूड’ म्हणून प्रसिद्ध पावला होता व हा खट्याळ मुलांचा वर्ग मला मुद्दामच देण्यात आला होता. हेतू हा की, माझी पुरती जिरावी! पण झाले उलट! ती मुले पूर्वीची मराठी चौथीतली होती; त्यामुळे मला चांगली माहितीची होती. माझे त्यांनी स्वागतच केले होते आणि त्यामुळे तेथील ‘हितचिंतकांची’ पुरती जिरली होती.
प्राथमिक शिक्षक असतानाच एका विद्यार्थ्याने एक दिवस भाजी मंडईतून भाजी खरेदी करीत असताना मला पाहिले. त्याच्या मोठ्या भावाचे हॉटेल होते ते बाजारपेठेत. त्याने मला पाहताच धाव घेतली आणि म्हटले, ‘‘गुरूजी चला माझ्याकडे चहा घ्यायला.’’
मी विचारले, ‘‘इथे तुझे घर कुठे जवळ आहे काय?’’
त्यावर तो म्हणाला - ‘‘घर नाही, माझ्या भावाचे हॉटेल आहे. ते समोर दिसते तेच. शाळा सुटल्यावर मीच गल्ल्यावर उभा असतो.’’
माझी शिस्त अशी होती की मी सहसा हॉटेलात कधी जात नव्हतो. म्हणून त्याला म्हटले, ‘‘अरे, मी हॉटेलात कधी जात नसतो. तुला माहिती आहे ना?’’
तो म्हणाला, ‘‘मला चांगलं माहीत आहे. तरीही मला वाटते की तुमचे पाया माझ्या हॉटेलात लागावेत. थोडातरी चहा घ्या आणि मगच घरी जा.’’
त्याची ही भावना अव्हेरावी असे न वाटल्याने मी त्याच्या बरोबर गेलो.
गल्ल्यावर पैसे देण्यासाठी त्यावेळी रांग लागलेली होती. त्या रांगेला बाजूला सारून त्याने मला जवळच खुर्ची दिली व ‘स्पेशल’ची ऑर्डर दिली.
हॉटेल बाजारातच असल्याने त्या हॉटेलात नेहमीच गर्दी फुललेली असे. माझ्यासाठी ‘ऑर्डर’ दिली होती, तरीही चहा यायला वेळ लागला होता. मी वेळ फुकट जात होता म्हणून थोडा बेचैन होतो. त्याहीपेक्षा इथे बसून आपण काहीच करू शकत नाही याचे मला वाईट वाटत होते. तेवढ्यात बाजूला पडलेल्या रद्दीकडे माझे लक्ष गेले. काही तरी वाचायला मिळेल म्हणून मी ती रद्दी चाळायला लागलो, तोच एक जुने हस्तलिखित माझ्या हाती लागले. मी अधाशासारखे ते वाचायला लागलो. ते हस्तालिखित होते कविश्रेष्ठ भालचंद्रांचे! हे भालचंद्र म्हणजे केशवसुत संप्रदायातले प्रसिद्ध कवी तर होतेच शिवाय मराठीत ‘प्रहसन’ हा वाड्ःमय प्रकार मराठी साहित्यात प्रथम त्यांनी आणलेला होता. उत्तम प्रहसनकार म्हणून ते मासिक ‘मनोरंजन’ मध्ये गाजलेले लेखकही होते. माझ्या दृष्टीने त्यांचे जे मोठेपण होते ते कवितेच्या दृष्टीने. ‘शिवदर्शिकाकार भालचंद्र’ हे त्यांनी स्वतः होऊन घेतलेले असे टोपणनाव होते. त्या काळात बहुतेक कवी ‘टोपण’ नावानेच लिहीत असायचे. गिरीश, केशवकुमार, बालकवी, गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, बी ही त्यातलीच नावेे होती. भालचंद्रांचे पूर्ण नाव होते गणेश नारायण टिपणीस. महाडच्या माध्यमिक शाळेत ते शिक्षक होते. त्यापूर्वी ते पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक होते. घरची शेती भरपूर होती. ती सांभाळायला कुणी जबाबदार हवे होते म्हणून ते महाडात परतले होते.
पुण्यात असताना राम गणेश गडकरी, बालकवी ठोंबरे हे त्यांचे जिवश्च कंठश्च असे मित्र होते. या तिघांनी एकत्रितपणे आपल्या कविता लिहिल्या होत्या तशाच त्या वाचल्याही होत्या. त्यातूनच त्या तिघांचे ‘अरूण’ एकाचवेळी जन्म पावलेले होते. आचार्य परीक्षेच्या निमित्ताने ‘मनोरंजन’सारखे अनेक जुने अंक, ‘विविधज्ञान विस्तार’चे अंक मी अभ्यासले होते. त्या त्या वेळी भालचंद्रांच्या अनेक कविता वाचनात आल्या होत्या. अशा या मोठ्या कवीचे ‘शिवदर्शिका’ हस्तलिखित माझ्या हाती अचानक पण चहाच्या निमित्ताने लागले होते. मी विद्यार्थ्याला म्हटले, ‘‘तुझा चहा राहू दे. त्या चहापेक्षा मला मोठा चहा मिळाला आहे. मी निघतो. मी हे हस्तलिखित नेऊ का?’’
या प्रप्रश्नावर तो चकितच झाला. मला म्हणाला, ‘‘कसले ते? काय नेऊन करणार? गुरूजी, चिवडा बांधायलासुद्धा हा कागद उपयोगी येईना म्हणून मी बाजूला टाकले होते. ते तुम्हाला आवडले?’’
मी म्हटले, ‘‘अरे तुझ्या चहाच्या निमित्ताने मला फार मोठे खाद्य मिळाले आहे. तुला हे मिळाले कुठे?’’
त्यावर तो म्हणाला, ‘‘माझ्याकडे जी रद्दी आली त्यात हे आले. थांबा; चहा घ्या आणि तुम्हाला आवडलेले ते बाडही घेऊन जा.’’ चहा घेऊन मी निघालो.
घरी आल्यावर मी त्या ‘शिवदार्शिका’हस्तलिखितानेच वेडा झालो होतो. एकामागून एक कविताच वाचत होतो. 97 कवितांचे ते हस्तलिखित होते. त्यातून भालचंद्रांनी स्वतःच्या हस्ताक्षरात त्या सर्व कविता लिहिल्या तर होत्याच पण ज्या ज्या मासिकात त्या प्रसिद्ध झाल्या होत्या त्या मासिकांच्या नावाचीही नोंद केली होती. माझ्यादृष्टीने ती गोष्ट अत्यंत महत्त्वाची होती. भालचंद्र, बालकवी, गोविंदाग्रज पुण्यात वास्तव्याला होते त्यावेळी एक छोटा कवी, ‘बालकवी’ही त्यांच्या सहवासात आला होता. त्याचे हे तिघांशी भावनिकअसे नातेही निर्माण झाले होते. हा ‘बालकवी’ म्हणजेच सुप्रसिद्ध कादंबरीकार रघुनाथ वामन तथा र. वा. दिघे होत. या तिघांचे ‘अरूण’ त्याने एकत्रितपणे ऐकले तर होतेच पण खुद्द बालकवींबरोबर (ठोंबरे) ते पर्वतीवर रोज फिरायलाही जात होते. त्यांना गोविंदाग्रजांनीच ‘बालकवी’ संबोधले होते. ‘वाग्वैजयंती’मध्ये त्यांच्यावर गडकर्यांनी एक कविताही लिहिलेली आहे. गडकरी कर्जतला (रायगड) असताना खोपोलीत र. वा. दिघे यांना नेहमीच भेटायलाही येत होते. भालचंद्रांच्या तर अनेक कविता र. वा. दिघे यांच्या तोंडी रूळल्याही होत्या.
हे हस्तलिखित मिळताच त्यांनी कवितांची नक्कल करून सर्व कविता माझ्याकडे मागितल्या होत्या आणि मी 97 कवितांची ती वही त्यांना दिलीही होती. आचार्य परीक्षेच्या निमित्ताने मी जी असंख्य पुस्तके अभ्यासली होती त्यात नागपूरच्या भ. श्री. पंडितांचे ‘आधुनिक मराठी कवितेचे स्वरूप’ हेही पुस्तक अभ्यासले होते. भालचंद्रांचे हस्तलिखित हाती मिळताच त्यांच्याशी माझा पत्रव्यवहार सुरू झाला तो त्यांच्या काही विधानांवर आक्षेप घेऊनच. मी त्यांना त्या पुस्तकात 3/4 ठिकाणी ‘भालचंद्र’ म्हणून जो उल्लेख आला होता त्याबाबत विचारले होते. त्यांना जे नीटसे स्पष्टीकरण देता आले नव्हते. तसे त्यांचे पत्रही आले होते. मात्र त्यांच्या त्या पुस्तकात त्यांनी जे वाक्य उच्चारले होते तेे आधाराला घेऊन मी प्रश्न विचारला होता. ते वाक्य असे होते, ‘भालचंद्रांच्या कवितेत चटका असे परंतु त्यांचे काव्य अत्यल्प असे आहे.’ बी कवींच्या कवितेवर भ. श्री. पंडितांनी मात्र भरभरून लिहिले होते. मी त्यांना विचारले, ‘‘बी कवींपेक्षाही अधिक काव्य भालचंद्रांनी लिहूनही आपण अल्पशब्दात त्यांना बाजूला का केलेत?’’
तेव्हा त्यांनी पत्रात लिहिले की बी कवींच्या जवळजवळ 45 कविता लिहिलेल्या आहेत तेवढ्याही मला भालचंद्रांच्या आढळल्या नाहीत.’’
मी मग भ श्रींना 97 कवितांची यादी पाठवली आणि स्पष्टपणे म्हटले की, आपल्यापुढे ‘मासिक मनोरंजन’चे अंक तेवढे होते त्यामुळे आपण ‘ते’ विधान केलेत. ही यादी पहा. ‘बी’ कवींपेक्षा भालचंद्रांच्या कविता दुप्पट अधिक अशा आहेत. त्यांनाही ते पटले व त्यांनी पत्रात मान्यही केले की ‘मासिक मनोरंजन’चे जे अंक हाती आले त्या आधारावर मी ते वाक्य लिहून गेलो.’’
भालचंद्रांच्या त्या हस्तलिखितामुळे भ. श्रींची व आमची चांगलीच जोडी जमली. ती इतकी की ‘‘मी पी.एच.डी केल्यास मार्गदर्शनासाठी मुंबईत येऊन राहील’’ असेही त्यांनी म्हटले. माझा ‘झंकार’ हा काव्यसंग्रह त्या काळात प्रसिद्ध व्हायचा होता. मी प्रस्तावनेसाठी त्यांच्याकडे हस्तलिखित पाठवताच त्यांनी प्रदीर्घ अशी प्रस्तावना पाठवली. मी ती छापली आणि ‘झंकार’ काव्यसंग्रह दिमाखात प्रकाशित झाला. त्यात कुसुमाग्रजांचाही अभिप्राय प्रसिद्ध केलेला आहे. त्यांच्याशी तर सतत पत्रव्यवहारच होता.
भालचंद्रांनी केशवसुतांवर जशी कविता लिहिली तशीच बालकवींवरही लिहिली होती. ‘ठोंबरे मरे; तो काळाला पुरूनि उरे’ अशी त्यांची कवितेची ओळ होती. गडकर्यांच्या ‘दसरा’ या गाजलेल्या समाजपरिवर्तनपर कवितेशी भालचंद्रांच्या कवितांचा जो संबंध आला आहे तो या कवितेच्या शेवटच्या ओळीत. गोंविदाग्रजांनी शेवटची ओळ लिहिली आहे.
‘अतारकरांची झडवा नौबत!’ भालचंद्रांची हस्तलिखितात जी कविता आहे ती ‘अतारकरांस’ या नावाची! आणि हीच कविता मासिक ‘मनोरंजन’मध्ये जी प्रसिद्ध झाली ती नेमकी ’नौबत’ या नावाने. गडकर्यांनी मित्रप्रेमातून या दोन्ही नावांचा मिलाफ घडवून आणून ती ओळ ‘दसरा’ कवितेत शेवटी लिहून टाकलेली आहे, हे ‘सत्य’ मला वाटते भल्याभल्यांना अजूनही कळलेले नाही. गडकर्यांना एखादा शब्द किंवा ओळ आवडली की ते त्यांचा अचूक उपयोग करून घेत असत. र. वा दिघे यांची ‘झरा’ कविता (ती रत्नागिरीत लिहिलेली) वाचनात येताच गडकरी म्हणाले होते की, ‘मी या झर्यातून प्रलय निर्माण करीन’ आणि त्यांनी ते तसेच करूनही दाखवले. गडकर्यांच्या कवितेतून असे ‘प्रेम’ अनेक ठिकाणी दाखवूनही देता येते. र. वा. दिघ्यांनी ते मला अनेकदा जाणवूनही दिलेले आहे.
‘जुनी कविता आता वाचणार कोण?’ या प्रकाशकांच्या विचारधारेमुळे ते हस्तलिखित पुढे प्रकाशात येऊ शकलेले नाही. शासनाने ते प्रसिद्ध करावे म्हणून प्रयत्न करूनही साहित्य संस्कृती मंडळाने त्याची दखलही घेतलेली नाही. शेवटी मराठीतील एक अजोड संपत्ती म्हणून भालचंद्रांचे ते हस्तलिखित जिवापाड जपूनही ठेवलेले आहे. एक इतिहासाची साक्ष म्हणून मला ते नेहमीच अधिक मोलाचे वाटत राहिलेले आहे. या हस्तलिखितांमुळे भ. श्री. पंडितांची मैत्री लाभली तसाच र. वा. दिघे यांच्याशी दाट असा स्नेहसंबंधही जुळून आला. मैत्रीची साक्ष म्हणून ‘शिवदार्शिका’ या हस्तलिखिताला माझ्या दृष्टीने केवढे तरी मोल आहे हे काय सांगायला हवे?
- डॉ. माधव पोतदार
(सुप्रसिद्ध लेखक आणि पत्रकार)
साप्ताहिक 'चपराक' - २५ डिसेंबर २०१७
साप्ताहिक 'चपराक'
१८ डिसेंबर २०१७
2011 साली ‘मर्डर 2’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘मर्डर 1’ मधील गाणी खूप चालली. मी बसने मुंबईत प्रवास करत होतो. माझ्या पुढच्या सीटवर एक तरुण माणूस आपल्या 4 (अंदाजे) वर्षाच्या मुलासोबत बसला होता. पोरगं बाहेरचं जग न्याहाळण्यात मग्न होतं. अचानक त्याला ‘मर्डर 2’चं पोस्टर दिसलं. ते पोस्टर पाहून पोरगं बापाला म्हणालं, ‘‘पप्पा, ते बघा कांदे बटाटे.’’ बापाला काय बोलावं तेच कळलं नाही. तो त्या पोरावर ओरडला आणि म्हणाला, ‘‘गप्प, असं नाही बोलायचं.’’ पोरगं गप्प बसलं.
त्या पोस्टरमध्ये जॅकलीन फर्नांडिस इम्रान हाश्मीच्या पाठीवर बसली आहे. ती पोज आपण लहान मुलांना ‘कांदे बटाटे’ असं म्हणत खेळवतो तशी होती. त्या पिटुकल्या लेकराला आठवलं असणार की आपले पप्पासुद्धा आपल्याला असंच उचलून घेतात. पण हा तर लहान मुलांचा खेळ. मग त्या इम्रानकाकाने जॅकलीन मावशीला असे का उचलले असेल? मोठी माणसंही असा खेळ खेळतात का? असा प्रश्न त्या चिमुकल्या जिवाला पडला असणार! म्हणून मुलगा असं म्हणाला, पण पप्पाला लाज वाटली की आता याबद्दल मुलाला कसं सांगायचं? की हा लहान मुलांचा खेळ नसून हा मोठ्या माणसांचा वेगळाच खेळ आहे.
या चित्रपटाची आणि प्रसंगाची आठवण काढण्याचे कारण म्हणजे केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टीव्हीवरील कंडोमच्या जाहिरातींसाठी वेळ निश्चित केली आहे. वाहिन्यांना सकाळी 6 ते रात्री 10 दरम्यान कंडोमच्या जाहिराती दाखवता येणार नाहीत. रात्री 10 च्या नंतर मुले टिव्ही बघत नाहीत असा सरकारचा निष्कर्श आहे. अश्लिलतेकडे झुकणार्या आणि मनात घृणा निर्माण करणार्या जाहिरातींवर बंदी घातली जाऊ शकते, असे नियम आहेत असे सरकारने सांगितले आहे.
यावरुन सरकारवर स्तुती सुमने उधळली गेली आणि तसेच प्रचंड टीकाही झाली. भाजपचे सरकार आल्यापासून माहिती आणि प्रसारण मंत्रालयावर अनेक टीका झाल्या आहेत. सेन्सॉर बोर्डला ‘संस्कार बोर्ड’ म्हणत खिल्लीही उडवण्यात आली आहे. जेम्स बॉण्डच्या चित्रपटतील चुंबनाच्या दृश्यांबद्दल खूप मोठा वाद झाला होता. ‘उडता पंजाब’वरील वाद तर प्रचंड गाजला. आता तर ‘सेक्सी दुर्गा’ आणि ‘न्यूड’ चित्रपटांवरील वाद अजूनही चघळला जात आहे.
पहिली गोष्ट अशी की सरकारने लोकांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेतली पाहिजे. हे सरकारचे कर्तव्यच आहे. म्हणूनच ‘पहले शौचालय फिर देवालय’ अशी घोषणा मोदींनी केली असावी. लोकांचे शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी या सरकारने बरेच कष्ट घेतले आहेत. तसेच त्याबद्दल जनजागृतीही करण्यात आली आहे. एका पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुस्तकाचे आवरण काढून तो कागद आपल्या खिशात ठेवला. आपण स्वतः स्वच्छतेबाबत काटेकोर नियम पाळतो, हा संदेश मोदींना त्यातून द्यायचा आहे. यावरुनही बरेच चांगले वाईट संदेश व्हायरल झाले. ‘मोदी दिखावा करतात’ असे काहींनी म्हटले तर ‘मोदी बोलतात तसे स्वतः वागतात’ असे काही जणांनी म्हटले. स्वच्छता अभियान, शौचालय, शुद्ध जल, गंगा स्वच्छता अशा गोष्टींतून सरकारने बरेच प्रयत्न केले आहेत. या आधीच्या सरकारनेही यासाठी प्रयत्न केले होतेच पण भाजपने विकासासोबत स्वच्छता हा आपला अजेंडा बनवला आहे.
हे झाले शारीरिक स्वास्थ्य! पण मानसिक स्वास्थ्याचे काय? मानसिक स्वास्थ्य चांगले राहील यासाठी विशेष नियम करता येत नाहीत, कारण प्रत्येक गोष्टींसाठी तुम्ही कायदे करु शकत नाही. जर कुणी गुन्हा केला तर पुराव्यांच्या बळावर कायद्यानुसार त्याला शिक्षा होऊ शकते पण गुन्हा घडू नये किंवा तो करु नये यासाठी केवळ संस्कार कामाला येतात. आपण विना-तिकीट ट्रेनमधून प्रवास करु नये, हे संस्कार सांगतात आणि तसे केल्यास तो कायदेशीर गुन्हा ठरेल ही कायद्यातील तरतूद आहे.
सरकार लोकांवर संस्कार करु शकत नाही. सरकार कुणाच्याही बेडरुममध्ये डोकावून पाहू शकत नाही. तो अधिकार त्यांना नाही. मुळात सरकारने कलेच्या संदर्भात कोणत्याही सामाजिक, राजकीय व धार्मिक दबावाला बळी पडू नये. मुलांनी काय पहावं किंवा काय पाहू नये यावर मर्यादा घालण्याचा अधिकार पालकांना आहे. सरकारने कोणतेही धोरण ठरवण्याआधी पालकांचे मन जाणून घेतले पाहिजे. हे अगदी खरे आहे की काही गोष्टी या लहान मुलांकरिता नसतात. मी लहानपणी ‘स्मॉल वंडर’ नावाची मालिका पहायचो. अतिशय सुंदर मालिका होती ती. त्या मालिकेतील पालक आपल्या मुलांसमोर एकमेकांचे चुंबन घ्यायचे. तरीही आमच्या बालमनावर कोणताच परिणाम झाला नाही. त्यात आम्हाला वावगे असे काही वाटले नाही.
स्मॉल वंडरचा एक एपिसोड तर मुल कसं जन्माला येतं या लाईनवर होता. त्यातील लहान मुलगा याबद्दल आपल्या बाबांना प्रश्न विचारतो. तेव्हा बाबांना काय उत्तर द्यायचे कळत नाही. म्हणून बाबा काहीही थापा मारतात. तेव्हा तो मुलगा म्हणतो, ‘‘तुम्ही चुकीचे बोलत आहात. तुम्हाला काही माहीत नाही. मुल कसं जन्माला येतं हे मला माहिती आहे’’ आणि त्याचे बाबा आश्चर्यचकित होतात. हा एपिसोड मी लहानपणी पाहिला होता. बालमन म्हणून काही प्रश्न मला पडले पण मनावर विपरित परिणाम झाला नाही. याचं कारण मुलांवर वाईट परिणाम होणार नाही याची काळजी या मालिकेत घेतली होती.
आता आपण कंडोमच्या जाहिरातीबद्दल विचार करुया. याआधीही काही जाहिराती आल्या होत्या. त्या सांकेतिक होत्या. त्यात संभोगाबद्दल उघडपणे बोलले जात नव्हते. आताच्या बर्याच जाहिराती मुलांना दाखवू नये अशाच आहेत पण आता आपला समाज खूप पुढे गेला आहे. आपण कशाकशावर बंदी आणणार? आता तुम्ही एका क्लिकवर पॉर्न पाहू शकता. युट्यूब आणि वेबसाईट्सवर असे अनेक कंटेंट्स आहेत. त्यामुळे केवळ कंडोमच्या जाहिरातीची वेळ निश्चित केल्याने मुलांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होणारच नाही, असे ठामपणे सांगता येईल का?
आताचे चित्रपट बोल्ड आहेत. आताच्या मालिका रिऍलिटी शो हे सर्व बोल्ड झाले आहेत. यामुळे सुद्धा मुलांच्या मनावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. यावर सरकार निर्बंध लादू शकत नाही हे सत्य आहे. त्यामुळे सरकारने याविषयी जनतेचे मत जाणून घेणे उपयुक्त ठरेल. स्वतःचे हसे करुन घेण्यापेक्षा हा मार्ग उत्तम आहे. आपल्याकडे लोकशाही प्रणाली आहे आणि लोकशाही प्रणालीत बहुसंख्यांच्या मतांचा आदर केला जातो. आपले सरकार असेच निवडून येते. म्हणून अशा गोष्टींसाठी सरकारने जनमत लक्षात घेणे गरजेचे आहे. तसेही मोदींचं सरकार सोशल मीडियावर सतर्क आहे. मोदी काही कार्यासाठी लोकांची मते जाणून घेतात. तशी ऑनलाईन सोय त्यांनी करुन दिली आहे. त्यामुळे अशा काही निर्णयामुळे सरकारची अब्रू घालवण्यापेक्षा लोकांचे सल्ले घेणे उपयुक्त ठरेल. सेक्स (सेक्शुअल लिबर्टी) आणि सिटीचा सबंध आहे पण ग्रामीण भागात आजही अनेक गोष्टींसाठी बंधने आहेत. शहरातले लोक फॉरवर्ड वगैरे समजले जातात. त्यामुळे शहरातल्या लोकांसोबत ग्रामीण भागातील लोकांचे म्हणणे सुद्धा ऐकावयास हवे.
सेक्स हा समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यातून नवा समाज घडतो पण सेक्समुळे आनंद सुद्धा मिळतो. त्यासाठी कंडोमची निर्मिती केली आहे. त्याची जाहिरात झाली पाहिजे पण त्या जाहिराती विशिष्ट वयोगटासाठीच आहेत. मुळात जाहिरात हा शब्दच शोभा करणे किंवा एखादी गोष्ट पसरवणे अशा संदर्भाचा आहे. जाहिराती सर्वांसाठीच खुल्या असतात. एड्सला रोखण्यासाठी गर्भ निरोधक आणि कंडोमचा वापर करावा, अशी जनजागृती सरकारकडून केली जाते. लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी मोफत कंडोमचे वाटप देखील केले जाते. अर्थात सरकारच्या जाहिराती बोल्ड नसतात. त्यात प्रबोधन असते. आताच्या कंडोमच्या जाहिराती, लोकांनी कंडोमचा वापर करुन सेक्सचा आनंद लुटावा यासाठी केल्या जातात. म्हणूनच त्यांच्या जाहिराती प्रौढांसाठी आनंददायी ठरतील अशाचप्रकारे निर्माण करण्यात आलेल्या आहेत. यावर निर्बंध हवेच पण सरकारला कुणी सांगितले की लहान मुलं रात्री 10 नंतर टिव्ही बघत नाहीत? सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत मुले टिव्ही पाहतात, हे कोणत्या रिसर्चवर आधारित आहे? सरकारचा हेतू शुद्ध असेल पण त्यासाठी सरकारने आधी रिसर्च करायला हवा.
लहान मुले घरात टिव्ही सुरु असेपर्यंत टिव्ही पाहतात. माझा मुलगा तरी असाच करतो. सेन्सॉरमध्ये युए नावाचं सर्टिफिकेशन दिलं जातं. याचा अर्थ तो चित्रपट मुले पालकांच्या मार्गदर्शनाखाली पाहू शकतात. माझ्यामते ए म्हणजे ऍडल्ट सर्टिफिकेट असलेला चित्रपट, जाहिरात टिव्हीवर शक्यतो दाखवत नाही. याचा अर्थ कंडोमच्या जाहिरातीला युए सर्टिफिकेट मिळत असणार. त्यामुळे आपल्या मुलांनी काय पहावं आणि काय पाहू नये याचा विचार पालकांनाच करु द्यावा. सरकारने शक्यतो त्यात लुडबुड करु नये. केल्यास पालकांचे मत जाणून घ्यावे. तसंही इम्रान हाश्मी आणि जॅकलीन फर्नांडिस ‘कांदे बटाटे’ खेळतात की अजून कोणता खेळ खेळतात, याचे उत्तर पालकच देतील.
- जयेश मेस्त्री
९९६७७९६२५४
साप्ताहिक 'चपराक'
१८ डिसेंबर २०१७
(साप्ताहिक 'चपराक' १८ डिसेंबर २०१७)
परमपूज्य गाडगेबाबा यांच्या जीवनावर आणि जीवनकार्यावर ज्या मान्यवर लेखकांनी लेखन केले, त्यातील अनेकांनी त्यांच्या अद्वितीय कार्याने प्रभावित होऊन त्यांना आपापल्या परीने गौरविले आहे. कुणी त्यांना समाजवादी संत म्हटले, कुणी त्यांना क्रांतिकारी संत असे संबोधिले आहे. कुणी त्यांना समाजक्रांतीचा अग्रदूत या शब्दांनी गौरविले आहे. कुणी त्यांना समतेचा नंदादीप म्हटले तर कुणी त्यांना वंदनीय वैराग्यमूर्ती या शब्दात गौरविले आहे. गो. नी. दांडेकर यांनी तर त्यांची ‘अमर्याद’ या एकाच शब्दातून थोरवी सांगितली आहे. या थोर मान्यवरांनी गाडगेबाबांचा केलेला गौरव आणि त्यांना बहाल केलेली बिरूदे ही त्यांच्या जीवनाचा विचार करता यथार्थ आहेत; यात शंकाच नाही. किंबहुना त्यांच्या कार्याचा विचार करता आणखी काही विशेषणे त्यांना बहाल केली तरी ती अपुरीच पडतील, यात शंका नाही! पण या सार्या बिरूदांच्या पलीकडे जाणारे त्यांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व पाहता त्यांना ‘लोकोत्तर’ याच विशेषणाने गौरवावे असे मला मनापासून वाटते.
वंदनीय गाडगेबाबांना मी ‘लोकोत्तर’ या शब्दाने गौरवितो याची अनेक कारणे त्यांच्याच आयुष्यात आपणाला पदोपदी सापडतात. त्यांनी व्रतस्थ वृत्तीने स्वीकारलेले ‘साधुत्त्व’ आणि ‘संतत्त्व’ लोकोत्तर होते. त्यांनी केलेला स्वतःचा आत्मिक विकास ‘लोकोत्तर’ होता. त्यांची कृतार्थ जीवनाची धारणा लोकोत्तर होती. त्यांचे चरित्र आणि चारित्र्य लोकोत्तर होते. त्यांची अनासक्ती आणि इंद्रियदमन लोकोत्तर होते; नव्हे कमालीचे अपवादात्मक होते. त्यांनी केलेला संसार आणि कुटुंबियांना दिलेली वागणूक लोकोत्तर होती. त्यांची कीर्तनाची पद्धत पूर्णतः नवीन आणि तितकीच लोकोत्तर होती आणि धर्म, उपासना, कर्मकाण्ड, परंपरा आणि अंधश्रद्धेविरूद्ध केेलेला संघर्ष लोकोत्तर होता. त्यांच्याठायी असलेली करूणा, प्राणिमात्राविषयी असणारे वात्सल्य, उपेक्षितांविषयी वाटणारा जिव्हाळा आणि निसर्गापासून ते महारोग्यापर्यंत विस्तारलेले प्रेम हेही तितकेच लोकोत्तर होते आणि या सार्या गोष्टींचा झालेला परिपाक म्हणजे त्यांनी स्वतःच्या आचरणातून दिलेला संदेश हा देखील तितकाच लोकोत्तर होता.
इथेच न थांबता पुढे जाऊन असे म्हणता येईल की, त्यांची आश्रमातली शिस्त लोकोत्तर होती. त्यांनी प्रतिष्ठित केलेली स्वच्छता मोहिमदेखील लोकोत्तर म्हणावी लागेल. त्यातून त्यांनी शरीरकष्टाला दिलेली प्रतिष्ठा तितकीच लोकोत्तर म्हणावी लागेल. यापेक्षाही लोकोत्तर म्हणण्याचे कारण स्वतःच्या मृत्युकडे पाहण्याची त्यांची भूमिका असाधारण आणि लोकोत्तर अशीच आपणाला जाणवते. त्यांच्या अंगावरचे कपडे? त्यांना आपण कोणत्या शब्दांनी वर्णावे? असा कपडा म्हणजे जुन्या-पुराण्या नाना रंगांच्या ठिगळापासून हाताने शिवलेली आकारहीन गोधडी जगातच्या एकाही मान्यवराने एक व्रत म्हणून आयुष्यभर वापरली नसावी! त्यांनी ती नुसती वापरली नाही, तिला केवढी तरी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. अशा या प्रतिष्ठाप्राप्त वस्त्राला ‘लोकात्तर वस्त्र’ असे आपण संबोधिले तर वावगे होणार नाही. आजकाल हा शब्दही वापरून गुळगुळीत झालेला असला तरी, एक मात्र खरे की, उपेक्षित आणि सामाजिक प्रतिष्ठा नसलेल्या परीट समाजात जन्मलेल्या एक निरक्षर, दरिद्री आणि शेतातल्या चार बैलांबरोबर पाचवा बैल म्हणून राबणार्या माणसाने पन्नास वर्षे म्हणजे दिवसांच्या भाषेत अठरा हजार दिवस श्रीमंतीचा कलंक न लागलेल्या गरिबीत राहून, गरिबांच्या समवेत राहून, त्यांच्या क्षूद्र व विझत चाललेल्या आयुष्याला चेतविले. त्यांच्या जीवनात प्रकाश पेरला, त्यांच्यावर सुसंस्कार केले, संसाराला परमार्थाची जोड दिली. नानाविध बंधनांनी जखडलेल्या गरिबांना बंधमुक्त केले. त्यांना आपल्या जीवनातील श्रेयसाचा साक्षात्कार घडविला. या सर्वांसाठी गाडगेबाबांना ‘लोकोत्तर’ हाच शब्द वापरावा लागेल, यामध्ये तिळमात्र शंका नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा लोकोत्तर असलेला महापुरूष बाबांच्या मांडीशेजारी बसून त्यांना घोंगडीसारखी भेट देतो, यातूनही त्यांचे लोकोत्तर अधिक ठळक होऊन जाते.
परमपूज्य गाडगेबाबा यांना मला ‘लोकोत्तर’ विशेषण वापरावे वाटले याचे आणखी एक कारण असे की, गाडगेबाबांच्या काळात आणि आजच्याही काळाचा विचार करता एकाही साधुने किंवा स्वामी, आचार्याने हाती खराटा घेऊन आयुष्यभर स्वच्छतायज्ञाची निष्ठेने उपासना केलेली नाही. एकाही साधू अथवा आचार्याने अस्पृश्यासाठी मोफत धर्मशाळा बांधली नाही. भक्तांसाठी धर्मशाळा बांधून सुद्धा एकही महाराज शेजारी उभारलेल्या झोपडीत राहिला नाही. एकाही साधंने भक्तांनी पायाशी टाकलेला पैसा भक्तांसाठी आणि अनाथ मुलांसाठी वापरला नाही. महाराष्ट्रातल्या एकाही महाराजाने पायांना रूईची पाने बांधून राना-वनातून शेकडो मैलांचा प्रवास केलेला नाही. आजच्या काही महाराजांना तर ए.सी गाडी लागते. बिसलेरीचे बाटलीबंद पाणी लागते. निवार्यासाठी पंचतारांकित सोय हवी असते. समोरच्या टेबलवर ठेवलेला दुधाचा पेला हातात देण्यासाठी एखादा सेवक लागतो. गाडगेमहाराजांच्या काळात आणि आजच्याही काळात एकाही महाराजाने आपल्या आई, पत्नी, जावयाला धर्मशाळेच्या बांधकामावेळी मजूर म्हणून राबविले नाही. स्वतः बाबासुद्धा पंढरपूरच्या धर्मशाळेच्या बांधकामावेळी गवंड्याच्या हाताखाली मजूर म्हणून राबले आहेत. तेही मजुरी न घेता. परमपूज्य गाडगेबाबा यांनी कुठलाही आदेश नसताना सारा गाव स्वच्छ केल्यावर एखाद्या माऊलीने दिलेली शिळीपाकी भाकरही ईश्वरी प्रसाद म्हणून आनंदाने खाल्ली. आजच्या काळातल्या किती आचार्यांनी, महाराजांनी अशी श्रमाची भाकरी खाल्ली आहे? अथवा एकही महाराज मजूर म्हणून बांधकामावर राबला नाही. एकही साधू- महाराजाने भाविकांना मिष्टान्नाचा प्रसाद दिल्यावर स्वतःसाठी तळहातावर ओली-सुकी भाकरी घेऊन खाल्ली नाही.
भुकेल्या माणसाला अन्न देणे, तहानलेल्या माणसास पाणी देणे, अनाथांना आधार देणे, महारोग्याला साबण लावून आंघोळ घालणे, पन्नास वर्षात मुखामध्ये कोणताही गोड पदार्थ न घालणे असला ‘वेडेपणा’ महाराष्ट्रातल्या एकाही साधुने केलेला नाही. म्हणूनच त्यांना ‘लोकोत्तर’ हे बिरूद बहाल करणे योग्य वाटते. त्यातही आश्चर्यकारक गोष्ट अशी की, सर्व बाजुंनी अभावग्रस्त परिस्थिती असताना त्यांनी हे लोकोत्तर कार्य केलेले आहे. ज्याच्याकडे अभिमानाने मिरवावा असा उच्चतम वर्णाचा आणि खानदानीपणाचा वारसा नाही, ज्याच्या घरात विद्येची पंरपरा नाही, ज्याच्या घरातले वातावरण भक्ती, शिक्षण व अध्यात्म यास अनुकूल नव्हते, ज्याच्याकडे चार पिढ्यांनी बसून खावे अशी श्रीमंती नांदत नव्हती, ज्याच्या घरात समाजसेवेची प्रेरणा देणारे कोणी नव्हते, ज्याला कोणत्याही गुरूचा अनुग्रह लाभलेला नव्हता आणि ज्याने कधी प्राथमिक शाळेचा उंबरठाही पाहिला नाही असा एक कष्टकरी-नव्हे मातीत राबणारा, मातीत लोळणारा आणि ज्याच्या आयुष्याची कदाचित मातीच झाली असती, असा एक अतिसामान्य माणूस गगनगामी झेप घेऊन आभाळाएवढे कार्य करतो, हे खरोखरच आश्चर्यकारक म्हणावे लागेल. एखादा माणूस पंचपक्वान्ने खाण्याची सोय असतानाही सतत पन्नास वर्षे एखाद्या व्रताप्रमाणे केवळ भाजी-भाकरी, चटणी खाऊन जगतो, हे खरोखर जगातले एकमेव उदाहरण म्हणावे लागेल. आपण महिनाभर सुद्धा दोन्ही वेळेला ते खाऊ शकणार नाही. एवढेच नव्हे तर महिनाभर सकाळ-संध्याकाळी श्रीखंड, पुरी खायची ठरविली तरी त्या मिष्टान्नाचा आपणाला कंटाळ आल्याशिवाय राहणार नाही. या माणसाचे जिभेवर नियंत्रण किती होते याचे हे एक उदाहरण म्हणून सांगता येईल. येशू ख्रिस्ताचे एक चिरंतर सत्य सांगणारे विधान आहे. ख्रिस्त म्हणतात, ‘‘जो जीभ जिंकतो, तो जग जिंकतो.’’ खाण्याच्या संदर्भात आणि वेडेपणाने दर्पयुक्त बोलण्याच्या बाबतीत त्यांचे हे विधान लागू पडणारे आहे. थोडक्यात काय, चमत्कार न मानणार्या या माणसाचे सारे आयुष्यच एकापरीने मोठा चमत्कार होता, असे म्हणावेसे वाटते. अशा या थोर व्यक्तीला ‘लोकोत्तर’ या शब्दाशिवाय दुसरा कोणताही शब्द शोभून दिसला नसता, यात शंका नाही.
गाडगेबाबांनी केलेले कार्य केवळ भक्ती-प्रवचनापुरते मर्यादित नव्हते; उलट त्यांचे कार्य बहुआयामी आणि बहुस्तरीय स्वरूपाचे होते. मानवी जीवन आणि संस्कृती यांना समृद्ध करणार्या तसेच त्यांना उन्नत बनविणार्या सार्या क्षेत्रांना त्यांनी आपल्या कार्याद्वारे स्पर्श केला. असा स्पर्श दुसर्या कोणत्याही आचार्यांनी केलेला नाही. परमेश्वराचे साक्षात्कारी दर्शन आणि मोक्षप्राप्ती या वैयक्तिक गोष्टीसाठीच त्यांनी धर्म आणि अध्यात्माचा वापर केला. म्हणून संत साहित्याचे थोर अभ्यासक श्रीमान बाळासाहेब भारदे एका लेखात म्हणतात, ‘‘या देशात अनेक ज्ञानी झाले. अनेक भक्त झाले, योगी, संत आणि तत्त्वज्ञ झाले. त्यांनी केवळ आपल्या उद्धारासाठी प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना ब्रह्मानंद कदाचित मिळाला असेलही; पण सामान्य माणसाच्या उद्धाराचा प्रयत्न त्यांंनी केला नाही. त्यांना आनंद झाला, लोकांना मात्र आनंद झाला नाही. हा संगम गाडगेबाबा आणि महात्मा गांधी यांच्या ठायी झालेला होता.’’
याची काही उदाहरणे देता येतील. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्याला हातभार लावला होता. त्यांनी गोरगरिबांसाठी स्वतः काही आश्रमशाळा काढल्या आणि त्याबरोबर त्यांनी रयत शिक्षण संस्था आणि ऍड. पंजाबराव देशमुखांच्या संस्थेला मोलाचे सहकार्य केले. ‘एक वेळ प्रसंग पडला तर जेवणाचा ताट मोडा, पण पोरांचे शिक्षण थांबवू नका’ असा आग्रह त्यांनी प्रवचनाद्वारे धरला. स्त्री-पुरूष समानतेचा आग्रह धरला. वृक्षारोपणास प्राधान्य दिले. व्यसनाधीनतेचा अधिक्षेप केला. विज्ञाननिष्ठेची कास धरली. प्रापंचिकाच्या एका खांद्यावर परमार्थ आणि दुसर्या खांद्यावर संसार घेऊन आनंदतीर्थाच्या प्रवासास जाण्यास शिकविले. त्यांनी अस्पृश्यता निवारणाचे मौलिक कार्य केले. आदर्श आणि कृतार्थ जीवनाचा संदेश दिला. ‘‘सार्वजनिक पैसा स्वतः वापरणे म्हणजे विष्ठा खाण्यासारखे होय’’ असा संदेश देऊन सदाचार, सद्विचार, पावित्र्य, चारित्र्य, समाजसेवा आणि राष्ट्रनिष्ठा यांना असणारे महत्त्व स्पष्ट केले. समाज जीवनातील विविध क्षेत्रांना समृद्ध आणि गतिमान करण्याचे कार्य गाडगेबाबांशिवाय दुसर्या कुठल्याच साधू किंवा महाराजांनी केलेले नाही हे लक्षात घेतले पाहिजे.
गाडगेबाबांच्या सर्वस्पर्शी जीवनकार्याचा सर्वांगीण व सूक्ष्म विचार केला तर आपणाला असे जाणवते की त्यांचे सारे प्रयोग माणसाला दुःखापासून मुक्त करण्याच्या ध्यासातून निर्माण झालेले आहेत. माणसाला कळणारे दुःख कशामुळे निर्माण होते हा खरा तर एक सनातन प्रश्न आहे. गौतम बुद्धाला तृष्णा हे दुःखाचे मूळ वाटते, महावीरांच्या मते हिंसेतून दुःख निर्माण होते. शंकराचार्यांना मायेतून दुःख निर्माण होते असे वाटते. महात्मा गांधीना संचयाची लालसा हे दुःखाचे कारण वाटते तर महात्मा फुल्यांना धार्मिक शोषणातून दुःखाचा जन्म होतो असे वाटते. गाडगेबाबांना वर दिलेली कारणे योग्य वाटतातच; पण त्यांच्या मते दुःख अज्ञानातून निर्माण होते. अंधश्रद्धा व कर्मकांडातून ते निर्माण होते. जाती-पातीच्या तटबंदातून दुःखाचा उगम होतो.
गुलामगिरीतून, दारिद्य्रातून आणि व्यसनाची शिकार झाल्याने माणसाला दुःख भोगावे लागते, असे त्यांचे निरीक्षण आहे आणि म्हणूनच या सार्यावर त्यांनी उपाय शोधले आणि त्यापरिने कार्य केले. महाराष्ट्रातल्या एकाही बाबाने असे कार्य केले नाही. त्यांच्या मते, निसर्ग माणसाला फार दुःख देत नाही. भूकंप, महापूर अथवा अवर्षण ही फार तर त्याची कारणे म्हणता येतील पण निसर्गापेक्षाही माणूसच स्वतःच्या आचरणातून दुःख निर्माण करतो. माणूसच दुसर्या माणसाला दुःखी करतो. स्वतःही दुःखाने होरपळून जातो पण त्यापासून तो मुक्ती घेत नाही. ते निवारण्यासाठी प्रयत्नही करीत नाही. त्यामुळे सामान्य माणूस जन्माला येताना सोबतीला दुःख घेऊन येतो; त्याच्या जगण्यात सोबतीला दुःख असतेच आणि मरतानाही दुःख सोबतीला घेऊनच मरतो. म्हणून सनातन दुःखाशी झुंज देणारा आणि सामान्य माणसाच्या दुःखावर फुंकर घालणारा हा महामानव होता, असे म्हणता येईल.
सामान्य माणसाचे दुःख कमी करण्याबरोबरच गाडगेबाबांनी धर्माचा अर्थ बदलला; ईश्वरपूजेचा अर्थ बदलला. साधू किंवा संत या शब्दाची व्याख्या बदलली. एवढेच नव्हे तर स्वर्ग आणि नरक, पाप आणि पुण्य, पवित्र आणि अपवित्र, अमृत आणि अप्सरा यात अडकून गरगरणार्या सामान्य माणसाला बाहेर खेचून धर्माचा प्राणभूत घटक त्यांच्या अंगणात उभा केला. कर्मकाडांनी माखलेली विधी-उपासना म्हणजे धर्म नव्हे; तर धर्म म्हणजे निरामय, निर्मळ, उन्नत, प्रवाही आणि जीवनदायी शाश्वत विचार म्हणजे धर्म होय! लौकिक आणि पारमाथिर्र्क जीवनाला समृद्ध करणारा शाश्वत विचार म्हणजे धर्म! हा धर्म बाबांनी लोकांना शिकवला. स्वतःच्या आचरणातही आणला. ज्या माणसाला वीसापर्यंतचे आकडे मोजता येत नव्हते, ज्याला बारखडीची अक्षरे ज्ञात नव्हती, ज्याला कुठलाही पंथ व परंपरा ठाऊक नव्हती, ज्याला कुठलाही ‘इझम्’ ठाऊक नव्हता, ज्याने आचार्यांच्या ज्ञान मंदिरात ज्ञानसाधना केली नव्हती अशा एका माणसाने शाश्वत स्वरूपाचे लोकोत्तर कार्य करावे आणि मानवी जीवन उन्नत होण्यासाठी पावला-पावलावर प्रकाशदीप पेटवावेत, याला ‘लोकोत्तर’ याशिवाय दुसरा शब्द नाही. एका निरक्षर माणसाच्या नावाने एखादे विद्यापीठ सुरू केले जाते, असे उदाहरण जगाच्या पाठीवर क्वचितच पहावयास मिळेल!
(साप्ताहिक 'चपराक' १८ डिसेंबर २०१७)
- डॉ. द. ता. भोसले, पंढरपूर
९४२२६४६८५५
देशातील तरुणांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, संशोधन क्षेत्रात देशाची मान उंचावली जावी, ज्ञान विज्ञानाचा प्रचार-प्रसार व्हावा या उदात्त हेतूने सरकाने देशभरात अनेक विद्यापीठांची स्थापना केली. त्याला करोडो रुपयांचे अनुदान दिले, आजही अविरतपणे दिले जात आहे. यातली बोटावर मोजण्याइतकी विद्यापीठं सोडली तर बाकीच्या विद्यापीठांचे संशोधनातील योगदान शून्यच आहे. ज्ञानदानाच्या व्यापक कार्याला वाहून घेतल्याचं ढोंग करत करोडोंचं अनुदान लाटण्याशिवाय यांची वेगळी महत्ता ती काहीच नाही. मागील काही वर्षांत तर भ्रष्टाचार, घोटाळे, परीक्षा विभागातील गैरकारभार, विद्यार्थी संघटनांचे वाद, विद्यापीठ निवडणुका, पैसे घेऊन पीएचडी वाटप या असल्या कारणांसाठीच विद्यापीठ चर्चेत आहेत. परीक्षा शुल्क, फेर तपासणी शुल्क, पदवीदान समारंभाचे शुल्क अशा अनेक नावांखाली विद्यार्थ्यांकडून भरभक्कम वसुली करणारी विद्यापीठं ही ‘प्रॉफिट मेकिंग’ कंपन्या झाल्या आहेत. एकट्या पुणे विद्यापीठाच्या ठेवी जवळपास सहाशे कोटींच्या घरात आहेत. याउपर राज्य सरकार, केंद्र सरकार, विद्यापीठ अनुदान आयोग, CSIR इत्यादीकडून मिळणारे कोट्यवधींचे फंड्स आहेत.
‘विद्यापीठ अनुदान आयोगाने’ घालून दिलेले कित्येक नियम या विद्यापीठांकडून राजरोसपणे पायदळी तुडवले जात आहेत. त्यावर कोणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही. उदाहरणार्थ PET (पीएचडी पूर्व परीक्षा) चे निकाल जाहीर झाल्यावर एक महिन्याच्या आत विद्यापीठाने उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखती घेणे अपेक्षित आहे. परंतु PET चा निकाल जाहीर होऊन एक महिना उलटला तरी अजून पुणे विद्यापीठातर्फे मुलाखतीची कोणतीही तयारी पहायला मिळत नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून करोडोंचे अनुदान लाटायचे आणि त्यांनी घालून दिलेल्या नियमांना त्यांच्याच पैशातून खरेदी केलेली केराची टोपली दाखवायची असाच हा एकंदर प्रकार आहे. सामान्य मुलांनी दाद तरी कोणाकडे मागायची? नव्यानेच दाखल झालेले कुलगुरू की स्वतःच खोट्या पदवीच्या घोळात अडकलेले शिक्षण मंत्री?
तर असा सगळा भीम पराक्रम असणार्या विद्यापीठाचे कर्मचारी तरी या खेळात कसे मागे राहतील?
महाराष्ट्र विद्यापीठ महासंघाचे अध्यक्ष, उच्च व तंत्रशिक्षण विभागातील भ्रष्ट अधिकारी यांच्याशी हात मिळवणी करून राज्यातील सर्वच अकृषी विद्यापीठातील कर्मचार्यांनी लाच देऊन, पदनाम बदलून घेऊन त्या द्वारे स्वतः च्या वेतनात घसघशीत वाढ करून घेतली आहे. आणि विशेष म्हणजे वाढीव वेतन हे शासनाच्या तिजोरीतून मंजूर झाले नसून ते विद्यापीठाच्या तिजोरीतून देण्यात येत आहे. एकंदर शासनाकडून आणि विद्यार्थ्यांकडून जमा केलेल्या ‘मधावर’ विद्यापीठातली अस्वलं राजरोसपणे ताव मारत आहेत.
पदनाम - वेतन वाढीचा घोटाळा नेमका काय?
साधारणतः शासकीय कर्मचार्याला वेतन वाढीचा लाभ ‘वेतन आयोग’ अथवा पदोन्नतीबरोबर मिळत असतो. परंतु राज्यातील विद्यापीठाच्या कर्मचार्यांनी वेगळीच शक्कल लढवत लाखो रुपयांचा मलिदा पदरात पाडून घेतला आहे.
सुरुवात
सन 2010 ते 2013 या काळात राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकार सत्तेवर असताना या घोटाळ्याला सुरवात झाली. ‘महाराष्ट्र अकृषी विद्यापीठ कर्मचारी संघा’ च्या काही नेत्यांनी मंत्रालयातील ‘उच्च व तंत्र शिक्षण’ विभागातील अधिकार्यांशी संबध प्रस्थापित केले. राज्यातील विद्यापीठामध्ये काम करणार्या सेवकांच्या वेतन श्रेण्यांमध्ये काही त्रुटी असून त्या दूर करणे गरजेचे असल्याचे सांगितले. याच अनुषंगाने ‘संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या’ कुलसचिवांनी दिनांक 19 ऑक्टोबर 2011 रोजी पत्र क्रमांक, संगाबाअवि/1/102/2-1313/2011 द्वारे शिक्षकेतर कर्मचार्यांचे पदनाम बदलून देण्यात यावेत अशा आशयाचा एक मोघम प्रस्ताव पाठवला. राज्य शासनातर्फे असा कुठलाही प्रस्ताव मागवण्यात आला नव्हता.
चेंडू उच्च व तंत्रशिक्षण विभागात
याच प्रस्तावाचा आधार घेत उच्च व तंत्रशिक्षण विभातील कार्यासन अधिकारी विकास कदम यांनी अत्यल्प मनुष्यबळामुळे कालमर्यादेत कामे करणे जिकीरीचे झाले असून, विद्यापीठाची गैरसोय होत आहे. ह्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी व ही कामे जलदगतीने होण्यासाठी काही पदांची पदनामे बदलवून मिळाल्यास त्या पदावरील कार्यरत संबंधित कर्मचार्याकडून जास्तीची कामे करून घेता येतील, अशी थाप मारून हे निवेदन प्रधान सचिव (उच्च व तंत्रशिक्षण) यांच्यापुढे मांडलं.
त्यावर प्रधान सचिवांनी DOES IT REQUIRE-PPROVEL OF THE FIN-NCE DEPT? असा प्रश्न विचारून सदर प्रस्ताव परत पाठवला.
प्रधान सचिवांच्या टिप्पणीस उत्तर म्हणून कार्यासन अधिकारी विकास कदम यांनी सदर प्रस्तावामुळे मंजुर पदसंख्येत कोणताही बदल होत नाही, फक्त पदनाम सुधारणा करण्यात येत आहे. त्याचबरोबर शासनावर अतिरिक्त आर्थिक बोजा नसल्यामुळे ‘वित्त विभागाच्या’ सहमतीची आवश्यकता वाटत नाही, तथापि आदेशार्थ सादर अशी टिपणी करून प्रधान सचिवांच्या टेबलवर परत पाठवला.
त्यावर प्रधान सचिवांनी ‘मान्य’ असा शेरा लिहून प्रस्ताव मंजूर केला.
या मंजूर झालेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने विकास कदम यांनी पुढे प्रत्येक अकृषी विद्यापीठाला पदनाम वेतनश्रेणी बदलाबाबत पत्र पाठवले. त्यात त्यांनी वित्त विभागाच्या अंतर्गत कार्य करणार्या कथित ‘वित्तीय सुधारणा समिती’च्या सहमतीच्या पत्राचा संदर्भ क्रमांक (270/9 वि.सु., दि 2.5.2009 ) दिला.
‘विकास कदम याचं पितळ उघडं पडलं’
वित्त विभागाकडे ‘माहितीचा अधिकार अधिनियम 2005’ अंतर्गत सदर पत्राची प्रत मागवली असता, वित्त विभागाने ‘वित्तीय सुधारणा समिती’ नामक कोणतीही समिती कार्यरत नसल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर (270/9 वि.सु., दि 2.5.2009 ) अशाप्रकारे क्रमांक देण्याची पद्धत नसल्याचे सांगितले. यावरून त्यांनी रचलेला बनाव स्पष्ट होतो.
नेमका फरक कुठे आणि काय पडला?
सदरहू वेतनश्रेणी वाढ ही ‘पूर्वलक्षी प्रभावाने’ लागू करण्यात आली. म्हणजे विद्यापीठाच्या कर्मचार्यांना 1996 अथवा 2006 पासूनची पगाराची कोट्यवधीची थकबाकी विद्यापीठाने दिली. वाढलेले वेतन आणि 1996/2006 पासूनची वेतनाची थकबाकी ही विद्यापीठाच्या स्वतःच्या फंडातून ददेण्यात आली. यासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारचे फंड मिळाले नाहीत कारण सदर प्रस्तावाला वित्त विभागाची कसलीही परवानगी नव्हती.
आम्ही माहितीच्या अधिकाराखाली कर्मचार्यांचे वाढलेले वेतन आणि दिलेले अरीअर्स (थकबाकी) याची माहिती मागवली असता धक्कादायक आकडे समोर आले.
उदाहरणार्थ,
विद्यापीठाने पुरवलेल्या माहिती अनुसार, ‘डॉक्युमेंटेशनिष्ट’ असलेले विद्यापीठाचे कर्मचारी ‘कमलाकर प्रभू गायकवाड’ यांचे पदनाम बदलून तंत्रज्ञान सहायक (ग्रंथालय)’ असे केले. वेतन चौतीस हजाराने वाढवले आणि वेतनवाढ पूर्वलक्षी असल्याने तब्बल पंचवीस लाख चौर्याहत्तर हजार वीस’ (2574020) रुपये इतके अरीअर्स मिळाले.
दुसरे उदाहरण, ‘कनिष्ठ ग्रंथालय सहायक’ असलेले भिवसेन भोन्जीबा थोरे’ यांचे पदनाम बदलून ‘वरिष्ठ तांत्रिक सहायक’ केले. वेतन तब्बल छत्त्तीस हजारांनी (36000) वाढले आणि अरीअर्स सत्तावीस लाख तेरा हजार (2713000) इतके मिळाले.
श्रीमती उर्मिला दिलीप कुलकर्णी काळे यांचं पदनाम इन्फोर्मेशन सायंटिस्ट असं करून त्यांच्या वेतनात दरमहा 53202 रुपये इतकी वाढ करण्यात आली आणि अडोतीस लाख रुपये अरीअर्स म्हणून देण्यात आले.
भौतिकशास्त्र विभागात प्रयोगशाळा सहायक असलेलेल्या संदीप भुजबळ यांचे पदनाम बदलून संशोधन सहयोगी केले आणि वेतनात दरमहा 41000 रुपये इतकी वाढ करण्यात आली.
असे एकट्या ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात’ पावणे सहाशे कर्मचारी आहेत, ज्यांना अडोतीस लाखांपर्यंत वेतन थकबाकी मिळाली आहे. हाच संघटीत लुटीचा प्रकार कमी अधिक प्रमाणात राज्यातील इतरही विद्यापीठांत सुरु आहे.
विद्यार्थ्यांकडून शुल्काच्या स्वरुपात करोडो रुपये गोळा करणार्या विद्यापीठात इतक्या मोठ्या प्रमाणावर लुट सुरु आहे.
यंत्रणा नेमकी कशाप्रकारे काम करत होती?
महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष, कुलसचिव, अमरावती विद्यापीठ व कक्ष अधिकारी, उच्च व तंत्रशिक्षण हे या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत.
प्रत्येक विद्यापीठातील कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी या कामासाठी मोठ्या प्रमाणावर दलाली घेतली. रक्कम जवळपास कोटीच्या घरात आहे. याचे समभाग मंत्रालयातील अधिकार्याला पोचवण्यात आले.
सुरुवातीला ज्यांनी पैसे दिले त्यांना सुधारित पदनाम व वेतनश्रेणी मिळत गेली. त्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागातून वेगवेगळे जी आर निघत होते. त्यामुळे यांची विश्वासार्हता वाढली. आणि त्याचमुळे हजारो कर्मचारी जाळ्यात अडकले. त्या बदल्यात अनेक कर्मचार्यांच्या पगारात भरघोस वाढ झाली आहे. त्याची आकडेवारी वर दिलीच आहे. आज विद्यापीठामध्ये केवळ ‘मॅट्रिक पास’ कर्मचारी जवळपास ‘ऐंशी हजाराचा’ पगार घेत आहे.
ज्यांनी पैसे देण्यास नकार दिला, त्यांना सूचक धमक्या दिल्या. त्याचबरोबर त्यांना जी आर मधून देखील वगळण्यात आलं.
हे सर्व जी.आर. 2010 ते 2013 या काळात काढले गेले. हे संकेतस्थळावर उपलब्ध होते पण गाजावाजा झाल्यामुळे काढून टाकले. पण जी आर ची अंमलबजावणी झाली आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
1. सर्व प्रशासकीय विभागांच्या कोणत्याही संवर्गाच्या वेतन सुधारणे संबंधीचे प्रस्ताव वित्त विभागाचे अभिप्राय घेऊनच अमलात आणले जातात. जे यामध्ये जाणीवपूर्वक डावलले गेले आहेत.
2. पदनाम बदलाचे सर्व प्रस्ताव व शासन निर्णय 2010 ते 2012 या काळातले आहेत. परंतु त्यांची मान्यता दि 02/05/2009 रोजी घेतली आहे असे भासवले जात आहे.
3. पदनाम वाटपात शैक्षणिक अर्हता हा निकष पूर्णपणे डावलला गेला आहे, ज्याने जास्त लाच दिली त्याला जास्त वेतन अशा प्रकारे हे पदनाम बदलून दिले गेले.
4. 172 पदनामांपैकी 102 पदनामे बदल्यात आली, म्हणजे 1235 कर्मचार्यांपैकी 681 सेवकांना वाढीव वेतनाचा लाभ मिळाला.
5. प्रस्तावात नमूद केल्याप्रमाणे कामाचे स्वरूप, जबाबदारी यामध्ये कोणताही अपेक्षित बदल झाला नाही.
6. कार्यासन अधिकारी, विकास कदम यांनी ‘पदनाम बदलाने तिजोरीवर ताण पडणार नाही’ असा दावा केला होता तो खोटा ठरला आहे, आणि विद्यापीठाच्या तिजोरीवर करोडोंचा अतिरिक्त बोजा पडला आहे.
वरील विषयाचा तत्कालीन मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण, सध्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून देखील या विषयाच्या गांभीर्यतेकडे दुर्लक्ष केले जात आहे, हे दुर्दैवी आहे.
एकीकडे तुटपुंजे वेतन मिळते म्हणून ऐन सणासुदीत संप करणारे राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी आहेत तर दुसरीकडे कमी कामात दुप्पट वेतन मिळवून रोजची दिवाळी करून सरकारचं दिवाळं काढणारे विद्यापीठातील कर्मचारी आहेत.
- अक्षय बिक्कड़
साप्ताहिक 'चपराक', पुणे
८९७५३३२५२३