Monday, March 2, 2015

ख-या 'आयडॉल्स'ची प्रेरणादायी ओळख!

'चपराक'ने प्रकाशित केलेल्या संजय वाघ लिखित 'गंध माणसांचा' या पुस्तकाची जयंत कुलकर्णी यांनी करून दिलेली ओळख. 



'गंध माणसांचा' या पुस्तकाचे प्रकाशन करताना डावीकडून लेखक संजय वाघ, उमेश सणस,शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, सुधीर गाडगीळ, विनायक लिमये आणि 'चपराक'चे प्रकाशक, संपादक घनश्याम पाटील.
गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नी माझे व्हावे मिलन...
या ओळींमध्ये गीतकाराने ज्या गंधाचा अनुभव घेतला, तसाच गंध लेखक संजय वाघ यांनी सभोवतालच्या समाजप्रेमी लोकांमध्ये अनुभवला.
‘गंध माणसांचा’ या पुस्तकाचे लेखक संजय वाघ हे हाडाचे पत्रकार आहेत. पत्रकारितेची गद्धे पंचविशी त्यांनी पूर्ण केली आहे. या प्रवासात त्यांना नानाविध भलीबुरी माणसे भेटली. अशा बहुरंगी, बहुढंगी चेहर्‍यांमधुन त्यांना भावली ती आपला कुटुंबकबिला सांभाळीत समाजासाठी वेगळे काहीतरी करणारी माणसे! प्रयत्न, जिद्द, परिश्रम व सच्चाईच्या भांडवलावर वेगळी वाट निवडून निरपेक्ष भावनेने ध्येयाकडे वाटचाल करणारी संवेदनशील मनाची माणसे, कारण ती लेखकाच्या जातकुळीतली होती.
लेखकाच्या मते हल्ली जो तो स्वत:चे सुख-दु:ख कुरवाळत बसलेला आहे. अशा माणुसकी हरवून बसलेल्या माणसाला लेखकाने अतिशय समर्पक ‘निरो’ची उपमा दिलेली आहे. रोम जळत असताता फिडल वाजवण्यात मग्न असलेल्या ‘निरो’ची!
अन्याय, अत्याचार, व्याभिचार, बलात्कार, घातपात, जाळपोळ, दंगल, महापुरूषांच्या पुतळ्यांची विटंबना, हुंड्यासाठी विवाहितांच्या हत्या, स्त्रीभ्रूण हत्या आदी प्रकारात वाढ झाल्याने जगात आता ‘राम’ उरला नाही; असा सूर आपल्यला नेहमीच ऐकावयास मिळतो. अशा निराशाजनक वातावरणात समाजासाठी काहीतरी करू पाहणारे लोक, काही करण्याची धडपड करणारे लोक हेच आशेचे किरण आहेत. लेखकाने अशा लोकांना काळोखात मिणमिणत्या पणतीची उपमा दिली आहे. ती सार्थ वाटते. त्या पणतीला तिच्या मर्यादा ठावूक असुनही कोणाची पर्वा न करता ती तिच्या परीने अंधार भेदण्याचे कार्य करीतच असते! जो तिच्या प्रकाशकक्षेत येईल त्याला अंधुक का होईना वाट दाखविण्याचे सामर्थ्य आणि जिद्द तिच्यात असते!
कस्तुरी हरणीच्या नाभीतच असताना ती अकारण तिच्या शोधासाठी वणवण भटकंती करीत असते. तसेच माणसांच्या बाबतीत सुद्धा आहे. अशी माणसे आपल्या आजुबाजुलाच असतात. त्यांचा शोध घ्यावा लागतो. अशाच माणसांचा शोध लेखकाने नाशिकच्या पंचक्रोशीत घेतला. हा शोध सत्कारणी लागला. चांगुलपणा, सच्चाई, माणूसकी, दानशूरता, परोपकारी वृत्ती या माणसांच्या गंधाने लेखकाला भुरळ घातली आणि यातुनच निर्माण झाले ’गंध माणसांचा’ हे पुस्तक!
साप्ताहिक सुटीच्या दिवशी लेखक महाशय या सुवासाचा वेध घेण्यासाठी बाहेर पडायचे, अगदी पदरमोड करून. दर आठवड्याला वेगळी वाट, वेगळी राने वने!
या प्रवासात लेखकाला भेटले डॉ. देवीप्रसाद शिवदे. बागलाण तालुक्यात मोसम नदीच्या तीरावर मातीत पुरलेल्या जाईला पुनर्जन्म देण्यासाठी धडपडणारे; ध्येय आणि तत्त्वात तडजोड न करण्यासाठी पंचवीस वर्षे गाव आणि संसाराचा त्याग करून काशाई देवीच्या मंदीरात वास्तव्य करणारे गोंदे येथील निष्ठावंत शिवसैनिक भिका राजू बोडके; स्वत:च्या दोन्ही मतीमंद मुलांचे दु:ख कुरवाळत न बसता गरजू आणि वंचितांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील तीन मुलींचे स्वखर्चाने कन्यादान करणारे नामपूर येथील शरद नेरकार भेटले; घात अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बेवारस प्रेतांचा वारसदार बनून त्यांची निगा राखणारे आणि प्रेताची ओळख पटताच त्यांना स्वखर्चाने त्यांच्या गावापर्यंत घेऊन जाणारे येवला येथील हुसेन शेख भेटले; तरूण वयातच छत्रपती शिवरायांच्या विचारांनी भारावलेले आणि गावाच्या प्रवेशद्वाराजवळ 43 लक्ष रूपयांची पदरमोड करून रयतेच्या राजाचा अश्‍वारूढ पुतळा उभारणारे खालच्या टेंभ्यातील भाऊसाहेब चिला अहिरे भेटले; जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी येणार्‍या आदिवासी भागातील रूग्णांच्या नातलगांची भोजनाची मोफत व्यवस्था करणारे जी. के. चढ्ढा आणि गंगाराम पांडे भेटले; विभक्त कुटुंबपद्धतीचा नवा ट्रेंड रूजवू पाहणार्‍या स्वैराचारी पिढीसमोर चार पिढ्यांपासून 65 जणांना एकाच छताखाली घेऊन एकत्र कुटुंब पद्धतीचा आदर्श वस्तूपाठ घालून देणारे मुंढेगाव येथील महादू गतीर यांचे माळकरी कुटुंब भेटले.
असे अनेक माणसांचे अनेक गंध आपल्याला या पुस्तकात अनुभवायला मिळतात. ज्यामध्ये अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना आधार देणारे, दुर्बल घटकांतील मुलांना आश्रय देणारे, ग्रामविकासासाठी झटणारे, प्रथमोपचार करणारे, व्यसनमुक्तीसाठी झटणारे, आपली खासगी विहिर गावच्या पाणीपुरवठ्यासाठी देऊन तहानलेल्यांची तहान भागविणारे, गावच्या हागणदारीमुक्तीसाठी झटणारे, अंधांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणारे, गोर-गरीबांना मोफत औषधोपचार करणारे डॉक्टर, पथनाट्यातून जनजागृती करणारे, मायेने पशुसंवर्धन करणारे. ही सगळी कर्तृत्ववान माणसे आपापल्या परीने ‘आपण समाजाचे काही देणे लागतो’ या विचाराने समाजकार्यात खारीचा वाटा उचलताना दिसतात.
आपल्या कर्तृत्वाचा गंध आसमंतात पेरणार्‍या या सर्वसामान्यातील असामान्य माणसांच्या कामाला नम्रपणे अभिवादन करणारे हे पुस्तक खूपच वाचनीय झाले आहे.
या पुस्तकाला पुण्यातील अग्रणी ‘चपराक प्रकाशन’चे संपादक व प्रकाशक घनश्याम पाटील यांची प्रस्तावना लाभलेली आहे. ‘सामान्य माणसाची शक्ती हीच सर्वोच्च शक्ती’ यावर दृढ विश्‍वास असणारे घनश्याम पाटील.
या पुस्तकातील लेख वाचताना अंगावर शहारे येतात, डोळे पाणावतात, अभिमानाने उर भरून येतो, भारावून गेल्यासारखे होते. सध्याच्या बजबजपुरीत असे लिखाण करणे, ते वाचले जाणे हे समाजाच्या सुदृढ मानसिकतेचे लक्षण आहे. साध्या सोप्या भाषेत लिहीलेले हे पुस्तक म्हणूनच वाचनीय झाले आहे. अनेकांना या पुस्तकातून समाजकार्याची प्रेरणा मिळेल असेही वाटते.
गुरूगोविंद आंबे यांचे बोलके मुखपृष्ठ या पुस्तकाला लाभले आहे.


१२८ पानाच्या या पुस्तकाचे मूल्य १३० रुपये असून  वाचकांना ते याच किमतीत घरपोहच पाठवले जाईल. त्यासाठी संपर्क : 'चपराक प्रकाशन' - ०२० २४४६०९०९/७०५७२९२०९२/९२२६२२४१३२

No comments:

Post a Comment