Wednesday, March 18, 2015

मराठी मातीतल्या 'अस्सल' कविता!


लहानथोरांपासून सर्वांच्याच भावविश्‍वाला साद घालणारा वाङ्मयप्रकार म्हणजे कविता. वास्तविक मानवी जीवनच काव्याने भरून राहिलेले आहे. त्यामुळे स्वाभाविकच कविता ही प्रत्येकाला कायमच सर्वाधिक जवळची वाटते. ‘चपराक प्रकाशन’च्या वतीने प्रकाशित झालेल्या ‘अक्षरगाणी’, ‘सुंबरान’, ‘नवं तांबडं फुटेल’ आणि ‘दाटुनी येताहे काळोखी काहूर’ या चार कवितासंग्रहांच्या निमित्ताने याची पुनर्प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. त्याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.

बालसाहित्य वा बालकविता हा तर साहित्याचा उगमस्रोतच मानता येईल. उगमाजवळचा नदीचा प्रवाह जितका सोपा वाटतो, तितकाच तो खडतर असतो. बालसाहित्याबाबत तसेच म्हणावे लागेल. बालसाहित्य वा काव्यलेखन जितके सोपे दिसतेे, तितकेच ते अवघड आहे. बालगोपाळांना समजेल, आवडेल, त्यांच्या कोवळ्या मनाचा ठाव घेईल, अशा शब्दांत लिहिण्यासाठी मुळातच लिहिणार्‍याला आधी लहान व्हावे लागते. तीच बालसाहित्यिकाची पूर्वअट असते. त्यात बालकवितेसारखा प्रकार हाताळायचा असेल, तर कवीचा अक्षरशः कस लागतो. संदिपान पवार यांनी हे शिवधनुष्य यशस्वीरीत्या पेलले आहे.
 पवार यांचा ‘अक्षरगाणी’ हा एक अभिनव प्रयोग आहे. लहानमुलांना या गाण्यातून वा कवितेतून स्वर-व्यंजनांची अर्थात मूळाक्षरांची ओळख करून देण्याचा कौतुकास्पद प्रयत्न त्यांनी केला आहे. अत्यंत साध्या, सोप्या भाषेत या माध्यमातून त्यांनी मुलांशी संवाद साधला आहे. स्वाभाविकच अक्षरओळख करण्याच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक पालक, शिक्षक सर्वांसाठीच उपयुक्त ठरू शकते.
‘अ’ हा पहिला स्वर. स्वाभाविकच अक्षरगाण्यांची सुरुवात या स्वरापासूनच सुरू  होते.
अननसाचे अ आहे
पहिले मूळाक्षर
पाठांतर करू चला
होऊ सारे साक्षर
अशा प्रकारे गाण्यातून पवार ‘अ’ अननसाचा धडा देतात. शिवाय साक्षरतेचे बीजही मनात रुजवतात. यानंतर आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः यांसारख्या स्वरांचीही चार ओळीतल्या गाण्यातून ते ओळख करून देतात.
अं च्या अंबारीत
बसता राजा
हत्ती चाले पुढे
वाजे बेंडबाजा
 अशा प्रकारच्या लयबद्ध व तालबद्ध ओळी या संग्रहात असून, त्या निश्‍चितच मुलांना झुलवणार्‍या, नाचवणार्‍या आहेत.
 कुठलीही गोष्ट गाण्यातून सांगितली, की ती मुलांना पटकन समजते, हा बालमानसशास्त्राचा सिद्धांत आहे. पवार यांनी या सिद्धांतावरच्या पायावरच आपली सरळमार्गी व रोजच्या व्यवहाराच्या भाषेत बोलणारी कविता फुलविली आहे.
कमळाचे क अक्षर
व्यंजन पहिले
आवडते देवाला
कमळ वाहिले
अशी क ते ज्ञपर्यंत पुढे जाणारी कविता मुलांचे अक्षरज्ञान अधिकच ठळक करते.
पंख असता परि
पायावर चालणारा
श चा शहामृग
पक्षी असे पळणारा
 यातून मुलांना शहामृग पक्षाच्या या वैशिष्ट्याचेही ज्ञान होते. स्वाभाविकच मुलांना परिसराचे, भोवतालचे ज्ञान व्हावे, यादृष्टिने अशा काही ओळी महत्त्वाच्या ठरतात.
ज्ञ चे ज्ञानोबा
आळंदीला आले
ज्ञानेश्‍वरी लिहिली
अन् देवची झाले
 हा काव्यसंग्रहाचा समारोपही तितकाच भावणारा आहे. मुख्य म्हणजे ही कविता मुलांच्या मनातील अनेकविध संकल्पना दृढ करणारी आहे. शिक्षण आनंददायी व्हावे, असे आपण नेहमीच म्हणत असतो. मात्र, प्रत्यक्षात त्यादृष्टिने काही घडताना दिसत नाही. पवार यांनी त्यादृष्टिने अत्यंत स्तुत्य असा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मूळाक्षरांचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने ओळख करून देण्याचा हा प्रयोग निश्‍चितच सर्वांसाठी आनंददायी ठरेल, यात संदेह नाही. किंबहुना, ऋ, लृ यांसारख्या मूळाक्षरांचा कुठे उल्लेख दिसत नाही. ऋषी, ऋतू, ऋजुता, ऋग्वेद, ऋचा यांसारखे कितीतरी शब्द सातत्याने वापरले जातात. त्यामुळे ‘ऋ’चा उल्लेख असायला हवा होता, असे वाटते. ‘लृ’ हा केवळ क्लृप्तीपुरता सीमित राहिला आहे. याशिवाय काही अनुनासिक मूळाक्षरे गायब झाली आहेत. त्यांचा अनुल्लेख औचित्याला धरूनच आहे. याशिवाय काही ओळींमध्ये यमक वा उपमा कृत्रिम वाटतात. हा अपवाद सोडल्यास ही अक्षरगाणी, त्यांना साजेेशी चित्रे, मांडणी सुबक अशीच आहे.
कवी प्रभाकर बळवंत चव्हाण यांच्या ‘सुंबरान’ या काव्यसंग्रहातील कविता या संत तुकाराम आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ‘अभंगगाथे’चा व ‘ग्रामगीते’चा वारसा सांगणार्‍या आहेत. भूपाळी ते प्रार्थना अशी उलगडत जाणारी ही कविता बहुपदरी अन् बहुआयामी आहे. तिच्यात अनेकविध सौंदर्यस्थळे ओतप्रोत भरलेली आहेत. या कवितेतून चव्हाण यांचे सामाजिक भान, प्रबोधनाप्रतीची निष्ठा अन् सर्वधर्मसमभावाचा व्यापक दृष्टिकोन ठसठशीतपणे अधोरेखित होतो.
या कवितेतून कोकणच्या नितांत सुंदर निसर्गाचे अत्यंत रमणीय दर्शन घडते. ‘साद’ ही कविता सृष्टीसौंदर्य व भावभावना याचा उत्कृष्ट आविष्कारच म्हटला पाहिजे.
 
गिरी माथी शोभल्या आम्रतरूच्या ‘ओळी’
 काजूंची मौक्तिके सुवर्णात गुंफलेली
 तरळतात अजुनी आठवणींच्या लाटा
 फणसाच्या कुशीत भरला अमृत साठा
 कोकणातील आंबा, काजू, फणसाची कूस, आठवणींच्या लाटा अशा प्रतिमा मन मोहवून टाकणार्‍या आहेत. याशिवाय श्र्र्ावणातील मखमल, भुईचंपकासह जंगम-संगम झुळझुळ घाट अन् कवीने ओवलेल्या शब्दफुलांच्या माळा त्यांच्या उत्तुंग प्रतिभेचीच साक्ष देतात.
 चव्हाण यांची कविता अंधश्र्र्द्धा, कर्मकांडावर कठोर प्रहार करते. मात्र, ती नास्तिकही नाही. माणूसपण, मानवता हा या कवितेचा मूलस्रोत आहे. जात, धर्म, पंथात ही कविता अडकत नाही. सर्वधर्मांचा, प्रतीकांचा आदर करणारी, समस्त मानव जातीवर इतकेच नव्हे, तर पशुपक्षी, प्राणी, निसर्ग यांच्याशी ऋणानुबंध असलेली ही कविता आहे. चव्हाण यांची ही प्रगल्भ कविता जातीधर्माच्या अस्मिता टोकदार होत जाणार्‍या आजच्या काळात कोणत्याही माणसाला विचारप्रवण करते. त्याच्यातील माणूसपण, आत्मभान जागवते.
धर्म नव्हे जात, शुद्र वा विटाळ ।
प्रेमाचा सुकाळ । धर्म जाणा ॥
धर्म नव्हे स्वार्थ, क्रौर्य रक्तपात ।
कारुण्य सवेत । धर्म जाणा ॥
 चव्हाण यांची कविता धर्माकडे या दृष्टिने पाहते. या कवितेतील विचार हा सर्वव्यापी आहे.
   बलदंड वर्धमान, सत्य, अहिंसा संयम
   प्रज्ञा, शील, करुणेने बुद्ध शांतीचा संगम
   पैगंबरांचा सबक मक्का, मदिना पवित्र
   कोणी अनाथाचे नाथ, त्यांचे वाचावे चरित्र
आणि
 गावी संतांची वचने ज्ञाना, तुकाचा जागर
 सज्जन वा प्रज्ञावंत जनसेवक जे थोर
 मग सवत्या चुलीचा, ‘धर्म सुभा’ का सवता?
 घ्यावा उमजून तरी, ‘खरा धर्म मानवता’
 अशी मानवतेवर विश्‍वास असणारी ही कविता आहे.
 नेत्रदान, पाणी बचत, आरोग्याचा संदेश, राष्ट्रकल्याण, तरुणाईला संदेश अशी या कवितेची अनेक अंगे आहेत. त्यामागे प्रत्येकाचे सामाजिक भान वाढावे, हाच शुद्ध उद्देश आहे.
  म्हणून हे सुंबरान मांडीलं व माय
            जनता जनार्दना ॥
साधू, भोंदू, कर्मकांडे; चमत्कारे केली कोंडी
ढोंगी भोगी बाबा-बापू, तया रोज तूप हुंडी
‘खर्‍या देवा बुडविले’, नादी लागोनी पाखंडी
करणी-धरणीत गाडीला, सोन्या धनगरांचा धोंडी
विज्ञानाचे मारेकरी, क्रूर सैतानांच्या झुंडी
झणी उठा वारकरी, छेडा विवेकाची वीणा ॥
असं म्हणत ही कविता सुंबरान आळवते. चव्हाण यांच्या कवितेवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कवितेचा विलक्षण प्रभाव दिसतो.
ग्रंथ पुस्तके वाचून, जरी केला असे चोथा ।
जीवाभावानं वाचावी, वेचावी ती ग्रामगीता ॥
अन्
तुझ्या-माझ्या अस्तित्वात, सकारात्मक जीवन ।
आनंदाची अनुभूती, आस्तिकत्व चिरंतन ।
तुकोबांच्या अभंगात, दिव्य मायेची पाखर ।
ग्रामगीता तुकडोजींची, मानवतेचे मंदिर ॥
ही कविता या संग्रहाचा कळसाध्यायच मानता येईल.
कवी माधव गिर यांचा ‘नवं तांबडं फुटेल’ हा कवितासंग्रह मराठी कवितेसाठी वेगळे परिमाण ठरू शकेल, असा आहे. मराठी साहित्यात आईवर विपुल लेखन झाले आहे. हे लेखन हळवे, उत्कट व काळजाचा ठाव घेणारे असे आहे. तुलनेत बापावर मोजकेच लेखन झाले आहे. काही अपवाद वगळता हे लेखन रूक्ष, कोरडे या सदरात मोडणारे आहे. गिर यांची कविता या सर्वाला छेद देणारी आहे. या कवितेचे विशेष म्हणजे ती अस्सल मातीशीच नव्हे, तर बापाशी नाळ असलेली आहे. शेतात राबणारा बाप इतक्या उत्कटतेने, तळमळीने गिर यांनी या कवितेतून पुढे आणला आहे, की त्याच्या भेटीने कोणताही माणूस अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाही. त्या अर्थी घरदार, शेतामातीसाठी हाडाची काडं करणार्‍या बापाला गिर यांनी खर्‍या अर्थाने न्याय दिला असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
मानेवर जू ठेऊन
ढेकळा धस्कटातून
चालत राहतोस...
उन्हातान्हात बैलामागून
आपलीच हाडे जाळून घेतोस..
कष्टाचे डोंगर उपसणार्‍या बापाचे हे दुर्लक्षित रूप कवी मोठ्या ताकतीने कवितेतून उभं करतो. ‘बांधावरचा लिंब’ या कवितेतून तर कवीने बांधावरच खितपत पडलेल्या वा उपेक्षित राहिलेल्या बापाला जगासमोर आणले आहे.
बांधावरचा हा लिंब मला
बापासारखा वाटतो
ऊन, वारा, पाऊस झेलून
गायी, गुरं, वासरं अन् वाटसरू
या सर्वांना आसरा देतो
 हा कवितासंग्रहाचा उत्कटबिंदूच मानला पाहिजे. यानंतरही या कवितासंग्रहात ठायी ठायी बाप येतो. गाव, शेत, शेतकरी, त्याचं जगणं, सावकारी पाश अशा अनेक अंगानी कविता फुलत जाते. मात्र, बाप हाच या कवीचा मुख्य गाभा आहे. त्यामुळे बापच सर्वत्र भरून राहतो.
गिर यांच्या कवितेतून मातीवरील श्र्र्द्धा व भक्तीचेही दर्शन घडते.
नाही पंढरीला आलो
तुझ्या दर्शनाला देवा
काळ्या मातीत राबतो
घेई जाणून तू सेवा
 या काव्यओळी तर संत सावता माळी यांच्या कांदा मुळा भाजी। अवघी विठाबाई माझी॥ या अभंगाशी नाते सांगणार्‍या आहेत. गोरगरिबांचा देव असणार्‍या विठ्ठलावर कवीचे अतीव प्रेम आहे. किंबहुना, खरा विठ्ठल कवीला मातीत, शेताशिवारात, पिकापाण्यातच सापडतो.
तुझा राऊळ कळस
दिसे माझ्या शेतातून
तुझी सावळीशी मूर्ती
हाले माझ्या पिकातून
अथवा
काय मागू तुझ्यापाशी
तू रे बडव्यांचा दास
नाही पंढरीला येत
मी हा पूजतो मातीस
 यांसारख्या कवितांतून कवीची मातीवरील श्र्र्द्धाच अधोरेखित होते.
शेतात राबराब राबूनही शेतकर्‍याला त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. या व्यवस्थेत शेतकर्‍याच्या पदरी पिळवणूकच येते. डोळ्यात ऊस जळताना, टाबून टाकली उरात कळ, यातून शेतकर्‍याचं दुःख अत्यंत तीव्रतेनं प्रकट झालं आहे.
पाऊस हा शेतकर्‍यांचा जीव अन् जीवन. शेतकर्‍याच्या जीवनात पावसाला काय स्थान आहे, हे ‘अशी मिरगाची झड’ या कवितेतून सांगण्याचा कवीने प्रयत्न केला आहे.
अशी मिरगाची झड
ओल्या मनी उतरते
अंगणात समृद्धीची
एक लय पसरते
 या ओळी मनात उतरल्याशिवाय राहत नाहीत. ही कविता कुणब्याचं शापित जगणं मांडणारी असली, तरी ती निराश वा हताश नाही. ‘नवं तांबडं फुटेल’, अशी आस बाळगणारी आहे. शेतीतील प्रश्‍न, बळीराजाची फरफट, निसर्गाची अवकृपा, सावकारी पाश यांसोबतच गाव, तेथील भवतालचं दर्शन घडविणारी ही कविता भारतातील रंजल्यागांजल्या शेतकर्‍याचेच प्रतिनिधित्व करणारी आहे. अर्थातच मराठी वा ग्रामीण साहित्याला ही कविता नवा आयाम प्राप्त करून देईल, यात संदेह नाही.
 शांताराम हिवराळे यांचा ‘दाटून येताहे काळोखी काहूर’ हा काव्यसंग्रहदेखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. माणुसपणावर दाटलेल्या अंधाराकडे ही कविता निर्देश करते. स्वस्त झालेले मरण, आत्महत्या, माणुसकीला लागलेलं ग्रहण, चंगळवाद अन् या माध्यमातून काळोखत चाललेल्या वाटा याचं अस्वस्थ चित्रण ही कविता करते.
‘वस्ती’ या कवितेतून
वस्तितल्या दारिद्र्यात
काळोख पाहिला मी
लाचार जिंदगीचा
आकांत पाहिला मी
अशा नेमक्या शब्दांत कवीने आपली व्यथा व्यक्त केली आहे. सभोवतालच्या अनेक घटना वा प्रसंग याचा कवीमनावर परिणाम होत असतो. हिवराळे यांच्या कवितेतही याचे प्रत्यंतर पहायला मिळते. अंधश्र्र्द्धा, भ्रष्टाचार, महागाईच्या नावाने होणारं सामान्यांचं शोषण अत्यंत परिणामकारकपणे ते मांडतात. मुळात ही सर्वसामान्यांचं दुःख, व्यथा मांडणारी कविता आहे. सत्ता, नीतीभ्रष्टता यामुळे अवघा समाज कसा नाडला, चिरडला जातो, हेच हिवराळे यांची कविता सांगते.
दाम, दंड, भेद
ऐशी राजनीती
कशी येईल गा
विकासाला गती
यातून सत्तेचे, राजकारणाचे चित्र कवी मांडतो. बांडगुळासारखा खुशाल जगणारा समाज पाहिला, की तो आणखीनच व्यथित होतो. मात्र, त्याच्या मनातही प्रकाशवाटा आहेत. काळोखाचे काहूर दूर होईल आणि चैतन्याच्या प्रकाशात अवघा आसमंत उजळून जाईल, अशी अपेक्षा हिवराळे यांची कविता बाळगून आहे.
 एकूणच अस्सल मातीतल्या या ‘अक्षर’ कविता आहेत. या कवितांमधून अस्सल जीवनानुभवच व्यक्त झाला आहे. त्यामुळे रसिकांनी या कविता आवर्जून वाचायलाच हव्यात.
- प्रशांत चव्हाण
संपादकीय विभाग प्रमुख,
बेळगाव तरुण भारत, पुणे


No comments:

Post a Comment