Saturday, May 14, 2016

नांदेड : ऐतिहासिक, सांस्कृतिक, वाङमयीन लेखाजोखा


 मासिक 'साहित्य चपराक' पुणे  

नांदेड गोदावरीच्या काठावर वसलेलं इतिहासकालीन नगर. नंदीतट, नंदिग्राम या नावांनी ओळखलं गेलेलं समृद्ध परंपरेचं एक गाव. हिंदू, शीख, मुस्लिम, बौद्ध, जैन या विविध धर्मियांच्या तीर्थक्षेत्रांना आपल्या कुशीत सांभाळणारं पवित्र शहर. इ. स. पूर्व पाचव्या आणि चौथ्या शतकात या भूप्रदेशात नंद राजाचे राज्य होते. पुढील काही काळ हा भाग मौर्य साम्राज्याचा हिस्सा होता. नंतर सातवाहन राजांनी इथली राज्यव्यवस्था पाहिली. राष्ट्रकुट राजांनी नांदेड जवळील कंधारला आपली राजधानी बनवले होते. इसवीसनाच्या दहाव्या शतकात राष्ट्रकुटांनी कंधार येथे बांधलेला जगत्तुंग सागर आणि किल्ला या परिसराच्या समृद्धीची साक्ष देतो. चालुक्यकालीन स्थापत्याचा उत्तम नमुना पहायचा असेल तर देगलूर जवळील होट्टलच्या मंदिर संकुलांचा उल्लेख करावा लागेल. या मंदिरांवरील कोरीव काम आणि मूर्तीकाम हे सौंदर्याचे अजोड लेणे आहे. माहूर येथे असणारे ‘रेणूकादेवीचे मंदिर’ हे नऊशे वर्ष जुने आहे. देवगिरीच्या यादवांनी हे मंदिर उभारले. माहूरची रेणूकादेवी एक संपूर्ण शक्तिपीठ म्हणून ओळखली जाते. माहूरच्या पट्ट्यातच उनकेश्वर येथे गरम पाण्याचे कुंड आहेत. या कुंडातील पाण्याच्या ठायी औषधीय गुणधर्म आहेत असे सांगितले जाते. अगदी सुरुवातीच्या काळातील एक मराठी शिलालेख या कुंडांजवळ आहे. निसर्गाच्या समृद्धीने वेढलेला हा परिसर. हाच अनुभव सहस्रकुंड येथेही येतो. पैनगंगा नदी आपल्या सहस्रधारांनी या ठिकाणी प्रपाताचे रुप धारण करत कोसळत राहते. त्या ठिकाणी हे कुंड तयार झाले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात या धबधब्याचे रुप हे विलक्षण मनोहर आणि स्तिमीत करणारे असते. मराठीतील सुप्रसिद्ध लेखक मारुती चित्तमपल्ली यांनी आपल्या लेखनाने या प्रदेशाला जिवंत केले आहे. जंगल खात्याचे अधिकारी म्हणून मारुती चित्तमपल्ली यांचे या भागात वास्तव्य होते. गोदावरी नदीच्या किनार्‍यावरती ‘शंखतीर्थ’ हे एक महत्त्वाचे स्थान आहे. ‘गोदावरी महात्म्य’ या पोथीमध्ये या स्थानाचा उल्लेख आहे. नांदेड शहरापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावरती असणारे हे ठिकाण गोदावरी नदीचे नाभीस्थान म्हणून ओळखले जाते. माळेगाव हे नांदेड - लातूर राज्य महामार्गावरती वसलेले एक छोटेसे गाव. या गावात खंडोबाचे मंदिर आहे. दक्षिण भारतात प्रसिद्ध अशी खंडोबाची यात्रा या गावात प्रतिवर्षी भरते. उंट, घोडे, खेचर यांची या जत्रेत मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होते. विविध भटक्या जमाती जत्रेच्या निमित्ताने एकत्र येतात. भटक्यांच्या जात पंचायतीचे हे महत्त्वाचे ठाणे आहे. या जातपंचायतींचा अभ्यास करण्यासाठी देशभरातील अभ्यासक जत्रेत येतात. ही जत्रा म्हणजे विविध उद्देशांनी एकत्र आलेल्या लोकांचा जनमेळाच असतो. कंधार येथील ‘सैयद मगदूम दर्गा’ आणि येथे भरणारा उरुस देखील असाच आनंददायी असतो. हा दर्गा सातशे वर्षे जुना आहे. उरुसात कव्वाल्यांचे फड ऐकणे, पाहणे विलोभनीय असते. ‘लीळाचरित्र’ या मराठीतील आद्य गद्यग्रंथात नांदेडचा उल्लेख सापडतो. ‘नंदीतट’ या शब्दाने हा उल्लेख केला गेला आहे. मोगल बादशहा औरंगजेब यांच्या काळात नांदेडला महत्त्वाचे स्थान होते. तेलंगण प्रांताचा कारभार नांदेडमधूनच पाहिला जाई. नंतरच्या काळात मात्र हा परिसर हैदराबादच्या निजामाच्या अधिपत्याखाली गेला. इ.स. 1725 ते इ.स. 1948 या दीर्घ कालखंडात या प्रदेशावरती हैदराबादच्या निजामाने राज्य केले. हैदराबाद संस्थानच्या शेवटच्या काळात नांदेड हे शहर स्वातंत्र्य चळवळीचे एक महत्त्वाचे केंद्र राहिले. या शहराने अनेक लढे दिले, आंदोलने पाहिली आणि स्वतःला वेळोवेळी सिद्ध केले. नांदेड सर्वदूर ओळखले जाते ते शीख धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून. शिखांचे दहावे गुरु ‘श्री गुरु गोविंदसिंगजी महाराज’ यांनी या भूमीत काही काळ वास्तव्य केले. याच भूमीत ‘श्री गुरुग्रंथसाहिबजीं’ची गुरु म्हणून घोषणा करण्यात आली. तख्त सचखंड ‘श्री हुजुर साहिबजी गुरुद्वारा’ येथे माथा टेकवण्यासाठी जगभरातून दररोज हजारो भाविक येत असतात. पंजाबचे महाराजा रणजीतसिंगजी यांनी इ.स. 1835 मध्ये हा गुरुद्वारा निर्माण केला. नगिना घाट, मालटेकडी, मातासाहिबजी, बंदाघाट, शिकारघाट, संगतसाहेबजी, हिराघाट येथील गुरुद्वारे हे इतर पवित्र गुरुद्वारे होत. शीख धर्मियांच्या सण व उत्सवाच्यावेळी शहरामध्ये चैतन्य निर्माण होत असते. सत्याचा प्रदेश आणि पृथ्वीच्या जलप्रलयातही अविचल राहाणारी, न बुडणारी जागा असे सांगणार्‍या धर्मश्रद्धा या भूमीशी जोडलेल्या आहेत. नांदेड शहरातील नंदगिरीचा किल्ला, माहूरचा किल्ला, विष्णुपुरी येथील काळेश्‍वराचे हेमाडपंथी मंदिर, शंकरसागर जलाशय, दाभड येथील बौद्ध विहार, विष्णुकवींचा मठ, गोरठा येथील संत दासगणू महाराजांचा मठ यांनी या परिसरातील जनमानसाला संपन्न असा सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा दिला आहे. हा वारसा पुढे घेऊन जाण्याचे कार्य अनेक मान्यवरांनी केले आहे. पं. अण्णासाहेब गुंजकर यांनी संगीत क्षेत्राला दिलेले योगदान अतुलनीय आहे. पंडित गुंजकरांनी शास्त्रीय संगीतामध्ये इथे एक पिढी घडवली. पंडित नाथराव नेरळकर, पंडित श्याम गुंजकर, पंडित रमेश कानोले, सीताभाभी राममोहन राव, रंगनाथबुआ देगलूरकर, मनोहरराव कांडलीकर या सगळ्याच दिग्गजांनी नंतर स्वरांना साज चढवला. लोकसंगीताच्या संदर्भात नरसिंग कव्वाल यांचे स्थानही अव्वल होते. गझल गायकीमध्ये नरसिंग कव्वाल यांचा हातखंडा होता. निजामाच्या दरबारात त्यांना मानाचे स्थान होते. नांदेडमध्ये वर्षभर संगीत मैफिलींचे आयोजन होत असते. शंकररराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘संगीत शंकर दरबार’ आयोजित केला जातो. या दरबारात देशविदेशातील थोर गायक, वादक, संगीतकार आपली हजेरी लावत असतात. आषाढी महोत्सव हा आ. हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित केला जाणारा कार्यक्रम. भर पावसात रसिक या कार्यक्रमाला हजेरी लावत असतात. दिवाळी पहाट, भीम पहाट, पाडवा पहाट अशा पहाटेच्या संगीत मैफिली गोदावरीच्या प्रसन्न काठावरती आयोजित केल्या जातात. सुनील नेरलकर हेही संगीत महोत्सवाचे नियमित आयोजन करत असतात. व्यावसायिक गायक वादकांची संख्या इथे मोठी आहे. त्यांनी आपापले ऑर्केस्ट्रा तयार केले आहेत. दि. 15 ऑगस्ट, दि. 26 जानेवारी, दि. 17 सप्टेंबर आणि एखाद्या प्रसिद्ध गायकाला आदरांजली वाहण्यासाठी हे ऑर्केस्ट्रा दर्जेदार आणि विनामूल्यही कार्यक्रम साजरे करतात. धनश्री देव, ठावरे, आनंदी विकास, रमाकांत चाटी असे नव्या जुन्या पिढीतील अनेक गायक संगीतकार आज राज्यभर नांदेडचा लौकिक वाढवत आहेत. देवदत्त साने यांचे आटोपशीर निवेदन अशा कार्यक्रमांना असते. रंगरेषांविषयीच्या उत्कट प्रीतीतून त्र्यंबक वसेकर यांनी नांदेडमध्ये ‘अभिनव चित्रकला महाविद्यालया’ची पायाभरणी केली. नंतरच्या काळात सुभाष वसेकर यांनी या महाविद्यालयाचा लौकिक वाढवला. लक्ष्मण कांबळे, त्र्यंबक पांडे, जी. एस. जगनार, नयन बारहाते, कविता जोशी, दामोदर दरक, जिचकार, संतोष घोंगडे, चंद्रकांत पोतदार ही चित्रकार मंडळी नांदेडशी संबंधित आहेत. दरम्यानच्या काळात शहरात अखिल भारतीय पातळीवरील ‘व्यंग्यचित्रकारांचे संमेलन’ही आयोजित करण्यात आले होते. सुजाता जोशी पाटोदेकर या नांदेड शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्या व्यंग्यचित्रकार म्हणूनही परिचित आहेत. बहुतेक इतर मंडळी ही नव्याने विस्तारलेल्या पुस्तक प्रकाशन व्यवहाराला मांडणी आणि मुखपृष्ठ देऊन सहकार्य करत असतात. नाट्यक्षेत्रात नांदेडचे महत्त्वाचे योगदान अगदी सुरुवातीपासूनच राहिले आहे. दोन वेळा ‘अखिल भारतीय नाट्य संमेलना’चे आयोजन या शहराने केले. 1965 साली पहिल्यांदा ‘नाट्य संमेलन’ आयोजित केले गेले. तेव्हापासून नाट्य परिषदेची शाखा शहरात कार्यरत आहे. त्याही अगोदर प्राचार्य सुरेंद्र बारलिंगे यांनी इथे ‘नाट्यमहासंघ’ ही संस्था स्थापन केली होती. अलीकडे प्रा. दत्ता भगत यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. ‘दलित नाट्य संमेलना’चेही या शहरात आयोजन करण्यात आले होते. दलित रंगभूमीला सौष्ठव देण्यात नांदेडचे योगदान राहिले आहे. इतर अनेक संस्था आणि छोटे मोठे ग्रुप नाट्यक्षेत्रात कार्यरत आहेत. काही दशकांपूर्वी ‘कलामंदीर’ हे शहरातील विविध सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र होते. दहा बारा वर्षांपूर्वी ‘कुसुम नाट्यगृह’ आणि महापालिकेचे ‘शंकरराव चव्हाण नाट्यगृह’ नांदेडकरांच्या सेवेत रुजू झाले. या दोन नाट्यगृहांमुळे कार्यक्रमांची रेलचेल शहरात सतत सुरु असते. मध्येमध्ये आयोजित केला जाणारा ‘नांदेड लोकोत्सव’. यशवंत, पीपल्स, सायन्स, प्रतिभा निकेतन या महाविद्यालयांचे नाट्यविभाग, स्वाराती मराठवाडा विद्यापीठाचा नाट्यविभाग यांनी उपक्रमशीलता टिकवून ठेवली आहे. डॉ. स. रा. गाडगीळ, पद्माकर लाठकर, ग. ना. अंबेकर, आनंदी लव्हेकर, कुसुमावती रसाळ, सुरेश पुरी, जीवन पिंपळवाडकर, संजय जोशी, वसंत मैय्या, नाथा चितळे, गोविंद जोशी, दिलीप पाध्ये, लक्ष्मण संगेवार, राधिका वाळवेकर अशा जुन्या नव्यांनी शहरातील नाट्य चळवळ पुढे नेली आहे. साहित्य आणि संशोधनाच्या क्षेत्रातही नांदेडचा पूर्वापार लौकिक आहे. मध्ययुगीन काळात रघुनाथ शेष, विष्णुपंत शेष हे संस्कृत कवी नांदेडमध्ये होऊन गेले. मराठीतील महत्त्वाचे पंडित कवी वामन पंडित हे याच शेष घराण्यातील. त्यांनी ‘यथार्थदीपिका’ लिहून आपले नाव मराठी शारदेच्या दरबारात कोरुन ठेवले आहे. इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात तात्यासाहेब कानोले यांचे नाव आदराने घेतले जाते. पुरातत्त्व शास्त्रांच्या संदर्भात डॉ. गो. ब. देगलूरकरांची ख्याती देश विदेशात पोहचलेली आहे. हैदराबाद संस्थानचा मौखिक इतिहास डॉ. प्रभाकर देव यांनी महत्प्रयासाने साकारला आहे. संस्कृत वेदांचे अभ्यासक, संशोधक म्हणून महामहोपाध्याय यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे यांचे नाव देशभर माहिती आहे. अलीकडे खगोलाच्या संशोधनात श्रीनिवास औंधकर यांचे नाव पुढे येत आहे. एल. के. कुलकर्णी यांनी आपल्या अथक अभ्यासातून ‘भूगोलकोश’ तयार केला आहे. गंगा नदीचे त्यांनी केलेले संशोधन ग्रंथरुपाने प्रकाशित झाले आहे. प्रा. शेषराव मोरे यांना सावरकरवादी म्हणून ओळखले जाते. आपल्या विशिष्ट वैचारिक बैठकीतून त्यांनी विपुल वैचारिक ग्रंथांची निर्मिती केली. अलीकडेच अंदमान येथे झालेल्या ‘विश्व मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्षपदही त्यांनी भुषविले आहे. हिंदू- मुस्लिम प्रश्न, भारताची फाळणी, काश्मिर प्रश्न यासंदर्भाने सावरकरवादी दृष्टिकोनातून मोरे यांनी मांडणी केली आहे. विजय पाडळकर यांनी जागतिक चित्रपटांचा अभ्यास आणि त्यावर संशोधन केले आहे. शहरामध्ये चित्रपट अभ्यासकांची मॅजिक लॅन्टर्न सोसायटी पाडळकरांनी सुरु केली होती. जुन्या गाण्यांचा अभ्यास असणारी काही मंडळी विशिष्ट दिवशी एकत्र येऊन आपल्या अनुभवाची देवाणघेवाण करतात. मधुकर धर्मापुरीकर हे व्यंग्यचित्रांचे एक महत्त्वाचे अभ्यासक आहेत. त्यांच्या संग्रही हजारो व्यंग्यचित्रे आहेत. व्यंग्यचित्रांच्या संदर्भाने त्यांचे संशोधनही प्रसिद्ध होत असते. नरहर कुरुंदकर हे केवळ नांदेडचेच नव्हे तर मराठी माणसांसाठीही आदरणीय नाव आहे. समीक्षक, विचारवंत म्हणून त्यांची सर्वदूर ओळख आहे. कुरुंदकर हे शहरातील पीपल्स कॉलेजमध्ये प्राचार्य होते. त्यांनी अनेकांना लिहीते केले. प्रोत्साहन दिले. 1980 च्या मागेपुढे त्यांच्या प्रस्तावना वा पाठराखणीशिवाय मराठवाड्यातील लेखकांची पुस्तकेच प्रकाशित होत नसत. दे. ल. महाजन, वा. रा. कांत, हरिहरराव सोनुले, पार्थिव, यादवसूत, राजा मुकुंद, भुजंग मेश्राम या नांदेडच्या कविंनी मराठी कविता समृद्ध केली आहे. अलोन यांची कविता अतिशय निराळी होती. तथापि एकही संग्रह प्रकाशित नसल्यामुळे चांगला कवी विस्मरणात गेला आहे. फ. मुं शिंदे यांचे आणि नांदेडचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या शहरातील यशवंत महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. आजही त्यांचा एक पाय नांदेडमध्ये असतो. लक्ष्मीकांत तांबोळी, श्रीकांत देशमुख, केशव देशमुख, मनोज बोरगावकर, शिवाजी आंबुलगेकर, पी. विठ्ठल, व्यंकटेश चौधरी, वृषाली किन्हाळकर, सुचिता खल्लाळ, योगिनी सातारकर, रविचंद्र हडसनकर, देविदास फुलारी, बापू दासरी, प्रफुल्ल कुलकर्णी, राजेंद्र गोणारकर, विनायक येवले, विनायक पवार, भगवंत क्षीरसागर, ज्योती कदम, संध्या रंगारी, आदिनाथ इंगोले, महेश मोरे, जगदीश कदम, निर्मलकुमार सूर्यवंशी, ललिता शिंदे हे सगळे कवी नांदेडशी संबंधित आहेत. विनायक येवले या तरुण कवीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ‘ठसे बदललेल्या मुक्कामावरुन’ हा विनायकचा संग्रह मागील दोन वर्षांपासून चर्चेत आहे. ग्रामीण कवितेच्या नव्या टप्यावरची कविता या कवीकडे आहे. श्रीकांत देशमुख यांनी सतत स्वतःचा आवाज जपला आहे. मराठी कवितेत स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केलेला हा प्रतिभावंत कवी आहे. कथा आणि कादंबरीच्या क्षेत्रात सुधाकरराव डोईफोडे, तु. शं. कुलकर्णी, बाबू बिरादार, प्रकाश मेदककर, मधुकर धर्मापुरीकर, रावजी राठोड, मथू सावंत, नागनाथ पाटील, भगवान अंजनीकर, जगदीश कदम, दत्ता डांगे, प्र. श्री. जाधव, अनंत राऊत, करुणा जमदाडे, शंकर विभूते ही नावे महत्त्वाची आहेत. शैलजा वाडीकर यांची अलीकडेच ‘मराठा मुलगी’ आणि ‘एकटी असण्याची गोष्ट’ ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आत्मचरित्रात्मक कादंबरीचा बाज असणारी ही दोन्ही पुस्तके वाङमयीन आणि समाजशास्त्रीय दृष्टीने महत्त्वाची आहेत. वाडिकर यांच्याकडून आगामी काळात मोठ्या शक्यता आहेत. शची शैलजा ही युवा लेखिकाही आपले स्वतंत्र स्थान मागेपुढे नक्की तयार करील असा विश्वास तिच्या लेखनाने दिला आहे. ‘आनंदी’ हा तिचा कथासंग्रह ती सातवीत शिकत असताना प्रकाशित झाला होता. ‘एका तळ्यात होती’ ही तिची कादंबरी येऊ घातली आहे. डॉ. जे. जी. वाडेकर यांचे ‘सर्जननामा’ हे आत्मचरित्र विशेष महत्त्वाचे आहे. मराठवाड्याच्या वैद्यकीय सेवेचा इतिहास आणि डॉक्टर्सची संघर्षगाथा हे आत्मचरित्र वाचकांपुढे ठेवते. तेजस्विनी वाडेकर, अनुराधा शेवाळे, सुजाता जोशी, वृषाली किन्हाळकर, अच्चुत बन, मापारी, व्यंकटेश काब्दे, हंसराज वैद्य, करुणा जमदाडे ही नांदेड शहरातील वैद्यक क्षेत्रात कार्यरत असणारी नामांकित मंडळी. यांनी कविता, अनुभवकथन, आत्मचरित्र, प्रवासवर्णने लिहून महत्त्वाची भर घातली आहे. कविता महाजन हेही नांदेडशी संबंधित नाव आहे. मराठी साहित्यातील महत्त्वाची कवयित्री, कादंबरीकार, संपादक, अनुवादक अशी त्यांची ओळख आहे. ‘साहित्य अकादमी’च्या अनुवाद पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. साहित्य अकादमीचा भाषा सन्मान आणि बालसाहित्य पुरस्कारही या लेखिकेला मागेपुढे नक्की मिळेल एवढी प्रचंड ताकत कविता महाजन यांच्याकडे आहे. श्रीकांत देशमुख, विनायक येवले, मधुकर धर्मापुरीकर, विजय पाडळकर ही साहित्य अकादमी पुरस्काराच्या योग्यतेची नावे आहेत. हे सगळेच लिहिते लेखक आहेत. त्यामुळे या पुरस्कारावरती ते आपली मोहोर नक्की उमटवतील. स्वाती काटे यांनी मुलांसाठी केलेले संपादन महत्त्वाचे आहे. ‘सृजनपंख’ या संपादनातून त्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या कवितांना आणि चित्रांना व्यासपीठ मिळवून दिले. माझ्यासोबत त्यांनी ‘शाळेतील कविता’ हे संपादनही तयार केले आहे. पाठ्यपुस्तकात असणार्‍या कवितांची शालेय विद्यार्थ्यांनी केलेली 26 बोलींमधील साडेतीनशे भाषांतरे ‘शाळेतील कविता’ मध्ये आहेत. मुलांच्या प्रतिभेला वाव मिळावा यासाठी दत्ता डांगे, व्यंकटेश चौधरी, शिवाजी आंबुलगेकर ही मंडळी सतत उपक्रमांचे आयोजन करत असतात. मुलांसाठी लिहिणारे दासू वैद्य हेही नांदेडचेच. एल. एस. देशपांडे यांनी साहित्य अकादमीसाठी नरहर कुरुंदकर यांचे चरित्र लिहिले आहे. त्यांचा कवितासंग्रहही येऊ घातला आहे. तरी त्यांची ओळख आहे ती अनुवादक म्हणून. मराठीतून इंग्रजीमध्ये त्यांनी अनेक लेखकांचे अनुवाद केले आहेत. भाषांतर मीमांसेच्या संदर्भातील त्यांचे काम दिशादर्शक स्वरुपाचे आहे. विजय पाडळकर, धर्मापुरीकर, राजेंद्र गोणारकर, दिलीप चव्हाण, शिवाजी आंबुलगेकर, भगवंत क्षीरसागर, शारदा तुंगार ही भाषांतराच्या क्षेत्रात कार्यरत असणारी काही नावे. जागतिक दर्जाच्या अनेक उत्तमोत्तम साहित्यकृतींचे अनुवाद त्यांनी केले आहेत. कोणत्याही ठिकाणी असते तशी सुमारांची प्रचंड मोठी संख्या याही गावात आहेच. आजूबाजूला हे लोक सतत मिरवत असतात. अर्थात त्यांची धाव कुंपणापर्यंतच असते, हेही खरे. पुस्तक प्रकाशित करण्याएवढी सुबत्ता आल्यामुळे पैशाची थैली घेऊन प्रकाशकाकडे जाणारे कवी, कवीला शक्य तेवढे जास्तीत जास्त लुबाडणारे प्रकाशक, स्थानिक वर्तमानपत्रातून पुस्तकांची ओळख लिहिणारे ‘थोर’ समीक्षक आणि ‘माझा पुरस्कार तुला देतो, तुझ्या गावातील पुरस्कार मला दे’ असे साटेलोटे करणारे ‘सुप्रसिद्ध’ लेखक यांचा सुकाळ याही शहरात आहे. प्रकाशन सोहळ्यात तास तास चालणारे कवी-लेखकांचे सत्कार आणि आहेर वैताग आणतात. एपीआयमुळे लिहिते झालेले महाविद्यालयीन प्राध्यापक आणि त्यांच्याकडून हजार पाचशे घेऊन निबंध छापणारी ‘संशोधन’ नियतकालिके यांनी चांगल्या चांगल्यांची माती केली आहे. कवी इतके स्वस्त झाले आहेत की फक्त आवाज दिला की धावत येतात आणि कविता वाचायला लागतात. टिंगल करण्यासारखे वातावरण भरपूर आहे. मात्र यांच्याकडे लक्ष देण्याचे कारण नाही. काळ आपल्या हातांनी फोलपटांना दूर सारणार आहे. ज्यांनी खरोखर योगदान दिले ते उद्याही टिकून राहणार आहेत. 
- डॉ. पृथ्वीराज तौर, नांदेड
संपर्क 75884 12153

(लेखक नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मराठीचे अध्यापन करतात.) 
 मासिक 'साहित्य चपराक' पुणे 

No comments:

Post a Comment