Monday, January 2, 2017

ट्रॉय शहराचे शास्त्रीय पद्धतीने उत्खनन करणारा आद्य पुरातत्त्वज्ञ हेन्री श्‍लीमन

रमणीय पुरातत्त्व

नव्या वर्षातील नवे सदर

साप्ताहिक ‘चपराक’च्या वाचकांना खास भेट

 

आर्किऑलॉजी’ अर्थात पुरातत्त्व म्हणजे प्राचीन काळाचा शास्त्रशुद्ध अभ्यास. पृथ्वीवरील माणूस सुमारे दहा लाख वर्षांपासून अस्तित्वात आहे. त्यापूर्वीचा काळसुद्धा या अभ्यासात येतो. एकपेशीय जीवापासून डायनोसॉरपर्यंत प्राणी यात अंतर्भूत आहेत. मानवी प्रगती कसकशी होत गेली, हे शोधून काढणे मोठ्या जिकिरीचे आणि कष्टाचे काम आहे. पुरातत्त्वामध्ये भौतिक विकास प्रामुख्याने पाहिला जातो. सन 1931 मध्ये मोहेंजोदडो आणि हराप्पा या शहरांचा शोध लागला आणि प्रगत अशी सिंधु संस्कृती उजेडात आली. भारताला प्राचीन इतिहास नाही, या पाश्‍चात्यांच्या कल्पनेला त्यामुळे मोठा धक्का बसला.
एकोणिसाव्या शतकात हेन्री श्‍लीमन (सन 1822 ते 1890) या जर्मन संशोधकाने पौराणिक ग्रीसच्या ट्रॉय शहराचे उत्खनन केले. पुरातत्त्वाच्या इतिहासातील हे पहिले शास्त्रशुद्ध उत्खनन. तोपर्यंत, मौल्यवान वस्तूंच्या शोधासाठी प्राचीन वास्तूंचा विध्वंस करणे, यालाच उत्खनन म्हणत असत. हेन्री श्‍लीमनचे चरित्र मोठे अद्भुत व रोमांचकारी आहे. सोन्याच्या हव्यासापोटी त्याने आयुष्यभर जी धडपड केली, ती ‘न भूतो न भविष्यति’ अशी आहे.
प्रसिद्ध लेखक/अनुवादक रवींद्र गुर्जर यांनी ‘पुरातत्त्व’ या विषयात उच्च शिक्षण घेतलेले आहे. प्रत्यक्ष कामही केले आहे. त्यांच्या सिद्धहस्त लेखणीमधून हेन्री श्‍लीमनचे चरित्र दोन भागांत आपल्यापुढे येणार आहे. ‘रमणीय पुरातत्त्व’ या शीर्षकाखाली या निमित्ताने साप्ताहिक ‘चपराक’मध्ये एक नवे सदर सुरू होत आहे. ‘पुरातत्त्वा’मधील चित्रविचित्र, रमणीय गोष्टी वाचकांच्या भेटीला यामधून येत राहतील.

(पूर्वार्ध)

सन 1983. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने ‘इंडॉलॉजी’ म्हणजे ‘भारतीय विद्या’ या विषयावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला होता. फक्त रविवारी सकाळी तीन तास वर्ग असायचे. डॉ. म. के. ढवळीकर, डॉ. शां. भा. देव, डॉ. म. श्री. माटे आणि डॉ. शोभना गोखले हे नामांकित प्राध्यापक शिकवायला यायचे. मी त्यात प्रवेश घेतला. डॉक्टर, आर्किटेक्ट, प्रसिद्ध व्यावसायिक, कुरियर म्हणून काम करणारे आणि काही तरूण असे विद्यार्थी तिथे होते. रविवार हा सुटीचा दिवस असूनही कुणीही तासांना दांडी मारत नसत. विषयच तसे ज्ञानात भर टाकणारे आणि मनोरंजक होते. या अभ्यासक्रमामधून पुढे अनेक पुरातत्त्वज्ञ आणि प्राचीन भारतीय इतिहासाचे अभ्यासक निर्माण झाले.
उत्खनन हा विषय शिकत असताना, हेन्री श्‍लीमन या जर्मन संशोधकाचे नाव समोर आले. त्याचे चरित्र मोठे विलक्षण आहे. होमर या महाकवीच्या ‘ओडिसी’ आणि ‘इलियड’ या ग्रीक महाकाव्यांचा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर हेन्रीला असा विश्‍वास वाटू लागला की त्यात असलेल्या व्यक्तिरेखा आणि ट्रॉयसारखी शहरे खरी असली पाहिजेत. आपले ‘रामायण’ व ‘महाभारत’ आठवा. रामायणाचा काळ तर फार जुना; पण महाभारत हे त्यामानाने अलीकडचे, म्हणजे पाच हजार वर्षांपूर्वी घडलेले. ही दोन्ही महाकाव्ये म्हणजे काल्पनिक रचना असाव्यात, अशी समजूत दृढ झालेली होती; परंतु महाभारतामधील गावांच्या उल्लेखांप्रमाणे उत्खनन केल्यानंतर, ती प्राचीन ठिकाणे उजेडात आली. घरे, भांडीकुंडी, अवजारे, धान्य आणि प्राण्यांचे अवशेष ‘उघड’ झाले. महाभारताचा नेमका काळ कोणता, हा अद्यापही अनुत्तरित प्रश्‍न आहे; पण ते होऊन गेले याबद्दल आता शंका राहिलेली नाही.
तर हेन्री श्‍लीमन या आपल्या मूळ विषयाकडे वळू! त्याचे जीवन खरोखर सुरस आणि अद्भुत आहे. बालपण अत्यंत गरीबीत गेले. वडील धर्मोपदेशक. पोटासाठी मिळेल ते काम करून त्याने प्रचंड हालअपेष्टा सहन केल्या. त्याला एका कानाने कमी ऐकू येत असे. या सर्व प्रतिकूल परिस्थितीतही त्याची तीव्र ज्ञानलालसा आणि स्मरणशक्ती अलौकिक होती. उदा. ‘ओडिसी’ व ‘इलियड’ ही महाकाव्ये त्याने मुखोद्गत केली. तो प्राचीन समृद्ध ग्रीसच्या वातावरणाशी एकरूप झाला. त्या काळात मनाने वावरू लागला. तीच गोष्ट भाषा-शिक्षणाची. सहा महिन्यात एक, या प्रमाणे 15-16 भाषा त्याने तरूण वयातच आत्मसात केल्या. पौराणिक ‘ट्रॉय’ शहराचा शोध आपण लावलाच पाहिजे, असा त्याने ध्यास घेतला. ‘चांदोबा’ मासिकात ‘लाकडी  घोडा’ ही क्रमशः येणारी कथा किंवा ‘हेलन ऑफ ट्रॉय’ हा सुंदर चित्रपट ज्यांनी पाहिला असेल ते खरोखर भाग्यवान!
हेन्रीचे चरित्र संक्षेपाने बघणे मोठे उद्बोधक ठरेल. पोलंडच्या सरहद्दीजवळ एका लहानशा इटालियन खेड्यात 6 जानेवारी 1822 रोजी त्याचा जन्म झाला. त्याला चार बहिणी व दोन भाऊ होते. वडिलांनी आपल्या मुलांना प्राथमिक शिक्षण घरातच दिले. हेन्री पूर्वजांच्या शौर्यकथा, गूढ, रहस्यमय भुतांच्या गोष्टी ऐकताना रंगून जाई. जमिनीखालची भुयारे आणि गुप्त खजिना हे त्याच्या खास आवडीचे विषय. ट्रोजन युद्धाच्या कथा ऐकताना त्याच्या अंगावर काटा उभा  राही, अंगात वीरश्रीचा संचार होई.
तो सात वर्षांचा असताना ‘जगाचा चित्रमय इतिहास’ हे पुस्तक त्याला भेट मिळाले. अग्नीच्या वणव्यात पेटलेल्या ट्रॉय शहराचे चित्र त्यात होते. तिथे घडलेल्या युद्धाचे जिवंत देखावे त्याच्या नजरेसमोर प्रत्यक्ष दिसू लागले. त्याने मनाशी निर्णय घेतला की, ते ट्रॉय शहर आपण शोधून काढायचेच! पुढे त्याच्या आठवणीत असा एकही दिवस गेला नाही, जेव्हा त्या ध्यासाचा त्याला विसर पडला होता.
आईच्या मृत्यूनंतर त्याला लहानपणीच काकाच्या गावी पाठवण्यात आले. तिथल्या शाळेत तो चांगलाच रमला. थोड्याच अवधीत त्याने लॅटिन भाषेवर प्रभुत्व मिळवले. त्याच्या शाळेत होमरचा अर्धपुतळा होता. 1832 च्या नाताळात (दहाव्या वर्षी) त्याने ‘भेट’ म्हणून वडिलांना ट्रोजन युद्धावर एक लांबलचक निबंध लिहून पाठवला. त्यात युद्धातील महत्त्वाच्या घटना आणि वीरपुरुषांचे पराक्रम यांचे वर्णन होते. अन्य मुलांपेक्षा तो बुद्धिमत्तेत वरचढ होता, याचे ते निदर्शक होते. पुढे फी भरणे अशक्य झाल्यामुळे चांगली शाळा सोडून त्याला सामान्य शाळेत जावे लागले. काकाचीही मदत मिळेना. मग शाळेला रामराम ठोकून शेजारच्या गावी एका वाण्याच्या दुकानात त्याने काम पत्करले. दोन घास अन्न आणि अंग टाकण्याएवढी जागा मिळणे, हे त्याच्या दृष्टीने अत्यावश्यक ठरले. मीठ-मिरचीपासून दारूपर्यंतचा माल गिर्‍हाईकांना तत्परतेनं पुरवण्याच्या कामावर तो रूजू झाला.
पगार अगदीच तुटपुंजा होता. मालकाचा त्याला खूप राग येई. पहाटे पाचला उठून पडेल ती कामे त्याला करायला लागायची. दिवसभर तो इतका थकायचा की, काही अभ्यास करायला त्राणच उरत नसे. पुढची पाच वर्षे तशीच गेली. त्याची श्रीमंत आणि संशोधक होण्याची स्वप्ने मात्र जिवंत राहिली. अचानक एक अपघात झाला आणि त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली. एक जड लाकडी पिंप उचलताना त्याच्या छातीमधून तोंडात रक्त आले. तो अत्यंत अशक्त झाला होता. त्यामुळे नोकरी सोडणे अपरिहार्य ठरले. हॅम्बुर्ग या किनार्‍याजवळच्या गावी जावे असे त्याने ठरवले. अमेरिकेला जाण्याची इच्छा मनात घर करून होती. जवळ फक्त सात पौंड एवढीच शिल्लक होती. त्यातूनही त्याने हिशेब लिहिण्याचे शिक्षण अल्पावधीत घेतले. अंगावरच्या कपड्यानिशी तो ‘नशीब’ कमवायला बाहेर पडला.
नव्या शहराने त्याला आकर्षित केले. ‘हॅम्बुर्गनं मला सप्तस्वर्गात नेऊन सोडलं आणि माझी स्वप्नांची दुनिया खुली झाली,’ असे त्याने आपल्या बहिणीला पत्र लिहिले. पण त्या अशक्त आणि अल्प अनुभव असलेल्या मुलाला कोण काम देणार? एक-दोन किरकोळ कामे करून त्याने त्या शहराचा निरोप घेतला.
योगायोगाने त्याच्या आईला ओळखणार्‍या एका जहाज व्यापारातील दलालाने त्याला नवी ‘दिशा’ दाखवली. दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाकडे जाणार्‍या एका जहाजावरून नेण्यासाठी त्याला शिफारस-पत्र दिले. मनाने तो केव्हाच तिकडे पोहोचला होता. जुन्या बाजारातून थोडे कपडे आणि चादर विकत घेऊन तो जहाजावर दाखल झाला. 18 नोव्हेंबर 1841 रोजी जहाज निघाले. या प्रवासाची सवय नव्हती. हेन्रीला जहाज लागले. चार-पाच दिवस आजारपणातच गेले. पुढे ‘नॉर्थ सी’मध्ये चक्री वादळाचा तडाखा सुरू झाला. त्यातही तो स्पॅनिश शिकण्याची धडपड करत होता.
त्यातून हिमवर्षाव सुरू झाला. लाटा आकाशाला भिडू लागल्या. डोक्यावर समुद्रपक्ष्यांच्या घिरट्या-एक अशुभ लक्षण! थंडीचा कडाका वाढला. अखेर मध्यरात्री, एका जबरदस्त लाटेबरोबर जहाज कलंडले आणि बुडायला लागले. झोपेतून जागा झालेला हेन्री डेकवर आला. त्याचे सर्व सामान पाण्याने गिळंकृत केले होते. कॅप्टनने काही होड्या बाहेर सोडल्या. त्यांचाही टिकाव लागेना. जहाजाने जलसमाधी घेतलीच. हेन्री त्याच्याबरोबर खाली गेला पण लगेच पृष्ठभागावर आला. जवळच एक लाकडी पिंप तरंगत होते. जिवाच्या आकांताने त्याने ते घट्ट धरून ठेवले. काही वेळानंतर त्याच्या एका सोबत्याने त्याला पाण्याबाहेर ओढले. बचावलेल्या एका होडीत चौदा जणांसह तो काकडत, अंग चोरून बसला. दिशाहीन भरकटत ती होडी डच किनार्‍याजवळील ‘टेक्सेल’ बेटावर पोहोचली.
एका शेतकर्‍याने त्या सर्वांना आपल्या घरी तीन दिवस आसरा दिला. हेन्रीला दोन विजारी, गरम चादर आणि लाकडी बूट मिळाले. विशेष गोष्ट म्हणजे त्याच्या सामानाची पेटी किनार्‍यावर वाळूत येऊन पोचली होती. मुख्य म्हणजे त्याला मिळालेले शिफारसपत्र त्यात सुरक्षित राहिलेले होते. त्याने फेरी बोटीतून हॉलंडला जायचे ठरवले. ऍमस्टरडॅमला काही कटू अनुभव घेतल्यानंतर एका कंपनीत त्याला नोकरी मिळाली. बँकेच्या हुंड्यांवर शिक्के मारून त्याचे रोख पैसे घेऊन येणे, हे त्याच्या कामाचे स्वरूप होते. त्याचे दारिद्य्र संपले आणि उज्ज्वल भवितव्याची वाटचाल सुरू झाली. त्यासाठी खूप धडपड मात्र करावी लागली.
कमीतकमी खर्चात राहणे, करमणुकीवर एक पै सुद्धा न उधळणे आणि स्त्रियांच्या भानगडीत न पडणे या गोष्टी त्यानं कटाक्षानं पाळल्या. स्मरणशक्ती वाढवणे आणि अनेक भाषांचा अभ्यास, हा त्याचा ध्यास होता. परिणामी त्याचा स्वभाव कडवट बनला. ताठ वागणूक, निष्ठुरपणा, भावनाशून्यता पण स्पष्टोक्ती हा त्याचा स्थायीभाव झाला. त्यातूनही त्याला ट्रॉय शहराचा विसर पडला नव्हता. एक क्षणही तो वाया घालवत नसे. सात भाषांचे ज्ञान, हिशेब लिहिण्यावर प्रभुत्व आणि दोन वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव यांच्या जोरावर त्याला एका नव्या कंपनीत ‘हिशेबनीस’ म्हणून 150 डॉलर्स पगाराची नोकरी मिळाली. पगार वेगाने वाढतच गेला. स्वतःच्या कर्तबगारीवर तो कंपनीचा मुख्य प्रतिनिधी बनला. इंग्रजी आणि रशियन तो लवकरच शिकला. नजीकच्या काळातच त्याला रशियाला जाऊन नीळ व्यापारात प्रचंड कमाईची संधी प्राप्त होणार होती. डिसेंबर 1845 मध्ये त्याला वरिष्ठांकडून अशी विचारणा झाली की, ‘‘सेंट पीटर्सबर्गमधील व्यवसाय सांभाळणार का?’’ त्याच्यासारखा बहुमोल माणूस कंपनीला गमवायचा नव्हता. म्हणूनच रशियाच्या राजधानीत महत्त्वाच्या पदावर पाठवायला वरिष्ठ तयार झाले. अन्य पाच शहरांचा व्यवसायही त्याच्या कार्यकक्षेत येणार होता. हेन्रीने त्वरित स्वीकृती दिली. यापुढे सार्‍या जगात त्याची भ्रमंती होणार होती.
अशा रीतीनं अवघ्या पंचविसाव्या वर्षी हेन्री जगातल्या एका मोठ्या कंपनीचा मुख्य प्रतिनिधी म्हणून बाहेर पडला. 1 फेब्रुवारी 1846 रोजी मोठा जिकिरीचा प्रवास करून तो सेंट पीटर्सबर्गमध्ये दाखल झाला.
त्याच्या जीवनात अनेक सुखद स्थित्यंतरे घडणार होती. सोन्याच्या राशी त्याची वाट पाहत होत्या.
(उत्तरार्ध साप्ताहिक 'चपराक'च्या पुढील अंकात)

- रवींद्र गुर्जर, पुणे 
९८२३३२३३७०

No comments:

Post a Comment