Thursday, July 2, 2015

‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ या पुस्तकाची परखड चिकित्सा करणारे पुस्तक

- कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट
लेखक : भाऊ तोरसेकर
प्रकाशक : ‘चपराक प्रकाशन’पुणे (7057292092)
सांस्कृतिक समृद्धीसाठी कार्यरत असलेल्या आणि मराठी मासिकाच्या परंपरेत मोठे योगदान देणार्‍या ‘अंतर्नाद’ मासिकाच्या जुलै 2015 च्या अंकात ‘चपराक’ने प्रकाशित केलेल्या ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ या पुस्तकाचे परीक्षण आले आहे. संपादक भानू काळे आणि हे परीक्षण लिहिणारे महाराष्ट्रातील विख्यात वक्ते आणि लेखक, सन्मित्र प्रा. मिलिंद जोशी यांचे आभार. 

 1995 साली महाराष्ट्रात सत्तांतर घडले त्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत साडेचार दशकांची कॉंग्रेसची सत्ता संपुष्टात आली. युतीचे राज्य आले. ‘ग्रंथाली’तर्फे ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सुहास पळशीकर आणि राजेंद्र व्होरा या दोन प्राध्यापकांनी हे पुस्तक लिहिले. ‘ग्रंथाली’च्या वतीने या पुस्तकाची ‘समकालीन राजकारणावरील अभ्यासपूर्ण व खळबळजनक ग्रंथ. तो वाचायला रोचक आहे आणि संग्रहालाही उपयुक्त आहे’ अशी जाहिरातही करण्यात आली. प्रत्यक्षात या पुस्तकात अनेक चुकीचे संदर्भ आहेत हे जाणवल्यानंतर पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी लेखकद्वयींशी आणि प्रकाशकांशी पत्रव्यवहारही केला. त्यावर प्रकाशकांनी ‘आपण लेखकांना लिहिलेल्या पत्राची प्रत वाचून थक्क झालो. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधून पुढे काय करायचे ते ठरवतो आणि कळवतो’ असे पत्राद्वारे सांगितले. तर लेखकांनी ‘तुमची आणि आमची यापूर्वीच ओळख झाली असती तर किती बरे झाले असते! हे पुस्तक आम्ही तुम्हाला प्रकाशन होण्यापूर्वीच दाखविले असते परंतु ते होणे नव्हते. असो. तुम्ही सहा पाने भरून तुम्हाला खटकणार्‍या आणि न पटणार्‍या मुद्यांची जंत्री दिली आहे. ती पडताळून पाहणे, त्याबाबत आमचे काय म्हणणे आहे हे ठरविणे यासाठी काही दिवस लागतील. तुमच्या पत्राची गंभीरपूर्वक दखल घेत आहोत,‘ अशा आशयाचे पत्र पाठवले.
या पुस्तकाची कौतुकाची परीक्षणे सर्वत्र छापून आली. ‘पुढच्या आवृत्तीत चुकांची दुरूस्ती करण्यात येईल’ असेही लेखक आणि प्रकाशकांच्या वतीने सांगण्यात आले. मे 1997च्या सुमारास ‘महाराष्टचतील सत्तांतर’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती बाजारात आली. भाऊ तोरसेकरांनी ती पाहिली. त्यात चुकांची पुनरावृत्ती होती. या पुस्तकामुळे वाचकांची दिशाभूल आणि बुद्धिभेद झाला असे मानणार्‍या भाऊ तोरसेकरांनी ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ या पुस्तकात मुद्देसूद, पुराव्यासह या पुस्तकाची परखड चिकित्सा केली आहे.
मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात सडेतोड आणि परखड राजकीय  विश्‍लेषक म्हणून स्वतंत्र ओळख असलेले भाऊ तोरसेकर गेली शेहेचाळीस वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. आचार्य अत्रेंच्या ‘मराठा’तून त्यांनी पत्रकारितेची सुरूवात केली. अनेक दैनिकांत आणि साप्ताहिकांत त्यांनी उपसंपादक आणि स्तंभलेखक म्हणून लेखन केले. श्री, ब्लिट्झ, चित्रलेखा, विवेक, भूपूत्र या साप्ताहिकांत तसेच दै. सकाळ, नवशक्ती, आपला वार्ताहर अशा दैनिकांत त्यांनी पत्रकारिता केली. जनशक्ती, नवनगर या दैनिकांचे आरंभीचे संपादक असलेल्या तोरसेकरांचे आजवर दहा हजारांपेक्षा जास्त सामाजिक, राजकीय लेख प्रसिद्ध झाले आहेत. ‘कोरी पाटी’, ‘ऊठ वेड्या, तोड बेड्या’, ‘मोदीच का?‘ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांचे ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट‘ हे पुस्तक म्हणजे मतभेदाचे रूपांतर मनभेदात न होऊ देता प्रतिवाद कसा करावा  याचे उत्तम उदाहरण आहे.
महाराष्ट्राच्या सत्तांतराच्या प्रक्रियेत अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार्‍या आणि राजकारणाला कलाटणी देणार्‍या अनेक घटना आहेत. त्याची माहिती अथवा संदर्भ ‘महाराष्ट्रातील सत्तांतर‘ या पुस्तकात नाही. उदाहरणार्थ, शालिनीताई पाटील यांची मराठा मुख्यमंत्री हवा म्हणून झालेली नाईकविरोधी मोहिम (1973), बाळासाहेब देसाईंचा मंत्रीमंडळातून राजीनामा. पी. के. सावंत, राजारामबापू पाटलांना अर्धचंद्र, तुळशीदास जाधव, आनंदराव चव्हाण यांची यशवंतराव विरोधी खुली मोहिम (70-74), शंकराव चव्हाणांच्या मंत्रीमंडळातून वसंतदादांना अर्धचंद्र, 1960पासून यशवंतरावांनी विरोधी नेत्यांना कॉंग्रेसमध्ये आणण्याचा लावलेला सपाटा, लाटेच्या राजकारणाने मोडून पडलेली कॉंग्रेस संघटना आणि त्यांनी टाळलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका, मुंबईतील ऐतिहासिक गिरणीसंप आणि त्यानंतर शिवसेनेला मिळालेली पालिकेतील सत्ता, औरंगाबाद महापालिकेत सेनेचा दणदणीत विजय, 1991 साली पवारविरोधात चार मंत्र्यांनी पुकारलेले बंड, शहाबानू निकाल आणि रूपकुंवर सतीचे वादळ यांकडेही तोरसेकरांनी लक्ष वेधले आहे. ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ या पुस्तकात लेखकांनी ‘1985च्या राजवस्त्रविरोधी आंदोलनाच्या निमित्ताने अल्पकाळ शरद जोशी, दत्ता सामंत आणि बाळासाहेब ठाकरे एकत्र आले होते’ असे म्हटले आहे. ते कसे चुकीचे आहे हे देखील तोरसेकरांनी दाखवून दिले आहे.
इतिहास म्हणजे केवळ घटना, प्रसंगांची जंत्री नसते. ते पुढच्या अनेक पिढ्यांसाठीचे संचित असते. त्यामुळे इतिहास कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता त्रयस्थपणे, तटस्थपणे आणि निःपक्षपातीपणे मांडला गेला पाहिजे. अनेकदा उपलब्ध साधने, अभ्यासाच्या मर्यादा आणि व्यक्तीचा आवाका यांमुळे इतिहासलेखनाला मर्यादा येतात. चुकाही राहून जातात पण त्या निदर्शनास आणून दिल्यानंतर दुरूस्त करणे महत्त्वाचे असते. अन्यथा चुकीच्याच गोष्टी पुढील अभ्यासकांपर्यंत जातात. असे घडू नये यासाठी भाऊ तोरसेकरांनी हा लेखनप्रपंच केला आहे. आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे.
- कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट
लेखक : भाऊ तोरसेकर
प्रकाशक : ‘चपराक प्रकाशन’पुणे (7057292092)
पृष्ठे :148, किंमत : 150 रू.

No comments:

Post a Comment