Monday, July 6, 2015

'मसाप'चे बेगडी सावरकरप्रेम!

प्रत्येक कार्यक्रमात 'मिरवण्यासाठी' प्रसिद्ध असलेल्या अ. भा. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य
साहित्य संमेलन आणि वाद यांचं नातं अगदी अतूट आहे. फेव्हिकॉलच्या जाहिरातीत ‘ये तूटेगा नही, फेव्हिकॉलका जोड है’ असं एक वाक्य असायचं. साहित्य संमेलन आणि वाद यांचा जोड तसाच आहे. विश्‍व साहित्य संमेलन आणि वाद हे तर जुळे भावंडं आहेत. पहिल्या विश्‍व साहित्य संमेलनापासून जे वाद सुरू झाले आहेत, ते आजही सुरू आहेत. विश्‍व साहित्य संमेलन भरवता येते का नाही या मुद्यापासून वाद सुरू झाला होता. त्यावेळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील होते. त्यांनी हे संमेलन भारताबाहेर होणे कसे आवश्यक आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आकांडतांडव केले. आता अंदमानात होणारे विश्‍व साहित्य संमेलन कसे बरोबर आहे हे महामंडळाच्या अध्यक्ष माधवी वैद्य सांगत आहेत.
अंदमानात विश्‍व साहित्य संमेलन भरवणे ही फक्त चुकीची बाब आहे. कारण अंदमान हा भारताचा भाग आहे. विश्‍व संमेलन हे परदेशातच घेतले जाईल अशी आजपर्यंत महामंडळाच्या पदाधिकार्‍यांची भूमिका होती. मात्र आता स्वत:ला मिरवून घेण्यासाठी वैद्य आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अंदमानला संमेलन होणे कसे बरोबर आहे हे सांगायला सुरुवात केली आहे. त्यासाठी सावरकरांना त्यांनी निर्लज्जपणे वेठीस धरले आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पन्नासाव्या स्मृतिवर्षानिमित्त हे संमेलन आम्ही अंदमानात घेत आहोत’, अशी भूमिका माधवी वैद्य यांनी मांडली आहे. मात्र, ज्या दोन संस्थांनी अंदमानात संमेलन भरवण्यासाठी प्रस्ताव दिले होते त्यापैकी ज्या संस्थेने सावरकरांच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम गेली काही वर्षे अव्याहतपणे केले आहे त्याच संस्थेचा प्रस्ताव नाकारला आहे. निलेश गायकवाड यांच्या संस्थेचा प्रस्ताव नाकारल्यानंतर जी कारणे समोर आली आहेत, ती अत्यंत धक्कादायक आहेत. ‘महामंडळाच्या पदाधिकार्‍यांचा विमान प्रवास, राहण्याची सोय आणि तेथे खर्चासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये महामंडळाने मागितले. ते देण्यास नकार दिल्याने आमचा प्रस्ताव नाकारला’ असा दावा निलेश गायकवाड यांनी केला आहे. महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी खर्चासाठी पाच हजार रुपये मागणे हे त्यांना निवडून देणार्‍या सर्व मतदारांचा अपमान करणारे आहे. आपल्या पदाचा असा दुरुपयोग आणि तोही साहित्य क्षेत्रातील मंडळीनी करावा हे किळसवाणे आहे. जर हे खरे असेल, तर महामंडळाच्या सदस्यांनी वैद्य यांच्यावर अविश्‍वास ठराव आणावा आणि तसे झाले नाही तर त्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रह धरावा. जर निलेश गायकवाड खोटे बोलत असतील तर महामंडळाने त्यांच्यावर अबू्र नुकसानीचा खटला दाखल करावा. आपण निरपराध आहोत हे त्यांनी सिद्ध करावे.
माधवी वैद्य यांनी यापुर्वी अशा विविध प्रकरणांमध्ये न्यायालयीन कारवाईचा आग्रह धरला आहे. अर्थात वैद्य यांच्या विरुद्ध धर्मादाय आयुक्तासमोर सुरू असलेल्या खटल्यांचे काय झाले ते अद्याप कळलेले नाही. मात्र या प्रकरणी वैद्य यांनी एकतर राजीनामा द्यावा किंवा ‘दूध का दूध और पानी का पानी‘ हे सिद्ध करण्यासाठी गायकवाड यांच्याविरुद्ध खटला दाखल करावा. मुळात अंदमानात असो की जगाच्या पाठीवर कुठंही जर साहित्य संमेलन भरवायचं असेल तर साहित्य विषयक संस्था किंवा साहित्य विषयक उपक्रमांना प्राधान्य देणार्‍या संस्थेला संधी मिळाली पाहिजे. इथं वैद्य यांनी दोन व्यावसायिक संस्थांची निवेदने स्वीकारून पहिली चूक केली आहे. आता त्याची भरपाई कशी करणार हा खरा प्रश्‍न आहे. उद्या कोणीही धनदांडगा उठेल आणि संमेलनाचा खर्च करण्याची हमी देऊन संमेलन भरवण्यासाठी प्रस्ताव देईल.
ज्या सावरकरांचे नाव वैद्यबाई घेत आहेत त्यांच्याबद्दल त्यांचे प्रेम हे जर खरं असेल तर सावरकरांच्या साहित्यिक कार्याची माहिती देणारी स्मरणिका काढावी, तसेच त्यांच्या स्मृतिनिमित्त पुण्यात कविसंमेलन घ्यावे, त्यासाठी दुसर्‍याच्या खर्चाने अंदमानला जाण्याचा खटाटोप करू नये.
माधवी वैद्य आणि त्यांच्या आजवरच्या भूमिका याबद्दल वेगळा लेख करता येईल. पण आता अंदमानच्या संमेलनावरून जो वाद पेटला आहे त्याचे निराकरण व्हायला हवे. सावरकर प्रेमींना देणगीचे आवाहन करणार्‍या वैद्यबाईंनी जर अंदमानात संमेलन घेण्यात योग्य भूमिका बजावली असती तर लाखो रुपयांच्या देणग्या दिल्या असत्या. सावरकरांचे नाव घेऊन स्वत:ची प्रतिमा उजळ करण्याचा उद्योग तातडीने थांबवावा. सावरकरांची अप्रतिष्ठा होऊ नये यासाठी सावरकर प्रेमींनीच महामंडळाला या प्रकरणातील सत्य बाहेर आणण्यासाठी जाब विचारावा.

- देवदत्त बेळगावकर, पुणे 

No comments:

Post a Comment