Monday, May 23, 2016

एका लेखकाची साहित्य कहाणी !


साप्ताहिक ‘चपराक’, पुणे

एकदा द. भि. कुलकर्णी मला म्हणाले होते, ‘‘बाबा रे, आपल्या मुलांची काळजी आपणच घ्यावी लागते.’’ चर्चा पुस्तकांविषयी आणि पुस्तके वाचकांपर्यंत पोहचवण्याबद्दल चालली होती. पुस्तक म्हणजे लेखकाला स्वत:च्या मुलाप्रमाणे असते. त्याचे त्याच्यावर जिवापाड प्रेम असते. माझी त्यावेळपर्यंत दोन-तीन पुस्तके प्रकाशित झाली होती. जे पुस्तक ‘छापायच्या योग्यतेचे नाही’ असे एका मान्यवर प्रकाशकाने सांगितले होते, त्याच्या हजारो प्रती संपल्या आणि चार भाषांमध्ये भाषांतरीत झाले होते.
द. भि. यांचे बोलणे मी मनापासून ऐकले आणि त्यावर काही दिवस विचार केला. त्यादरम्यान आणखी दोन-तीन पुस्तके प्रकाशित झाली. ‘कर्दळीवन: एक अनुभूती’ हे पुस्तक मी स्वत:च नोव्हेंबर 2012 मध्ये प्रकाशित केले आणि सर्व प्रकारच्या कल्पनांचा मुक्त वापर केला. परिणामी त्या पुस्तकाच्या तीन वर्षामध्ये एक लाख प्रती संपल्या आणि ते आठ भाषांमध्ये भाषांतरीत झाले. माझे भाग्य सर्वार्थाने फळफळले. खरं तर त्या आधीच्या पुस्तकांच्या बाबतीतही मी प्रकाशकांजवळ वेगवेगळ्या कल्पना मांडल्या होत्या; पण त्या प्रत्यक्षात आल्या नाहीत. त्यात प्रकाशकाचा दोष आहे असे मी म्हणणार नाही. सख्खी आई आणि सावत्र आई यांमध्ये नैसर्गिक फरक तो राहणारच! शिवाय प्रकाशक अनेक पुस्तकांचे प्रस्ताव, प्रकाशन, वितरण आणि जमाखर्चाचा हिशोब यामध्ये व्यग्र असतात आणि त्यांनी ते व्यग्र असणे त्यांच्या अस्तित्त्वासाठी गरजेचे असते. त्यामुळे मी कितीही जीव तोडून कल्पना मांडल्या तरी त्यांना त्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अडथळ्यांची शर्यंत काही ओलांडता आली नाही. त्यामुळे चांगले पोटेन्शिअल असूनही मी काही करु शकलो नाही आणि जणू काही पूर्णत: हतबल झालो.
यादरम्यान मी प्रकाशकांबरोबर केलेल्या करारांचा सूक्ष्म अभ्यास केला. बहुतांश करार हे पूर्णत: प्रकाशकधार्जिणे असतात हे दिसून आले. वास्तविक करारामध्ये दोन्ही पक्षांनी तो नीट समजावून घेवून करणे आवश्यक असते; मात्र तितकी पारदर्शकता क्वचितच आढळते. खरं तर प्रकाशक लेखक करार हा मराठीमध्ये एका मोठ्या विनोदाचा विषय होवून बसला आहे. नुकत्याच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या  ‘मसापगप्पा’  कार्यक्रमामध्ये राजन खान यांनी लेखक प्रकाशक संबंधाची जी भंबेरी उडवली ती काही सन्माननीय अपवाद वगळता अक्षरश: खरी आहे, असे एक लेखक म्हणून मला प्रांजळपणे वाटते. ज्याप्रमाणे आई बनण्यासाठी एक अनावर उत्सुकता, कुतुहल आणि आतुरता नवविवाहितांमध्ये असते, अगदी तशीच अनावर आतुरता लेखक बनण्याची किंवा लेखक-कवी असा शिक्का बसण्याची नवीन लेखकांमध्ये दिसून येते. मला वाटते तिथेच खरी गोची आहे. लिहिणे ही एक स्वतंत्र मिरासदारी आहे. माझे लेखन झाले आहे. आता पुढचे प्रकाशक, वाचक आणि समाज पाहून घेईल. मला पुढचे उपद्व्याप आणि सव्यासप करायची काय जरुरी आहे, असा विचार काही लेखक मंडळी करतात. याचे आणखी एक कारण म्हणजे  व्यावसायिक लेखक असे स्वतंत्र करियर आपल्याकडे फारसे विकसित झाले नाही. फक्त लेखनावरच ज्यांनी आयुष्यभर गुजराण केली असे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच साहित्यिक सापडतील. पोटासाठी निरंतर उत्पन्न देणारी नोकरी किंवा व्यवसाय किंवा वडिलोपार्जित साधन संपत्ती आहे आणि मग लिखाणाकडे वळलेली बहुतांशी लेखक मंडळी आहेत. त्यामुळे एक प्रकारचे अनाहूत, अप्रत्यक्ष मिंधेपण आणि न्यूनगंड लेखकांमध्ये आढळतो. त्यातून ते भित्रे आणि हबकलेले बनले असल्याची शक्यता अधिक वाटते. प्रस्थापित प्रकाशकांकडेही नवनवीन लेखक सतत येवून प्रस्ताव देत असतात. प्रकाशकांनाही एक नैसर्गिक मर्यादा आहे. प्रकाशक म्हणून मुख्यत: व्यावसायिक आणि नफ्यातोट्याचा विचार करणे हे अजिबात गैर नाही. असो.
मी मात्र पुस्तक तयार होण्याची प्रक्रिया नीट अभ्यासली. डिटीपी म्हणजे काय? त्याला किती खर्च येतो? प्रूफ रिडींग, मुखपृष्ठ, पुस्तकाच्या आतील सजावट, चित्रकारांचा पुस्तकामधला रोल, त्याचे वितरण, त्यातील गुंतवणूक, ग्रंथ विक्रेते, वाचनालये आणि सामान्य वाचक या सर्व घटकांचा आढावा घेतला. चर्चा केली. निरिक्षणे नोंदवली. माझ्या असे लक्षात आले की डिटीपी आपण बाहेरही करुन घेवू शकतो. संगणक येत असल्यास केवळ दोन तासांच्या प्रशिक्षणानंतर आपण स्वत:च युनिकोड फॉंटमध्ये आपले लेखन टाईप करु शकतो. ते नंतर छापण्यासाठी श्रीलीपी किंवा इतर कोणत्याही फॉंटमध्ये रुपांतरीत करता येते. अनेक उत्तमोत्तम आणि दर्जेदार चित्रकार आपल्या कल्पनेप्रमाणे उत्तम दर्जाचे मुखपृष्ठ, रेखाचित्रे आणि आतील चित्रांची दर्जेदार मांडणी करुन देवू शकतात. व्यावसायिक प्रूफरिडरही उपलब्ध आहेत. त्यांचेकडून प्रूफरिडींग करुन घेता येते. तसेच डिटीपीवाल्यांकडून पेज लेआऊट लावून घेता येतो. अशा प्रकारे पुस्तक ‘रेडी टू प्रिंट’ तयार करुन घेतल्यास ते नक्कीच लवकर प्रकाशित होवू शकते. यासाठी थोडा खर्च येतो; पण मला वाटते वेळेचा हिशोब केल्यास तो खर्च क्षुल्लक आहे.
अर्थात या सर्व प्रक्रियेमध्ये बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाचे फार मोठे योगदान नक्कीच आहे. छपाईचे तंत्र ‘360 ओ’ मध्ये बदलले आहे. संगणक आणि सॉफ्टवेअर्सनी अक्षरश: क्रांती केली आहे. त्यामुळे पुस्तक लिहून झाल्यावर त्याच्यावर कराव्या लागणार्‍या प्रकाशन प्रक्रियेचा कालावधी लक्षणीयरित्या कमी झाला आहे. पुस्तक तयार झाल्यानंतर त्याच्या संपादनासाठी मदत करणारे एडिटरही आता उपलब्ध आहेत. अनेक प्रकाशकांकडे असे व्यावसायिक एडिटर दिसून येतात. तंत्रज्ञानाच्या या विस्फोटामध्ये प्रकाशनाबरोबरच वितरण व्यवस्थेतही आमूलाग्र बदल झाला आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, बुकगंगा अशा ऑनलाईन वितरकांनी वाचक आणि लेखकांना अगदी जवळ आणले आहे. मला इथे नमूद करायला आनंद वाटतो की, ‘कर्दळीवन’च्या एक लाख प्रतींपैकी 60 हजाराहून अधिक प्रती डायरेक्ट माझ्याकडून वाचकांनी विकत घेतल्या आहेत. ग्रंथविक्रेत्याचे सहकार्य मोलाचे आहेच. मात्र ऑनलाईन विक्रेते आणि इंटरनेट मोबाईल बँकींगने वितरणाचे गणित पूर्णपणे बदलले आहे. आज माझ्या पुस्तकांची महिन्याकाठी 500 हून अधिक प्रतींची विक्री ऑनलाईन होत आहे.
पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचवायच्या स्वरुपातही आमुलाग्र बदल झाला आहे. छापील पुस्तकांबरोबरच मोबाईल ऍप बुक, ईबुक आणि ऑडिओ बुक अशी स्पर्धा सुरू झाली आहे. भारतामध्ये वीस कोटी लोक स्मार्टफोन वापरत आहेत आणि येत्या पाच वर्षांमध्ये ही संख्या 80 कोटीपर्यंत जाईल असा अंदाज आहे. किंडल, स्मार्टफोन आणि स्मार्ट हँडी संगणकामध्ये पुस्तकांचे जतन करणे आणि ती पाहिजे तेव्हा वाचणे याकडे कल वाढत आहे. जगभरातील प्रकाशन विश्व ढवळून निघाले असून अनेक आश्चर्यकारक उलथापालथी घडत आहेत. यापुढे कोणत्याही लेखकाने आपले पुस्तक प्रकाशित करताना ते एकाचवेळी छापिल, मोबाईल ऍप बुक, ईबुक आणि ऑडिओ बुक मध्ये पुस्तक रुपांतरीत करायला जराही खर्च येत नाही. शिवाय त्याचे मानधन दरमहा पारदर्शकपणे निरंतर आपल्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा होत राहते. पुस्तक आधी छापणे शक्य नसेल तर सुरुवातीला मोबाईल ऍप बुक आणि ईबुक स्वरुपामध्ये प्रसिद्ध करुन नंतर छापील स्वरुपामध्ये प्रकाशित करता येईल. प्रकाशक, ग्रंथविक्रेते आणि वाचनालये या वाचक आणि लेखकांच्यामध्ये असणार्‍या साखळीमध्ये तंत्रज्ञानाने नवनवीन अंगाची भर टाकली आहे. तिचा फायदा घेवून शहाण्या लेखकाने स्वत:ची साहित्यिक आणि व्यावसायिक जडणघडण केली पाहिजे. प्रत्येक लेखकाला स्वत:चे पुस्तक स्वत: प्रकाशित करता येणे शक्य नाही, हे मला माहिती आहे; पण जर त्यांने प्रकाशन प्रक्रिया करुन म्हणजे डिटीपी, प्रुफरिडींग, मुखपृष्ठ, लेआउट एडिटींग करुन मग प्रकाशकाबरोबर संपर्क साधला तर पुस्तक प्रकाशित होण्याचा कालावधी कमी होईल. प्रकाशकाचा खर्च आणि ताण कमी होईल. तो लवकर निर्णय देवू शकेल. तसेच लेखकालाही अधिक मानधनासाठी आग्रह धरता येईल. चित्रपट क्षेत्रामध्ये जसे तंत्रज्ञानामुळे रौप्य महोत्सवी, सुवर्ण महोत्सवी चित्रपटांचे युग संपून गेले तसेच ते पुस्तक प्रकाशनाच्या क्षेत्रातही होईल आणि लेखकाला मानधनाची नवीन दालने उघडून देईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नवीन लेखकांची निर्मिती व्हायला मदत होईल अशी खात्री वाटते. 
या सगळ्या प्रवासामध्ये मी एक लाख लेखक आणि एक कोटी वाचक यांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जोडणारी अभिनव चळवळ म्हणून  ‘साहित्य सेतू’  (www.sahityasetu.org) हा उपक्रम सुरु केला. त्यालाही भरभरुन प्रतिसाद मिळाला. सजग लेखक, सक्षम लेखक या कार्यशाळेला लेखकांनी गर्दी केली.
आज माझे 11 वे पुस्तक प्रसिद्ध होत असताना मी एक नवीन प्रयोग केला आहे. आतापर्यंतच्या दहा पुस्तकांपैकी एक पुस्तक 8 भाषांमध्ये, एक चार भाषांमध्ये, दोन पुस्तके तीन भाषांमध्ये प्रकाशित झाली आहेत. एक पुस्तक ब्रेल लिपीमध्ये झाले आहे. सर्व पुस्तकांच्या मिळून पावनेदोन लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. ईमेल, फेसबुक, व्हॉट्सऍप इ. सोशल मीडियाच्या माध्यमातून 5 लाखांहून अधिक व्यक्तिंचे नेटवर्क तयार झाले आहे. ‘स्वर्गारोहिणी: स्वर्गावर स्वारी’ या 11 व्या पुस्तकाच्या वेळी मी पुस्तकाचा एक व्हिडीओ ट्रेलर तयार केला. तो ट्रेलर प्रकाशनाआधी गेल्या 15 दिवसांमध्ये 1 लाखांहून अधिक व्यक्तींनी पाहिला आहे. पुस्तक प्रकाशित होताना एकाच वेळी छापिल पुस्तक, मोबाईल ऍप बुक, ई बुक आणि ऑडिओ बुक म्हणून प्रकाशित होत आहे. मराठी भाषेतील हा एक अनोखा प्रयोग आहे असे मला विनम्रपणे नमूद करावेसे वाटते. लेखक हे एक स्वतंत्र करिअर बनावे आणि हजारो तरुणांना या करिअरमध्ये उतरावे असे माझे स्वप्न आहे. ज्यांच्या लिखाणामध्ये दम आहे, त्याने तंत्रज्ञानाचा अचूक वापर करुन थोडीशी साहसी वृत्ती अंगिकारुन यामध्ये यशस्वी व्हावे असे मला मनोमन वाटते. प्रस्थापित, नामांकित, नावाजलेल्या साहित्यिकांनी आणि प्रकाशकांनी या बदलांकडे अभ्यासूपणे पहावे आणि अगत्याने मार्गदर्शन करावे. अशी ही माझी एका लेखकाची साठा उत्तराची साहित्य कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण.

-प्रा. क्षितिज पाटुकले
9822846918

(पूर्वप्रसिद्धी : साप्ताहिक ‘चपराक’, पुणे)

5 comments:

  1. खूपच माहितीपूर्ण लेख!
    प्रकाशन क्षेत्रात क्रांतीची शक्यता!

    ReplyDelete
  2. क्रांतिकारक लिखाण

    ReplyDelete
  3. क्रांतिकारक लिखाण

    ReplyDelete
  4. लेखकंच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यास या लेखाचा प्रभावी उपयोग होईल.
    शुभेच्छा.

    ReplyDelete
  5. लेखकंच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यास या लेखाचा प्रभावी उपयोग होईल.
    शुभेच्छा.

    ReplyDelete