Thursday, August 11, 2016

स्मार्ट जीवनशैलीचे स्मार्ट संतुलन

मासिक 'साहित्य चपराक' ऑगस्ट २०१६ 

स्मार्ट या शब्दाने नवीन पिढीवर अक्षरश: गारुड केले आहे. ‘आपली प्रत्येक गोष्ट स्मार्ट असली पाहिजे आणि प्रत्येक स्मार्ट गोष्ट आपल्याजवळ असली पाहिजे’ असा अट्टाहास सध्या सुरु आहे; मात्र त्यातून आपण पूर्णत: स्मार्ट होतो का, हे तपासून घेणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाने आजच्या प्रत्येक व्यक्तिच्या जीवनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आक्रमण केले आहे. त्याचा प्रभाव इतका खोलवर आहे की त्यापासून कोणीही अलिप्त राहू शकत नाही. एकंदरीत सगळ्या जीवनशैलीवर तंत्रज्ञानाचा प्रभाव आहे आणि तंत्रज्ञानाशिवाय जगणे आजच्या पिढीला शक्य नाही. मी सतत सगळ्यांच्या पुढे राहिलो पाहिजे, सगळ्यांमध्ये प्रथम, सगळ्यांच्या आधी,  सगळ्यांमध्ये श्रेष्ठ, सगळ्यांमध्ये उच्च आणि सगळ्यांमध्ये स्मार्ट! अशी ही लढाई प्रत्येक तरुणाईच्या मनामध्ये सुरु आहे. सर्वात उत्तम मोबाईल हँडसेट हवा, सर्वात उत्तम संगणक हवा, सर्वात वेगवान पळणारे इंटरनेट हवे, सर्व प्रकारची आधुनिक गॅझेटस माझ्याकडे हवीत असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी त्याचा आटापिटा सुरु असतो. त्यातून तुलना येते. त्यातून मग मानसिक आणि भावनिक आंदोलने सुरु होतात. ईर्षा, स्पर्धा, महत्त्वाकांक्षा यांचे रुपांतर असूया, मत्सर, अहंकार, निराशा आणि हतबलता अशा भावनांमध्ये देखील होऊ लागते. त्याचे दृश्य परिणाम अनेकदा आत्महत्या, बलात्कार, हिंसक हल्ले अशा भयावह प्रकारे दिसून येतात.
आजचे जीवन स्पर्धेचे आहे, असे बाळकडू अगदी लहान वयापासूनच दिले जाते. त्यासाठी सतत तयारी करुन घेतली जाते. आजचे संपूर्ण जीवन अर्थप्रधान झाले आहे. प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक कृती पैशाशी संबंधीत आहे असेच ठसविले जाते. मानवी जीवनमूल्ये, नैतिकता, परस्पर संवाद, कौटुंबिक सामंजस्य, सामाजिक बांधिलकी इ. विचार कालबाह्य करण्यात आले असून आर्थिक विचार आपल्या जीवनशैलीवर पूर्णपणे स्वार झालेले आहेत. त्यामुळे यंत्राप्रमाणे माणसे जीवनाशी लढताना दिसतात, तेव्हा हसावे की रडावे ते कळत नाही. स्मार्ट असणे काळाची गरज आहे. स्मार्ट राहणे म्हणजे पाप नाही. स्मार्ट असण्याचे फायदेही भरपूर आहेत. स्मार्टनेस याचा अर्थ आपल्याकडील उपलब्ध साधनांचा उपयुक्त वापर. यामध्ये जी संसाधने नसतील ती मिळवणे आणि जी संसाधने उपलब्ध आहेत त्यांचा प्रभावी वापर करणे हे आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तंत्रज्ञान आणि गॅझटेस कितीही आधुनिक आणि वेगवान असली तरी ती वापरणारी व्यक्ती हुशार आणि कार्यक्षम नसली तर अपेक्षित परिणाम दिसणार नाहीत. आज आपण पाहतो की कितीतरी साधनांचा आपण पुरेपूर वापरच करीत नाही. प्रत्येक मोबाईल हँडसेटमध्ये जितक्या सुविधा दिल्या असतात त्यापैकी 50% हून अधिक सुविधा वापरल्याच जात नाहीत. कारण अभ्यास आणि निरिक्षण यांचा अभाव आहे. हँडसेट उघडल्यावर त्याचे मुख्य फिचर आत्मसात केल्यावर इतर फिचर्सकडे दुर्लक्ष होते. त्याचवेळी बाजारात नवीन हँडसेट येतो. मग त्याच्यामागे धावाधाव सुरु होते. खरंतर आजच्या तंत्रज्ञानाची ही खरी गंमत आहे की ते सतत अत्यंत वेगाने बदलत आहे. विशेष गोष्ट म्हणजे करोडो लोकांना ई-मेल म्हणजे काय ते माहीत नाही आणि त्याचवेळी करोडो लोक फेसबुक, व्हॉटसऍप, ट्विटर पार करुन क्लाऊड आणि रोबोच्या सानिध्यात राहत आहेत. प्रत्यक्ष जीवन जगत असताना सर्व प्रकारच्या व्यक्ती आणि समुहांबरोबर आपला संबंध येत असतो. तेव्हा त्या सर्वांबरोबर जुळवून घेत आपले कार्य स्मार्टपणे करणे गरजेचे असते. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबरोबरच समाजाची तंत्रज्ञान विषयक किंवा स्मार्ट जगण्याविषयीची जाणीव हीदेखील महत्त्वाची ठरते. ती जाणीव जितकी विकसित तितके स्मार्ट काम करणे सोपे जाते. वर्तमानपत्रे आणि विविध माध्यमांतून तंत्रज्ञान आणि स्मार्ट गॅझेटच्या वापरांविषयी सुरु झालेल्या माहिती देणार्‍या पुरवण्या याचीच साक्ष देतात.
जीवन स्मार्ट बनविताना आधुनिक गोष्टी नक्कीच आत्मसात केल्या पाहिजेत. त्याविषयीची माहिती मिळवली पाहिजे. त्या हाताळून पाहिल्या पाहिजेत. त्यांची उपयुक्तता तपासून घेतली पाहिजे आणि त्यांचा स्मार्ट वापर कसा करता येईल याबाबत विचार केला पाहिजे. कॅमेर्‍याने फोटो काढणे आणि नंतर ते डेव्हलप करुन आणणे ही गोष्ट पूर्णत: कालबाह्य झाली आहे. मोबाईल आणि इंटरनेट क्रांतीने जग अक्षरश: बदलून टाकले आहे. जगण्याची प्रत्येक प्रक्रिया 360 अंशाच्या कोनात विस्तारली आहे. संवाद माध्यमे आणि संभाषण माध्यमे यांचा कालावधी अत्यंत कमी झाला आहे. पूर्वी पत्र पाठवून करावी लागणारी चौकशी आणि 8 दिवसानंतर मिळणारा प्रतिसाद ही सारी प्रक्रिया काही सेकंदावर आली आहे. जीवन अत्यंत गतिमान झाले आहे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, असे संत तुकाराम महाराजांनी एक आध्यात्मिक कल्पना सांगताना म्हटले आहे. आज जग स्मार्ट जीवनशैलीने रात्रंदिन युद्धाचा प्रसंग उभा राहिला आहे. अतिशय वेगाने समोर येणारी माहिती,  घटना, त्यावर तितक्याच वेगाने घ्यावे लागणारे निर्णय आणि त्यातून होणारे बरेवाईट परिणाम यांचा करावा लागणारा सामना यातून एक संघर्ष प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. ‘करु की नको करु’ अशी साशंकता प्रत्येक कृतीमध्ये आली आहे.
इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की माणूस हा निसर्गत: एक पशू आहे. मानवी शरीर विधात्याने बनविलेली एक अद्भूत किमया असली तरी शरीराच्या काही मर्यादा आहेत. मानवी शरीर म्हणजे यंत्र नाही. त्याला मन, बुद्धी, चित्त इ. विकार आहेत. त्यांचे संतुलन राखणे हे फार महत्त्वाचे आहे. मानवी शरीराची ताण सहन करण्याची एक मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या बाहेर गेल्यास त्याचा त्या व्यक्तिला आणि त्याचबरोबर कुटुंबाला आणि समाजालाही त्रास होतो. जसे रबर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ताणता येते. रबराशी सतत खेळत राहिल्यास त्यातील ताणशक्ती निघून जाऊन ते निकामी होते. स्मार्ट जीवन जगत असताना शरीराची आणि मनाची काळजी घेणे फार आवश्यक आहे. मनातील विचारांचा शरीरावर परिणाम होतो. विचार करण्यासाठी, आपल्याच मनाशी संवाद करण्यासाठी वेळ काढणे खूप आवश्यक आहे. स्मार्ट तंत्रज्ञानाद्वारे माहिती, संधी आणि प्रगती जरी एका क्लिकवर उपलब्ध झाली तरी आपले जीवन सुखी आणि आनंदी होते का हे तपासून पाहिले पाहिजे. फेसबुक, ट्विटर, ई-मेल, व्हॉटस्ऍप यामुळे जीवन नक्कीच गतिमान झाले आहे. माहितीची देवाण घेवाण वेगाने घडत आहे. परस्पर संवाद वेगवान झाले आहेत; मात्र त्यांच्या चांगल्या परिणामांबरोबर दुष्परिणामही वाढत आहेत. थोडा वेळ जरी इंटरनेट कनेक्शन बंद झाले तरी अस्वस्थता येते. दिवसरात्र माणसे फेसबुक आणि व्हॉटस्ऍपला चिकटून आहेत. मनासारखे झाले नाही तर छोट्या छोट्या गोष्टींमुळेही चिडचिड होते. कौटुंबिक आणि सामाजिक संवाद कमी होत आहेत. माणसे आभासी जीवनात रममाण झाली आहेत. अशावेळी आपल्या जीवनशैलीमध्ये स्मार्ट विचारांचे अधिष्ठान जागविणे फार गरजेचे आहे. स्वत:शी आणि इतरांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, फक्त स्वत:साठी काही वेळ राखून ठेवणे, स्वत:शी संवाद करणेही गरजेचे आहे. चांगले मित्र जोडणे आणि त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष गप्पा मारणे, गरजेचे आहे. विचारांची देवाण घेवाण केल्याने मनातील कोंडलेल्या भावनांचा निचरा होतो. मनाला नवा तजेला मिळतो. चांगल्या पुस्तकांचे आणि ग्रंथांचे वाचन खूप महत्त्वाचे आहे. ग्रंथ हे गुरु आणि सर्वात चांगले मित्र आहेत. त्यामुळे आपण एका वेगळ्या विश्‍वात जातो. याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाणे, ट्रेकींग करणे यामुळेही एक नवीन ऊर्जा प्राप्त होते. व्याख्याने आणि प्रवचने ऐकणे यांनीही आपल्या मनाचे पोषण होते. आपल्याला नवीन विचार समजतात. आपल्या मनातील शंकांचे निराकरण होते. नवीन कल्पना स्फूरतात.
आजचा काळ आव्हानात्मक तर आहेच तितकाच तो असुरक्षितही आहे. स्पर्धेबरोबर आता पुढे काय होईल, कसे होईल अशी विवंचना प्रत्येकाला आहे. अशा वेळी स्मार्ट जगणे ही एक कला आहे. संतुलन स्वत:च्या मनाचे, स्वत:च्या आरोग्याचे आणि स्मार्ट साधनांचे अशी काळाची गरज आहे. स्मार्ट साधनांचा पुरेपूर वापर आणि त्या वापरामधले संतुलन हे निरंतर यशाकडे घेऊन जाईल. प्रत्येक कृती करताना थोडे थांबून, थोडा विचार करुन, ही कृती अधिक स्मार्टपणे करता येईल का, याचा अंदाज घेऊन मग करणे शहाणपणाचे ठरेल. स्मार्ट जीवनशैलीसाठी स्मार्ट विचारांचे अधिष्ठान असले पाहिजे. आज यश मिळविणे कदाचित सोपे आहे. ते टिकवणे खूप अवघड आहे. म्हणूनच तरुणाईला सांगणे आहे,
स्मार्ट करा रे मन । स्मार्ट करा रे जीवन ।
आणि स्मार्ट संतुलन । त्यासाठी हवे स्मार्ट अधिष्ठान ॥
- प्रा. क्षितिज पाटुकले, पुणे
संपर्क: 98228 46918

मासिक 'साहित्य चपराक' ऑगस्ट २०१६

No comments:

Post a Comment