Tuesday, August 9, 2016

सोविएत युनियन (रशिया) मधील कम्युनिस्ट चळवळीचा समग्र इतिहास...

मासिक 'साहित्य चपराक' ऑगस्ट २०१६ 

प्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे
संपर्क 020-2447 3459
पृष्ठे: 468 । मूल्य: 350/-
मार्क्सवाद! कम्युनिझम! मराठीत सांगायचं तर साम्यवाद! एकेकाळी  जगभरातल्या तरूणांना मार्क्सवादाचं आकर्षण होतं. साम्यवादाचं आकर्षण होतं. असं काय होतं या कम्युनिझमध्ये? जगाला का हादरे बसले त्यामुळं? जगाच्या नकाशावर नजर टाकली तर काय दिसतं? साम्यवादी विचारसरणी. तिनं सगळीकडेच प्रभाव गाजवला आहे. विशेष करून मागच्या शंभरेक वर्षात. एक गोष्ट खरी आहे. आता काळ बदललाय. याला जागतिकीकरणाचा काळ म्हणतात. आता कुठलाही देश घ्या. तो शंभर टक्के साम्यवादी राहू शकेल का? तर नाही राहू शकत. आता ‘भांडवलशाही’ची चलती आहे. आता बोलते ती एकच गोष्ट. पैसा!! चीनवर कम्युनिस्ट पक्षाची पकड आहे; मात्र तिथंही आता ‘माओ’चा काळ राहिलेला नाही. तिथली अर्थव्यवस्था. ती आता ‘साम्यवादी’ राहिली नाही. साम्यवादी विचारांचं राजकारण म्हणजे काय? तर त्यात साम्यवादी विचारांचं अर्थकारणही येतंच. मग भांडवलशाही अर्थव्यवस्था चांगली की साम्यवादी? असे प्रश्‍न .ेयेतातच. काय चांगलं? काय वाईट? हे समजून घ्यायचं तर? तर अनेक गुंते. ते नीटच अभ्यासावे लागतात. त्यासाठी जगभरातील राजकीय उलथापालथी. त्या समजून घ्यायला लागतात. ‘कम्युनिझम‘  समजून घ्यायची सुरूवात. ती मात्र सोविएत युनियनपासूनच करावी लागते. का? तर तिथं पहिली कम्युनिस्ट क्रांती झाली. कम्युनिस्ट सत्तेवर आले. जवळपास सत्तर वर्ष त्यांनी तिथं राज्य केलं. काय काय घडलं या इतक्या मोठ्या काळात? ‘कम्युनिझम’ तिथं खरंच यशस्वी झाला का? तो एक प्रयोग होता का? काय घडलं मग या प्रयोगशाळेत? मराठीत यावर दोन-तीन लेखकांनी लिहिलं. गोविंद तळवळकर, नरेंद्र सिंदकर, अरूण साधू ही नावं प्रामुख्यानं घेता येतील. यापैकी तळवळकरांचं लेखन सपक. ‘सोविएत साम्राज्याचा उदय आणि अस्त’ हा ग्रंथ. त्याचे तीन खंड लिहिले त्यांनी. अभ्यासाशिवाय लिहितात का माणसं तीन-तीन खंड? मात्र होतं काय? तर काहीजण आपला अभ्यास किती आहे हे दाखवण्यासाठी लिहितात. तळवळकर हे असे ‘दिखाऊ’ लेखक आहेत. अशा लेखकांना एक मारामार असते. वाचक मिळण्याची. मग कम्युनिझम वा मार्क्सवादासारखा विषय असेल तर? वाचकांची मग अजून गोची होते. मग हा विषय सोपा करून सांगितला कुणी? तर अरूण साधूंनी. प्रश्‍नच नाही. ‘तिसरी क्रांती’ हा त्यांचा ग्रंथ. कसा आहे तो? तर तो वाचकांना समजेल असा आहे. पाचशे पानात साधुंनी हा विषय संपवून टाकला. खंडांचे डोंगर पोखरत बसले नाहीत ते. डोंगर पोखरून उंदीर काढता येतो का? अन् मग तो पुन्हा वाचकांना अभिमानानं दाखवता येतो का? तर येतो की. त्याबाबतीत तळवळकरांसारखा लेखक शोधूनही सापडणार नाही. साधुंनी ते केलं नाही. साधुंचं हेच मोठेपण आहे. खरंतर या विषयाच्या बाबतीत नरेंद्र सिंदकरांचा अधिकार मोठा. त्यांचा अभ्यासाचा आवाकाच मोठा. अफाट असा! शिवाय ते रशियात राहिले होते. अगदी मॉस्कोतच. किती काळ? तर तब्बल पंचवीसेक वर्ष!! ‘लाल महासत्तेचा उदयास्त’ हा ग्रंथ. त्याचे दोन खंड लिहिले त्यांनी. पहिला प्रकाशित झाला. दुसरा झाला नाही. का? ते कॉन्टीनेंटल प्रकाशनलाच माहीत. मग सिंदकरांचा पहिला खंड कसा आहे? तर अभ्यासपूर्ण व बर्‍यापैकी वाचनीय आहे. फक्त झालं एकच. फार आकडेवारीमुळं तो जड झाला. दुसरं, सिंदकर पक्के ‘स्टॅलिनवादी’. त्यामुळं कितीही नाही म्हटलं तरी त्यांना तटस्थपणे लिहिता आलं नाही. त्यामुळं ट्रॉटस्की, क्रुश्‍चेव्ह, गोर्बाचेव्ह या नेत्यांवर अन्याय होतोच. या लोकनेत्यांनी स्टॅलिनला कधीच मानलं नाही. दुसरीकडे स्टॅलिनवादी लेखक. त्यांनी या लोकनेत्यांना मानलं नाही. साधू मात्र जास्त तटस्थ वाटतात. एकतर सोपं लिहिलयं त्यांनी. दुसरं, स्वत:ला कुठंही झुकू दिलेलं नाही. सगळं लेखन तटस्थ. त्याचवेळी झपाटल्यासारखं! लेखन असं असेल तर? तर वाचकही झपाटून जातो. त्यामुळं ‘तिसरी क्रांती’ ग्रंथ. तो तुम्हाला काय देतो? तर झपाटलेपण!! मग वाचक म्हणून काय होतं आपलं? तर दोन दोन-तीन तीन वेळा वाचायला घेतो आपण हा ग्रंथ. ग्रंथाच्या शेवटी शेहचाळीस संदर्भ ग्रंथांची यादी आहे. त्यावरून कळतं ते एकच. साधूंचं अफाट वाचन! या यादीत एकाहून एक सरस इंग्रजी ग्रंथ आहेत. त्यात ‘पर्मनन्ट रिव्होल्युशन’ हा ग्रंथ आहे. खुद्द ट्रॉटस्कीनंच लिहिलेला आहे तो. ट्रॉटस्कीनं लिहिलेला ‘हिस्ट्री ऑफ द रशियन रिव्होल्युशन’ हाही ग्रंथ आहे. जॉन रीडचा ‘टेन डेज दॅट शूक द वर्ल्ड’ हा ग्रंथ आहे. रॉबर्ट टकरचा ‘सोविएत पॉलिटीकल माईंड’आहे. मायकेल सायर्स व अल्बर्ट कान चा ‘द ग्रेट कॉन्स्पिरसी अगेन्स्ट रशिया’आहे. रॉय मेदवेदेव हा सुप्रसिद्ध लेखक. त्याचे दोन ग्रंथ या यादीत आहेत. एक ‘ऑन स्टॅलिन अँड स्टॅलिनिझम’. दुसरा आहे ‘लेट हिस्ट्री जज’. हॅरिसन सॅलिसबरीचा ‘नाईन हन्ड्रेड डेज: द सीज ऑफ लेनिनग्राड’ हा ग्रंथही या यादीत आहे. या यादीत ट्रॉटस्कीचं आत्मचरित्र आहे. कार्ल मार्क्सचं चरित्र आहे. स्टॅलिन व गोर्बाचेव्ह यांची चरित्रंही आहेत. अगदी मार्क्सपासून गोर्बाचेव्हपर्यंत साधुंनी विस्तारानं लिहिलंय. या सगळ्यांचा कालखंड विस्तारानं येतो. त्यामुळं साधुंचा हा ग्रंथ या विषयावरचा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ ठरतो. याची पहिली आवृत्ती 1991 साली आली. नंतर तिसरी आवृत्ती आली फेब्रुवारी 2010 मध्ये. पहिली आवृत्ती पाचशे साठ पानी आहे. तिसरी चारशे अडुसष्ठ पानी. ‘ताजा कलम’ व ‘पंधरा वर्षानंतर’. तिसर्‍या आवृत्तीत ही दोन नवीन प्रकरणं आहेत. ‘उपसंहार’ ही आहे. त्यामुळं हा विषय अगदी नीट समजतो. साधुंच्या मनोगतातच एक वाक्य आहे. ‘‘प्रस्तुत ग्रंथ जगाविषयी उत्सुक असलेल्या तरूणांसाठी आहे’’ ते म्हणतात.
ग्रंथाची सुरूवात होते ‘फ्रेंच राज्यक्रांती’ पासून. मग लेखक कार्ल मार्क्सची ओळख करून देतो. काय म्हणत असे हा मार्क्स? ‘‘समाज बदलता येतो. तो बदलला पाहिजे’’ मार्क्स सांगे. मार्क्स कसा होता? तर ‘तो झंझावाती बुद्धिचा माणूस होता’ साधू सांगतात. मार्क्सची पत्नी जेनी. अतिशय बुद्धिमान होती तीदेखील! अत्यंत महत्त्वाची गोष्ट. जेनीचं मार्क्सच्या लेखनावर लक्ष होतं. त्याच्या अभ्यासावर लक्ष होतं. मार्क्सची गरिबी भयंकर!! अशा अवस्थेत जेनीनं मार्क्सचा संसार सांभाळला. मार्क्सची गरिबी भयंकर, तशी त्याची अजून एक गोष्ट भयंकर होती. त्याचं अक्षर! त्यामुळं जेनीचं एक काम आणखी वाढलं. मार्क्सच्या लिखानाची मुद्रणप्रत. ती तिलाच तयार करावी लागे. जेनीचं माहेरचं आडनाव वेस्टफालेन. सुसंस्कृत कुटुंबातून आली होती ती. एक प्रज्ञा व अफाट चिंतन! या दोन गोष्टी सोडल्या तर? तर मार्क्सकडे बिचार्‍याकडे होतं तरी काय? खिसा फाटकाच होता त्याचा! त्यामुळं कौटुंबिक विवंचना भयंकर! त्यातून जेनीची चिडचिड देखील होई; मात्र जेनीनं मार्क्सला सांभाळलं. त्यात आयुष्य वेचलं. नवरा फकीर वृत्तीचा होता तिचा. त्यामुळं वाट्याला गरीबी आलेली. म्हणून काही जेनीनं मार्क्सला सोडचिठ्ठी दिली नाही. आपल्याला प्रश्‍न पडतो. जेनी नसती तर? तर मार्क्सचं काय झालं असतं? मात्र नियतीच अशा गाठी मारत असते. पक्क्या असतात त्या गाठी. जेनीचं आणखी एक मोठेपण कुठं आहे? शेवटच्या काळात तर कॅन्सर जडला तिला; मात्र नवर्‍याच्या लेखनावरचं तिचं लक्ष. ते मात्र तसूभरही कमी झालं नाही. का कुणास ठाऊक; मात्र ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुलेच आठवतात इथं. मार्क्स व जेनीबद्दल वाचत असताना.
मार्क्सचा जन्म जर्मनीतला. वंशानं तो ज्यू. नंतर तो फ्रान्समध्ये राहिला. बेल्जियममध्ये राहिला. लंडन इथंही राहिला. त्यावेळचे प्रशियन (जर्मन) पोलीस अधिकारी. ते मार्क्सला कुठंही सुखानं राहू देत नसतं. त्यांच्या दृष्टीनं तो धोकादायक माणूस होता. मार्क्सनं आयुष्यात खूप अपमान सहन केले. पचवले. हे सगळं सोसतच त्यानं त्याचा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. ‘दास कॅपिटल’(भांडवल)! हा तो ग्रंथ. तीन खंडात लिहिला त्यानं तो! हाच तो मार्क्सवाद! जगभरातली भांडवलशाही राष्ट्रं. ती या मार्क्सवादाला टरकून होती अक्षरश:! या मार्क्सवादाचा जगभरचं स्वत:चा एक पगडा होता. मार्क्सच्या आयुष्यात काय घडत होतं नेमकं तेव्हा? तर त्याची दोन लहान मुलं. ती मरण पावली होती. कशामुळं? तर उपासमारीनं! अनेकदा कर्जबाजारी होण्याची वेळ आली त्याच्यावर. त्यातून अक्षरश: रस्त्यावर यायचे प्रसंग आले. मार्क्ससह कुटुंबही रस्त्यावर! अशा वाईट वेळा आल्या. मार्क्सचा हा सगळा त्याग! सामान्य त्याग नव्हताच तो! ‘घर जाळून कोळशाचा व्यापार’ म्हणतात याला. तो त्यानं त्यावेळी केला. कामगारांचं जगभर होणारं शोषण! ते त्यानं त्याच्या या ग्रंथातून मांडलं. पुढं तो कामगारांना आपला मुक्तिदाताच वाटला. अगदी जगभरातील कामगारांना. त्यातून जगभर लाल बावटे फडकू लागले. मग हा लाल बावटा खर्‍या अर्थानं कुठं फडकला पहिल्यांदा? तर सोविएत यूनियनमध्ये. 1917 साल. या साली तिथं झालेली हीच ती क्रांती. पहिली कम्युनिस्ट क्रांती! ‘तिसरी क्रांती’ हा ग्रंथ याच क्रांतीची कहाणी सांगतो. तिची वाटचाल सांगतो. तेव्हा रशियातली परिस्थिती कशी होती? तर रशिया अंधारयुगातच होता तेव्हा. गरीबी व सरंमजामशाही. समाज पोखरला होता या दोन गोष्टींनी. त्याही आधी 1904 साली झालं? तर रशिया -जपान युद्ध. यात रशियाचा दारूण पराभव झाला. रशियात तेव्हा ‘झार’ची राजवट होती. राजेशाहीच होती ती. रशियन जनता मात्र भाबडी. या युद्धात ती झारच्या पाठीशी उभी राहिली. हेच झालं पहिल्या महायुद्धाच्या वेळी सुद्धा. 1914 साली सुरू झालं हे पहिलं महायुद्ध. ‘‘पहिलं महायुद्ध हा कत्तलखानाच होता’’ अरूण साधू म्हणतात. त्या युद्धात रशियन फौजा जर्मन फौजांना भिडल्या. कसा होता हा कत्तलखाना? किती सैन्य ठार व्हावं रशियाचं? तर अडतीस लाख!! तेही पहिल्याच दहा महिन्यात!! मात्र तिसरी क्रांतीची पहिली आवृत्ती. त्यात या संख्येची गफलत झाली आहे. पान क्रमांक 116. त्यावर ठार झालेल्या सैनिकांची संख्या आहे अडतीस लाख. तर पान क्रमांक 169. त्यावर ती आहे  पंधरा लाख. त्यामुळं नेमकी संख्या कळत नाही; मात्र ती लाखोंच्या घरात होती हे खरं. एखाद्या देशाचे इतके सैनिक मारले जात असतील तर? तर काय हाहाकार माजत असेल त्या देशात? रशियातही तो माजलाच होता. रशियन जनता संतापली. झारला शिव्याशाप देऊ लागली. आधीच रोजचं आयुष्य. हीच एक लढाई होती. त्यात लाखो तरूण युद्धात मारले गेलेले. माणसं उठाव करतील नाहीतर काय करतील? मात्र कुठलाही असंतोष वा बंड. त्याला एक दिशा लागते. ब्लादिमीर लेनिन हा लोकनेता. त्यानं या असंतोषाला दिशा दिली. लिऑ ट्रॉटस्की हा त्याचा सहकारी. खूप जबरदस्त क्रांतिकारक होता तो. तो या उठावात लेनिनच्या बरोबर होता. खरंतर रशियन जनतेचा हा उठाव. तो उत्स्फूर्त होता. जनता नेतृत्त्वाची वाट पहात बसली नाही तेव्हा. लेनिननं काय केलं? तर नंतरच्या काळात या उठावाचं बोट धरून तो सत्तेपर्यंत गेला. फ्रेंच राज्यक्रांतीचं बोट धरून नेपोलियन बोनापार्ट सत्तेपर्यंत गेला तसाच. लेखकानं या ग्रंथात हा सगळा इतिहास त्यातल्या बारीकसारीक तपशिलासह सांगितला आहे. 
रशियातले हे लाखो कम्युनिस्ट क्रांतिकारक. लेनिनचे हे समर्थक. ते होते तरी कसे? तर त्यांची दोन वैशिष्ट्यं साधू सांगतात. साधेपणा व त्याग. त्यांना ‘बोल्शेविक’ असं म्हटलं जाई. दोन गटच होते बंडखोरांचे. बोल्शेविक व मेन्शेविक. त्यातल्या बोल्शेविकांचं नेतृत्व लेनिनकडे होतं. पुढं या बोल्शेविकांचाच कम्युनिस्ट पक्ष झाला. लेनिन स्पष्ट भूमिका घेई. त्याच्याकडे ठामपणा होता. त्यामुळं मेन्शेविकांपेक्षा तो लोकप्रिय ठरत गेला. हे सगळं 1917 व त्यानंतर घडत गेलं. त्याआधी गाजला तो 1905 सालचा संप. कामगार व शेतकर्‍यांनीच केलेला. खरंतर तो जबरदस्त उठाव होता. सत्तेवर होता अर्थातच दुसरा निकोलस झार. बेपर्वा माणूस! 1904 चं रशिया-जपान युद्ध. ते रशियाच्या अंगलट आलेलं. शेतकरी, कामगारांची अवस्था. ती भयानक झालेली. उदारमतवादी, बुद्धिवंतही होतेच तेव्हा रशियात. कलावंत होते. कवी होते. देशाची विस्कटलेली ही घडी. ती पाहून ते निराश होत होते. क्रांतिकारक वृत्तीचे तरूण. ते भूमिगत होत होते. बॉम्ब बनवत होते. पिस्तूलं बाळगत होते. झारला ती खदखद कळत होती;मात्र वळत नव्हती. रशियातला कामगार वर्ग. तो कुठं कुठं काम करत होता तेव्हा? तर तो छापखान्यांमध्ये काम करत होता. जहाजबांधणी कारखान्यांमध्ये काम करत होता. तो गोदी कामगार होता. पोलाद कामगार होता. कोळसा कामगार होता. रेल्वे कर्मचारीही होता. या सगळ्यांनी 1905 साली केलेला हा संप. इतकंच नव्हे तर तेव्हा शिक्षक, डॉक्टरही संपावर गेले. बँकांचे कारकून, पोस्टमनही संपावर गेले. वीज कर्मचारी व अक्षरश: टांगेवालेही संपावर गेले. झारचं रशियन साम्राज्य खूप मोठं होतं तेव्हा. बाल्टिक समुद्रापासून ते पूर्वेला पॅसिफिकपर्यंत पसरलेलं. विविध वांशिक समुहांचा विशाल समूह होता हा. या विशाल भूभागात लक्षावधी कामगार होते. कोट्यावधी शेतमजूर होते. शेतकरी होते. गुलाम होते. त्यांचे जगण्या मरण्याचे प्रश्‍न होते. त्यातून ते रस्त्यावर उतरत होते. झार दुसरा निकोलस. त्यानं अशावेळी केलेली घोडचूक कोणती? तर तो पुन्हा पुन्हा जनतेशी अमानुष वागला. झार जात्याच निर्दयी. त्यामुळं 1911 ते 1914 या काळातही काय झालं? तर कामगारांचे वारंवार उठाव झाले. दिनांक 9 जानेवारी 1905 या दिवशी तर कामगारांवर अमानुष गोळीबार झाला. मॅक्झिम गॉर्की हा सुप्रसिद्ध रशियन लेखक. तो तेव्हा पत्रकार होता. अमेरिकेतल्या ‘न्यूयॉर्क जनरल’चा. त्यानं त्याचवेळी बातमीची तार पाठवली होती अमेरिकेला. ‘रशियन क्रांती सुरू झालेली आहे’ त्यानं बातमीत म्हटलं होतं. अर्थात क्रांती व सत्तांतर. 1917 साल उजडावं लागलं त्यासाठी; मात्र गॉर्कीला लक्षणं जाणवलीच होती. क्रांतीची लक्षणं! नंतर त्यासाठी काळानं ‘लेनिन’ची निवड केली होती इतकंच. लेनिननं बोल्शेविकांना संघटित केलं. बोल्शेविकांची खरी ताकद काय होती? तर लढवय्ये कार्यकर्ते!! असे लढवय्ये बोल्शेविक कुठं कुठं होते? तर ते खेड्यांमध्ये होते. शहरांमध्ये होते. कारखान्यांमध्ये होते. शेतं, बराकी व अगदी युद्धाच्या आघाडीवरील खंदकातही ते होते. 1917 साली उठाव झाला व लगेचच बोल्शेविक सत्तेवर आले का? तर तसं झालं नाही. अलेक्झांडर केरेन्स्कीचं हंगामी सरकार सत्तेवर आलं होतं तेव्हा. लेनिन व ट्रॉटस्कीनं हे सरकार उलथवल.ं खरंतर त्यासाठी रक्तपात करावाच लागला नाही. संघटित ताकद पणाला लावली बोल्शेविकांनी. ती फार मोठी होती का? तसंही नव्हतं. केरेन्स्कीनं ठरवलं असतं तर? तर तो बोल्शेविकांचा उठाव मोडून काढू शकला असता; मात्र तो अक्षरश: पळून गेला. क्रांतिकारकांच नीतिधैर्य. तेच श्रेष्ठ ठरलं. याबद्दल अरूण साधू काय म्हणतात? ‘‘ही क्रांतीची सुरूवात. सत्तेचा चुंबक बदलला होता. भूगर्भातील प्रस्तर हलू लागले होते. राजसत्तेचा डोलारा डळमळू लागला होता.’’ साधुंची अशी अनेक वाक्यं. ती या ग्रंथात आहेत. त्यांचं हे लेखन ‘रोमँटिक’ आहे. कुठल्याही क्रांतीवरचं लेखन रोमँटिक असू शकतं. प्रत्यक्षात क्रांती कठोर असते. निर्दयी असते. या ग्रंथात या दोन्ही गोष्टी वाचकांना जाणवतात. एक उदाहरण सांगता येईल. दुसरा निकोलस झार. त्याला त्याच्या कुटुंबासह ठार मारण्यात आलं. रशियन राज्यक्रांतीतल्या रक्तपाताला तिथूनच सुरूवात झाली.
लेनिन व ट्रॉटस्कीनं सरकार आणलं. बोल्शेविकांचं सरकार; मात्र खरी परीक्षा तिथून सुरू झाली. ऑक्टोबर 1917. या महिन्यात बोल्शेविक सत्तेवर आले; मात्र पुढच्या क्षणी काय झालं? तर दोन भयानक गोष्टी. त्या समोरच येऊन उभ्या ठाकल्या. ब्रिटन, अमेरिका व फ्रान्स. पहिल्या महायुद्धातली ही मित्रराष्ट्रं. त्यांना पोटदुखी सुरू झाली. कसली? तर सोविएत यूनियनमध्ये डाव्या विचारांच्या बोल्शेविकांचे सरकार सत्तेवर आल्याची. मग या थोर (?) व लोकशाहीवादी (?) राष्ट्रांनी काय करावं? तर आपली लष्करी व गुप्तहेर यंत्रणा. ती कामाला लावली. कशासाठी? तर या बोल्शेविक क्रांतीचा गळा घोटण्यासाठी. तसे प्रयत्न त्यांनी अगदी नेटानं सुरू केले. बोल्शेविकांचं सरकार पाडण्याचे हे प्रयत्न. त्यासाठी भयानक कारस्थानं केली. हा एक मोठा इतिहासच आहे असं साधू सांगतात. लेनिन व ट्रॉटस्की. त्यांच्या पुढचं दुसरं संकट काय होतं? तर सोविएत यूनियनमध्ये ‘श्‍वेतसेना’ स्थापन झाली. आता हा काय प्रकार होता? तर रशियाभरचे जमीनदार एकत्र आले. काही लष्करी अधिकारी एकत्र आले. अमीर-उमराव एकत्र आले. या सगळ्यांनी मिळून श्‍वेतसेना उभी केली. अगदी लष्करी संघटनच केलं तिचं. कुणाविरूद्ध? तर लेनिनच्या बोल्शेविक सरकारविरूद्ध. या सरंमजामशहांना द्वेषानं पछाडलं होतं. लेनिननं सरकार स्थापन केलं होतं. त्यांना हे सहन होत नव्हतं. आता लेनिन तरी कच्च्या गुरूचा चेला होता का? तर नाहीच. त्याच्या बोल्शेविक सरकारकडेही ‘लालसेना’ होतीच. तिची सूत्रं होती ट्रॉटस्कीकडे. ट्रॉटस्की हाही बाप माणूस! लेनिनला घडवून आणलेल्या क्रांतीचं रक्षण करायचं होतं. अन्यथा रशिया पुन्हा सरंजामशाहीच्या गर्तेत फेकला गेला असता. शिवाय या सरंजामशहांना वर उल्लेख केलेल्या मित्रराष्ट्रांचा पाठिंबा होताच. मग क्रांतीच्या रक्षणाची जबाबदारी लेनिननं सोपवली कुणावर? तर अर्थातच ट्रॉटस्कीवर. ट्रॉटस्कीनं लालसेनेचं नेतृत्व केलं. लष्करी डावपेच लढवले. पाय रोवून उभा राहिला तो! लेनिनच्या विश्‍वासाला जागला. हे यादवी युद्ध होतं. लालसेना विरूद्ध श्‍वेतसेना. क्रांतिकारकांविरूद्ध प्रतिक्रांतिकारक! क्रांतीला प्रतिक्रांतीनं दिलेलं हे आव्हान! मित्रराष्ट्रांनी श्‍वेतसेनेला पैसे दिले. लष्करी मदत केली; मात्र क्रांतिकारकांचा चिवटपणा! तो मात्र अफलातून होता. जिद्दीला पेटले होते ते!  आपल्या हक्काच्या सरकारचं रक्षण करण्याची जिद्द! ती जिद्द खरोखर तुफानी होती. एकतर ही पहिली साम्यवादी क्रांती. तिचा हा जगातला पहिलाच प्रयोग. क्रांतिकारकांना नवीन समाज घडवायचा होता. सामाजिक परिस्थिती वाईट होती. आर्थिक परिस्थिती तशीच. पहिल्या महायुद्धानं घातलेले घाव. ते खोलवर बसले होते. त्यात हे यादवी युद्ध! आणि या सगळ्याला टक्कर देणारे क्रांतिकारक! शेवटी हे यादवी युद्ध! ते किती भयानक अवस्थेला गेलं? तर दोन्ही सैन्यातले दहा लाख लोक ठार झाले त्यात; मात्र क्रांतिकारकांनी आपलं सरकार शाबूत राखलं. तीन वर्ष ही या यादवी युद्धाची होती. 1918 ते 1921. ही ती तीन वर्षे. या सगळ्यातली एक गोष्ट विलक्षण होती. लेनिन सत्तेवर आला होता. कसा? तर रक्तहीन सत्तांतर होऊन; मात्र आता रक्तपात अटळ ठरला. का? तर त्याच रक्तहीन क्रांतीचं रक्षण करण्यासाठी. लेनिननं सत्तेवर आल्यावर पहिलं काम काय केलं? तर पहिल्या महायुद्धातून सरळ माघार घेतली. सैन्य मागं घेतलं. जर्मनीशी तह केला. जनता युद्धाला विटली होती. भुकेनं मरत होती. दुष्काळानं पिडली होती. त्यामुळं लेनिनचा हा निर्णय. जनतेचा विश्‍वास संपादन केला एका क्षणात लेनिननं हा निर्णय घेऊन. झारची राजवट मुळातच भ्रष्ट! अत्याचारी! तिनं लादलेलं हे युद्ध. लेनिननं या दुष्टचक्रातून रशियन जनतेची सुटका केली असंच म्हटलं पाहिजे. हा निर्णय घेताना स्टॅलिन हा लेनिनच्या पाठिशी होता, तर ट्रॉटस्की मात्र कुंपणावर.
ब्लादिमीर लेनिन, लिऑ ट्रॉटस्की, जोसेफ स्टॅलिन व मिखाईल गोर्बाचेव्ह. सोविएत युनियनमधली ही चार व्यक्तिमत्वं. यातील गोर्बाचेव्ह खूप नंतरचे. पहिले तिघं समकालीन; मात्र या सर्वांबद्दलच साधुंनी विस्तारानं लिहिलं आहे. त्यांचे स्वभाव कसे होते? त्यांचं साम्यवादी क्रांतीतलं स्थान काय? स्टॅलिनची राजवट प्रदीर्घ होती; मात्र ती नेमकी कशी होती? गोर्बाचेव्ह यांचं आंतरराष्ट्रीय राजकारणातलं स्थान काय? साधू खूप नेमकेपणानं सगळ्या गोष्टी सांगतात. काहीही हातचं राखून ठेवत नाहीत. लेखक म्हणून त्यांचं हे खूप सुंदर वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. त्याकडे साधू शेवटी येतात. तो मुद्दा सोविएत यूनियनचे तुकडे कसे झाले हा. त्याचं अत्यंत तपशिलवार वर्णन साधुंनी केलं आहे. ‘तिसरी क्रांती’ हा ग्रंथ. तो सोविएत यूनियनचा मागील जवळपास शंभर वर्षांचा इतिहास सांगतो. गांगरून जायला व्हावं इतकं अफाट राजकारण यात येतं. यात क्रांती येतेच. तिची वाटचाल येते. पहिलं व दुसरं महायुद्ध येतं. अमेरिका व सोविएत यूनियनमधील शीतयुद्ध येतं. साम्यवादी राष्ट्रं व भांडवलशाही राष्ट्रं. त्यांच्यातील शह-कटशह येतात. आंतरराष्ट्रीय राजकारणातील कारस्थानं येतात. वाचकाच्या अंगाचा थरकाप व्हावा अशी ही कारस्थानं व शह-कटशह! साधुंच्या शैलीतच ते वाचावेत. सोविएत यूनियनमधील लक्षावधी कॉम्रेडस्. त्यांनी एका क्रांतीचं स्वप्न पाहिलं. त्यासाठी रक्त सांडलं. तुम्ही कम्युनिस्ट किंवा असू नका. हा ग्रंथ वाचून होतो तेव्हा आपली झोप उडालेली असते. स्वेतलाना ऍलेक्सोविच ही बेलारूसची लेखिका. पूर्वीच्या सोविएत यूनियनमध्येच होतं बेलारूस. स्वेतलानाला नुकतंच साहित्यातील नोबेल मिळालं. सोविएत यूनियनमधील राजकारण व तिथली माणसं. त्याचा आयुष्यभर अभ्यास केला तिनं. तेथील रक्तपात. तो तिला आयुष्यभर अस्वस्थ करत राहिला. या सगळ्यावर तिनं खूप लिहिलं. तिला हा पुरस्कार मिळाला तो तिच्या याच ‘नॉनफिक्शन’(वास्तववादी) लिखाणासाठी. तब्बल पन्नास वर्षांनी ’नॉनफिक्शन’ प्रकारात कुणालातरी नोबेल देण्यात आलं. यावरूनही तिच्या लेखणाचं महत्त्व लक्षात यावं. तिसरी क्रांती या ग्रंथातही हे सगळं येतंच. स्वेतलानानं तिच्या ग्रंथातून त्यातला भयानक मानवी संहार पुढं आणला. त्याचे दोन पिढ्यांवर झालेले त्याहून भयानक परिणाम. ते पुढं आणले. हे सगळं तिनं अधिक प्रकर्षानं पुढं आणलंअसं म्हणता येईल. तिचं हे सगळं साहित्य. ते चांगल्याप्रकारे मराठीत कधी भाषांतरीत होईल का?
तर साधुंच्या या ग्रंथात फक्त इतिहास दडलेला नाही. ती एक महान शोकांतिका सुद्धा आहे. एका अफाट देशातल्या मानवी आयुष्याची! ते एक महाकाव्य आहे! यातलाच एक महानायक होता लेनिन. त्याचं आयुष्यच वादळी होतं. त्याच्या घरातच एक वादळ उठलं होतं. तो दिवस होता दिनांक 8 मे 1887. या दिवशी रशियात पाच तरूणांना फासावर लटकवण्यात आलं. का? तर त्यांच्यावर गंभीर आरोप होते. काय आरोप होते? तर ‘झार’ राजवटीविरूद्ध कट रचल्याचे. या फासावर गेलेल्या पाच तरूणांत एक होता अलेक्झांडर. वीस वर्षांचा होता तो तेव्हा. कोण हा तरूण? तर तो लेनिनचा सख्खा मोठा भाऊ! लेनिनचं वय होतं तेव्हा सतरा. याच लेनिननं पुढं सगळा देशच हलवून सोडला. याला म्हणतात नियती! याला म्हणतात अस्सल महाकाव्य! त्यातल्या खर्‍या महानायकांची अस्सल आयुष्य!! पुढं सत्तेवर आला हाच लेनिन; मात्र साधाच होता तो शेवटपर्यंत. डोक्यात फक्त क्रांती! डोक्यात कुठलंही मंत्रिपद नाही. पंतप्रधानपद नाही. अध्यक्षपद नाही. विचार फक्त काय करत राहिला लेनिन? तर रशियातल्या विषमतेवर काय उपाय करता येतील हा. त्यासाठी त्याच्या देशातल्या अफाट लोकसंख्येला, तिच्या ऊर्जेला कुठं कसा मार्ग दाखवता येईल हा. ऑगस्ट 1918 मध्ये तर लेनिनवरच गोळीबार झाला. दोन गोळ्या शरीरात घुसल्या त्याच्या. एक हृदयाच्या वर फुफ्फुसात गेली व तिथंच रूतून राहिली. एक मानेला घासून गेली. हे कृत्य करणारी एक महिला होती. फानया काप्लान तिचं नाव. सोशल रिव्होल्युशनरी नावाचा एक पक्ष. त्या पक्षाच्या दहशतवादी गटाची सदस्य होती ती. झारच्या विरूद्ध काही तरूण दहशतवादाच्या मार्गानं लढत होते. हेच तरूण या सोशल रिव्होल्युशनरी पक्षाकडे खेचले गेले. झारच्या विरूद्ध ते लढत होते ते ठीक होतं; मात्र बोल्शेविकांनी यांचं काय घोडं मारलं होतं? मात्र हिंसक वृत्ती व द्वेष यांच नातं पार जवळचं. एक लक्षात घेतलं पाहिजे. बोल्शेविकांचा दहशतवादाला विरोध होता. लेनिनचं महानपण दिसतं इथं. सोशल रिव्होल्युशनवाल्यांना लागली होती हिंसेची चटक!! मग त्यांनी सत्तेवर आलेल्या बोल्शेविकांनाच लक्ष केलं. मात्र साधू म्हणतात तसा लेनिनच्या हत्येचा हा प्रयत्न. हे एकाकी कृत्य नव्हतं. त्यामागंमोठ्या कटाचा भाग असू शकत होता. लेनिनवर शस्त्रक्रिया झाली. फुफ्फुसातली गोळी बाहेर काढण्यात आली; मात्र कधी? तर तब्बल चार वर्षांनंतर. 1922 साली. तोपर्यंत ती हृदयाजवळच होती. हेही महानपणच त्या क्रांतिकारकाचं! मन मोठं त्याचं! त्यानं ती शत्रूची गोळी. ती चार वर्ष जणू हृदयाशी जपून ठेवली. त्या गोळीनं तिचं काम मात्र बजावलं. 1921 चा नोव्हेंबर महिना. गंभीर आजारी पडले लेनिन. दिनांक 25 मे 1922. पक्षाघाताचा झटका आला या दिवशी लेनिनना. शेवटी अवस्था वाईट होत गेली. दिनांक 21 जानेवारी 1924. लेनिननी अखेरचा श्‍वास घेतला या दिवशी. ‘जगातील अग्रणी क्रांतिकारक’ असं साधू वर्णन करतात लेनिनचं. लेनिनच्या हत्येचा 1918 साली झालेला तो प्रयत्न. त्यामुळं बोल्शेविकांचं सरकार खडबडून जागं झालं. छुप्या दहशतवाद्यांना तर जमावानंच मारलं. सामान्य जनता बोल्शेविकांच्याच पाठिशी होती. ‘‘रस्त्यावरचे लोक पूर्णपणे बोल्शेविकांच्या बाजूनं असल्याचा हा पुरावा’’ साधू म्हणतात. लेनिनचं हे बलिदानच होतं एका अर्थी; मात्र त्याआधी विकलांग अवस्थेतही हा माणूस गप्प बसला नाही. डिसेंबर 1922 ते मार्च 1923. लेखनिकांकरवी लेख व पत्र लिहिली लेनिननं या काळात. कशी होती या लोकनेत्याची विचारसरणी? लेनिनचं अंतिम टिपण फार बोलकं आहे. त्यात त्यांनी तीन सूचना केल्या होत्या. काय होत्या सूचना? तर संकुचित राष्ट्रवादाचा प्रतिकार करा. विशेषत: रशियन प्रतिगामी राष्ट्रवादाचा. ही पहिली सूचना. दुसरी सूचना होती, खार्चिक, अन्यायी व दमन करणारं प्रशासन नाकारा. तिसरी सूचना होती, स्टॅलिनला पक्षाच्या जनरल सेक्रेटरी पदावरून काढून टाका. आणखी एक मत होतं या टिपणात. काय होतं ते? तर रशियन जनतेला जागतिक बंधुभावाचं बाळकडू पाजलं पाहिजे. लेनिनच्या अंत:प्रेरणा. त्याबद्दल आणखी वेगळं भाष्य करायची गरज उरत नाही इथं. स्टॅलिनला काढून टाका असं का म्हणाले लेनिन? तर लेनिन आजारपणातही राजकारणावर लक्ष ठेवून होते. सहकार्‍यांच्या वागण्यावर लक्ष ठेवून होते. स्टॅलिन उद्धट होत चालला होता. महत्त्वाकांक्षी होत चालला होता. लेनिनला हे प्रचंड खटकलं होतं. तरीही त्याला पोलिट ब्युरोतून काढून टाका असं म्हणाले नाहीत लेनिन. मनाचा मोठेपणा शेवटच्या क्षणीही गमावला नव्हता त्यांनी. अखेरच्या टिपणात आणखी एक म्हणाले होते ते. ‘स्टॅलिन व ट्रॉटस्कीत सत्तासंघर्ष होईल’ हे ते मत. लेनिनचा ओढा ट्रॉटस्कीकडे होता हे खरंच. पक्षाचं सगळ्यात महत्त्वाचं पद. ते जनरल सेक्रेटरी पद. ते स्टॅलिनकडे. लेनिनला ते नको होतं. पक्षासाठी सुद्धा व कदाचित ट्रॉटस्कीसाठी सुद्धा. ट्रॉटस्की शेवटी जिवलग कॉम्रेड होता लेनिनचा. श्‍वेतसेनेविरूद्ध प्राणपणानं लढला होता तो! त्याची साम्यवादावरील श्रद्धा! त्याची तत्वनिष्ठा! या गोष्टी त्यानं केव्हाच सिद्ध केल्या होत्या. लेनिनचं व त्याचं नातंच विलक्षण होतं. कसं होतं हे नातं? तर लेनिन दिवसातून पंधरा-वीस वेळा ट्रॉटस्कीला फोन करत. विविध विषयांवर त्याच्याशी सल्लामसलत करत. ट्रॉटस्की वागायला सरळ. छक्केपंजे स्वभावात नव्हते त्याच्या. त्याचं मूळ नाव लेव दाविदोविच ब्रॉन्स्टीन. जन्म दिनांक 7 नोव्हेंबर 1879 चा. तो मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला. त्याचं बालपण. ते स्टॅलिनच्या बालपणासारखं खडतर नव्हतं; मात्र पहिल्यापासूनच तो चळवळ्या! बुद्धिमान! त्याचे वडील. फार श्रीमंत नव्हते ते; मात्र बर्‍यापैकी सधन शेतकरी होते. त्यांच्या शेतात शेतमजूर राबत. लेवला त्यांचे हाल बघवत नसतं. क्रांतिकारक वृत्तीचा कुठलाही तरूण. जगरहाटी जशीच्या तशी स्वीकारत नाही तो. स्वत:च्या बुद्धिला पटेल तेच करतो. बर्‍याचदा पहिलं बंड. ते त्याला स्वत:च्या घरात करावं लागतं. लेव घरात रमला नाही ते त्यामुळंच. शेतातल्या शेतमजूरांचं शोषण होतंय असं त्याला वाटे. त्यातून त्याचं  वडिलांशी पटेना. शाळेत असतानाच त्यानं काय केलं? तर मार्क्सवादाचा अभ्यास असणार्‍या तरूणांशी मैत्री केली. लेवचं नवनवीन ग्रंथांच वाचन होतं. वृत्तपत्रांचं वाचन होतं. वक्तृत्व सुंदर!! तो मार्क्सवादावर बौद्धिकंही घेई. ती ऐकायला कामगारांचे लोंढेच्या लोंढे येत. मिसरूडही फुटलं नव्हत त्याला; मात्र बुद्धी धारदार!! पहिला तुरूंगवास! तो कधी झाला त्याला? तर वयाच्या अठराव्या वर्षी!! सायबेरियातही तुरूंगवासात होता तो. तेव्हा त्याचं वय होतं एकवीस! वंशानं तो ज्यू. त्याचाही त्याला खूप त्रास झाला. ‘ज्यू’ असणं हा त्याकाळी जणू अपराधच. फक्त जर्मनीच नव्हे तर इतरत्रही ‘ज्यू द्वेष’ हा प्रकार होताच. रशियातही तो होताच. या वंशद्वेषाचा उल्लेखही ग्रंथात एके ठिकाणी वाचायला मिळतो. ट्रॉटस्कीचं ‘ज्यू’ असणं. स्टॅलिनच्या पथ्यावर पडलं तेही. खुनशी होताच स्टॅलिन. त्यानं ट्रॉटस्कीच्या ज्यू असण्याचं भांडवल केलं. हे करत स्वत:चं व्यक्तीस्तोमही माजवलं. लेनिनला मात्र व्यक्तिपूजेचा तिटकारा होता. पक्षात लेनिनची कोणी व्यक्तिपूजा करू पाहत असेल तर? तर लेनिनला ते अजिबात आवडत नसे. व्यक्तिस्तोम न आवडणारा तो लोकनेता होता. ट्रॉटस्कीही एकच बांधिलकी मानणारा. मार्क्सवाद! क्रांतीशी त्याचं जन्मजात नातं! ती नाळ त्यानं तुटू दिली नाही. अगदी त्याची हत्या झाली. त्यावेळीही त्याच्यातला क्रांतिकारक जिवंत होताच. कुणी केली ट्रॉटस्कीची हत्या? कुठे झाली ती? त्याचा तपशिलही ग्रंथात आला आहे. 1928 हे साल. त्या सालाच्या शेवटी ट्रॉटस्की विजनवासातच होता. देश सोडावा लागला होता त्याला. त्याकाळात त्याची मुलगी आजारानं मरण पावली. लेव व सर्जेई ही त्याची दोन मुलं. त्या दोघांचीही गूढ हत्या झाली. अन् मग 1940 साल उजडलं. या साली ट्रॉटस्कीचीही हत्या झाली. कुठं? तर मेक्सिकोत. या सगळ्या हत्या. त्या स्टॅलिननंच घडवून आणल्या. खरंतर एकाकी अवस्थेत होता ट्रॉटस्की. फक्त त्याची पत्नी नतालिया. ही शेवटपर्यंत त्याच्या सोबत होती. तरीही एकाकी ट्रॉटस्कीची स्टॅलिनला इतकी भीती वाटावी? त्याचं कारण होतं. ट्रॉटस्कीचं लेखन चालू होतं. स्टॅलिनवादातले धोके. ते तो स्पष्टपणे मांडत होता. ट्रॉटस्कीच्या लिखाणाचं सार एकच असे. स्टॅलिन साम्यवादी चळवळीला बदनाम करतो आहे. स्टॅलिनसारखा क्रूर हुकूमशहा! मग तो अस्वस्थ झाला नसता तरच नवल. कटू सत्य हे नेहमी दांभिकांनाच झोंबत का? म्हणूनच मग ते हिंसेवर येतात का?  तसंही हिंसा हे दांभिकतेचं सर्वात ठळक लक्षण!! मग ती शारीरिक असो वा मानसिक. स्टॅलिननं लक्षावधींच्या हत्या घडवून आणल्या.  त्याची सगळी वर्णनं. ती या ग्रंथात आहेत. ती काही स्टॅलिनची बदनामी नव्हे. ते एक सत्य आहे. आता स्टॅलिनचीही काही बलस्थानं नक्कीच होती. साम-दाम-दंड-भेद!! याबाबतीत तो ‘बाप’ माणूस! म्हणूनच तो दुसर्‍या महायुद्धात हिटलरला पुरून उरला. त्या विजयाचं श्रेय. ते स्टॅलिनच्या कर्तव्यकठोर नेतृत्वाचंच. ‘लोहा लोहे को काटता है’असा तो प्रकार. हे सांगताना साधू हातचं काही राखून ठेवत नाहीत; मात्र त्यानं वेळोवेळी घडवून आणलेला अमानुष हिंसाचार! तोही ते सांगतातच. ट्रॉटस्कीबद्दल स्टॅलिनला खुन्नस होतीच. त्यातूनच त्याआधीही ट्रॉटस्कीवर हल्ले झाले. दिनांक 24 मे 1940. या दिवशीही ट्रॉटस्कीवर हल्ला झाला. मेक्सिकोतील त्याचा बंगला. त्यात वीस-पंचवीस जण घुसले. बेसुमार गोळीबार केला. हल्लेखोर कोण होते? तर मेक्सिकन कम्युनिस्ट. कडवे स्टॅलिनवादी होते ते. इतक्या द्वेषाने का पछाडले होते ते? तर ट्रॉटस्कीबद्दल प्रचार करण्यात आलेला. अगदी जगभर. प्रचार अत्यंत विषारी होता तो! त्यातून ट्रॉटस्कीलाच मार्क्सविरोधी ठरवण्यात येत होतं. लेनिनविरोधी ठरवण्यात येत होतं. ट्रॉटस्की अशा हल्ल्यांना मात्र कधीही घाबरला नाही. मग हे हल्ले वैचारिक असो वा शारीरिक. साधू म्हणतात त्याप्रमाणं तो हाडाचा क्रांतिकारक होता. ट्रॉटस्कीच्या मते जागतिक साम्यवादाला कशाचा धोका होता? तर स्टॅलिनवादाचा; मात्र ट्रॉटस्कीचं दुर्दैव काय होतं? ते साधुंनी अचूक सांगितलं आहे. ‘‘त्याची बाजू ऐकून घेणारे फार कमी लोक तेव्हा जगात होते’’ साधू म्हणतात एकतर सोविएत यूनियनमधील सर्व सत्ता. ती स्टॅलिनच्या पायाशी लोळण घेत होती. जगभरातले कम्युनिस्ट. त्यांना स्टॅलिनच प्रिय होता. सत्तेचा हा गुणधर्म. ‘जिसकी लाठी उसकी भैंस!’ त्यात स्टॅलिनची प्रचारयंत्रणा. कशी होती ती? तर ‘गोबेल्स’च्या प्रचारयंत्रणेपेक्षा कुटील व घातकी होती. तसं ग्रंथातच म्हटलं आहे. सरळ वागणारा नेहमीच एकटा पडतो. त्याच्याविरूद्ध एकजात सगळे ‘नीच’ एकवटतात. मानवी आयुष्यातलं हे एक सत्य! अटळ सत्य! ट्रॉटस्कीच्या बाबतीत ते खरं ठरलं. दिनांक 20 ऑगस्ट 1940. घातवार असावा तो. त्या दिवशी पुन्हा हल्ला झाला ट्रॉटस्कीवर. कुर्‍हाडीचे घाव घालण्यात आले त्याच्यावर. घाव घालणारा होता मर्कादर नावाचा स्टॅलिनवादी. मर्कादरच्या दुष्टपणाची हद्द झाली. परिणाम एकच. दिनांक 21 ऑगस्ट 1940. त्या दिवशी ट्रॉटस्की या जगात नव्हता. हे सगळं घडलं तेव्हा नतालिया घरातच होती. तिच्या समोर हा भीषण प्रकार घडला. काय वाटलं असेल तिला? ट्रॉटस्कीला जीवाचं रान करताना पहात होती ती. बरोबर स्वत:चं ग्रंथालय घेऊन फिरत असे ट्रॉटस्की. लिहिताना अनेकदा समाधी लागत असे त्याची. सगळ्या सुखांवर पाणी सोडलं होतं त्यानं. मार्क्सवाद व रशियन राज्यक्रांती. त्यावर अनेक ग्रंथ लिहिले होते त्यानं. नतालिया हे पहात होती. मर्कादरचे घाव जणू तिच्या काळजावर बसले होते. असे भोग अनेक सच्च्या कम्युनिस्ट क्रांतिकारकांच्या वाट्याला आले त्याकाळात. ट्रॉटस्की हा तर लेनिनच्या उंचीचा क्रांतिकारक. त्याचं एकही चरित्र मराठीत नाही. त्याच्या एकाही ग्रंथाचं उत्तम मराठी भाषांतर नाही हेही विषयाच्या ओघात सांगितलेलं बरं.
साधुंची लेखणी पुढं सटॅलिनच्या सत्तेची कहाणी सांगते. ‘‘स्टॅलिन दांडगट होता; मात्र त्याची क्रांतिकारी जिद्द प्रखर होती’’ साधू म्हणतात. स्टॅलिन कठोर होता. निर्दयी होता; मात्र त्याची इच्छाशक्ती!  ती अत्यंत जबरदस्त! प्रश्‍नच नाही! त्यातून त्यानं एक निर्णय घेतला. सोविएत यूनियनमधील सर्व शेती सरकारी मालकीची करण्याचा. पॉलिट ब्युरोचं शिक्कामोर्तब झालं यावर. तो होता 1930 चा जानेवारी महिना. ‘‘बड्या शेतकर्‍यांचा वर्गच समूळ नष्ट केला पाहिजे’’ स्टॅलिनचं हे मत. ते त्यानं कठोरपणे अंमलात आणलं. बड्या शेतकर्‍यांना ‘कुलक’ म्हणत. अशा शेतकरी कुटुंबांची संख्या. ती होती वीस लाख. यातून एकच गोष्ट घडणार होती. रक्तपात! किती भयानक होता तो? तर जुने बोल्शेविक हादरून गेले. त्यांच्या नीतिधैर्याची वाट लागली. त्या भयंकर आठवणी. काहीजणांच्या मानगुटीवर स्वार झाल्या त्या. आयुष्यभर त्यांना छळत राहिल्या. लालसेनेचे काही अधिकारी. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं. अनेक कुलक सरळ मारलेच गेले; मात्र याची दुसरी बाजू. मोठी विलक्षण आहे ती! साधुंनी ती सांगितली आहे. काय मत होतं स्टॅलिन समर्थकांचं? ते म्हणत, स्टॅलिनचा यात वैयक्तिक काय फायदा होता? त्यानं हे रशियन जनतेसाठी केलं. साम्यवादी समाज निर्माण करण्यासाठी केलं. इतकंच नव्हे तर अनेक शेतकरी. त्यांनीही स्टॅलिनला पाठिंबा दिला. कोण होते ते? तर या शेतीच्या सामायिकीकरणाच्या प्रयोगात त्यांचीही वाट लागली होती; मात्र त्यांनाही वाटत होतं ते तेच. अन्याय नकोय ना? विषमता नकोय ना? दारिद्रय नकोय ना?  पिळवणूक नकोय ना? साम्यवाद आणायचा आहे ना? मग स्टॅलिनचं चुकलं तरी काय? या मोहिमेला ट्रॉटस्कीचा पाठिंबा होता हे विशेष!  या प्रयोगाचा वाईट परिणाम काय होता? तर 1931 व 1932. या दोन वर्षातली पिकं कोसळली. दुष्काळ पडला. लाखो शेतकरी विस्थापित झाले. अन्न -अन्न करत माणसं मेली. टाचा घासून मेली. किती माणसं बळी पडली? तर त्याचे अंदाज दहा लाख ते पन्नास लाखापर्यंतचे आहेत; मात्र सामायिकीकरण पूर्ण झालं, त्यानंतर काय घडलं? तर शेतीची मध्ययुगीन पद्धत गेली. पारंपारिक जुनी अवजारं गेली. टॅ्रक्टर्सचा तांत्रिक जमाना आला. प्रचंड सामायिक शेतं उभी राहिली एका बाजूला. दुसर्‍या बाजूला तांत्रिक शिक्षणाची केंद्रं उभी राहिली. यंत्रदुरूस्ती केंद्रं उभी राहिली. ट्रॅक्टर्सचे ताफे सामायिक शेतातून फिरू लागले. ग्रामीण भागाचा चेहरा बदलला. दुसरीकडे स्टॅलिनने पंचवार्षिक योजना आणली. औद्योगिकीकरणाचा वेग. तो त्यानं तुफान वाढवला. कोळशाचं उत्पन्न वाढवलं. तेलाचं उत्पन्न वाढवलं. वीजेचं उत्पन्न वाढवलं. पोलादाचं उत्पन्न वाढवलं. अफाट ुउत्पादन! त्याचे आकडे ग्रंथात आहेत. त्यातून रशियाभर बांधकामं ुउभी राहिली. नवी शहरं उभी राहिली. दीड हजार जड उद्योग. ते स्टॅलिनला उभे करायचे होते. प्रचंड कारखाने बांधायला सुरूवात केली त्यानं त्यासाठी. या सगळ्यासाठी राबत होतं कोण? तर लक्षावधी सोविएत यूनियन जनता! सतरा कोटींचा हा देश होता तेव्हा. कम्युनिस्टांनी सगळा देशच हलवून सोडला होता.
लेनिन वारला. चोपन्न वर्षांचा होता तो तेव्हा. नंतरचा काळ हा सगळा स्टॅलिनचाच. स्टॅलिनचं सार्वजनिक आयुष्यच वादळी सगळं! मग अशा माणसांची खाजगी आयुष्यं? ती तरी स्थिर कुठली असायला?  साधुंनी या क्रांतिकारकांची कौटुंबिक आयुष्यंही सांगितली आहेत. 1932 साल होतं ते. स्टॅलिननं सगळा देश मुठीत ठेवला होता तोपर्यंत! अन् त्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ उठलं. त्याची पत्नी नादेइदा अलेलूमेवा उर्फ नादिया. काय करावंतिनं? तर आत्महत्या! आता ही आत्महत्या की हत्या? इथपासून छुपी चर्चा सुरू झाली. स्टॅलिनची दहशत त्यावेळी भयानक!! नंतरच्या काळात काही लेखकांनी शोध घेतला. नादियाच्या मृत्युचा. नेमकंकाय झालं? वेगवेगळे अंदाज केले गेले त्याबद्दल. स्टॅलिननं तिचा सर्वांसमक्ष अपमान केला होता का? म्हणून ती दुखावली गेली? स्टॅलिनचे काही स्त्रियांशी संबंध होते? त्याचा हा परिणाम? मात्र ते तरी खरं होतं का? स्टॅलिन खरंच बाहेरख्याली होता का? समजा असला तरी कसं ठरवायचं? ते किती नैतिक किती अनैतिक ते? आता लेनिनचीही प्रेमप्रकरणं झालीच की. त्याची चर्चा आली आहे एका मराठी ग्रंथात. ‘व्होल्गा जेव्हा लाल होते’ हा तो ग्रंथ. लेखक वि. स. वाळिंबे. नादियाच्या मृत्युबद्दल एक अंदाज आहे. तो मात्र सत्याच्या जवळ जातो. स्टॅलिन शेवटी सत्ताधारी होता. अत्यंत कठोर होता. निर्दयी होता. त्याच्याकडून रक्तपात होत होता. हत्या होत होत्या. भलेही हे सगळं साम्यवादाच्या नावाखाली होत असेल; मात्र नादिया त्यामुळं अस्वस्थ होत होती. तिची घुसमट होत होती. बरं, आणखी काही गोष्टी होत्या. तिचे वडील. ते स्वत: कामगार होते. नादीया स्वत: बोल्शेविक कार्यकर्ती होती. बोल्शेविक क्रांती! त्यात नादियानं स्वत: सहभाग घेतलेला. अतिशय सुंदर व संवेदनशील स्त्री! तिचं असं वर्णन या ग्रंथात आहे. तिचा मृत्यू. हा तिच्या घुसमटीचा परिणाम असण्याचीच शक्यता जास्त. स्टॅलिनचे व तिचे संबंध. त्याबद्दल साधू एक विलक्षण वाक्य लिहितात. ‘‘नादिया तिच्या संवेदनशील जगात रहात होती व स्टॅलिन त्याच्या कठोर विश्‍वात’’ साधू म्हणतात. वि. स. वाळिंबेंचा अजून एक ग्रंथ आहे. ‘स्टॅलिनची मुलगी’. त्यातही हा विषय आला आहेच. त्यात रोझा कोगोनोविच या स्त्रीचा उल्लेख आहे. तिचा दवाखाना होता. ही स्त्री स्टॅलिनच्या आयुष्यात आली होती. कधी? तर नादियाच्या मृत्युनंतर. पुस्तकात तसं स्पष्ट म्हटलंय. मात्र अजून एक म्हटलंय. या दोघांच्या मैत्रीचं स्वरूप कसं आहे हे म्हणे कुणालाच सांगता येत नव्हतं. इथं एक गंमत होती. रोझा ज्यू होती. स्टॅलिन होता ज्यू द्वेष्टा; मात्र स्टॅलिनसारखा रांगडा व रासवट सत्ताधारी. त्याला काय फरक पडत होता? तसंही जगभरातल्या पुरूषांना एक म्हण लागू पडतेच, ’दिल आया आप पे तो परी क्या चीज है!’
स्टॅलिनच्या कारकिर्दीतील ’सफाई पर्व’ प्रकरण. तेही खूप भयानक होतं. कडव्या कम्युनिस्टांचं एक ठरलेलं असतं. आपलेच पक्ष सहकारी. त्यांची हे हत्या करतात. त्याचं कारण काय सांगतात? तर आम्हाला पक्षाचं शुद्धिकरण करायचं होतं. स्टॅलिनच्या काळातही हे झालंच. खूप निघृणपणे झालं. त्याची अनेक वर्णनं ग्रंथात आहेत. नादिया त्याआधीच वारली बिचारी. नंतरचा हा रक्तपात! तो पाहूच शकली नसती ती. ग्रंथात या संदर्भात दोन प्रकरणं आहेत. एक आहे ’हत्याकांड सूरू झाले.’ दुसरं आहे ’स्टॅलिनचं संहारसत्र.’ या सगळ्याला सुरूवात झाली ती एका हत्येपासून. सर्जेई मिरोनोविच किरोव. कोण होता हा? तर हा होता कम्युनिस्ट पक्षाच्या पोलिट ब्युरोचा सदस्य. मध्यवर्ती समितीचाही सेक्रेटरी. शिवाय पक्षाच्या लेनिनग्राड समितीचा प्रथम सेक्रेटरी. त्याची हत्या झाली. किरोव हा स्टॅलिनचा लाडका कार्यकर्ता; मात्र स्टॅलिनचा स्वभावच चमत्कारिक! संशयाचं पिशाच्च! ते एकदा का मानगुटीवर बसलं की मग स्टॅलिन कुणाचाच राहत नसे. त्याच्या जवळ असणारे त्याचे सहकारी. त्याच्याशी एकनिष्ठ असलेले. त्यांच्या  जीवालाच सर्वाधिक धोका असे. कुणाकडून? तर खुद्द स्टॅलिनकडूनच. विश्‍वास बसत नाही; मात्र त्याचे असे अनेक सहकारी मारले गेले. कुणाकडून? तर स्टॅलिनकडूनच. अत्यंत थंड डोक्यानं केलं त्यानं हे सगळं! थंड क्रौर्य! क्रुश्‍चेव्हसारखे काही सहकारी. ते मात्र वाचले बिचारे. स्टॅलिनचं हे हत्यासत्र. ते नंतर क्रुश्‍चेव्हनं उघडकीला आणलं. किरोवची हत्या. क्रुश्‍चेव्हच्या मते तीसुद्धा स्टॅलिननंच घडवून आणली होती. सोवियत युनियनमध्ये त्यानंतर हजारो कार्यकर्ते मारले गेले. कम्युनिस्टच होते की ते सगळे; मात्र त्यांचा दोष काय? तर स्टॅलिनला त्यांच्याबद्दल संशय वाटला. त्यांच्या ’मार्क्सवादी’ असण्याबद्दल संशय! मग कुणाला ’ट्रॉटस्कीवादी’ ठरवण्यात आलं. कुणाला ’क्रांतीचे शत्रू’ ठरवण्यात आलं. कुणाला ’ब्रिटिशांचे हेर’ ठरवण्यात आलं. कुणाला ’साम्राज्यवाद्यांचे कुत्रे’ ठरवण्यात आलं. कुणाला ’भांडवलदारांचे चमचे’ ठरवण्यात आलं. कुणाला ’फुटीरवादी’ ठरवण्यात आलं. फुटीरवादी का? तर त्यांनी म्हणे युक्रेन हा प्रांत तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बेलोरशिया तोडण्याचा प्रयत्न केला. पूर्व सायबेरिया तोडण्याचा प्रयत्न केला. सगळा सोवियत युनियनच तोडण्याचा प्रयत्न केला. दोन वर्षात अशा हजारो कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. 1936 ते 1938. हा तो काळ. हत्या म्हणजे काय? तर ’सरकारी हत्या’ म्हणता येईल याला. कसलं ’सफाईपर्व’ होतं हे? खरंतर ते ’हत्यापर्व’ होतं. साम्यवादी चळवळीच्या नावाखाली झालेलं. अन् त्यात मारलं गेलं कोण? तर सच्चे साम्यवादी कार्यकर्तेच! कोण कोण मारलं गेलं याच्यात? तर 1917 चा उठाव. त्यात कित्येक क्रांतिकारक सहभागी झालेले. त्यातले बरेचजण. ते या सफाईपर्वात मारले गेले. बरं, यात मारले गेलेले कम्युनिस्ट. ते सगळे कडवे फॅसिस्टविरोधी होते. नाझीविरोधी होते. मुसोलिनी हा इटलीचा फॅसिस्ट हुकूमशहा. काय म्हणला तो तेव्हा? ’’स्टॅलिन फॅसिझमची सेवा करतो आहे. फॅसिझम विरोधकांना ठार मारून.’’ मुसोलिनीचं हे वाक्य. त्यातून एकच जाणवतं. मदतच होती ही स्टॅलिनची फॅसिस्टांना. ती कशी? तर कार्यकर्त्यांच्या अशा बेछूट हत्या! सोवियत युनियन कमकुवत होत होता त्यामुळं. दुसरीकडं जर्मनी प्रबळ होत होता. तिथले फॅसिस्ट उतमातच करत होते. खरंतर फॅसिस्ट काय किंवा स्टॅलिनवादी काय? सारखेच होते की ते! फरक काय होता त्यांच्यात? स्टॅलिनचा एक धूर्त डाव काय होता? तर त्याला पूर्व युरोपची वाटणी करायचीच होती. कुणाबरोबर हातमिळवणी करून? तर याच नाझींबरोबर. नंतर पोलंडचे लचके तोडलेच त्यानं. तर स्टॅलिनही त्याचं राजकारण शिजवत बसला होताच. करायलाही हरकत नव्हती ते. साम्राज्यवाद्यांचं राजकारण. त्याला कोणीतरी उत्तर देणारं हवं होतंच; मात्र सोन्यासारखे आपलेच कार्यकर्ते. तेच मारले त्यानं. शिवाय तो वागला कसा? तर साम्राज्यवादी वाईट की हा वाईट? तसा प्रश्‍न पडावा. ’’जंगलतोड व्हावी तशी सफाईपर्वात कार्यकर्त्यांची छाटणी झाली’’ अरूण साधू म्हणतात. दरम्यान ट्रॉटस्की इशारे देतच होता. त्याच्या मते हिटलरच्या उदयाला स्टॅलिनच जबाबदार होता. जर्मनीच्या कामगार चळवळीतही तेव्हा फूट पडली होती. जर्मनीतला कम्युनिस्ट पक्ष. तो एकाकी पडला. हिटलरनं तिथल्या कम्युनिस्टांवरही मात केली. हे स्टॅलिनमुळं झालं हा ट्रॉटस्कीचा आरोप. स्टॅलिननं आदेश दिले होते. काय? तर जगभरातल्या समाजवाद्यांना नेस्तनाबूत करण्याचे आदेश. त्यामुळंच जर्मनीतली कामगार चळवळ दुभंगली. हा आरोप ट्रॉटस्कीचा. अर्थात नंतर स्टॅलिन हिटलरला पुरून उरला. राजकारणातही व युद्धातही;  मात्र या दोघांचे युद्धातले डावपेच. भयानक होते ते!  आपापल्या देशातल्या सैनिकांच्या जीवाची पर्वाच नव्हती त्यात. दोघंही क्रूर व लबाडच होते. राजकारण हा ’बदमाषांचा अड्डा’ झाला दोघांमुळं. त्यांच्या त्यांच्या देशात. बदमाषांना ’माणुसकी’ हा प्रकार माहित नसतो. खोटारडेपणा हे तर बदमाषांचं अत्यंत ठळक लक्षण! दोघांच्याही राजकारणात हा खोटेपणा आहे. एकानं वांशिक राष्ट्रावादाच्या नावाखाली केला तर दुसर्‍यानं जागतिक साम्यवादाच्या नावाखाली. आता राजकारण खेळण्यात ’बाप’ होते दोघंही! त्याबद्दल मात्र शंका नाही! हिटलरनं रशियावर केलेलं आक्रमण! त्यानं जग हादरून गेलं! स्टॅलिन तेव्हा बेसावध होता. त्याचा बराच तपशील ग्रंथात आला आहे; मात्र नंतर तो सावध झाला. भानावर आला. चोवीस तास मग त्यानं युद्धाची सूत्रं हलवली. युद्ध आघाडीला पश्‍चिम रशिया व युक्रेन जवळ होता. तिथं प्रचंड कारखाने होते. किती? तर दीड हजार!! अनेक विद्यापीठं होती. संशोधन संस्था होत्या. त्या स्टॅलिननं पूर्वेला हलवल्या. कुठं? तर व्होल्गा खोर्‍यामध्ये, उरल प्रदेशात व सायबेरियात. प्रचंड मोठी अवजड यंत्रं! ती हलवली. त्यांचे सुट्टे भाग हलवले. लाखो कामगारांच काय? तर त्यांनाही हलवलं. त्यांच्या कुटुंबियांनाही हलवलं. ही सगळीच वाहतूक कशी केली? तर रेल्वेनं. स्टॅलिनची तडफ दिसते अशा प्रसंगात! नोव्हेंबर 1941. नाझी सैन्य कुठं होतं या महिन्यात? तर मॉस्कोपासून अवघ्या वीस ते तीस मैलांवर! मात्र स्टॅलिन मागं हटला नाही. युद्धाचे सगळे बारीकसारीक तपशील. सगळ्यावर त्यानं डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलं; मात्र वर उल्लेख आला तसा स्टॅलिनची युद्धनीती. ती अत्यंत निर्दयी होती. युक्रेनची राजधानी कीव्ह. तिला जर्मनीचा वेढा बसला. योग्य वेळी माघार घेईल तो स्टॅलिन कसला? त्याला तर ’कीव्ह’ लढवायचंच होतं. तेही एकही इंच माघार न घेता; मात्र त्याचे परिणाम भयंकर होते. एका क्षणी त्यानं माघार घेतली; मात्र तोपर्यंत काय झालं? तर हजारो माणसं त्या वेढ्यात मारली गेली. सोविएत  सैन्याची लांडगेतोड झाली. अनेक लष्करी अधिकारी. अनेक राजकीय अधिकारी. ते मारले गेले. दुसरं महायुद्ध! हा काही सामान्य विषय नाही. त्यात जर्मनी व रशियातील युद्ध! आपण नुसती कल्पनाही करू शकत नाही. कशाची? तर त्यातल्या रक्तपाताची! किती सैनिक मारले गेले असतील दुसर्‍या महायुद्धात सोविएत युनियनचे? ग्रंथाच्या पान क्रमांक दोनशे पन्नासवर हा आकडा आला आहे. किती? तर दोन कोटी!! आता ही संख्या नागरिक व सैनिक दोघांची मिळून असावी. जिज्ञासूंनी त्यासाठी इतर संदर्भग्रंथ पहावेत. या संख्येबद्दल कदाचित मतभेद असू शकतात; मात्र सोविएत रशियन जनतेचा हा सगळा त्याग! त्याबद्दल मतभेद कसे असू शकतील? त्याचकाळात गाजली ती आणखी एक लढाई. त्याचीही वर्णनं ग्रंथात आली आहेत. फार विस्तारानं नाहीत आलेली ती; मात्र  अत्यंत प्रभावी लिहिलंय साधुंनी त्याबद्दल. त्या संदर्भात साधू एका कादंबरीचा उल्लेख करतात. ‘लाईफ अँड फेट’ ही ती प्रचंड कादंबरी! स्टॅलिनग्राडच्या वेढ्यावरची! लेखक कोण? तर वॅसिली ग्रॉसमन. आहे का या ग्रंथाचं तरी उत्तम मराठी भाषांतर? भाषांतरासाठी असे विषय सुचतील तर ना! आडात नाही तर पोहर्‍यात कुठून येणार? वाचकांनी वर्णन वाचावं. साधुंनी केलेलं. स्टॅलिनग्राडच्या या लढ्याचं. स्टॅलिनग्राडमधलं प्रत्येक घर! प्रत्येक माणूस! प्रत्येक कामगार! स्त्री-पुरूष! सगळे लढलेत नाझींविरूद्ध! ‘लाईफ अँड फेट’ बद्दल काय म्हणतात साधू? ‘‘या कादंबरीतील वर्णनं उत्कट, अंगावर काटा आणणारी आणि सामान्य रशियन जनतेच्या अफाट माणुसकीचं दर्शन घडवणारी आहेत.’’ स्टॅलिनग्राड हे पूर्वीचं झारित्सिन शहर. व्होल्गा प्रदेशातलं. तिथं घडलेलं हे महाकाव्य! ते आलं पाहिजे उत्तम मराठीत. यत्किंचित वेळ न दवडता. मुळात भाषांतर हा दुय्यम वाड्मय प्रकार नाही. तसा तो मानता कामा नये. तो श्रेष्ठ दर्जाचा वाड्मय प्रकार आहे. फक्त एक मुद्दा आहे इथं. माराठीत येणारं असं भाषांतर. ते थोडंसुद्धा फसता नाही कामा. न  पेक्षा ते न आलेलं बरं. दोस्तोयवस्की हा सुप्रसिद्ध रशियन कादंबरीकार. त्याची जगभर गाजलेली कादंबरी. ‘क्राईम अँड पनिशमेंट.’ मराठीत भाषांतर आलं आहे तिचं; मात्र हातात धरवत नाही ते भाषांतर. आणखी एक जगप्रसिद्ध कादंबरी. ‘गॉन विथ द विंड.’ लेखिका मार्गारेट मिशेल. मराठीत याचंही भाषांतर आहे; मात्र एक पान वाचवत नाही. कसं होणार? ‘तिसरी क्रांती’ सारखे ग्रंथ. असे ग्रंथ ही एक संधी असते. त्या विषयावरच्या आणखी ग्रंथांचं भाषांतर मराठीत आणण्याची. अशा उत्कृष्ट भाषांतराचं भांडार असलं पाहिजे मराठीत. त्यातून मराठी साहित्याला प्रेरणा मिळेल. नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल. कवींना कवितांसाठी विषय मिळतील. वाचकांच्या जाणीवा वाढतील. त्या भिकार राहणार नाहीत. आपल्या कादंबरीकारांच्या अस्सल देशी जाणीवा. त्याही वाढतील. नाटकी, प्रचारकी व खोटा राष्ट्रवाद. त्यातले धोके कळतील. नाहीतर मग आहेच आपलं ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘पूर्वरंग’ नाहीतर गेलाबाजार ‘मृत्यूंजय’. अगदीच डोक्यावरून पाणी गेलं तर ‘एक होता कार्व्हर’. अन् पाणी जास्तच डोक्यावरून गेलं तर? तर ‘मुसाफिर’. ‘एक होता कार्व्हर’ वाचून तर अनेकांची आयुष्यं सार्थकी लागली आहेत. उदात्त सुखांचा ध्यास नको. उदात्त दु:खांचा ध्यास नको. उदात्त यातनांचा ध्यास नको. स्वत:ला अस्वस्थ व त्याचवेळी उन्नत करणारं जगभरातलं साहित्य. त्याचा ध्यास नको. अशांच्या हातात ‘लाईफ अँड फेट’ कशी दिसणार? एक होता लेनिन, एक होता मार्क्स, एक होता गांधीबाबा, एक होता ट्रॉटस्की, एक होता मंडेला, एक होता चे गव्हेरा. याचं भान सुटून उपयोग आहे का? अर्थात हे सगळं वाचल्यावर पुढं काय? तो प्रश्‍न असतोच. आता तो सोडवणं कठीण नसतं फारसं. काय स्वीकारायचं ते वाचक ठरवत जातो. काय नाकारायचं ते ठरवत जातो. मानवी मूल्य स्वीकारायची की हिंसा? असे प्रश्‍न पडतातच. हिंसा काही वेळा अपरिहार्य असते का? असेही प्रश्‍न पडतातच. ही प्रश्‍नोत्तरं. ती वाचकाची जडणघडण करतात. त्याला माणूस बनवतात. निरर्थक हिंसा नाकारण्याची नैतिक ताकद. ती त्याला देऊ पाहतात. फक्त रंजनप्रधान साहित्यात असते का ही ताकद? तर अजिबात नसते. एकाच शब्दात असते ती ताकद! सत्य! अन् सत्य पचवणं सोपं नसतं. ते दाहक असतं. कटू असतं. जालिम असतं. काहीवेळा सुखद व आनंददायीही असतं. हे सगळं सत्य. ते पचवत जाणं महत्त्वाचं. ‘तिसरी क्रांती’ या ग्रंथातही अशी अनेक सत्य आहेतच.
असंच एक भीषण सत्य. साधू ते सांगतात. ‘ऑपरेशन स्प्लिंटर फॅक्टर!’ काय प्रकार होता हा? वाचकांनी तो मुळातून वाचावा. नीट अभ्यासावा; मात्र इथं त्याचा थोडातरी उहापोह गरजेचा. आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा साम्राज्यवादी राजकारण. माणसांच्या जीवाची काही किंमत नसते त्या राजकारणाला. स्प्लिंटर फॅक्टर हा असाच प्रकार होता. पूर्व युरोपात तेव्हा कम्युनिस्टांचाच बोलबाला होता. ‘राष्ट्रवादी कम्युनिस्ट’ असाच त्यांचा उल्लेख लेखक करतो. राष्ट्रवादी हा शब्द. तो इथं संकुचित अर्थानं घेता येत नाही. त्याचा खरा अर्थ काय? तर प्रागतिक! उदारमतवादी! बुद्धिवादी! निस्वार्थी! तर असे कम्युनिस्ट सत्तेवर होते पूर्व युरोपात. कुठं कुठं? तर पोलंडमध्ये होते. हंगेरीत होते. बल्गेरियात होते. झेकस्लोव्हाकियात होते. रूमानियात होते. पूर्व जर्मनीत होते. स्वातंत्र्य व साम्यवादी चळवळ. या दोन गोष्टींसाठी आयुष्याचा होम केलेली ही माणसं! नाझींशी लढलेली! दुसरं महायुद्ध संपलं. मग हे कम्युनिस्ट सत्तेवर आले; मात्र राजकारण निष्ठूर असतं. काय कारस्थान शिजलं? त्या सगळ्या राष्ट्रवादी कम्युनिस्टांविरूद्ध? तर स्टॅलिनच्या मनात विष कालवण्यात आलं. कुणाबद्दल? तर याच कम्युनिस्टांबद्दल. हे होतं संशयाचं विष! तेव्हा स्टॅलिन फक्त सोविएत युनियनचंच राजकारण करत नव्हता. तो पूर्व युरोपातही राजकारणातले डावपेच लढवत होता. त्यातून वरील राष्ट्रांमध्ये रशियन हेर वावरत होतेच. त्यांनी केवळ संशयावरून या सत्ताधारी कम्युनिस्टांकडे बोट दाखवलं. त्यातून या सगळ्या पूर्व युरोपीय देशात भूकंपच झाले. हे नेमकं सांगायचं तर काय होतं? तर युरोपातील ‘सफाईपर्व!’ पुन्हा अटका! कारागृह! फायरिंग स्क्वॉड!! हजारो सच्चे कम्युनिस्ट कार्यकर्ते. ते ठार झाले. रक्ताचे पाट वाहिले. हे सगळं कुणी घडवून आणलं? तर अमेरिकेनं. त्याचा मुख्य सूत्रधार कोण होता? तर अलन डलेस. हा अमेरिकेच्या गुप्तहेर विभागात होता तेव्हा. त्यानं आणलेली ही योजना! ऑपरेशन ‘स्प्लिंटर फॅक्टर’! आंतरराष्ट्रीय राजकारण कसं असतं? तर ते दिसतं तसं नसतं इतकंच म्हणता येईल. लेखकानं इथं हे सगळं विस्तारानं सांगितलं आहे. हे सांगण्याआधी लेखक सांगतो पोलंडमधल्या उठावाची कहाणी. दुसर्‍या महायुद्धातला हा उठाव! पोलिश जनतेनं केलेला. कुणाविरूद्ध? तर नाझींविरूद्ध! हिटलरच्या सैनिकांविरूद्ध! तो दिवस होता दिनांक 1 ऑगस्ट 1944. दोन महिने लढलं ‘वॉर्सा’ हे शहर! पोलंडची राजधानी असलेलं हे शहर; मात्र स्टॅलिननं इथं काय करावं? तर अत्यंत निघृण विश्‍वासघात!! कुणाचा? तर वॉर्सातील या लढवय्या जनतेचा! परिणाम? परिणाम एकच! नाझींकडून वॉर्सातील लढवय्या कार्यकर्त्यांचा ‘कत्लेआम‘ झाला! तिथल्या गल्लीबोळात प्रेतांचा खच पडला. दोन लाख पोलिश नागरिक! ते मारले गेले या शहरात! स्टॅलिननं काय केलं इथं? ते वाचकांनी मुळातूनच वाचावं.
पुढं या ग्रंथात नंतरचा काळ येतो. दुसर्‍या महायुद्धानंतरचा. लेखक मग मिखाईल गोर्बाचेव्हबद्दल सांगतो. ते ऐंशीचं दशक. मिखाईल गोर्बाचेव्ह. हा माणूस सत्तेवर आला. त्यानंतर काय काय घडलं? तो सगळा इतिहास! तो सुद्धा चक्रावून टाकणारा आहे. चांगल्या अर्थानं चक्रावून टाकणारा. गोर्बाचेव्ह हा गांधीजींच्या तोडीचा महापुरूष! प्रश्‍नच नाही! अरूण साधू त्यांना ‘महामानव’च म्हणतात. सत्तेवर गोर्बाचेव्ह आले. कशी होती त्यांच्या सत्तेची सुरूवात? तर ती सावध होती. चाणाक्ष होती. कठोर होती व प्रसिद्धीविन्मुख सुद्धा! अरूण साधू असं नेमकं वर्णन करतात. काय होता गोर्बाचेव्ह यांचा निर्धार? त्यांचा दृष्टिकोन? त्यातून पुन्हा किती उलथापालथी घडल्या? ते वाचकांनी वाचलंच पाहिजे; मात्र या उलथापालथी अहिंसक होत्या. त्यातून जगभर भूकंप झाले; मात्र तेही अहिंसक! पूर्वीचे सत्ताधारी. त्यांच्यापेक्षा खूप वेगळे होते गोर्बाचेव्ह. ‘‘ मला ‘कम्युनिझम’चा मानवी चेहरा जगापुढं आणायचा आहे’’ ते म्हणत. त्यात ते यशस्वी झाले का? खरंतर यात गोर्बाचेव्ह यांचाच मानवी चेहरा समोर आला. स्टॅलिनचा काळ. नुसताच रक्तपात नाही झाला तेव्हा, तर रशियातील बौद्धिक वातावरण. ते घुसमटून गेलं होतं. तिथली वृत्तपत्रं व साहित्यव्यवहार. काही वाव नव्हता त्यांना स्टॅलिनच्या काळात. स्टॅलिन वारला. मग हे साहित्यव्यवहार सुरू झाले. स्टॅलिननंतर सत्तेवर आला निकिता क्रुश्‍चेव्ह. अफाट ऊर्जेचा माणूस! स्टॅलिनचं हत्यासत्र. त्यातून हाच तेवढा वाचला. बालपणी क्रुश्‍चेव्हच्या वाट्याला आल्या होत्या चारच गोष्टी. दारिद्रय! भूक! उपासमार! अन् काबाडकष्ट! हीच परिस्थिती गोर्बाचेव्हचीही होती. सोविएत युनियनमधील सामायिक शेती. तिथं बारा-बारा तास कष्ट उपसले होते गोर्बाचेव्हनं त्याच्या बालपणी.  गावात  ’मशीन ट्रॅक्टर केंद्र’ असत. तिथं गोर्बाचेव्ह काम करत. कंबाईन ऑपरेटर म्हणून. भरलेल्या शेतातलं पीक कापावं लागे. त्याचे दाणे बाजूला करण्याचं मशीन असे. प्रचंड मशीन! हे मशीन गोर्बाचेव्ह चालवत. सततचे दुष्काळ व दुसरं महायुद्ध. त्यातली मनुष्यहानी भीषण होती. बारा ते सोळा वर्षातील शाळेतील मुलंमुली. त्यांना शेतात काम करावं लागे. कारखान्यात काम करावं लागे. सक्तीनं करावं लागे. अर्थात वर्षातून ठराविक वेळाच असत त्याच्या; मात्र त्यात कुचराई चालत नसे. परिस्थिती कशी होती? तर शाळा सुरू होत नसत पीक निघाल्याशिवाय. तर मुद्दा असा, क्रुश्‍चेव्ह व गोर्बाचेव्ह. दोघांनी सकारात्मक कामांवर भर दिला. आपलं बालपण करपलं म्हणून समाजावर सूड उगवत बसले नाहीत ते. सगळी सत्ता त्यांच्या पायाशी लोळण घेत होती. त्याची हवा डोक्यात जाऊ दिली नाही त्यांनी. गोर्बाचेव्ह यांच्या बाबतीत तर हे ठामपणे सांगता येईल. आता क्रुश्‍चेव्हचं मोठेपण कुठं आहे? तर त्यानं मॉस्को शहराची पुनर्बांधणी केली. मॉस्कोची जगप्रसिद्ध भुयारी रेल्वे. तिचं काम त्यानं मार्गी लावलं. रशियातलं त्यावेळचं सर्वोच्च ‘लेनिन’ पारितोषिक ते मिळालं त्याला या कामाबद्दल. दिनांक 24 फेब्रुवारी 1956ची रात्र. रशियन कम्युनिस्ट पक्षाची विसावी परिषद. स्थळ मॉस्को. क्रुश्‍चेव्हचं त्या रात्री ऐतिहासिक भाषण झालं. किती तास? तर तब्बल चार तास!! स्टॅलिनचं क्रूर राजकारण व त्यानं घडवून आणलेल्या हत्या. क्रुश्‍चेव्हनं त्या भाषणातून सांगितल्या. पुढं गोर्बाचेव्ह यांनी दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. ‘पेरस्त्राईका‘ व ‘ग्लासनोस्त’(पुनर्रचना व पारदर्शी मोकळेपणा.) अरूण साधुंच्या मते या घोषणांची बीजं. ती क्रुश्‍चेव्हच्या या भाषणात होती. जगभरातले स्टॅलिनवादी कम्युनिस्ट. ते क्रुश्‍चेव्हच्या भाषणानं हादरून गेले. अगदी जगभरातले सगळे कम्युनिस्ट. त्यांनाही या भाषणाची दखल घ्यावी लागली. क्रुश्‍चेव्हचा व्यक्तिगत त्यागही मोठा. त्याचा मोठा मुलगा लढाऊ वैमानिक होता. तो जर्मनीविरूद्धच्या लढाईत मारला गेला; मात्र  क्रुश्‍चेव्ह त्या दु:खातूनही बाहेर पडला. क्रुश्‍चेव्हनं ‘युक्रेन’ प्रांताची देखील पुनर्बांधणी केली. कधी? तर युद्धोत्तर काळात. ते करताना त्यानं स्टॅलिनचा विश्‍वास कमावला होता हे विशेष!  मारून मुटकून करावं लागलं त्याला हे; मात्र करणार काय? स्टॅलिनपासून स्वत:ला जिवंत वाचवण्याची कसरत साधी नव्हती. ती त्याला करावी लागली. तसंही क्रुश्‍चेव्हकडे राजकीय संयम अफाट होता असं म्हटलं पाहिजे. अर्थात क्रुश्‍चेव्हनंही त्याच्या सत्ताकाळात दडपशाही केलीच. पोलंड व हंगेरी. हे दोन देश. तिथं त्यानं एका अर्थानं ‘स्टॅलिनशाही’च गाजवली. त्यापैकी हंगेरीत तर त्यानं उतमातच केला. हंगेरीची राजधानी बुडापेस्ट. तिथं क्रुश्‍चेव्ह वागला ते स्टॅलिनपेक्षा वेगळं नव्हतं. हंगेरीचा खरा कम्युनिस्ट क्रांतिकारक इम्रे नागी. त्याच्या सात हजार समर्थकांना बुडापेस्टमध्ये ठार मारण्यात आलं. नंतरच्या काळात नागीलाही. काय प्रकरण होतं ते? तर ते वाचकांनी ग्रंथातच वाचावं; मात्र क्रुश्‍चेव्हच्या सत्ताकाळात रशियाची एकूण प्रतिमा सुधारली. साधुच तसं सांगतात. ती प्रतिमा ‘उदारमतवादी देश’ अशी झाली. ‘प्रगतिशील देश’ अशी झाली. ‘उत्साही देश’ अशी झाली. ‘गरीब राष्ट्रांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी उदारपणे मदत करणारा समाजवादी रशिया’ अशी ही ती प्रतिमा झाली. याचं आणखी एक कारण साधू सांगतात. क्रुश्‍चेव्हचं दिलखुलास व्यक्तिमत्व. काही प्रसंग. त्यात क्रुश्‍चेव्ह कठोर वागला; मात्र तो पाताळयंत्री व क्रूर होता का? तर तसं म्हणता येत नाही. त्याच्याकडे एक संयमी शहाणपणही होतं. रशिया व अमेरिकेत युद्ध पेटण्याची वेळ आली होती. कशावरून? तर ‘क्यूबा’मध्ये अण्वस्त्र ठेवण्यावरून. अक्षरश: अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर होते दोन्ही देश! जगानं श्‍वास रोखून धरलेले. त्यावेळी क्रुश्‍चेव्हनं दाखवलेलं संयमी शहाणपण सगळ्या जगानं पाहिलं. त्यानं क्यूबात आणलेली अण्वस्त्र मागं घेतली. हा सगळा तपशिलही वाचकांनी आवर्जून वाचावा असा.
पुढं गोर्बाचेव्ह यांचे निर्णय. ते एकाहून एक अफलातून ठरले. अमेरिकेशी चाललेली अण्वस्त्रस्पर्धा. ती त्यांनी थांबवली. या दोन देशातली महाभयंकर खुन्नस! ती त्यांनी कमी केली. अफगाणिस्तानात रशियन फौजा होत्या. त्या त्यांनी काढून घेतल्या. त्यामुळं रशियन सैनिकांची मोठी प्राणहानी टळली. अणुयुद्धाची भीती. त्यातून जगाला बाहेर काढलं त्यांनी. बर्लिनमधील भिंत पडली व जर्मनीचं एकीकरण झालं. त्यामागं गोर्बाचेव्ह यांची धोरणंच होती. पूर्व युरोपात त्यावेळीही कम्युनिस्ट सत्तेवर होतेच. कुठं कुठं सत्तेवर होते ते? तर पोलंडमध्ये होते. हंगेरीत होते. पूर्व जर्मनीत होते. झेकोस्लोव्हाकियात होते. रूमानियात होते. अल्बानियात होते. त्या कम्युनिस्ट राजवटी. त्या धडाधड कोसळल्या. तिथली कम्युनिस्ट दडपशाही. ती जनतेनं झुगारली. खर्‍या स्वातंत्र्यासाठी तिथं उठाव झाले. त्यामागं प्रेरणा गोर्बाचेव्ह यांचीच होती. गोर्बाचेव्ह यांना शांततेचं ‘नोबेल’ मिळालं. फक्त एक झालं. गोर्बाचेव्ह हे सोविएत युनियनला एकसंघ नाही ठेवू शकले. खूप इच्छा असूनही त्यांना ते करता आलं नाही. सोविएत युनियनचे तुकडे पडले. एका महासत्तेचा अंत झाला. कसं घडलं हे सगळं? ते वाचकांनी अरूण साधुंच्याच शैलीत वाचावं. चक्रावून टाकणारा सगळा काळ आहे तो! बेलारूस हा प्रांत. तो सोविएत युनियनमधून फुटला. जॉर्जिया फुटला. युके्रन फुटला. अर्मेनिया फुटला. कझाकस्तान फुटला. ताजिकीस्तान फुटला. उझबेकिस्तान फुटला. या फाटाफुटीचे परिणाम? तेही होतेच. तेही साधुंनी सांगितले आहेत. ग्रंथाच्या शेवटी हा सर्व भाग आलाय. तो वाचकांनी काळजीपूर्वक वाचावा असा. गोर्बाचेव्ह यांच्यानंतर सत्तेवर आला बोरिस येल्त्सिन. त्यानं  सर्वच क्षेत्रात उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं. या उदारीकरणाचा एक परिणाम अटळ असतो. अनेक क्षेत्रात ‘माफिया’ तयार होतात. रशियातही हे कसं झालं? ते वाचकांनी मुळातून वाचावं.
शेवटचा महत्त्वाचा मुद्दा. भौतिक सुधारणा. त्यासाठी जगभर उलथापालथी होतात अशा. मार्क्सनं हेच तर ठासून सांगितलं. काय? तर मानवजातीला आधी अन्न हवं. पाणी हवं. निवारा हवा. वस्त्र हवं. अन् ते राजकारण, शास्त्र, कला, धर्म याच्या आधी व्हावं. बाकीच्या गोष्टी नंतर. डार्विननं सचेतन सृष्टीचा नियम शोधला. मार्क्सनं मानवी इतिहासाच्या विकासाचा नियम शोधला. अरूण साधू हा मुद्दा ग्रंथाच्या सुरूवातीलाच मांडतात; मात्र भौतिक सुधारणांनंतर पुढं काय? ते शेवटी हा प्रश्‍नही विचारतातच. त्याचं उत्तरही ते देतात. ‘राजकीय तत्वज्ञानांना विशुद्ध व वैज्ञानिक अध्यात्माची जोड’ हे ते उत्तर. भांडवलशाही प्रतिगामी होतीच. कधी? तर मार्क्सनं मार्क्सवाद सांगितला तेव्हा. तेव्हा ती कामगारांना छळणारी होती. शोषण करणारी होती. साम्यवादानं केलं काय? तर या भांडवलशाहीवर जगभरातच दबाव आणला. तिला कल्याणकारी व्हायला भाग पाडलं बर्‍याच ठिकाणी. कामगार कायदे त्यामुळं जगभर सुधारले. प्रागतिक झाले. हे साम्यवादाचं यश. याचा एक अर्थ असा. साम्यवादाच्या अशा यशातच साम्यवादी चळवळीचा अंत आहे. कारण भांडवलशाही मानवी कल्याणाचा विचार करणार असेल तर? तर तिला उत्तर द्यायला साम्यवादाची गरज उरत नाही; मात्र हे सगळं इतकं सोपंही नाही. विशेषत: आपल्यासारखे देश. त्यांना सगळ्या गोष्टींचा नीट विचार करावा लागेल. शोषण व हिंसा. मानवी इतिहासाला चिकटलेल्या या गोष्टी. त्याच्या मुळाशी जावं लागेल. हे फार गुंतागुंतीचे प्रश्‍न आहेत; मात्र उत्तरं शोधावी लागतील. देशाची एकसंघता! तिला अत्यंत काळजीपूर्वक जपूनच ही उत्तरं शोधावी लागतील. अरूण साधुंचा ‘तिसरी क्रांती’ हा ग्रंथ. हे प्रश्‍न निर्माण करतोच. त्या प्रश्‍नांचा विचार करायला भाग पाडतो आपल्याला. हे या ग्रंथाचं व लेखक म्हणून अरूण साधुंचं मोठं यश! याच प्रश्‍नाची उत्तरं लक्षावधी कॉम्रेडस् शोधत होते जगभर! त्यांना खरोखर लाल सलाम; मात्र अहिंसक लाल सलाम!! हा सलाम त्यांच्या स्वार्थत्यागाला!! त्यांच्या धैर्याला!! त्यांच्या प्रागतिक दृष्टिकोनाला!! अन् हो, एक नम्र लाल सलाम त्या मार्क्सबाबाला व जेनी मार्क्स नावाच्या त्याच्या अंबाबाईलाही!! अन् यासाठी कम्युनिस्टच असायला पाहिजे असा काही नियम नाही.
- महेश मांगले 

९८२२०७०७८५ 
मासिक 'साहित्य चपराक' ऑगस्ट २०१६

1 comment: